3G-4G काळातली किशोरावस्था आणि हरवलेले बालपण

"कड़ी धूप में अपने घर से निकलना,
वो चिड़िया, वो बुलबुल, वो तितली पकड़ना, 
वो गुड़िया की शादी में लड़ना झगड़ना,
वो झूलों से गिरना, वो गिरके सम्हलना
कभी रेत के ऊँचे टीलों पे जाना,
घरौंदे बनाना, बनाकर मिटाना"...

जगजीत सिंह यांची ही जुनी गझल मी जेंव्हा जेंव्हा ऐकते तेव्हा मला माझे बालपण आठवते, म्हणजे ७० ते ८० च्या दशकात जन्मलेल्या आणि ९० च्या दशकात किशोरवयीन झालेल्या पिढीला तरी ह्या गझल मधले "बालपण" लाभले होते. नुकत्याच सुरु झालेल्या दूरदर्शनच्या काळापर्यन्त तरी हे चित्र टिकून होते, असे म्हटले तरी चालेल.

आपल्या सर्वांनाच उन्हाळ्याच्या सुट्टीत गच्चित बसून स्वतः घरीच रंगीत कागदातून तयार केलेली पतंग उड़वणे, साप शिडी खेळणे, मातीत पाय घालून किल्ला बनवणे लक्षात असेलच. ह्या असल्या बालपणच्या आठवणी आपल्यातल्या कित्येक पालकांना ओळखीच्या वाटतील, पण आपल्या teenage मुलांना मात्र हे चित्र ठाऊकच नाही. त्याला कारण म्हणजे आजची तांत्रिक दृष्ट्या प्रगत, यूट्यूब-चलित 3G, 4G सोसायटी! 

त्यांचे संपूर्ण विश्वच तसे "डिजिटल"! ऑफलाइन जग ही असते, त्यात खरे खुरे आयुष्य ही जगायचे असते हे त्यांना माहित नाहीच, असे वाटते. त्यामुळे यूट्यूबवर अपलोड केलेले सहस्त्र वीडियोज् पाहणे हीच काय ती weekend ला केलेली करमणुक! मला आठवते माझ्या लहानपणी मुलांना करमणुकी करता काहीही चालायचे, अगदी रस्त्यावर बसलेल्या गायींची शेपटी खेचून, कुत्र्या माजरांचे आवाज़ काढू-नही मस्त करमणुक व्हायची.

आज मुलांचे आयुष्य सोमवार ते शनिवार क्लासेस च्या वेळापत्रकात बंदिस्त झाले आहे. त्यामुळे, आपल्याला वाटते तेवढे त्यांचे आयुष्य चिंतामुक्त नाही. नक्कीच, ९० च्या दशकातील किशोरावस्था, ह्या तुलनेत पुष्कळ ताणरहित होती असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. त्यातून सिंगापूर सारख्या देशातली संस्कृति मुळातच workaholic. सेकेंडरी स्कूल पर्यन्त येताच मुले सुट्टीत पार्ट-टाइम काम शोधतात; वेळ फुकट घालवत नाहीत. माझ्या मुलांनीही जेव्हा मला विचारलं की त्यांनाही काही पार्ट-टाइम मिळकती चे पर्याय शोधायचे आहेत तेव्हा मला नवल वाटले नाही. मात्र peer pressure काय असते ते त्या क्षणी जाणवले. सर्व मित्र आपापल्या खर्चा करता आई-वडिलांवर अवलंबून न राहता पार्ट-टाइम जॉब करतात, मग आम्हीही करतो असे म्हटल्यावर मला आपण राहत असलेल्या देशांची सांस्कृतिक घडण अन् त्याची आपल्या मुलांवर झालेली पकड प्रकर्षाने जाणवली. मग आता पार्ट-टाइम काम धरल्यावर सुट्टीतला तो निवांतपणा आणि सुट्टीतले ते खेळ कालबाह्यच झाले आहेत, नाही का?

बऱ्याचदा विचार येतो की आपण ’९० मध्ये अनुभवले ते आयुष्य खरच सोपे होते का? आजची किशोर मुलं फारच व्यावहारिक झालेली दिसतात (बऱ्या वाइट दोन्ही संदर्भात😢) मला आठवते, अगोदर मुलानी करियर कुठले निवडावे हा निर्णय सार्वजनिक पणे घरातले मोठे, शेजारी, दूरचे काका मावश्या घेत असत. आज आपल्याला कुठल्या क्षेत्रात करियर करायचे अन् त्या करता कुठला कोर्स निवडावा मग योग्य त्याच दिशेनं पावल उचलून निर्णय घेणारा आजचा तरूण निश्चितच जास्तं सूज्ञ वाटतो!

ह्या त्यांच्या चिकित्सक विचारसरणीमुळे व मिळालेल्या तांत्रिक साक्षरतेमुळे मुलांसमोर आता आई-वडील अधिकच अडाणी भासतात.

मला आठवतं, पूर्वी घरा करता नवीन काही वस्तू म्हणजे फ्रिज, टीव्ही जरी घ्यायच्या झाल्या तरी माझे वडील त्यांच्या पेक्षा मोठ्या लोकांना विचारून चौकशी करून घेत असत. आणि आता मात्र मोबाइल, संगणक, लॅपटॉप इतकेच कशाला साधे इंटरनेट जरी घ्यायचे झाले तरी घरातल्या तरुणांचा सल्ला घ्यावा लागतो कारण त्यातील तांत्रिक बाबींची जाण त्यांना जास्तं असते.

फक्त ‘मोठं’ म्हणून कुणाचा सल्ला नाही घ्यायचा. जर कुणी माहितगार असेल आणि मग जरी वयाने लहान असेल तरी त्याचे म्हणणे ऐकावे, असा नव्या युगातील नवा पाठ, मला माझ्या किशोरवयीन मुलाने त्या दिवशी शिकवला. आता विचार करून पहा, चाइल्ड लॉक कसा वापरतात हे सुद्धा पालकांच्या आधी मुलांना माहित असते. तसेच, घरातील wifi कनेक्शनचा पासवर्ड देखील आजकाल मुलांजवळच असतो. वरचेवर तो पासवर्ड बदलतात देखील तेच! म्हणजे आता तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण कसे काय ठेवायचे? घरातल्या कुठल्या कोपऱ्यात बसून मुलगा काय डाऊनलोड करेल आणि मुलगी काय अपलोड करेल ह्यावर तुमचा काहीच जोर नाही. पुनः जास्ती शिस्त /बंधन घालायचा प्रयत्न आज कुठल्याही पालकांना शक्यच नाही कारण तसाच किशोर वयापर्यंत येता येता पालक आणि मुलं ह्यांच्यात वरचेवर खटके उड़णं सुरु झालेले असतच. आठवून पहा, आपल्यालाही किशोरावस्थतेत सक्ती आवडत नसे. त्यामुळे उगाच मुलांच्या मनात आपल्याबद्दल तिढा वाढू नये ह्याची दक्षता घेत, प्रसंगी, तटस्थ राहून मूक मार्गदर्शनही करावे लागते.

आजकाल इंटरनेट वर माहितीपूर्ण वीडियोज् इतके आहेत की आता म्हटलं तर ते वीडियोज् पाहुन मनात असेल ती शंका वेळीच दूर करून भरभर नवनव्या कला, विषय आत्मसात करता येतात. नको तितके वाह्यात वीडियोज् देखील आहेतच. म्हणजे फायदा, नुकसान दोन्ही. तसे ह्या यूट्यूब ने आपल्या सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळेच आपण ही मनसोक्त इंटरनेट क्रांतीचा उपभोग घेत आहोतच. 😊 

पूर्वी म्हणजे जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा कित्येक प्रश्न अनुत्तरित रहायचे. मला आठवते माझ्या किशोरावस्थेत मला Rubik’s Cube सोडवणं म्हणजे अतिशय कठीण अशी गोष्ट वाटायची पण माझ्या मुलाने फार कमी वयातच रूबिक्स क्यूबवरील ट्युटोरियल पाहून ते सोडवून मला विचारात पाडले. पुन्हा मी माझ्या मुलाला शाबासकी दिली तर तो म्हणाला, "ममा, मी अजुन वीडियोज् पण पाहिले इतर काही मुलांनी माझ्याही पेक्षा कमी वेळात रुबिक्स क्यूब सोडवले आहे". म्हणजे त्याच्या करता पुनः नवे आव्हान!😢

नंतर आपलाच रेकॉर्ड आपणच तोडायचे, म्हणजे पुनः नवा प्रयास, नवे आव्हान. त्यामुळे मला वाटले की आजच्या मुलांचं विश्व जरा जास्तीच नित्य नवीन आव्हानांनी व्यापून गेलं आहे. झपाट्याने बदलत्या प्रोग्रेसिव समाजात, वाढणाऱ्या महत्वाकांक्षांमुळेच, पालकांनाही हे म्हणणे जमत नाही की बाबा मस्त मजेत वेळ घालवत आयुष्य जग... पतंग उडव बिनधास्त !😊, 

सिंगापूर जगातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देशात गणला जातो. इथे टिकणं म्हणजे सततच्या जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणं. म्हणतात ना, "stress & progress go hand in hand". स्पर्धा असेल, तेथेच प्रगति, आणि सोबत ताण!

तेव्हा आजची मुले लवकर शिकतात, कदाचित पियर प्रेशरमुळे. पाहुन आनंद होतो पण तो आनंद लगेच अर्धा होतो जेव्हा मुलगा म्हणतो, "ममा, जास्तं उंच उडू नको, सर्वांना येतय रुबिक्स क्यूब ". 😢

मी विचारात पडते सारखी, पूर्वी आपण जास्तं समाधानी आयुष्य जगलो. कदाचित म्हणूनच, आपली किशोरावस्था, दूरदर्शनचे मोजके धारावाहिक पाहत, काहीशा कमी चुरशीच्या वातावरणात छान पैकी जगता आली. पुन्हा अपेक्षा देखील माफक असल्याने, " थोड़ा है थोड़े की जरूरत है" या मानसिकतेमुळे आयुष्य तसे सुखासीनच वाटले. 

आपणा सर्वांना जाणवत असेलच की आजच्या इंटरनेट व चुरशीच्या जगात मुलांवर काय दडपण असेल. इंटरनेट व तंत्रज्ञान त्यांचे प्रश्न चटकन सोडवत असेल पण ह्यामुळे ही मुले फार रिलॅक्स आहेत असं अजिबात नाही. उलट, त्यांचं आयुष्य जास्तं जटील झालं आहे. माझी ९० सालातली किशोरावस्था जास्त साधी सोपी आणि रम्य होती.

आता "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा", किंवा “ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी. मगर मुझको लौटा दो बचपन का वो सावन”, अशी मागणी देवाला केली, तरी ते रम्य "लहानपण" वयाच्या दुसऱ्याच वर्षी डे केअर ला जाणाऱ्या टाॅड्लरला नाही समजणार. 

"वो मासूम चाहत की तस्वीर अपनी,
वो ख्वाबों खिलौनो की जागीर अपनी
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी"

खैर, वो दौर कुछ और था ये दौर कुछ और है. "कालाय तस्मै नमः!". असेच म्हणत, मी आपला निरोप घेऊन आपणास फक्त एवढेच विचारते, आजचे टेक्नोसॅव्ही बालपण, तारुण्य वाटतं तितकं रिलैक्स आहे का?
मी तर म्हणेन, बड़ी खूबसूरत थी वो हमारी ज़िंदगानी…..

- रुपाली पाठक










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा