- संपादकीय -

नमस्कार, मंडळी!

ऋतुगंधच्या शरद अंकामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या ह्या अंकाची केंद्रकल्पना आहे "तमसो मा ज्योतिर्गमय."

एकीकडे सिरीया सारख्या देशांत माजलेली अनागोंदी, त्याचा तिथल्या नागरी जीवनावर होणारा परिणाम, सक्तीची स्थलांतरं आणि त्यात येणाऱ्या अनंत अडचणी आणि उद्भवणाऱ्या शोकांतिका; जागतिक सत्तांमध्ये चाललेली वर्चस्वस्पर्धा आणि युद्धाची टांगती तलवार; भारतात स्त्रियांवर आणि नकळत्या पोरांवर होणारे बलात्कार, भेदाभावाधारित दंगे; इंडोनेशियातील अरण्यआगी; अमेरिकेतला गोळीबार; पाकिस्तानातला दहशतवाद … ह्या सगळ्या परिस्थितीत "तमसो मा ज्योतिर्गमय" न आठवलं तरच नवल.

अर्थात ह्या सगळ्या अंधारात काही तेजशलाकाही आहेतच. हेमलकसासारखा आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारा प्रकल्प, सिंगापूरसारखा ५० वर्षांत जगाच्या नकाशावर पोचलेला देश, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून वाहणारा मदतीचा ओघ, प्राणावर बेतणारा धोका पत्करून इबोला सारख्या संकटांच्या वेळी मदतीला धावून जाणारे स्वयंसेवक, ऑंग सान सु क्यी ला निवडणूक लढवण्याची परवानगी…

आपला सगळा प्रवास हा अंधार आणि तेजाच्या तटांमध्ये दोलायमान असतो. आपल्याला सगळ्यांनाच अंधाराकडून तेजाकडे जायचं असतं आणि हा प्रवास दोन पावलं पुढे एक पाऊल मागे असा चालू राहतो. पण तेजाची - न्यायाची, समभावाची, शांतीची, विकासाची, ज्ञानाची, आनंदाची - आस आपल्याला कायमच राहते. कधी अंधार दाट वाटतो, कधी अमावस्या नको इतकी दीर्घ वाटते, पण त्यानं दिवस उगवायचा टळत नाही आणि त्याची वाट बघणंही.

ह्या अंकातलं बव्हंशी साहित्य ह्या केन्द्रकल्पनेचा वेगवेगळ्या अनुभवांतून शोध घेतं. रोजचे अनुभव, नातीगोती, आध्यात्मिक बैठक असे वेगवेगळे कोपरे धुंडाळतं. त्याबरोबरच आपली इतर सदरं आहेतच.

ह्या बरोबरच आपण ऋतुगंधसाठी एक "तमसो मा ज्योतिर्गमय" पाऊल उचलतो आहोत. ह्या अंकापासून आपण ऋतुगंध फक्त ब्लॉग रुपात प्रकाशित करणार आहोत. कारणं अनेक आहेत; प्रमुख अशी:

१. पीडीएफ अंकामुळे अंकाच्या वजन / आकाराचा प्रश्न उद्भवतो आणि त्यामुळे लेखकांवर शब्दमर्यादा घालावी लागते. अभिव्यक्तीला त्यामुळे मर्यादा येतात आणि काही दर्जेदार साहित्य आपल्याला प्रकाशित करता येत नाही. ब्लॉगमुळे हा प्रश्न सुटतो.
२. डाउनलोड करण्याचा त्रास कमी होतो.
३. लेखक - संपादक मंडळाबरोबर सहज संवाद साधता येतो, प्रतिक्रिया देता येतात.
४. अक्षरजुळणीतल्या अनेक अडचणी टाळता येतात.
ममंसिंनी कार्यकारिणीनी ह्या प्रस्तावाला मान्यता दिली याबद्दल ऋतुगंधतर्फे खूप आभार! आणि हा बदल तुम्हां सर्वांना रुचेल अशी आशा.

नुकत्याच येऊन गेलेल्या दिवाळीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

तुमची,
ऋतुगंध २०१५ समिती


*** लेखांत व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे संबंधित लेखकांची आहेत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तसेच संपादक समिती त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा