सहजीवन

तीस-पस्तीस वर्षापूर्वीची परस्थिती फारच वेगळी होती. त्यावेळी क्वचितच प्रेमविवाह व्हायचे. लहान वयातच मुलामुलींचे लग्न होत असल्यामुळे प्रेम प्रकरणं कमी व्हायची. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य त्या वेळी मुलामुलींमधे नव्हते. वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या घरातील व्यक्ती जोडीदार निवडण्याचे काम करत असत. यामध्ये मुलींच्या मताचा फारसा विचार होत नसे. आपले आई-वडील आपले चांगले करणारच हा ठाम विश्वास त्या वेळी मुलामुलीं मध्ये होता.

माझा जोडीदार निवडताना घर, वर व सासरची माणसे चांगल्या स्वभावाची असावी, एवढी माफक इच्छा आई वडिलांची होती. माझे वय कमी (18 वर्ष) असल्यामुळे जोडीदारच्या बाबतीत काय अपेक्षा असाव्या किंवा असल्या पाहिजेत, यावर मला फारशी समज त्या वेळी नव्हती. अगदी टिपीकल पध्दतीने माझी वधू परीक्षा झाली. दोन तासात निर्णयपण समजला. पुढे दोन महिन्यांनी आई-वडीलांनी पसंत केलेल्या मुलाबरोबर माझे शुभमंगल पार पडले. लग्नानंतर मी सासरी नाशिकला आले. लग्नानंतर मुलीचे गाव, घरदार, माणसेच नाही तर सगळे विश्वच बदलते. मनावर खूप दडपण आले होते. नवीन घरातील माणसे, त्यांचे स्वभाव, रीतिरिवाज या सगळ्याचे पालन करतांना आपल्याकडून काही चुका तर होणार नाहीत ना, याची सतत भीती वाटत असे. त्यातच मी खेडेगावामधून आलेली. शहरी भागात वावरण्याची मला सवय नव्हती, अशावेळी मात्र माझ्या पतीने मला खूप सांभाळून घेतले. सुरुवातीला थोडे अवघड गेले पण हळूहळू मात्र मी घरात रूळू लागले. कालपरवा पर्यंत मनावर असलेले दडपण हळूहळू कमी होऊ लागले. सहजीवन जगतांना एकमेकांच्या सहवासाची ओढ निर्माण होऊ लागली. पुढे सहवासाने जीवन फुलत चालले होते. दीडवर्षांने आई झाले. बाळाच्या बाललीला व पतीच्या सहवासात रमून गेले. हे सर्व होत असताना परके वाटणारे सासर केव्हा आपलेसे झाले हे मला कळलेच नाही. सुरुवातीचे दिवस कसे पंख फुटलेल्या पाखरासारखे भुरकन उडून गेले.

पुढे दुसरा मुलगा झाला नी माझी जबाबदारी आणखी वाढली. दोन मुलांचे संगोपन करतांना अनेक अडचणी येत घरातून पतीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तींचा आधार मिळाला नाही. त्यांनी मात्र खंबीर पणे माझ्या पाठीशी उभे राहून मला खूप धीर दिला. 'मी आहे ना तुझ्यासोबत, मग कसली काळजी करतेस?' या एका वाक्याचा मला आधार वाटत असे. आम्ही दोघे ही एकमेकांचे आधारस्तंभ झालो होतो. अनेक संकटांचा धैर्याने सामना केला. हळूहळू माझी भिती कमी होत गेली नी मी धीटपणाने वागू लागले. थोडक्यात काय तर परस्थितीने मला धीट होण्यासाठी भाग पाडले. परिणामी 'कभी खूशी, कभी गम' अशी परस्थिती घरात असायची पण त्यात ही आनंद होताच. एखादा पदार्थ रूचकर बनवतांना जसे तिखट, मीठ, आंबट, खारट या चवीची आवश्यकता असते तसेच संसारात सुध्दा कधी सुखदुःख तर कधी रुसवाफुगवा, कधी भांडण तर कधी प्रेमाची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय संसाराची लज्जत वाढणार कशी!

प्रत्येक व्यक्तीला प्रेम व्यक्त करता येतेच असे नाही. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सहसा कोणाचेही पती उघडपणे म्हणत नसत किंवा व्यक्त करत नसत पण संकटाच्या वेळी मात्र खंबीरपणे पाठीशी उभे राहून साथ द्यायचे त्यावेळी मला जाणीव होत असे. पती जे म्हणतील त्याप्रत्येक गोष्टीला होकार देणे, माझ्या स्वभावात बसत नव्हते. जी गोष्ट पटत नाही तिला मी ठामपणे नकार देत असे. त्यामुळे बर्याच वेळा वादविवाद व्हायचे. मग कधी ते तर कधी मी पडती बाजू घेऊन एकमेकांना सांभाळून घ्यायचो. आमच्या आवडी-निवडी जरी भिन्न असल्या तरी आम्हा उभयतामध्ये संवाद नेहमी असायचा. दोघांचे एकमत होवो आथवा न होवो पण घरातील प्रत्येक गोष्ट करत असताना पती मला विश्वासात घेऊन व्यवहार करत असत. कुठलाही व्यवहार किंवा महत्त्वाची गोष्ट आम्ही कधीच एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. मला अनेक कलागुणांची आवड होती. दैनंदिन कामे व नोकरी करत असताना मी वेळ काढून माझे छंद जोपासत होते. बऱ्याच वेळेला माझे पती मला प्राेत्साहन देत असत. पण कधी कधी मात्र विरोध करत असत. अशावेळी त्यांचा विरोध पत्करुन कधी प्रेमाने, कधी भांडण करुन तर कधी हक्क गाजवून मी माझे छंद पुर्ण करत असे. या कलागुणांनामुळे आजपर्यंतचे आयुष्य मला कधीही कंटाळवाणे झाले नाही.

सहजीवन खऱ्या अर्थाने जगताना पती व मुलांनी चांगली साथ दिली. दोन्ही मुलं इंजिनिअर होऊन जॉब करायला लागल्यावर संसारात आर्थिक स्थैर्य आले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे. जेष्ठा, कनिष्ठा अशा रुपात दोन्ही गृहलक्ष्मी माझ्या घरात आल्यामुळे माझ्या घराचे नंदनवन झाले, असे आयुष्यात बरेच आनंदाचे क्षण आले पण सर्वात आनंदाचा क्षण मला आपल्या बरोबर शेअर करावा वाटतो. मोठ्या मुलाचे लग्न होऊन सून घरात आली तो क्षण! मला मुलगी नसल्यामुळे सून घरात आली त्यावेळी मी फक्त सासूबाई नाही तर परत मुलीची आई झाले असे वाटत होते. नशीबाने व देवाच्या कृपेने सून चांगली मिळाली. स्वतःच्या मुलीसारखे सुनेचे कैातुक केले. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आई होणे पण मला मात्र वाटते 'आजी झाल्यावर आपण अधिक आनंदाचे क्षण उपभोगू शकतो. ज्यावेळी आम्ही आजी-आजोबा झालो म्हणून मुलाने आम्हाला फोन केला त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांचे हात हातात घेऊन आनंदाने खूप नाचलो. तो आनंदाचा क्षण मी शब्दात वर्णन करू शकत नाही. पत्नी होणं, त्यानंतर आई आणि आता आजी होणे हे अनमोल क्षण आम्ही दोघांनी खूप आनंदात घालवले. आज आमची संसारवेल फळाफुलांनी खऱ्या अर्थाने बहरली असे आम्हांला वाटते.

'सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातले' असे एकमेकांच्या मनातले भाव समजून घेत गेल्या चाैतीस वर्षांचे सहजीवन कुटुंबासमवेत आनंदाने घालवले ते पुढे असेच जावो. संसाराचा शेवट गोड होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आपला निरोप घेते.


- साै. प्रतिभा विभूते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा