जेवणाचे संगीत..


भुकेजल्या पोटी मी स्वैपाकघरात पाय ठेवला
तशी सगळी भांडी नाचू लागली गाऊ लागली..

परात म्हणाली, 'मला उचल अन् पिठ मळवं'
कढई म्हणाली, 'घेऊन मला कडेवर, हळूच ठेव आचेवर'
कुकर म्हणाले, 'हवा मला अंबेमोहोर, सुंगध दरवळेल घरभर'

पुढ्यात माझ्या सांडशी आली, कालथा आला, विडी आली, रवी आली
तवा, पोळपाट, लाटणं, बत्ता सारं सारं काही आलं
भांडयाला भांडं लागून आदळआपट व्ह्यायला लागली.

मी कान बंद केले तसा मला भास झाला..
आई म्हणाली 'कणिक मळताना हाताला जरासं तेलतूप लावावं'
कांदा चिरताना ताई म्हणाली 'पाण्यात आधी कांदा बुडवून घ्यावा'

प्रेमळ सुरात आजी म्हणाली 'वरणाला रवी लावताना पातेलं कस खोल असावं'
शेजारची काकू आली, वहिनी आली, मावशी आली, आत्या आली

आता आदळआपट थांबली, भासानी भरलेले घर शांत झाले,
आठवणींचे घुंगर वाजू लागले.. हळुहळु तेही मंद झाले

स्वैपाकघरातील दिवा मालवून, आवरून अन सावरून
कधी साग्रसंगीत जेवण पाटासमोर आलं कळले देखील नाही...
- यशवंत काकड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा