एक चतुर्थांश !


आपल्यातही फिटनेस असला पाहिजे, इच्छा प्रबळ होती पण पहिला प्रश्न पडला, ‘म्हणजे नक्की काय’? विचारांती ‘फिटनेस’ ह्या शब्दाच्या अर्थातचं उत्तर सापडलं. पण जेव्हा लख्ख प्रकाशात उत्तर 'शारीरिक व्यायाम' असं आलं तेव्हा तीन चतुर्थांश उत्साह तिथेच गळून पडला. उरलेल्या एक चतुर्थांशाबरोबर मजल गाठायची म्हणजे थोडं अवघडंच कोडं सोडवायचं होतं. नुसता शारीरिक व्यायाम, योगा नाही तर आहारावर नियंत्रण म्हणजे सगळ्या आवडत्या चटपटीत गोष्टींना टाटा बाय बाय! अगदीच बाय बाय नाही तर मनांत आलं की कधीतरी नुसतंच Hi-hello करता येणार होतं. आहाराचं वेळापत्रक पाळावं लागेल, चांगले छंद जोपासावे लागतील, मित्र मैत्रीणींबरोबर निखळ आनंद उपभोगणं, सूची तर तयार झाली पण त्यात सर्वात महत्वाचा अडथळा म्हणजे उरलेला एक चतुर्थांश भाग! म्हणजे ह्या सर्वांची सांगड घालून, मनांत पक्का निश्चय करुन आपल्याला हवा असलेला माईल स्टोन गाठणं. विचारांती तसं सर्वचं अवघड होतं आणि नव्हतंपण. खरतरं परीक्षा होती ती ह्या एक चतुर्थांशाची.

मग सुरुवात झाली की राव परीक्षेला! संपूर्ण दिनक्रम ठरवला गेला. त्यात सद्यस्थितीत असलेल्या अनावश्यक सवयींची विचारपूर्वक सूची तयार केली गेली, त्यात थोडेसे फेरफार करुन सुधारीत आवृत्ती हाती लागल्यावर त्यांवर अंमलबजावणी कधीपासून करायची ह्यावर गहन चिंतन केलं गेलं. त्यातून निष्कर्ष निघायला उशीर होतोय हे एक चतुर्थांशानी पुन्हा निर्देशित करुन दिलं तसं युध्दपातळीवर चिंतन पुन्हा सुरु झालं आणि निकाल हाती लागला. परीक्षेचा दिवस निश्चित झाला तसं उत्साहाचं वातावरण तयार झालं. भविष्यातली दिवास्वप्नं खरी होण्याची जाणीव अन् त्यातूनच निर्माण होणारी positive उर्जा. सोबतीला असा सवंगडी आल्यावर कोणतीही मजल गाठणं सोपं होतं ह्याची जाणीव आठवड्याभरातचं झाली. नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक बदल होत गेले. स्वत:च स्वत:च्या प्रेमात पडतो ना तसे काही झाले बुवा ! 

रोजचा नियमीत व्यायाम अन् त्या वेळेत ऐकले जाणारे संगीत आणि काही चांगले चांगले विचार, रोज ज्ञानात भर घालत होते. जसा काही पाठ्यपुस्तकातला रोज एक धडा शिकायला मिळत होता म्हणा नं. निसर्गासोबत रममाण होण्यासाठी की काय walk शी गट्टी जमत गेली, अन् त्यातूनच त्याचे व्यसनचं लागले म्हणा की.

आहारात थोडेफार बदल झाल्यामुळे आपण काहीतरी विशेष करतोय ह्या जाणीवेतून आकाश दोन बोटं ठेंगणं झाल्याचा भास होत गेला. शरीरातील उत्साह वाढला, त्याचबरोबर छोट्या छोट्या शारीरिक तक्रारीतून मुक्तता होऊ शकते ह्याची प्रचिती यायला वेळ लागला नाही. मित्र मैत्रिणी कौतुक करत होत्या तेव्हा काहीतरी प्रेरणादाई करत असल्याचा आनंद मिळतं गेला. उत्साहाच्या भरात जे जे छंद जोपासावेसे वाटत होते त्यांना चालना दिली गेली. मग काय, ह्या स्वर्गीय सुखात रमायचाच मुळी ध्यास जडला अन् अचानक लक्षात आलं की आपल्यातला एक चतुर्थांश परीक्षेत उत्तीर्ण झालाय. मग आता पुढे काय? आता पुढच्या पुढच्या परीक्षा देण्याचा नवा छंद जोपासलाय अन् त्यातूनच फिटनेसचे शारीरिक आणि मानसिक धडे शिकायला मिळताहेत. आता फिटनेसचं रहस्य सोडवण्यासाठी वेगळ्या टीमची गरज नाही, आपणचं आपले गुप्तहेर असतो हे उमगलयं ….

- नंदिनी नागपूरकर






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा