संपादकीय


नूतन वर्षाभिनंदन !!

वसंतातल्या पालवी पालवीतून
निसर्ग सृजनाचे रूप गवसे
शब्द शब्द कवितेत शिंपून
साहित्य सृजनाचे उमटती ठसे
ऋतुराजाच्या आगमनाने
पुलकित होती तनमने
ऋतुगंधचा आनंद उत्सव
काव्य विशेषांकाचा साज सजे

शालिवाहन शके 1935 च्या या नववर्षातील ऋतुगंधच्या या काव्य-विशेषांकात सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत!!

मागच्या वर्षी चित्रकला, नृत्य, चित्रपट, नाट्य आणि संगीत अशा निरनिराळ्या कलाक्षेत्रांचा आपण ऋतुगंधमध्ये आस्वाद घेतला. सर्जनशीलता हा या सार्‍याच कलांचा आत्मा. साहित्याच्या प्रांगणात प्रकट होणार्‍या सर्जनतेचं एक प्रभावी, मोहक आणि तरल रूप म्हणजे "कविता'!! कवितेशी गाठ-भेट न झालेला मनुष्य विरळाच. शालेय जीवनात तर ही कविता विशुद्ध रूपात भेटतेच, पण शिक्षणाला मुकलेल्या दुर्दैवी मुलांनाही ती लोकगीते, भजन, अभंग, आरत्या, ओव्या आणि नव्या युगातली भावगीते, चित्रपट गीते अशा रुपातून आपले दर्शन देतेच. कुठल्याही रुपात गवसली तरी ती एक जिवलग सखी बनून आपल्या मनात ठाण मांडून बसते.

शाळेत शिकलेल्या, जगलेल्या आणि मनाच्या कोपर्‍यात जपून ठेवलेल्या कविता ही आपल्या सर्वांचीच एक अमूल्य सांस्कृतिक ठेव आहे. सहज सोप्या शब्दांत सकाळी जागवणारी "उठा उठा चिऊताई', तर "दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट' ऐकत लाडावून केलेले दुपारचे जेवण, "घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार' असं म्हणत काठीच्या घोड्यावरचा खेळ आणि "टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' म्हणत बागेत धरलेला फेर... या कवितांचा प्रवेश बालविश्वात असा सहज झाला होता. "लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधून दुसर्‍या लाख' या बाहुलीच्या कवितेनं आपल्याला कधी संवेदनशील बनवलं तर "विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्रांना' म्हणत गवतफुलाचे रंग पहाताना आपल्याला कधी सृष्टीसौंदर्याचे भांडार उघडून दिले ते आपल्याही ध्यानात आलं नाही. "तदा बापाचे हृदय कसे होते, न ये वदता अनुभवी जाणती ते' शिकताना आपल्याच बाबांमध्ये दडलेल्या कुठल्या तरी अज्ञात भाव-भावनांचे दर्शन झाले तर "घाल घाल पिंगा वार्‍या' ऐकताना आईच्या मनोविश्वात थेट प्रवेश झाला...

वाढत्या वयाबरोबर अनुभवांचं क्षितिज वाढू लागलं. सीमेवर लढणार्‍या "अनाम वीरा'चा अभिमान दाटून आला तर कधी "तिची उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवानं दोन हात दहा बोटं' ऐकताना कृतिशीलतेचा संदेश कायमचा कोरला गेला. "पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!' ने जिद्द जागवली तर "त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक'ने "स्व'त्वाला शोधण्याचा मार्ग गवसला. निसर्गाच्या वैभवाचे एक एक दालन उघडून त्याच्याशी गट्टी जमवणार्‍या कविता तर निसर्गाच्या प्रत्येक रूपात साठून राहिल्या. "तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणीला' मधला फुलराणीचा मुग्धभाव, "झाडांनी किती मुकुट घातले डोकिस सोनेरी'मधली रम्य संध्याकाळ, "वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे' म्हणत पाहिलेलं श्रावणातलं आकाश, "कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो' अशी हुरहुर लावणारी हरवलेली चांदरात...या सार्‍याचा अनुभव कुठल्या शब्दात व्यक्त करता येईल का कधी?
ग्रामीण कविता, शहरी कविता, दलित कविता, निसर्ग कविता, छंदबद्ध कवित, मुक्तछंद कविता, सुनीत, गजल, चारोळ्या अशा निरनिराळ्या रुपातल्या आणि शांत, करुण, रौद्र, वीर, शृंगार इत्यादि निरनिराळ्या रसांनी परिपूर्ण अशा नाना कविता भेटत राहतात. गीत बनून ओठावर रुळणार्‍या कवितांची जादूही निराळीच. भाव-भावनांचे, व्यक्तिचे, प्रसंगांचे मनोहारी दृष्य चित्रण या गीतांमधून पहायला मिळते आणि आपण सहज गुणगुणू लागतो. "वेडात मराठे वीर दौडले सात' मधलं शौर्य, "सुख थोडं, दु:ख भारी, दुनिया ही भलीबुरी' मधलं वास्तव, "राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची' मधला स्वतंत्रता घोष, "तरुण आहे रात्र अजुनी'मधला लाघवी शृंगार, "पाऊस कधीचा पडतो'मधलं ओलं एकटं दु:, "ही वाट दूर जाते' मधली स्वप्नाळू मुग्धा...या आणि अशा अनेक गीतांमधून जपलेले अनेक अनुभव आपलं भावविश्व समृद्ध करीत असतात.

कविता सखी बालपणाची
कधी तरुणाईतल्या स्वप्नांची
कधी कुणाच्या मनात डोकावीत
भावतरंगांवर आन्दोलित करणारी
मूठभर शब्दांची सहज गुंफण
कधी शिस्तीतली तर कधी उधळण
कधी मिटलेल्या डोळ्यांतून दाटणारी
कधी हात धरून पावसात भिजवणारी
संवाद स्वत:शी, संवाद भगवन्ताशी
संवाद जोवर मनामनाशी
तोवर कविता भेटत राहील
गुरफटत उलगडत जराजराशी...

कवी, कविता आणि त्या तरल काव्यविश्वाची सफर घडवून आणण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न. या अंकातून थोडंसं कवितेत गुरफटूया, थोडीशी कविता उलगडुया, थोडीशी कविता जगूया...


अमिता डबीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा