गीतकार शैलेंद्र एक प्रवास !

मी शाळेत असताना कृष्णधवल (Black & White ) दूरदर्शनच्या काळात दर गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता एक छायागीत नावाचा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात नवी जुनी हिंदी चित्रपटातील गाणी दाखवत असत. माझ्या मते त्याकाळात या कार्यक्रमाला सर्वात जास्त TRP मिळत असे. 

अश्याच एक गुरुवारी छायागीत सुरु झाले आणि पहिलेच गाणे लागले हास्य अभिनेता जॉनी वाॅकर वर. ह्या गाण्याचे शब्द होते जंगल मे मोर नाचा किसीने न देखा. हास्यरसातील गाणे आणि गाण्याचे शब्द जरा वेगळे असल्यामुळे हे कायम लक्षात राहिले. तेव्हा गाणे बघताना गाण्याची माहिती समोर आली त्यात दिले होते, चित्रपट- मधुमती, गीतकार : शैलेन्द्र आणि संगीतकार: सलील चौधरी, गायक: मोहम्मद रफी. यात गीतकार शैलेंद्र यांचे नाव माझ्या नावाशी जवळचे असल्यामुळे लक्षात राहिले. शालेय जीवनात शैलेंद्र यांच्या प्रतिभेची पारख झाली नाही पण कॉलेजमध्ये आल्यावर मी त्याकाळी इसाक मुजावर संपादित चित्रानंद मासिक वाचत असे. त्यात शैलेंद्र यांच्या काव्यप्रतिभेची थोडी ओळख झाली आणि नंतर राजू भरतन यांच्यामुळे शैलेंद्र यांच्या काव्यप्रतिभेची ओळख झाली.

वरील उल्लेखलेल्या गाण्यामागची एक सुरस कथा थोडक्यात मांडतो. मुंबईच्या सांताक्रुझ या उपनगरात संगीतकार / गायक हेमंत कुमार एका बंगल्यात राहत. त्यांच्या शेजारच्या बंगल्यात शैलेंद्र राहत असत. हेमंत कुमार यांच्या बरोबर त्यांच्या चार मेहुण्या राहत असत. एके दिवशी शैलेंद्र थोडी पिऊन घरी आले आणि स्वतःच्या बंगल्याच्या फाटकाशी थोडे अडखळले. ही गोष्ट हेमंत कुमार यांच्या मेहुणीनीं बघितली आणि त्या जोराने उपहासात्मक हसल्या. तो उपहास शैलेंद्र यांनी लक्षात ठेऊन त्याचे काव्यात रूपांतर केले आणि खालील शब्द लिहिले- 

जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा 
हम जो थोडीसी पीके झुमे तो सबने देखा


३० ऑगस्ट १९२१ साली रावळपिंडी येथे जन्मलेले शैलेंद्र यांचे मूळनाव होते शंकरदास केसरीलाल. शैलेंद्र यांचे कुटुंब मूळचे बिभास मधील होते त्यामुळे घरात भोजपुरी / हिंदी आणि बाहेर उर्दू या भाषेची ओळख पक्की झाली. नंतर काही वर्षांनी त्यांचे कुटुंब मथुरेला राहायला आले आणि शैलेंद्र मथुरावासी झाले आणि त्यांच्यावर तेथील ब्रज भाषेचा पगडा बसला. शैलेंद्र स्वतःला मथुरावासी अभिमानाने म्हणवत. १९४२ साली घरची आर्थिक ओढाताण त्यांना मुंबईला घेऊन आली. मुंबईतील माटुंगा या उपनगरात ते रेल्वेमध्ये कामाला होते. तेथे त्यांची दोनच कामे असत, एक नोकरी करणे आणि डफली वाजवून स्वतःच्या कविता गाणे. एकदा इप्टा या संस्थेत त्यांनी जालियनवाला बाग / भगतसिंग यांच्यावर रचलेली ‘जलता पंजाब’ ही कविता डफली वाजवून गाऊन दाखवली. या कार्यक्रमाला पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर हजर होते आणि राज कपूर हे खरोखरच रत्नपारखी होते. कार्यक्रमानंतर राजसाहेब त्यांना भेटले आणि म्हणाले मी 'आग' नावाचा चित्रपट बनवत आहे त्याकरता गाणी लिहिणार का? तेव्हा शैलेंद्र यांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले मी कविता विकून पैसे कमावत नाही. तेव्हा राजसाहेबांनी वाईट वाटून न घेता आपले ओळखकार्ड दिले आणि म्हणाले जेव्हा तुम्हाला चित्रपटाकरता गाणी लिहायची असतील तेव्हा माझ्याशी संपर्क जरूर करा.

हा प्रसंग घडला तेव्हा शैलेंद्र एकटेच होते. काही दिवसांनी जेव्हा त्यांचा विवाह झाला आणि घरी नवीन पाहुणा येण्याची चिन्हे दिसली आणि पैशाची तंगी त्रास देत होती तेव्हा त्यांना नेमके राज कपूर आठवले. त्यांनी राज साहेबांची भेट घेतली आणि गीते लिहिण्याची इच्छा व्यक्त केली पण त्या अगोदर त्यांनी ५०० रुपयांची मागणी केली आणि राजसाहेबांनी ती लगेच पुरी केली. पत्नीला माहेरी पाठवून ते राजबाबांकडे हजर झाले आणि म्हणाले तुम्हाला कुठली गाणी लिहून हवी आहेत ते सांगा. तेव्हा राजसाहेबांनी 'बरसात' चित्रपट बनवायला घेतला होता आणि त्यातील दोन गाणी वगळता इतर गाणी लिहून तयार होती. राज साहेबांकडून गाण्याची चाल ऐकल्यावर शैलेंद्र यांनी शब्द लिहिले. ‘बरसात मे हमसे मिले तुम सजन’. हे चित्रपटाचे शीर्षक गीत होते. त्यानंतर संपूर्ण कारकीर्दीत अनेक शीर्षक गीते लिहिली आणि प्रसिद्ध झाली. 


बरसातमध्ये दुसरे गाणे लिहिले ‘पतली कमर हैं तिरछी नजर है’.  



‘बरसात’ हा चित्रपट तुफान प्रसिद्ध झाला आणि त्या चित्रापटाशी निगडीत सर्व कलाकार / गायक / संगीतकार आणि अर्थात निर्माता, सगळेच मालामाल झाले आणि शैलेंद्र यांच्यावर पैशाचा पाऊस कोसळला आणि त्यांनी नवीन घर घेतले, त्यास नाव दिले ‘रिमझिम’ !

राजसाहेब, शंकर-जयकिशन, मुकेश, हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांचा मैत्रीचा कंपू तयार झाला आणि कामाव्यतिरिक्त हे सगळे एकत्र वेळ घालवत असत. शैलेंद्र यांनी बहुतेक काम राज कपूर यांच्या चित्रपटासाठी केले पण त्यांनी शंकर जयकिशन यांच्याबरोबर राज कपूर यांचा सहभाग नसलेले चित्रपट पण केले. काही मोजकी गाणी देत आहे.  

‘सीमा’ १९५५ चे गाणे ‘मनमोहन बडे झुठे
‘दाग’ १९५२  चे गाणे ‘ऐ मेरे दिल कही और चल’ 
‘पतिता’ १९५३  चे गाणे ‘किसीने अपना बनाके मुझको’ 
‘बसंत बहार’ १९५६  चे गाणे ‘केतकी गुलाब जुही
‘चोरी चोरी’ १९५६  चे गाणे ‘ये रात भिगी भिगी’ 
‘चोरी चोरी’ १९५६  चे गाणे ‘रसिक बलमा’ 
‘नई दिल्ली’ १९५८  चे गाणे ‘नखरेवाली’ 
‘अनाडी’ १९५९  चे गाणे ‘दिल की नझर से नझरों के दिलसे’ 
‘दिल आपना प्रीत पराई’ १९६०  चे गाणे ‘अजीब दास्तां है ये’ 
‘जंगली’ १९६१  चे गाणे ‘याहू चाहे मुझे कोई जंगली’ 
‘प्रोफेसर’ १९६२  चे गाणे ‘मै चली मै चली’ 
‘दिल एक मंदिर’ १९६३  चे गाणे ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा’ 
‘आई मिलन की बेला’ १९६४  चे गाणे ‘ओ सनम तेरे हो गये हम’ 
‘राजकुमार’ १९६४  चे गाणे ‘जानेवालों जरा होशियार’ 
‘जानवर’ १९६५  चे गाणे ‘लाल छडी मैदान खडी’ 
‘आम्रपाली’ १९६६  चे गाणे ‘जाओ रे जोगी तुम जाओ रे’ 
‘लव्ह इन टोकियो’ १९६६  चे गाणे ‘कोई मतवाला आय मेरे द्वारे’ 

शैलेंद्र यांच्या मृत्यूनंतर सुद्धा काही गाणी प्रसिद्ध झाले जी अगोदर लिहून ठेवली होती 
‘अॅन इव्हिनींग इन पॅरिस’ १९६७  चे गाणे  ‘रात के हमसफर’ 
‘लाटसाहब’ १९६७  चे गाणे ‘सवेरे वाली  गाडी से चले जायेंगे’ 
‘रात और दिन’ १९६७ चे  गाणे ‘दिल गिरा खोल दो चूप ना बैठो’ 
‘ब्रह्मचारी’ १९६८  चे गाणे ‘मै गाऊँ तुम सो जाओ’ 
वर फक्त मोजकीच गाणी दिली आहेत ज्यावर शैलेंद्र आणि शंकर जयकिशन यांनी एकत्र काम केले होते.  

शैलेन्द्र यांनी राज कपूर करता अनेक अजरामर गीते लिहून दिली. एक गोष्ट लक्षात घ्या; राज कपूर स्वतःच्या बरसात (१९४८) पासून हीना (१९९०) पर्यंत सर्व गाण्यांच्या चाली स्वतः देत. जरी संगीतकार हे नाव अन्य कोणाचे असले तरी. संगीतकार फक्त चालींना सांगीतिक स्वरूप देत असत.

बरसात मधील दोन गाण्यांचा वर उल्लेख केला आहे 
‘आवारा’ १९५१ चे गाणे ‘आवारा हूं’ 
‘आवारा’ १९५१ चे गाणे ‘घर आया मेरा परदेसी’ 
‘आह’ १९५३ चे गाणे ‘ये श्याम की तनहाइयाँ’ 
‘श्री ४२०’ १९५५ चे गाणे ‘मुड मुड के ना देख’ 
‘श्री ४२०’ १९५५ चे गाणे ‘मेरा जुता है जापानी’ 
‘जिस देश मे गंगा’ बहती है १९६० चे गाणे ‘होठों पे सच्चाई रहती है’ 
‘जिस देश मे गंगा बहती है’ १९६० चे गाणे ‘मेरा नाम राजू’ 
‘संगम’ १९६४ चे गाणे ‘ओ मेरे सनम’ 
‘संगम’ १९६४ चे गाणे ‘मेरे मन की गंगा’ 

दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे राजसाहेब आणि शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र यांना कधीच चित्रपटातील सर्व गाणी लिहिण्यास दिली नाहीत. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी हे दोघेही गाणी लिहीत असत. 

त्याखेरीज शैलेंद्र यांनी एस डी बर्मन (दादा बर्मन), सलील चौधरी यांच्या बरोरबर लिहिलेली काही गाणी देत आहे 
‘दो बिघा जमीन’ १९५३ चे गाणे  - ‘हरियाल सावन ढोल बजाता’ 
‘जागते रहो’ १९५६ चे गाणे  - ‘जागो मोहन प्यारे’ 
‘मधुमती’ १९५८ चे गाणे  - ‘आजा रे परदेसी’ 
‘परख’ १९६० चे गाणे  - ‘ओ सजन बरखा’ 
मधुमती १९५८ आणि परख १९६० यातील सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिलेली असून चित्रपटातील सर्व गाणी त्याकाळी अतिशय गाजली आणि आजही ती गायली जातात. 

पंडित रविशंकर यांनी काही मोजक्या चित्रपटांना संगीत दिले आणि त्यातील ‘अनुराधा’ १९६० ह्या चित्रपटातील सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिली. ही सर्व गाणी गाजली आणि आजही ती ऐकली जातात. एक उदाहरण ‘सावरे सावरे’ 


दादा बर्मन आणि शैलेंद्र यांची साथ खूप उशिरा म्हणजे १९६० सालच्या ‘कालबाजार’ या चित्रपटापासून झाली आणि ‘बंदिनी’ १९६३ (एक गाणे गुलझार यांनी लिहिले) , ‘मेरी सुरत तेरी आँखें’ १९६३ आणि ‘गाईड’ १९६५ या चित्रपटापर्यंत राहिली. शैलेंद्र आणि दादा बर्मन यांची सर्व गाणी गाजली. काही मोजकी गाणी देत आहे. 


शैलेंद्र यांच्या समकालीन गीतकार मंडळींमध्ये शकील बदायूं, मजरूह सुलतानपुरी, राजेंद्रकृष्ण, हसरत जयपुरी, साहिर लुधियानवी आणि भरत व्यास असे अनेक मोठे मोठे आणि प्रतिभावान कवी होते आणि तेही तितकेच व्यसनी होते. पण शैलेंद्र यांचे वेगळेपण असे होतं की ते फार मोठं तत्वज्ञान अगदी साधे सोपे शब्द वापरून सांगत आणि जे लिहायचे त्यात एक गेयता असे. चित्रपटाचा आशय लगेच समजे. एक उदा. जेव्हा 'आवारा' चित्रपटाची काठ ठरली आणि गाणी लिहिण्याची वेळ आली तेव्हा राजसाहेब आणि शेलेंद्र कथा ऐकायला लेखक के ए अब्बास यांच्याकडे घेऊन गेले. शैलेंद्र यांची ओळख करून दिली पण साधे कपडे घातलेले शैलेंद्र यांचे व्यक्तिमत्व अब्बास यांना काही अपील झाले नाही पण त्यांनी काठ ऐकवली. शेवटी राजकपूर यांनी शेलेंद्र यांना विचारले 'तुम्हाला काय समजले?’ 'आवारा था बिचारा गर्दीश मे आस्मान का तारा था’. अब्बास उडाले. 'माझ्या कथेचे सार अगदी चपखल मांडणारा हा इसम कोण आहे?' तेव्हा राजसाहेबांनी परत ओळख करून दिली आणि हेच शब्द शैलेंद्र यांनी काव्यात मांडले. 

शेलेंद्र यांच्या मुलांनी सांगितलेल्या आठवणीनुसार शैलेंद्र हे अतिशय प्रेमळ पिता होते. जेव्हा त्यांना वेळ मिळत असे तेव्हा लहान मुलांमध्ये लहान होत असत. 

शैलेंद्र यांच्या वाचनात एक कादंबरी आली त्याचे नाव होते ‘मारे गये गुल्फाम’ लेखक होते फणीश्वरनाथ रेणू. त्यांना कथेत एक चित्रपट दिसला आणि त्यांनी स्वतः निर्मिती करायचे ठरवले हीच त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका ठरली आणि त्यांचे प्राण घेऊन गेली. 

पटकथा लिहायला रेणू बसले, स्टार कास्ट ठरली वहीदा रहमान आणि राज कपूर. राज कपूर यांचे चित्रपटात आगमन होताच शंकर जयकिशन हे संगीतकार ठरले आणि माझ्या माहितीप्रमाणे यातील बहुतेक गाणी जयकिशन यांनी संगीतबद्ध केली. राजसाहेबांनी १ रुपया मानधन घेण्याचे ठरवले आणि इतर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी आपले मानधन न घेता काम करायचे ठरवले. चित्रपट एका वर्षात तयार होणार होता, ज्याचे बजेट ४ लाख रुपये होते. झालेल्या विलंबाने ते २२-२३ लाख रुपयांवर गेले. त्याकाळी शैलेंद्र हे कायम तणावाखाली असत आणि कर्ज घेतलेली मंडळी पैशाकरता तगादा लावत. संवेदनशील मनाचे शैलेंद्र हा ताण सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी १४ डिसेंबर १९६६ रोजी आत्महत्या केली. 

यशाचे सगळेच भागीदार असतात पण अपयशाला कोणीही वाली नसतो. अपयशाची जी कारणे ऐकली ती फक्त एकमेकांवर चिखलफेक होती आणि दुर्दैवाने एक सुंदर चित्रपट शैलेंद्र यांच्या मृत्यूनंतर पुरा झाला आणि प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 

खरेतर शैलेंद्र यांचे आयुष्य त्यांच्या शब्दानुसार ‘दिलका हाल सुने दिलवाला, सिधी बात ना मिरची मसाला’ असे होते पण चित्रपट निर्मितीचा ध्यास जीवघेणा ठरला. 

शैलेंद्र यांच्यानंतर जग थांबले नाही. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शैली शैलेंद्र यांनी गीतकार म्हणून काही चित्रपटांकरता गीते लिहिली पण त्यांना यश लाभले नाही. शैलेंद्र यांच्यासारखा साध्या शब्दात मोठे तत्वज्ञान मांडणारा दुसरा शब्दप्रभू परत होणा कठीणच !

-शैलेश दामले














संदर्भ 
लता मंगेशकर : लेखक - राजू भरतन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा