कथा - जोडीदार

'नानी नानी ' करत छोटा अंकुर मालतीबाईंच्या गळ्यात पडला आणि त्या मऊसूत स्पर्शाने मालतीबाई तृप्त झाल्या. गेला महिनाभर त्या नातवाच्या स्वागताची तयारी करत होत्या. मुलगी मन्नू आणि जावई शिरीष, अंकुरला घेऊन त्यांच्या घरी पोचेपर्यंत मालतीबाईंच्या जिवात जीव नव्हता. अमेरिकेहून भारतात यायचं म्हणजे तासंतास प्रवास. मोठ्यांचे ठीक आहे पण त्या लहानग्या बाळाला कसला त्रास तर होणार नाही ना ह्या काळजीने मालतीबाईंची गेले आठ दिवस झोप उडालेली.

"अहो, त्याला सर्दी तर होणार नाही ना? "काम करताना मध्येच थबकून त्या यजमानांना विचारत होत्या. "विमानाचे टेक-ऑफ होताना लहान मुलांच्या कानात दडे बसतात." नातवाच्या तब्येतीची काळजी करून त्या थकल्या होत्या.

"मन्नू, त्याची सगळी औषधं घे बाई बरोबर."
"मन्नू, थोडी सुंठ पावडर आणि हळदीचे दूध ठेव गं बरोबर. त्याचे गरम कपडे इथे लागणार नाहीत पण तू ठेव बॅगेत."
गेले पंधरा दिवस त्या मन्नूला सूचना देत होत्या.
"आई, अगं कित्ती काळजी करशील? आमची कधी एव्हढी काळजी केलीस का गं?", मन्नू हसत म्हणाली.

"गधडे, अशीच मोठी झालीस का गं तू?" त्या खोटं रागावून म्हणाल्या. एकीकडे त्यांना आतून मायेचे कढ येत होते. कधी एकदा लेकीला, नातवाला कुशीत घेते असं झालं होतं. जावयाला डोळे भरून बघावेसं वाटत होतं. लेकीच्या आवडीची गुळपापडी आणि रव्याचे लाडू त्यांनी घरचे साजूक तूप कढवून बनवले. जावई पुरणपोळ्या खाणारा...तसंच मासे, मटण यावर आडवा हात मारणारा. त्याच्यासाठी मालतीबाई नवीन रेसिपीज शिकत होत्या. दुसरीकडे घराची साफसफाई चालूच होती.

श्रीधरराव म्हणजे त्यांचे यजमान आणि मन्नूचे बाबा, ते मात्र अगदी शांतपणे बायकोची धावपळ, तगमग बघत होते पण त्यांना ती निरर्थक वाटत होती. ते सकाळी उठून रोजच्या रोज ऑफिसला जात होते. तसंही त्यांच्या सारख्या हुशार, कर्तबगार माणसाला त्यांची कंपनी निवृत्ती द्यायला तयार नव्हती. मालती बाईंनी मात्र आपल्या कुटुंबासाठी ठराविक वर्षं नोकरी करून बाहेरच्या कामातून निवृत्ती पत्करलेली. त्यानंतर त्यांचा जीव घरात गुंतलेला.

"अहो तुम्हाला इतकं शांत कसं बाई राहता येतं?" त्या न राहवून म्हणाल्या.
"मग काय करू?", श्रीधरराव तेव्हढ्याच शांतपणे म्हणाले. ऑफिसचं काम संपवून त्यांनी लॅपटॉप बंद करून ठेवला. "तू पण जरा निवांत बस माझ्या बरोबर. मुलांना सगळी माहिती असते. ती सगळं काही व्यवस्थित सांभाळतात. ती काय पहिल्यांदाच येणार आहेत का आणि मला एक सांग, आपण काय कमी प्रवास केलाय का? अगं, जगभर फिरलोय. मन्नूला वर्ष दिड वर्षाची घेऊन मॉरिशसला गेलो होतो." 
" तेव्हाची गोष्ट वेगळी होती." त्या हलकेच भूतकाळात शिरत म्हणाल्या.
"ती कशी काय?"
"तेव्हा आतंकवाद नव्हता, जगभर अस्थिरता नव्हती."
"तेव्हा मोबाईल होता? लॅपटॉप होता? स्मार्ट फोन होता ? फेस तू फेस टॉक होता? इतका पगार होता?" प्रश्नांचा भडीमार करून श्रीधररावांनी मालती बाईंची विकेटच घेतली. तरीही त्या हसल्या, समाधानाने हसल्या. त्या हसण्यात काय दडलं नव्हतं? जोडीदाराविषयी अभिमान होता. त्याच्या कडून बोलण्यात पराभूत व्हायलाही एक प्रकारचा मिळणारा आनंद होता. तिला त्यांचा स्वभाव माहित होता. त्यांना तिची मानसिकता ठाऊक होती. त्यांनी तिला जवळ बसवून प्यायला पाणी दिले. दोघांचे शब्दांवाचून मनानेच संवाद होत होते. इतक्या वर्षाच्या सहवासाने शब्दांच्या कुबड्या क्वचितच कामी येत. असो.

थोड्याच दिवसात मन्नू आणि शिरीष येण्याचा दिवस उगवला आणि त्या सुखाच्या क्षणाचा त्या समरसून आनंद घ्यायला त्या तयार झाल्या. त्यानंतर प्रत्येक दिवस धावपळीत जात होता. मन्नू आणि शिरीष दोन वर्षांनी त्यांच्या घरी येत होते. शिरीषचे बाळाला सांभाळणे, त्याची शी-शू साफ करणे, कपडे बदलणे, रात्री उठून बाळाला जोजवणे सगळे बघून मालतीबाई आश्चर्यचकित होत होत्या. मन्नूचा जोडीदार तिच्या बरोबरीने तिला कामात मदत करत होता. मन्नूला त्यांनी अनेकदा टोकले.

"अगं, किती काम करायला लावतेस त्याला?"
"आई, मग काय झालं गं थोडं बाळाचं केलं तर? तो बाबा आहे न बाळाचा?"
"खरं आहे गं तुझं. यातलं थोडं तुझ्या बाबालाही शिकव कधी तरी. "त्यांची नाराजी त्यांच्या स्वरात उमटलीच. "माझ्या बाबांना दोष देऊ नकोस हं. तू सगळं करत राहतेस म्हणून ते करत नाहीत. वेळ आली तर बाबांनी पण सगळं केलं असतं माझ्यासाठी."

मालतीबाई राग विसरून हसल्या. हे मात्र त्यांना मनोमन पटले. नात्यांची हिच तर गम्मत असते. पित्याला जरा काही बोलले कि किती राग येतो हिला? उद्या ह्यांना मन्नू काही बोलली तर आपल्यालाही आवडणार नाही. नवऱ्याने काम केलेले चालते हिला, नव्हे जोडीदारा कडून ती अपेक्षाच असते सगळ्यांची विशेषतः ह्या नवीन पिढीची, पण हिच्या बाबांना काही काम पडलं तर अजिबात चालत नाही हिला. ठीक आहे ! जोपर्यंत कोणाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत नाही तोपर्यंत सगळं ओके. सगळं काही प्रेमाचं आणि आपुलकीचं दर्शन. त्यांच्या मनात आले.

त्यादिवशी संध्याकाळी त्यांना अंगात कणकण वाटली. क्रोसीन घेऊन त्या पडल्या आणि चक्क झोपी गेल्या. नेमके मन्नू आणि शिरीष मराठी नाटकाला गेले होते, त्यांना एरवी बघायला मिळत नाही म्हणून. अंकुर अर्धा पाऊण तास छान झोपला आणि त्यानंतर कुरूकुरू लागला. मालतीबाईंना काही म्हणजे काहीच पत्ता लागला नाही. जाग आली तर, "आई, बरं वाटत नाही का गं?" मन्नू विचारत होती. ह्यांचा हात कपाळावर होता.

"अगंबाई, मी इतका वेळ झोपले? आणि बाळ कुठेय?" त्या धडपडून उठत म्हणाल्या. "काही काळजी करू नकोस. त्याच्या नानांनी म्हणजे माझ्या बाबांना छान सांभाळला त्याला. आम्ही आलो तेव्हा बघतो तर काय बाबा आणि याची जोडी रंगात आलेली. त्यांना सोडायला तयार नव्हता लबाड." मन्नू बाळा पेक्षा बाबांचे जास्त लाड करत म्हणाली. मालतीबाई आपल्या जोडीदारावर खूष होऊन पुन्हा एकदा हसल्या. आता त्यांना अगदी मोकळे वाटत होते.


- मोहना कारखानीस



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा