सप्तपदी

सतरा तासाच्या विमानप्रवासानंतर मी आणि माझी मुलगी सिंगापूरला पोचतो. आधुनिक जगातल्या नोमॅडसच्या जमातीतले आम्हीपण एक... हातावरती पोट घेऊन नोकरीच्या शोधात सिंगापूरला पोहोचलेल्या नवर्‍याकडे, मुलीची शाळेची उन्हाळ्याची सुट्टी घालवायला अमेरिकेहून मीही पोचते तिला घेऊन. 

इथे आल्यापासून माझी दैनंदिनी अगदीच वेगळी असते. घरातल्या नेहमीच्या कामांची घाई नाही. ऑफिसचे वेळापत्रक तर घरून काम करणार असल्याने एकदमच फ्लेक्सिबल. आजूबाजूचे वातावरण वेगळे. हवामान वेगळे. पहाटे ऐकू येणार्‍या कोकिळेच्या आवाजाने तर अगदी भारतातच असल्याचा भास कितीदातरी करून दिलेला असतो. त्या नॉस्टॅलजियात आणि जेटलॅग मधेच पहिले काही दिवस कसे निघून जातात हे कळत देखील नाही. 

वुडस्पाईस आफ्टरशेव्हच्या चिरपरिचित वासानं मला एकदम जाग येते. जडावलेले डोळे उघडायला नकारच देत असतात. मी किलकिल्या डोळ्यांनी खिडकीकडे पाहाते. बाहेर लख्ख उजेड पडलेला असतो. आता मात्र माझी ग्लानी जाऊन मला खाडकन् जाग येते. 'मी अजून अंथरूणात आणि बाहेर लखलखीत उजाडलंय? हे असं पूर्वी कधी बरं घडलं असावं', हे आठवण्यासाठी मी पडल्या पडल्याच डोक्याला ताण देते. आता मात्र उठायलाच हवं, माझं मन एकीकडे मला हलवते. एव्हाना कामाच्या यादीतले काय-काय करून झाले असते - आता आज सगळ्यालाच उशिर, मी एकीकडे चरफडते. कामाची यादी एकदा मनातून पडताळून पहावी, म्हणून ती नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करते आणि परत एकदा चक्रावतेच. एकही नेहमीचे काम येत नाही डोळ्यांसमोर. आता मात्र मला थोडी भीती वाटू लागते. हे असं काय होतंय? मी आहे कुठे? 'मी' तिच 'मी' आहे नं की मला विस्मृती झालीये? मी मेलेय की काय? आणि आता ह्या पांढऱ्या शुभ्र मऊ ढगावर तरंगते आहे की काय? जिथे टू-डू लिस्ट मधली कुठलीच कामे आठवत नाहीत, त्यालाच स्वर्ग म्हणतात की काय? एक ना अनेक - हजार प्रश्न! 

"शिल्पा, मी जातो बरं का!" या अमितच्या वाक्यानं मात्र मी पृथ्वीतलावर परतते. "कुठं?" मी विचारते. "कुठं काय? ऑफिसला! आठ वाजलेत, आणि हो! किचनमधे ब्रेकफास्ट आहे आणि संध्याकाळी मी येताना तुमच्या आवडीचा फ्राईड फिश हॉकर सेंटरमधून घेऊन येईन, डिनरला". असे म्हणुन अमित गेल्याचा आणि दार बंद केल्याचा आवाज येतो. मला हळूहळू उलगडा होतो. हे सिंगापूरचे अमितचे, म्हणजे माझ्या नवऱ्याचे अपार्टमेंट आहे. अमित नोकरीच्या निमित्ताने फिनीक्स सोडून् सिंगापूरला राहतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून आमचे फिनिक्समधले घर बंद करून मी आणि माझी मुलगी इथे आलेलो आहोत.

माझी मुलगी अजून निवांत झोपलेली असते. जरा भानावर येऊन मी उठते. गरमागरम ब्रूचे ४-५ घोट घेईपर्यंत मला पूर्ण तरतरी येते आणि मग इतका वेळ शिथिल झालेल्या मनाची चक्रे फिरू लागतात. हे इतके निवांतपण कसे काय बरे आले माझ्या वाट्याला? रोजचा गजर टू-डू लिस्ट वाजवतच उठवत असतो. उठल्यावर पहिल्या तासाभरातच अतिशय तांत्रिकपणे रोजची कामे पार पडतात. रोजच्या कामात इतर काही जास्तीचे असेल, तरी तेही न गोंधळता पार पडते. मात्र हे आज अचानकपणे मिळालेले निवांतपण मला कसे भांबावून सोडते आहे. ह्या निवांतपणाला काय म्हणतात बरं? आणि मग माझ्या मनाची कवाडे एका शब्दाने हलकेच उघडतात. "माहेरपण!" गेली कित्येक वर्षे हा शब्द नुसता शब्दच राहिलेला असतो, माझ्यासाठी. कारण, माहेरच्या भेटी कधीच निवांतपणाच्या नसतात. इतक्या लांबच्या प्रवासाची धावपळ. बर्याच दिवसांनी गेल्यामुळे करायच्या गोष्टींची यादीही मोठी. शिवाय अतिशय थोडका वेळ. त्यामुळे सारीच दगदग. माहेरी जाऊनही निवांतपणा या अर्थाने माहेरपण क्वचितच मिळणारे. पण इथे अमितच्या तात्पुरत्या घरात आल्यापासून माहेरपणाच्या संकल्पनेत बसणाऱ्या गोष्टी घडत असतात. "तुला नाही सापडणार, काही! मी संध्याकाळी आल्यावर करेन चिकनकरी जेवायला" किंवा "माझ्या वाटेवरच आहे ते दुकान, मी आणेन ग्रोसरी" वगैरे वाक्ये मला पुढचे काही दिवस हवेत तरंगत आणि टूडू लिस्ट मुक्त ठेवतात. 

माझे ऑफिसचे काम उरकल्यावर मिळालेल्या मो़कळ्या वेळात मन निवांतपणे फेरफटका मारत रहाते. आठवणी जाग्या होतात त्या माझ्या मुलीच्या जन्मावेळच्या. जवळचं, विचारपूस करणारं आणि मदतीला कोणीतरी हवं, असं वाटणारा तो काळ. देश-माणसं सगळं स्वतःच्या मर्जीनं सोडून आल्यावर, आपल्याला ते सुख नसण्याची तक्रार करता येत नाही पण ही वेळ मात्र, तो धीर सुटतो कि काय अशी वाटायला लावणारी. काही ना काही अपरिहार्य कारणाने भारतातून कोणीच आलेले नसते. इथल्या जोडलेल्या माणसांनी बरीच मदतही केलेली असते, पण तरीही उणीव भासते. मायेनं विचारपूस करणारं आणि हक्कानं काहीही सांगता येणारं आपलं कुणीतरी असावं हे अगदी आतून वाटत राहातं आणि ती भरून काढली जाते ती दोन महिने सुट्टी घेऊन घरी राहिलेल्या अमितमुळे. अगदी मऊ खिचडी करण्यापासून ते काही दिवसांच्या आमच्या मुलीला सांभाळण्यापर्यंत त्याचा हरएक प्रामाणिक प्रयत्न खूपच आधार देत रहातो. 

देशाबाहेर आल्यावर पाहिलेले असतेच की इथल्या बायका खरे तर सर्व आपापले करतात. त्यांना मदत असते जवळच्या कुटुंबाची पण आपल्याकडच्या सारखे प्रस्थ नसते. कितीही काहीही झाले तरी, "बाळंतपण" आणि "माहेरपण" हे दोन, किमान भारतीय स्त्रीसाठी अतिशय जिव्हाळ्याचे शब्द. या दोन "पणात" होणारे लाड, कौतुक, काळजी, हेळसांड ती कधीच विसरू शकत नाही. भारत सोडल्यानंतर मी पहिला दिवाळसण, पहिली मंगळागौर, डोहाळजेवण या सर्व लाडांवर पाणीच सोडलेलं असतं आणि त्याचं फारसं कौतुक नसल्याने खंतही वाटत नसते. पण इतर मैत्रिणींच्या बाळंतपणात त्यांना असलेली मदत पाहून मात्र हेवा वाटलेला असतो. भारतातल्या मैत्रिणी निवांत माहेरी रहातात, हे पाहून कुठेतरी आत जाणवलेले असते. मग लक्षात येते की इथे हा मिळालेला निवांतपणा दुसरे-तिसरे काही नसून माहेरपणच तर आहे. कॉफीचे घोट घेता घेता मला उमगते की आपलं माहेरपण आणि बाळंतपण दोन्हीही आपल्या नवर्‍यानेच तर केलं!

काळ बदलला, माणसे स्थलांतरीत झाली आणि विखुरली जगभर. स्त्री-पुरुष भूमिकांच्या आणि भेदांच्या संकल्पना बदलत चालल्या. "घाल घाल पिंगा वार्‍या...." आणि "यादव राया राणी रुसून बसली" यांसारखी गाणी, माहेर आणि सासर या दोन्हीला दुरावलेल्या माझ्यासारखीला आणि माझ्यासारख्या आपला देश सोडून दूर राहाणार्‍यांना दूरचीच वाटू लागली. तरीही, माहेरपण आणि बाळंतपण या शब्दांची भूल मात्र काही उतरली नाही. त्या ‘घाल घाल पिंगा’ गाण्यातल्या वार्‍याला, माझा इतका दूरवर असलेला परस तर नक्कीच नाही सापडणार; मात्र जोपर्यंत माहेरपण देऊ शकणारा नवरा आहे तोवर त्या शब्दाचा सुवास दरवळत राहील, हे मात्र नक्की. स्थलांतरीत झालेल्या भारताबाहेरीलच नव्हे तर भारतातीलही कित्येक जणींनी हा सुवास अनुभवला असेल. 

बदलणार्‍या काळाबरोबर आयुष्यातली आव्हाने बदलली. एकत्र कुटुंब पद्धती गेल्यामुळे प्रत्येकावरची जबाबदारी बदलत गेली. बायकोला नुसते सासरच नाही तर माहेर देऊ करणारे असे असंख्य जोडीदार या जगात असतील. तसेच वेळ पडेल तशी भूमिका बदलून आपल्या सहचराची आई, बहिण, मैत्रिण होणार्‍या असंख्य सहचारिणीही. या सगळ्यांनीच लग्न या कायदेशीर संस्थेची व्याख्या बदलून त्याला माणूसपणाचे एक नवीन परिमाण दिले. वैवाहीक जीवनात असणारे नाविन्य संपल्यानंतर, आपल्या जोडीदाराचे माणूसपण ओळखून राहाणेच हे उर्वरित आयुष्याच्या समाधानाचे सार असेल्. जोडीदारावर असलेल्या प्रेमाबरोबरच त्याच्याबद्द्ल असलेल्या करूणेचे अस्तर जोवर अबाधित आहे तोवर नात्याची वीण घट्ट् राहायाला मदत होत असेल. जोडीदार हा आधी एक माणूस आहे आणि नवरा-बायको ह्या भूमिका आयुष्यातल्या फक्त काही अंशच व्यापणार्‍या आहेत हे समजून घ्यावे लागते. ती उमज केवळ आतून येणारीच, कोणीच शिकवू न शकणारी. त्यासाठी लागणारी संवेदनशीलता ज्याने जपली त्याने जोडीदाराबरोबर खरी सप्तपदी चालली. 


- शिल्पा केळकर


३ टिप्पण्या:

  1. सुंदर. शेवटचा उतारा अप्रतिम.मुलाच्या वेळी मी खर्‍याखुर्‍य़ा माहेरच्या लाडाची चव अनुभवली. पण मुलीच्या वेळेस आमचाच अट्टाहास होता की ’बाळंतपणासाठी’ म्हणून नाही यायला लावायचं दोन्हीकडच्या आईला. आपलं आपण झेपवू. तेव्हा तुझ्यासारखंच माहेरपण मी अनुभवलं नवर्‍याकडून. हे लिहिताना त्या वेळची ती धावपळ, मला जिने चढ उतर करायचे नव्हते त्यामुळे पर्णिकाचं करुन मला जेवण वरच्या खोलीत आणून देणं, मुलाची मदत करायची अतीव इच्छा, तारांबळ सारं चित्रपटासारखं नजरेसमोर तरळलं.

    उत्तर द्याहटवा
  2. परदेशात रहाण्याचा निर्णय घेऊन माहेरपण, बाळंतपण व इतर अनेक सणवार यांना मुकल्याने होणारी घालमेल.. सुरेख मांडलीय..!

    उत्तर द्याहटवा