आरोग्य - मनाचे आणि शरीराचे

फिटनेस म्हटले की लगेच डोळ्यासमोर जिम , डाएट फूड अश्या गोष्टी येतात. पण फिटनेस म्हणजेच आरोग्य. हे शरीराचे महत्वाचे आहेच पण मनाचेही तितकेच महत्वाचे आहे.

आज अनेकजण आपापल्या busy schedule मधून वेळात वेळ काढून जिम मध्ये जातात , जेवणावर नियंत्रण ठेवतात . जे जे जमेल ते करून आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात.

पण आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि ते म्हणजे आपले मन. त्याचेही आरोग्य तितकेच महत्वाचे आहे.

आपल्या मराठी भाषेतच मनाला कितीतरी महत्व दिले आहे. अनेक म्हणी मनाशी संबंधित आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मन चित्तीं ते वैरी न चिंति, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे . रामदास स्वामींनी तर मनाचे श्लोक लिहिले आहेत. आपल्या धर्मामध्ये ध्यानधारणेला खूपच महत्व दिले आहे. आजकाल ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ते आपल्या पूर्वजांनी अनेक शतकांपूर्वी सांगितले आहे जे आता पाश्चात्य आपल्याला नव्याने शिकवत आहेत.

शरीराला फिट ठेवण्यासाठी जसे योग्य आहार, विहार आवश्यक आहे त्याचप्रमाणे मनाला फिट ठेवण्यासाठीही काही छोटे छोटे उपाय आपण करू शकतो.

सर्वात मुख्य म्हणजे आपल्या वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपली कामे वेळेत पूर्ण करू शकतो . याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या मनावर कामाचा ताण येत नाही. याचे कारण म्हणजे आजकाल जो तो स्ट्रेस मध्ये असतो. मुळात हा स्ट्रेस येतो कुठून हे आपणच आपले शोधले पाहिजे. आपले जीवन खूपच वेगवान झाले आहे. रोज अनेक कामे आपल्याला करायची असतात त्यामुळे वेळेचे नियोजन हे खूपच आवश्यक आहे. नुसतीच कामे महत्वाची नसून आपला आहार आणि आरामही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तंदरुस्त ठेवणे महत्वाचे आहे आणि ते आपल्याच हातात आहे. मनाचा कणखरपणा आपल्याला खूप बळ देतो. यामुळे आपण प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करू शकतो. अशी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतातच पण कितीतरी वेळेला आपणही असे काही केलेले असते आणि करतही असतो. ते शक्य होते ते मनाच्या उत्तम आरोग्यामुळे.

असे म्हणतात की आपण आनंदात असताना काहीही वचन देऊ नये आणि रागात असताना कोणताही निर्णय घेऊ नये कारण दोन्ही वेळेला आपले मन थाऱ्यावर नसते त्यामुळे आपण चुकीचा निर्णय घेऊ शकतो . म्हणजेच भावनेच्या भरात मनावर संय्यम ठेवता आला पाहिजे. कुठल्याही वेळी मनावर संय्यम ठेवता येणे हे पण मनाचे आरोग्य उत्तम असण्याचे लक्षण आहे.

म्हणूनच आपण शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य उत्तम राखण्याचं प्रयत्न करू या. ध्यानधारणा म्हणजेच दिवसातून १० ते १५ मिनिटे शांत बसणे किंवा आपण म्हणूया स्वतःसाठी वेळ देणे. कुठलेही वाईट विचार मनात येऊ न देण्याचा प्रयत्न करणे , चांगले वाचन, रोज आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत थोडातरी वेळ रोज घालवणे. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवणे , ह्या सारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण मनाचे आरोग्य उत्तम राखू शकतो.

शरीराच्या आरोग्यासाठीही तितकेच प्रयत्न आवश्यक आहेत. आवश्यक तेवढा व्यायाम, संतुलित आहार आणि जिभेवर संयम हे जर आपल्याला जमले तर आपण शरीराचे आरोग्यही उत्तम राखू शकतो. खूपदा संध्याकाळी आपल्याला भूकही नसते पण केवळ सवयीमुळे आपण पोटभर जेवतो ते टाळले पाहिजे.

माझा एक अनुभव सांगते. बाजारात खाण्याच्या वस्तू खरेदी करायला जायचे असेल तर आधी आपण घरातूनच पोटभर खाऊन निघावे म्हणजे खरेदी करताना अनावश्यक वस्तू घेणे आपोआपच टाळले जाते नाहीतर आपण जर भुकेल्या पोटी गेलेलो असलो तर ती भूक आपल्याला अनेक वस्तू खरेदी करायला भाग पाडते. हा अनुभव तुम्हीही घेऊन बघा. एकूण काय आपले आरोग्य , मग ते शरीराचे असो व मनाचे उत्तम राखणे आपल्याच हातात आहे.

आपण जर ठणठणीत असलो तर आपण आपल्या कुटुंबाचेही आरोग्य उत्तम राखू शकतो. आपले काम उत्तमरित्या करू शकतो. आपले पूर्वज नेहेमीच सांगत आले आहेत की आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्याला आपण दूर ठेवले पाहिजे कारण तोच आपल्याला आरोग्यापासून दूर ठेवत असतो आणि म्हणूनच आपल्याकडे स्वतःकडे बघायला वेळ नसतो.

चला तर मग आपण शरीराच्या आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करूया.

- अनुराधा मिलिंद साळोखे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा