एक परिपूर्ण आयुष्य !

गेल्या महिन्यातच २४ जून रोजी, माझ्या पपांनी, म्हणजेच श्री प्रकाशचंद्र धर्माधीकारी ह्यांनी आपला ७८वा वाढदिवस साजरा केला. फोन वरून मी त्यांचे अभिनंदन केले. बॉटनी ह्या विषयाचे प्राध्यापक आणि प्रिंसिपल पदावरून सेवानिवृत्त झालेले, सहसा माफकच बोलणारे, असे माझे पपा त्या दिवशी मात्र का कुणास ठाऊक खूप वर्षांनी फोनवर माझ्याशी चक्क पाच मिनिटे बोलले. नेहमीपेक्षा थोडे जास्ती भावुक होऊन बोलले. मला त्याचे फार अप्रूप वाटले अन त्याचबरोबर मी थोडी हळवीही झाले. हे वाचणाऱ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की आजच्या technologically driven काळात जेथे whatsapp, skype आणि facebook सारख्या सहज उपलब्ध संचार साधनांमुळे, तसेच स्वस्त झालेल्या टेलिफोन दरांमुळे लोक तासंतास फोनवर गप्पा हाणतात, तेथे आजही माझ्या वडिलांसारखे काही जण ट्रंककॉलच्या युगाप्रमाणे फोनवर प्रति मिनिट मोजून, शब्दसीमेत संभाषण साधतात !

तर त्या दिवशी अभिनंदन केल्यावर मी त्यांना विचारले, "पपा, आत्मचरित्र वगैरे लिहिण्याबदल काय म्हणता?" एरवी लिखाणाची भरपूर आवड असणाऱ्या, वृत्तपत्रांमधील कितीतरी अवघड मुद्द्यांवर आपल्या दर्जेदार शब्दांची उधळण करीत आपली मते, टिप्पण्या लिहीणाऱ्या माझ्या पपांना, स्वतःचे "आत्मचरित्र" वगैरे लिहिण्यासारखी गोष्ट त्यांच्या आकलना पलीकडची वाटली. स्वतःचे आत्मनिरीक्षण करणे आणि त्यात प्रामाणिकपणा राखणे हे कठीणच आहे. अचानक विचारलेल्या माझ्या प्रश्नाने गांगरलेल्या माझ्या पपांनी किंचित संकोचतच विचारले, "मी असे काय दिव्य केले आयुष्यात, काय लिहू स्वतःबदल?" तो विषय त्यांनी तिथेच संपवला. पुढे संभाषण चालू ठेवत स्वतःच्या घराण्याबदल सांगताना, त्यांच्या वडिलांच्या वैभव भोगलेल्या काळाचे वर्णन (मी कित्त्येक वेळा ऐकले असले तरी) त्याही दिवशी त्यांनी पुन्हा सांगितले अन मी पुन्हा नव्याने ऐकले. पुण्यातल्या लहान तालुक्यांमधील "जुनोनेदिगर" ह्या तालुक्याचे जामीनदार असल्याने शेती, जमिनी असेपर्यंत त्यांच्या घराण्याचे वास्तव्य तेथेच होते. पुढे जामीनदारी प्रथेचा अंत झाल्याने जहागिरी बळजबरी हस्तगत करण्यात आली, त्यांचे घराणे कायमचे पुण्यातून हलले आणि ग्वाल्हेर येथे स्थाईक झाले. पपांचे जन्मगाव अन कर्मक्षेत्र हे ग्वाल्हेरच! ह्या सर्व गोष्टी त्यांच्या लहानपणीच्या ! पण मला माझ्या काही आठवणीही येथे सर्वांना सांगाव्याश्या वाटतात तसेच माझ्या पपांना देखील आज सांगावेसे वाटते, त्यांनी "वडील" म्हणून काय केले! शेवटी आपलं सगळ्यात पहिलं आणि जवळचं नातं - आपल्या आई वडिलांशी असलेलं मुलाचं किंवा मुलीचं नातं !

इतक्या वर्षांनी प्रथमच माझ्या वडिलांबद्दलच्या माझ्या भावनांना व्यक्त करण्याकरिता मिळालेली सोनेरी संधी नक्कीच घालवायची नाही, असं ठरवलं आणि कित्येक लहानपणीच्या आठवणी नव्याने जिवंत झाल्या. माझ्या धूसर आठवणींपासून सुरुवात करायची झाली तर आठवते ते हेच की माझ्या इतर मैत्रिणींच्या वडीलांप्रमाणे, माझे वडील दररोज रात्री ऑफिसमधून घरी येणारे वडील नसून "वीकेंड वडील" होते, म्हणजे दर शनिवारी नोकरीअंती असलेल्या ठिकाणाहून घरी परतणारे वडील ! इतरांचे वडील रोज घरी येतात पण आपले मात्र वीकेंडला, पूर्वी विचित्र वाटणारी ही गोष्ट नंतर सवयीने अंगवळणी पडली. आज स्वतः दोन teenager मुलांची आई झाल्यावर जाणवते ते हेच की दररोज रात्री घरी वेळानेच का होईना परतलेल्या माझ्या नवऱ्याला, मला कित्येक गोष्टी सांगायच्या असतात, मग त्या मुलांच्या शिक्षणाबद्दल असोत किंवा त्यांच्या पुढील करियरसंबंधी असोत. पण बऱ्याचदा तसे होत नाही तेव्हा तीव्रतेने जाणवते की रोज मुलांना अन बायकोला न भेटू शकणाऱ्या माझ्या पपांना weekend लाच काय तो वेळ मिळायचा स्वतःच्या वाढत्या मुलांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देण्याकरिता.

मी स्वतः रसायनशास्त्र ह्या विषयाची पदवीधर आहे, मला माझ्या techno-savvy मुलांच्या कित्येक प्रश्नांची उत्तरें देण्याकरिता आपल्या इंजिनिर नवऱ्याची वाट पहावी लागते. तेव्हा माझ्या मम्मीला कोणकोणत्या घरगुती समस्यांना एकटीनेच तोंड द्यावे लागले असेल ह्याचा प्रत्यय येतो. कायम वेळेचा दंडक पाळणाऱ्या माझ्या मम्मीने नवऱ्याच्या अनुपस्थितीत, एकटीने वेळ-प्रसंगी धाडसाने कित्येक निर्णय घेऊन मितव्ययी पद्धतीने टापटीपपणे संसार करून घरगुती प्रश्नच नव्हेत तर बँकांचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूकी, ह्या क्षेत्रांची बाजूदेखील सांभाळली, त्याचसोबत माझ्या मनाला कळत नकळत कितीतरी पैलू पाडले. ह्याची जाणीव आज होते जेव्हा स्वतः त्याच ठिकाणी उभी राहून मी बरेच प्रश्न सोडवते आहे...

मला आठवते की आठवड्याने घरी परतणारे माझे पपा मला कसे माझ्या सायन्सच्या नोट्स तयार करण्यात किंवा dissection शिकवण्यात मदत करायचे. मी भाग घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या विषयावर कात्रणे, टिपा काढण्यात मदत करायचे. मला लहानपणापासून शाळा कॉलेजात तसेच शरद व्याख्यानमालेत वादविवाद स्पर्धा व लेखन स्पर्धेत भाग घेण्यास उद्यूक्त करणाऱ्या पपांमुळेच मी लिहिती झाले अन निरनिराळ्या मासिकांना वेळोवेळी लेख पाठवण्यास मला स्फूर्ती मिळाली, ह्याचे श्रेय मी त्यांनाच देते. स्वतःला व्यक्त करायला मला आजही आवडते. मग ते वक्तृत्वाच्या माध्यमातून असो वा लिखाणामधून असो! मनातले कागदावर उतरवताना झालेला निर्भेळ आनंद, बक्षीस मिळविण्यापेक्षाही अवर्णनीय असतो हे मी कसे आणि कुणास सांगू? मला हे सुख उपभोगू देण्याकरिता मी ऋतुगंघ ह्या मासिकाची ऋणी आहे.

आज ह्याच संदर्भात एक गमतीदार किस्सा आठवतोय. ग्वाल्हेर येथे दर वर्षी आयोजित होणाऱ्या शरद व्याख्यानमालेत १९९० साली 'आरक्षण एक अभिशाप है या वरदान', हा आम्हाला मिळालेला विषय होता. त्या वर्षी 'अर्जुन सिंग' हे सत्तेत असल्याने, हा गरम राजनैतिक मुद्दा होता. मला आठवते, त्या वर्षी आरक्षण ह्या ज्वलंत मुद्याच्या विरोधात कित्येक विद्यार्थ्यांनी जीव दिला होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदावरून अर्जुन सिंग ह्यांना त्यागपत्र द्यावे लागले होते. तर सांगायचे म्हणजे, नेहमीप्रमाणे माझे वडील शहरात नसल्याने माझ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी ह्या किचकट विषयावरील माहिती इकडच्या तिकडच्या पुस्तकांमधून गोळा करून, ठळक मुद्यांना कागदावर लिहून मग पाठ करणे म्हणजे माझ्याकरिता तारेवरची कसरत होती. आजसारखे online माध्यम नव्हते. संगणक किंवा इंटरनेटचा वापर आज जसा गल्लोगल्ली पसरला आहे तसा त्यावेळी नव्हता. स्वतःचे विचार मांडण्याकरिता शाळेतील वार्षिक संमेलनाखेरीज दुसरा मंच देखील नव्हता. माझी त्रेधातिरपीट उडत असताना, नेमके पपा त्या दिवशी शनिवार ऐवजी एक दिवस आधीच घरी परतले आणि त्यांनी ऐनवेळी येऊन मला माझ्या भाषणात व्हिंस्टन चर्चिलचे जगप्रसिद्ध असे एक वाक्य जोडण्याचा सल्ला दिला...."Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders, politicians will be of low caliber and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles". त्या वेळच्या राजनैतिक घडामोडी आणि त्या संपूर्ण राजनैतिक गोंधळात, सत्तारूढ नेत्यांच्या नाटकी हालचालींना पाहता हे चर्चिल यांचे वाक्य भाषणात वापरल्यामुळे माझं भाषण इतकं प्रभावी झालं की मी त्या वर्षीच्या शरद व्याख्यानमालेची विजेती ठरले आणि मुंबईच्या वृत्तपत्रात माझं नाव, "डॉक्टर दिवेकर पुरस्कार" विजेती म्हणून झळकलं. मराठी वृत्तपत्र ग्वालेहरला मिळत नसल्याने माझ्या मुंबईच्या आत्याने पत्राद्वारे मला ही बातमी सांगितली आणि ती आठवण आजही माझ्या सोबत आहे. तर ह्यात गमतीदार अशी गोष्ट ही होती की ती चर्चिल यांचे इंग्रजीतील वाक्य काही केल्या मला पाठ होत नव्हते. उत्तरभारतीय मुलुखात हिंदी बोलणाऱ्या मैत्रिणींमुळे मला फारसा इंग्रजी बोलण्याचा सराव नसल्याने, तेवढे पाठांतर करून ते स्टेजवर सफाईदार पद्धतीने बोलणे मला थोडे कठीण वाटले. तरीही माझ्या वडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचायला दिलेल्या कित्येक इंग्रजीतील पुस्तकांमुळे माझे इंग्रजी वाचन सुधारण्यात बरीच मदत मिळाली असल्याने मी ते भाषण यशस्वीपणे केले. नंतरच्या वर्षांत मी प्रयत्नपूर्वक इंग्रजी भाषा आत्मसात केली, त्याचेही श्रेय मी पपांनाच देते. मला आठवते त्याच सुमारास त्यांनी मला प्रोत्साहन देण्याकरिता लोकमान्य टिळकांबद्दल सांगितले होते की एकदा भर सभेत टिळकांनी इंग्रजीतून दिलेल्या भाषणाची इंग्रजांकडून बरीच टीका झाली. त्यांच्या इंग्रजी उच्चारात झालेल्या चुकांवरून त्यांची टिंगल झाली असता त्यांनी इंग्रजांना दिलेले उत्तर म्हणजे, "माझ्या इंग्रजीची टर उडवताना लक्षात ठेवा की ती तुमची मातृभाषा आहे आणि जन्मापासून तुम्हाला मिळालेली आहे. मी, ती माझी भाषा नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीने आत्मसात केली आहे". त्यांनी सांगितलेल्या ह्या एका प्रसंगामुळे मला बरेच मानसिक बळ मिळाले.


आपले वडील प्रत्येक मुलीला किंवा मुलाला प्रियच असतात पण एक व्यक्ती म्हणून त्यांचे 'वेगळेपण', जे मी आज जाणत्या परिपक्व वयात ओळखले ते म्हणजे, त्यांची "समाधानी प्रवृत्ती" ! आजच्या भौतीक युगात, पहाते तिथे मेंदूचा वापर करून माणसे फायदा तोटा पाहून लग्नासारखीही नाती जोडतात व तोडतात, तेथे त्यांची ती ह्र्दयाने निर्णय घेण्याची सवय मला वेगळी वाटते. त्यांनी स्वतःच्या लग्नाचा निर्णय देखील ह्र्दयानेच घेतला. त्यात मेंदू वापरून बायको नोकरीची आहे की सासऱ्यांकडून काय आर्थिक मदत होईल ह्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. पैशाची गरज त्यांना नव्हती असे नाही. आज गृहिणी म्हणून घरात राहणाऱ्या बायकोला कमी लेखून सतत पाणउतारा करणारे पुरुष पाहिले की माझ्या पपांचे वेगळेपण जाणवते. त्यांनी माझ्या आईला नॊकरी करच असा आग्रह कधीच केला नाही. एकाचा पगार कुठल्याही काळात तसा अपुराच असतो पण त्यांनी त्याही स्थितीत निभावले. बहुतेक आजही काही व्यक्तींच्या सुखाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असतात. पैसाच त्यांच्या लेखी सर्व काही नसतो...काहीच दिवसांपूर्वी, मी स्टिव्हन कॉनरॅड ह्या लेखकाचे "Pursuit Of Happyness" हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकाच्या शीर्षकातच सर्व आले तरी सुद्धा अर्थ सांगायचा झाला तर आयुष्यातील लहान सहान गोष्टीतून सुखाचा मागोवा घेत आयुष्य एक पर्व म्हणून जगणे ! त्या पुस्तकातून वाचकांना फक्त एकच सोपा सरळ संदेश दिलेला आहे आणि तो म्हणजे .."वर्तमानात जगा" !

आज माणसं सतत गणितीय आकडेमोड करत भविष्याच्या बेगमीसाठी वर्तमान घालवतात. अशी जगतात जशी कधी मरणारच नाहीत अन अशी मरतात जशी कधीच जगलीच नाहीत. माझ्या पपांचे भावविश्व् इतरांपेक्षा वेगळे आहे असेच मी म्हणेन. सेवानिवृत्ती नंतरचे उर्वरित आयुष्य, ते ग्वाल्हेर येथे आपल्या छंदात रमून घालवतात. त्यांच्या दुपारी अन संध्याकाळी आता ऐतिहासिक कादंबऱ्यांचे अफाट वाचन करण्यात, बागकाम करण्यात, संगीत विश्वात रमून, व्हायोलिनचे नित्य नवीन सूर बरसवण्यात जातात. चार चौघात बसून, उगाच निंदा नालस्ती, फुकटच्या गप्पा ठोकण्यापेक्षा, माझे पपा स्वतःचे मनोरंजन अशा रचनात्मक आणि सृजनात्मक पद्धतीने करतात. तेव्हा मला वाटते की एखाद्याने खरंच आयुष्याची संध्याकाळ घालवावी तर अशीच ! खऱ्या अर्थाने हेच आदर्शपणे जगलेले म्हातारपण, म्हणजेच शेवटी एक परिपूर्ण आयुष्य !

- सौ रुपाली मनीष पाठक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा