संवेदक – संवेदिका (मानव आणि यंत्रमानव यांच्या मैत्रीची विज्ञानकथा)

१८:४५ च्या सुमारास हातावरच्या जैवघड्याळाने २५० कॅलरीज बर्न झाल्याचा मंजूळ नाद केला आणि तळ्याकाठी धावणारा सौरभ भानावर आला. “अरेच्या, एवढे वाजले? आता १५ मिनिटांत मॉड्युलमध्ये पोहोचले पाहिजे, संवेदक वाट पाहत असेल” असे काहीसे पुटपुटत तो त्वरेने त्याच्या मॉड्युलकडे – घराकडे – जायला निघाला.

हा “संवेदक” म्हणजे सौरभचा अगदी जन्मापासूनचा मित्र! म्हणजे सौरभची “चाहूल” लागताच त्याच्या आईने हॉस्पिटलमधल्या मागणी-रजिस्टरमध्ये नोंदविलेला आणि तान्हुल्या सौरभच्या गृहप्रवेशाबरोबर आणलेला यंत्रमानव – सौरभचा “संवेदक” !

“कंप्युटर हे एक भावनारहीत यंत्र आहे”, ही संकल्पना नष्ट होऊन आज २००० वर्षे उलटली होती. त्या वेळेस-म्हणजे आजपासून २००० वर्षांपूर्वी- तर पृथ्वीवरच्या मानवजातीसमोरच्या बिकट प्रश्नांचा अगदी कडेलोट झाला होता. गुन्हेगारी, आतंकवाद, लोकसंख्येचा विस्फोट, नैसर्गिक साधनसामग्रीचा झपाट्याने होणारा ह्रास..... किती म्हणून पाढा वाचायचा ! अशावेळी निसर्गानेच आपला समतोल सुधारायला सुरवात केली (इतिहासाची पुनरावृती झाली, कारण असाच प्रकार सुमारे ६.५ करोड वर्षांपूर्वी डायनासॉर्सच्या बाबतीत घडला होता. १६ करोड वर्षे पृथ्वीच्या पाठीवर सुखेनैव संचार करणारे हे अजस्त्र प्राणी निसर्गाच्या एका जोरदार तडाख्यामुळे अगदी नामशेष झाले. एका थिअरीनुसार डायनासॉर्समुळे उत्क्रांती थांबली होती, जीवनचक्र अडकले होते, ते सुरळीत करण्यासाठी निसर्गानेच त्यांचा संहार घडवून आणला, असे म्हटले जाते). 

ईसवी सन २००० च्या सुमारास कधीतरी पृथ्वीवरील अमेरिका नावाच्या एका खंडात निवडणुका झाल्या, त्यातील अनपेक्षित निकालांमध्ये बव्हंशी बाह्य-जगाला अप्रिय असे उमेदवार निवडून आले; आणि त्यापाठोपाठ सुरु झाली ती विनाशकारी युद्धांची मालिकाच ! पुढील पाच शतकांत जगाने ९ सर्वनाशी महायुद्धे पाहिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने युरोपचा नकाशा बदलला असे म्हटले जायचे; पण या महायुद्धांनी तर मनुष्याचा जनुकीय नकाशाच पालटून टाकला. सर्वत्र चाललेला नरसंहार पाहून मानवी विकारांना चालना देणारा मेंदूतला “अॅमिग्डला” (Amygdala) हा भाग फार झपाट्याने कमी झाला आणि सुसंस्कृत मेंदूची (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स – Prefrontal Cortex) अतिशय जोमाने वाढ झाली. याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरील मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ आणि मनोविकार जवळपास पूर्ण नष्ट झालेला असा झाला. ईसवी सन १३०० च्या संत ज्ञानेश्वरांचे मागणे “दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।“ अगदी खरे झाले. मागील उण्यापुऱ्या दोन हजार वर्षांत पृथ्वीची लोकसंख्या ७०० कोटींवरून घटून फक्त ७५ कोटी उरली होती. सर्वसाधारण १५० वर्षे आयुर्मान असणारे, निष्पाप मनांचे सुसंस्कृत, जाणकार नागरिक. ईसवी सन १५०० च्या सुमारास सर थॉमस मोर यांनी युटोपिया (Utopia) या आदर्श वसाहतीची संकल्पना मांडली होती, किंवा त्याहीपूर्वी फार कधीतरी ऋषी वाल्मिकी यांनी रामराज्य श्लोकबद्ध केले होते; तीच कल्पना आज ईसवी सन ४००० मध्ये पूर्ण सत्यात उतरली. 

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एका चांगल्या मित्राची (True Friend) गरज असते, हे सूत्र आता जगाने मान्य केले आहे आणि आजच्या संगणकप्रधान युगात मनुष्याचा सर्वात चांगला मित्र म्हणजे त्याचा समविचारी (Same Wavelength) असणारा संगणक किंवा यंत्रमानव. आज मूल जन्माला येताच त्याला एक संवेदक (मुलाला संवेदक आणि मुलीला संवेदिका) असाईन केला जातो. अगदी लहानपणापासून मुलाने आपले मन संवेदकापाशी मोकळे करायचे, प्रश्न पडल्यास त्याच्याशी दिलखुलास चर्चा करायची आणि अशावेळी संवेदक मुलाला त्याच्यासाठी परिपूर्ण (Perfect) सल्ला देई. एका छोट्या क्लृप्तीने हे साध्य झाले होते. दर महिन्याच्या सुरवातीला त्या मुलाच्या विचारतरंगांचा आलेख काढून तो संवेदकाला फीड केला जाई, अशा तऱ्हेने संवेदक मुलाच्या विचारांचे हुबेहूब प्रतिबिंब आपल्या प्रोग्राममध्ये बनवून मुलाला रामबाण असा सल्ला देई. जॅकस लाकान (Jacques Lacan) या फ्रेंच मानसोपचारतज्ञाने पूर्वी एक “Mirror Stage” म्हणून थिअरी मांडली होती, त्याचीच “संवेदक” ही मूर्त अवस्था होती. असो ! आपण आता कथेच्या सुरवातीला म्हटलेल्या सौरभच्या संवेदाकाकडे वळूया.

१९:१० वाजता सौरभने त्याच्याकडच्या बायोमेट्रिक चावीने दार उघडून मॉड्यूलमध्ये प्रवेश केला. नंतर वॉश आणि एनर्जी ड्रिंक घेऊन फ्रेश झाल्यावर त्याने अभ्यासाला सुरूवात केली. साधारण १५-२० मिनिटे झाल्यावर तो टॅब बंद करून आपणहून संवेदकासमोर मन मोकळे करायच्या उद्देशाने येऊन बसला. संवेदकाने बोलायला सुरुवात केली, “हॅलो सौरभ, आज नेहमीपेक्षा ५० कॅलरीज जास्त बर्न केल्यास, तुला मॉड्युलमध्ये यायलाही उशीर झाला, टॅबवर तू कालचाच प्रोग्राम परत लिहिलास, अभ्यास सुरू असतांना तुझ्या श्वासांची गती अनियमित होती आणि तुझे मेंदूतील स्मृतिकेंद्र वारंवार जागृत होत होते, असे तुझ्या बुब्बुळांच्या आणि जिवणीच्या हालचालीवरून वाटले. यावरून तू कुठल्यातरी आठवणीत गर्क आहेस, असा निष्कर्ष मी काढत आहे !”

“आज लॅबमध्ये गार्गी आणि माझी एकत्र असाईनमेंट होती...” सौरभने सुरवात केली. “असाईनमेंट संपल्यावर आम्ही टू अवर्स भरपूर गप्पा मारल्या. आय रिअली लाईक हर नेचर...” सौरभच्या सुरात ठामपणा होता.

आजच्या युगात मुलामुलींनी स्वतःसाठी अनुरूप जोडीदार निवडणे यात काहीच वावगे नव्हते. भावनाप्राबल्य नसलेल्या सुसंस्कृत, निरागस मेंदूसाठी तर ही सहजसाध्य गोष्ट होती. मुलांच्या वयाच्या १५व्या वर्षी आवश्यक ते लैंगिक ज्ञान शाळेकडून दिले जायचे. (अर्थात, त्यांच्या निरागस मनासाठी तो सिलॅबसचा एक भाग होता, एवढेच.) साधारण २०व्या वर्षी दोघांनी अनुरूपता ओळखून एकत्र शिक्षण पुरे करायचे आणि २५व्या वर्षापासून सहजीवनाला सुरुवात करायची. आता आपला सौरभ २० वर्षांचा झाला होता आणि त्याच्या मनाचा कल गार्गीकडे होता.

“गार्गी... म्हणजे मॅथेमॅटिक्स मॉड्युल घेऊन त्यातच पुढे कॅरिअर करू इच्छिणारी तुझी क्लासमेट, राईट?” संवेदकाने विचारले.
“हो” – सौरभ

आता संवेदकाने अर्ध्या मिनिटाचा पॉझ घेतला. आपल्या विद्युतजनित्राद्वारे इलेक्ट्रिक रिपल्स निर्माण करून त्याने सर्व शक्याशक्यता (possibilities) पडताळून पाहिल्या. वर उल्लेखिल्याप्रमाणे जोडीने एकमेकांना शिक्षणात मदत करायची, हा सध्याच्या समाजव्यवस्थेचा एक अलिखित नियम होता; आता गार्गीने “डीफरन्शिअल मॅथेमॅटिक्स” हे मॉड्युल घेतले होते आणि सौरभने “अॅव्हिएशन सायकॉलॉजी” !

दोघांचे इंटरेस्ट निराळे असल्यामुळे त्यांची अनुरूपता जुळत नव्हती, हे स्पष्ट होते. संवेदकाच्या विश्लेषणानुसार पुढील दोन पर्यायांची संभाव्यता (probability) सर्वात अधिक होती. एकतर गार्गीची संवेदिका तिला सौरभचा प्रस्ताव न स्वीकारण्याचा (जर त्याने गार्गीला सहजीवनाबद्दल विचारले असेल तर) सल्ला देईल (ज्याची संभाव्यता = ८१%) अथवा गार्गी स्वतःहून सौरभचा प्रस्ताव नाकारेल (ज्याची संभाव्यता = ६८%).

“गार्गीला मी आज सहजीवनाबद्दल विचारले” – इति सौरभ. “ती म्हणाली, तिने संवेदिकेबरोबर काही दिवसांपूर्वी मन मोकळे केले, आणि संवेदिकेने तिला हा प्रस्ताव – आल्यास - नाकारण्याचा सल्ला दिला होता,” सौरभच्या बोलण्यात किंचित नाराजीचा सूर उमटला होता. त्याच्या ब्रेनमधल्या सिंग्युलेट कॉर्टेक्समध्ये जोरदार अॅक्टिव्हिटी सुरू असणार, तर्कशुद्ध विचार भावनांवर विजय मिळवण्याचा खटाटोप करत असणार, हे संवेदकाने ताडले. दीड मिनिटांतच सौरभ स्वस्थ झाला आणि पुढे सांगू लागला, “गार्गीची संवेदिका म्हणते की विश्लेषणात्मक (analytical) विचार करणारी गणिती प्रज्ञा ही भावनिक प्रज्ञेपेक्षा (emotional intelligence) केव्हाही उजवी ठरते, निरपेक्ष निर्णय घेणे हे गणिती प्रज्ञेला चटकन जमू शकते. तुमचे कोशंट्स वेगळे असण्यामुळे तुमचे सहजीवन जुळण्याची संभाव्यता (probability) ३८% एवढी आहे. (ती माझ्या गणनेनुसार ७२% येते, संवेदकाच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये शब्द उमटले, पण त्यात सापेक्षता (biased) असणार हे उघड होते.)

“आय थिंक आय विल गिव्ह अप द थॉट...” सौरभने समारोप केला.
“वेट सौरभ, गार्गीच्या संवेदिकेचे मत आहे की, विश्लेषणात्मक विचारांनी भावनिक विचारांवर मात करता येते, आणि हेच नकाराचे एकमेव कारण आहे”
“होय”
“मग गार्गीला वैचारिक द्वंद्वाबद्दल विचारशील का?”
“म्हणजे?”
“आय कॅन प्रुव्ह टू हर ...  भावनिक विचारधारा ही काही वेळेस तार्किक विचारधारेवर मात करू शकते”
आता हे काहीतरी नवीन घडत होतं. आपल्या मित्रासाठी एका यंत्रमानवाने दुसऱ्या यंत्रमानवाला वादविवादात हरवायचं आणि तेदेखील दुसऱ्या यंत्रमानवाच्या सखोल ज्ञान असलेल्या विषयात ! हे नक्कीच सोपं नव्हतं.

एक तारीख ठरवून सौरभ त्याच्या संवेदकाचे प्रोसेसिंग युनिट गार्गीकडे घेऊन गेला. त्याने प्रोसेसिंग युनिटला मेन सप्लाय केबलबरोबर जोडून कार्यान्वित केले. सुरु होताच संवेदक म्हणाला, “हॅलो संवेदिका आणि गार्गी, जर मी सिद्ध केले की भावनिक विचारधारा ही तार्किक विचारधारेवर परीस्थितीनुरूप मात करू शकते, तर संवेदिका तुझा आणि पर्यायाने गार्गीचा सौरभला होकार असेल?”
“हो” संवेदिकेकडून उत्तर आले
“ओके, आता मी माझा प्रश्न विचारतो. माझ्या स्क्रीनवर उमटलेल्या चित्राप्रमाणे समजा एक रिकामी ट्रॉली अनियंत्रित वेगाने धावत आहे. थोड्याच वेळात ती ट्रॉली पुढे जावून पाच निष्पाप मजूरांना चिरडणार आहे, ज्यांना याची काहीच कल्पना नाही. एक माणूस लीव्हरजवळ उभा आहे. जर का त्याने ट्रॅक चेंज केला तर पाच जीवांचे जीव वाचतील पण एका मजुराचा नाहक बळी जाईल. दोन्ही ट्रॅक्स उत्तम वापरात असून सुस्थितीत आहेत. अशा वेळी त्या माणसाने काय करायला पाहिजे असे तुला वाटते?”



७ सेकंदांचा पॉज घेतल्यावर संवेदिका म्हणाली,”एका माणसाचा जीव जाऊन पाच माणसांचे जीव जर वाचत असतील, तर त्या माणसाने ट्रॅक चेंज करायला पाहिजे”
“उत्तराबद्दल थँक्स” संवेदक म्हणाला, “आता ह्या सीनला थोडसं चेंज करूया. माझ्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे यावेळी तू एका ब्रिजवर उभी आहेस, तीच रिकामी ट्रॉली अनियंत्रित वेगाने धावत आहे. यावेळी तुझ्यापुढे एक जाडजूड माणूस उभा आहे. जर का त्याला तू खाली ढकललंस तर ट्रॉली त्याला अडकून नक्की थांबेल आणि ५ जीव वाचतील, पण तो एक माणूस बिचारा मरेल. अशावेळी तू काय करशील?”


यावेळी मात्र संवेदिकेने २० मिनिटांचा मोठ्ठा पॉज घेतला. त्यानंतर ती म्हणाली, “पहिल्या सीनमध्ये निरपेक्ष भावाने मी ५ विरुद्ध १ असा निर्णय पटकन करू शकले, पण दुसऱ्या सीनमध्ये मात्र स्वतःची इनव्हॉवमेंट असल्यामुळे एका माणसाला मारायचा निर्णय होत नाही. मी मान्य करते की परीस्थितीनुरूप भावनिक विचारधारा ही तार्किक विचारधारेवर मात करू शकते. सौरभ आणि गार्गी यू कॅन गो अहेड”.
“संवेदक, यू आर ग्रेट” सौरभच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. “माझा मित्रच माझ्या उपयोगाला आला.”

समारोप : घरी परत जाण्यासाठी जेव्हा संवेदकाचे प्रोसेसिंग युनिट बंद केले जात होते, तेव्हा संवेदकाच्या मनात विचार आलाच, दोन संपूर्णतः भिन्न अशा विचारसरणींच्या मनांत सहजीवनाचा विचार येणे हे निसर्गाचे एक आंदोलन (oscillation) तर सूचित करत नव्हते? की निसर्गाने आपला समतोल मुद्दामहून बिघडवायला तर सुरवात केली नव्हती?


- राजीव खरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा