मुलाखत- सुधीर मोघे


शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला "सखी' म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे श्री. सुधीर मोघे. खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील "Poet Sudhir' मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व मांडले. त्यांनी लिहिलेली आणि गाजलेली अशी गाणी अनेक, पण त्यातली खास म्हणजे सखी मंद झाल्या तारका, फिटे अंधाराचे जाळे, आला आला वारा, सांज ये गोकुळी, एक झोका, गोमू संगतीने, दयाघना, दिसलीस तू, विसरू नको श्रीरामा मला, फिरुनी नवी जन्मेन मी, रात्रीत खेळ चाले हा गूढ सावल्यांचा. "पक्ष्यांचे ठसे', 'स्वतंत्रते भगवती', "गाण्यांची वही', "शब्दधून', "लय' आणि "आत्मरंग' हे त्यांचे सहा कविता संग्रह आणि "निरंकुशाची रोजनिशी', "गाणारी वाट', "अनुबंध' ही त्यांची ललित गद्यस्वरूपातील पुस्तकं. 

"शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते' असे समजणार्‍या या कवीबरोबर गप्पांचा योग ऋतुगंधच्या टीमला आला. त्याच गप्पांमधला काही भाग मुलाखत स्वरूपात आपल्या पुढे मांडत आहोत. 

तुमच्या मनात एखादी कल्पना येते ती कोणत्या रुपात येते? शब्दांच्या, सुरांच्या की रेषा आणि रंगांच्या? 

माझे कवी असणे हेच मुलभूत आहे. कवी कविता करतो म्हणून मी कवी नाही. माझे कवीपण हे शब्दांवर अवलंबून नाहिये, तर कवीपण ही माझी वृत्ती आहे, माझी अभिव्यक्ती आहे आणि माझ्या व्यक्तिमत्वाचे मूळ आहे. काव्यापलिकडे मला अनेक गोष्टी अवगत आहेत, अनेक गोष्टींची आवड आहे. याचा अर्थ जे जे मी केले आहे वा करतो, त्याला मी poet असण्याचा base आहे. I am a poet-performer, poet-composer, कवी-संगीतकार आहे. हे सगळे नकळत झाले आहे, ठरवून झालेले नाही. ह्या सगळ्यात माझं कवी असणे हेच मुलभूत आहे. कोणतेही माध्यम असो पण त्यात जो व्यक्त होतो तो कवी असतो. शब्द हे कवितेचे निर्विवाद अविभाज्य अंग आहेत. तरीपण माझे कवी असणे वा माझे निरपवाद स्वयंभू कवीपण हे केवळ शब्दातून व्यक्त होणारे, निव्वळ शब्दांतून सिद्ध होणारे आणि शब्दा अभावी पोरकं होणारे असं मी कधी मानलं नाही . 

१९७५ साली जेव्हा माझा कवी असण्याचा गवगवा नुकताच सुरू झाला होता, तसेच अनेक क्षेत्रात, जसे सिनेसृष्टीत काहीतरी करण्याची अभिलाषा होती आणि तसे प्रयत्नही चालले होते, तेव्हा आकाशवाणीवर “बिंब- प्रतिबिंब” या मालिकेत अरुणा ढेरे यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला होता, “हे इतकं सगळं करायचं म्हणतोस, पण त्यामध्ये तुझी कविता, तुझ्यातले कवीपण कोमेजणार नाही का? त्यावर मी सहजगत्या उत्तर दिले होते, “तो कवी त्याची कविता हे जर इतकं लेचंपेचं असेल तर मरेल, पण तसं नसेल तर मी जे करेन त्याला कवितेचा स्पर्श असेल.” माझ्या गद्यलेखनाची जातकुळी कवितेचीच आहे. “कविता-सखी” ह्या लोकसत्तामधील लेखमालिकेत मी माझ्यातल्या कवीच्या दृष्टीकोणातून सारे काही टिपण्याचा प्रयत्न करतोय. 

एक दोन वर्षात मला paintings ची ओढ लागली. तसं या आधी मी कधी paintings केले नव्हते, पण अचानक अपरिहार्यपणे ह्या process मध्ये ते सुरु झाले आणि ते करता करता माझी अभिव्यक्ती त्यात दिसायला लागली. त्यामुळे ते चालू आहे. मागच्या काही दिवसांत माझी exhibitions झाली “निरव- नि:शब्द”आणि “रंगधून”. मी असे म्हणेन की “आतापर्यंत मी कवितेत चित्र काढत होतो तर आता चित्रात कविता करतो”. ह्या गोष्टींचा मला complex नाही आहे. ती ताकद impulsive आहे. जे काही मी करतो त्याच्याशी मी सन्मुख असतो. एक विशिष्ट inner urge असल्याशिवाय मी काहीच करत नाही. 

कवी, गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्व कसे घडले? 

पहिल्यापासूनच मी बहुआयामी आस्वादक होतो. माझे वडील कीर्तनकार होते त्यामुळे रक्ताच्या नात्यामुळे तो वारसा मला लाभला. माझ्या वडिलांचेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते, ते एक सशक्त कलावंत, सुजाण, विकसनशील होते. अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांना कीर्तन साकारताना पाहिले. ज्या कुठल्या परिस्थितीत मनुष्य वाढतो त्याचा परिणाम, ते संस्कार त्यावर होतातच. मी स्वतःभोवती कधीही भिंती उभारल्या नाहीत. त्यामुळे माझ्याकडे काव्य, संगीत जे काही आपोआप येते होते, ते मी अनुभवत होतो आणि ते आत्मसातही होत होतं. 

तुम्ही नेहमी ज्या कविता लिहिता त्या उत्स्फूर्त येतात, पण चित्रपटाच्या प्रसंगांसाठी जेव्हा तुम्ही गीतलेखन करता तेव्हा काही अडसर येतात का? 

माझे लहानपण चित्रपट गीतांच्या सान्निध्यातच गेले. शैलेंद्र, साहिर यासारख्या गीतकारांचा माझ्यावर बराच प्रभाव होता. हिंदीवर माझा पिंड पोसला गेला आहे. त्याचा प्रभाव हा माझ्यावर आहे. मी एक कवी आहे आणि चित्रपट गीते लिहितो म्हणजे मी काही वेगळे करतो असे नाहे. मी एक कवीच आहे जो फक्त एका वेगळ्या मीडियाला सामोरे जातो.  मुळातच मी रंगभूमीशी, सिनेमाशी निगडीत असल्यामुळे, चित्रपटगीते करणे काही अस्वाभाविक आहे, असे कधीही वाटले नाही. किंबहुना मी एक कलाकारही होतो, मला अभिनायाचेही वेड होते पण ते मी अंगिकारले नाही. माझ्यातला तोच कलाकार नेहमीच सशक्तपणे या कवीच्या मागे उभा असतो. माझ्याकडे आलेल्या संधी मी सोडत नाही, कुठल्याच नाही. माझ्यातला कवी, माझ्यातला कलाकार आयुष्य जगताना वेगवेगळ्या भूमिका घेतो, वेशभूषा घेतो पण आतला मनुष्य तर तोच, मी असतो ना! त्याच्याच आयुष्याचा संबंध कुठेतरी जुळलेला असतो. त्यामुळे चित्रपट गीते माझ्या कविताच आहे, माझ्याच जाणिवा आहे. “दिस येतील दिस जातील” या गाण्यात तर स्त्री आणि पुरुष या दोघांची मने आहेत. या द्वंद्व गीतात पुरुषी दुखरेपणाही आहे आणि स्त्रीसुलभ मनही आहे. एकाने मला विचारले तुम्ही पुरुष असूनही स्त्री मन कसे काय व्यक्त करू शकता? त्यावर मी इतकेच म्हणालो मनाला कुठे gender असते? मनाला कुठे स्त्री पुरुष हा भेद माहित? मन जेथे पोहोचते, तिथले त्याला दिसते. मी लिहिलेल्या अनेक द्वंद्व गीतातून gender व्यक्त होताना दिसत नाही. “मला काय झाले, माझे मला कळेन” असे कोणीही म्हणू शकते. 

चित्रपट गीते लिहित असताना माझ्यातला चावटणा, धीरगंभीरपणा हे सगळे अवतरत होते. ह्या जंगलात घुसल्यावर शब्दांशी खेळताना मी एक वेगळाच अनुभव घेत होतो. खळबळ झाली आणि त्यातूनच शब्द मिळाले, अनेक फाटे फुटले, त्यामुळे हे जगणं खूप सहज आनंदाचे झाले. थोडक्यात चित्रपट गीतांमुळे मी कवी म्हणून वाढलो अधिक समृद्ध झालो. 

तुमच्या कवितेतून काळोख, अंधार असे विषय अनेकदा येतात, त्याबद्दल काही सांगाल का? 

सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी एक सकारात्मक दृष्टीकोण असणारा कवी आहे. "फिटे अंधाराचे जाळे' या कवितेसंदर्भात काही बाल कलाकारांशी संवाद साधताना माझ्या डोक्यात विचार आला, "फिटे अंधाराचे जाळे' अशी ओळ मी लिहिली आहे, याचे कारण मला प्रकाशाचे गाणे गायचे झाले तर अंधाराचे जाळे म्हणावेच लागेल. अंधार म्हणजे काही कुरूप गोष्ट नाही. कवितेतील शब्द हे सापेक्ष असतात, ते चिरंतन सत्य नाही. कवितेचं मूळ सांगणं आणि स्पष्ट करणं हा त्यांचा हेतू असतो “फिटे अंधाराचे जाळ” ही पहिलीच ओळ त्याची निदर्शक आहे. उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई अधिक उत्कट करण्यासाठी "अंधाराचे जाळे' ही प्रतिमा आली आहे. 

पण काळोखाचे तरंग मनावर उमटत असताना खोल जाणवतं की, या सर्वाहून निराळा असा काळोखाचा तुकडा आपल्या फार जिव्हाळ्याचा आहे, कारण तो खास आपला एकट्याचा आहे, जणू खास आपल्या मालकीचा आहे. त्याची जर तुलना करता आली तर आईच्या गर्भातील उबदार, आश्वासक काळोखाशी करता येईल. म्हणूनच माझ्या "सांज ये गोकुळी' या कवितेतील "माउली सांज अंधार पान्हा' या ओळी विशेष आहेत. 

तुम्ही लोकसत्ताच्या लेखात नमूद केलेल्या अनिकेत आणि निरंजन ह्याबद्दल काही सांगा ना .. 

अनिकेत आणि निरंजन हे माझेच reflections आहेत. ते दोघेही दुसरे कोणी नाहीयेत. लहानपणापासूनच अंधाराचे वेड असलेला मी जिन्याखालच्या अंधारात तासनतास बसून राहायचो. हा निरंजन वा अनिकेत कोण, याहीपेक्षा ते भेटल्याचा क्षण मोलाचा, महत्वाचा. त्यांच्या भेटीमुळे आयुष्यात प्रकाशाचा थेंब पडला. असे म्हणता येईल की एक प्रकारे शारीरिक मानसिक कोंडीच फुटली. आजचा हा तुमच्या पुढे बसलेला निरंकुश कवी आपल्या भोवतालच्या अनेक लौकिक कोंड्या फोडतच जन्माला आला आहे. अनिकेत निरंजनबद्दल लिहिण्याची खूप इच्छा आहे पण ही पात्रं इतकी माझ्या व्यक्तिगत जीवनाशी जुळलेली आहेत की माझी सुख-दु:खे बाहेर दाखवणे मला अजिबात आवडत नाही आणि तशी इच्छाही नाही. तरी तुम्ही माझ्या चित्रांकडे पाहिले तर माझ्या चित्रांमध्ये कधीच आखीव रेखीव रेषा वा झाडे मी काढली नाहीत आणि मला काढता येतही नाही. माझ्या रेषांमध्ये एक बेशिस्तपणा असतो, त्या चित्रांखाली मी "अनिकेत' म्हणून सह्या करतो. 

“शब्दांच्या काठावरचे शब्दांच्या देठी आले”, शब्दांचे अप्रूप शब्दांच्या ओठी आले. शब्दांच्या अर्थातील जे अप्रूप आहे ना ते गुंजतच बाहेर येते आणि हेच माझ्या लेखी फार महत्वाचे आहे. म्हणूनच "अनिकेत निरंजन'चा जो जिन्यातला काळोख आहे तो माझ्या मालकीचा काळोख आहे आणि जिव्हाळ्याचा आहे. 

एखादी कल्पना कवितेतून, गीतातून किंवा चित्रातून व्यक्त करता येत नाही अशा प्रकारची कोंडी कधी झाली आहे का? 

प्रत्येक क्षणी पाहिले तर creative माणसाची कोंडी होतच असते. जसे आता मी जे तुमच्याशी बोलतोय ते मला सांगायचे नाहीये. मग मला काय सांगायचे आहे? जसे "सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का?' हे तसे पाहिले तर एक romantic गीत आहे पण एका अर्थाने तत्त्वज्ञानपरसुद्धा आहे. कोंडी ही आयुष्याशी जोडलेली अवस्था आहे. त्यामुळे मला अमुक एक सांगता येत नाही असे होत नाही. ते सांगणे सापडणे व ते काय सांगताय याचा शोध घेत राहाणे हेच महत्वाचे आहे. अंधारात बसलेला मुलगा अनिकेत, त्याचाही शोध सुरु आहे. तो शोध कधीच संपणार नाही आहे तो सुरूच रहाणार आहे. जेव्हा त्या सापडत जाईल, तेव्हा त्याला सगळे उलगडत जाईल. 

आपल्या भविष्यातील काही उपक्रमांविषयी माहिती देऊ शकाल का? 

मागच्या दोन वर्षामध्ये मी किर्लोस्कर उद्योगाच्या शंभर वर्षाच्या प्रवासावर “आधी बीज एकले” या नावाची documentary film केली आहे, त्यात अरुण नलावडे यांनी काम केले आहे तर, लेखन आणि दिग्दर्शन देबू देवधर यांचे आहे. ज्योत्स्ना भोळे यांच्या जीवनावरही फिल्म करतो आहे. फिल्म इंडस्ट्री मला खूप जवळची आहे. माझ्या मनात काही कल्पना आहेत जसे "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' प्रमाणे “मराठी रियासत” नावाची मालिका करण्याचा मानस आहे. तसेच एक पटकथाही सध्या डोक्यात आहे, १८५७ च्या काळातली, पण आजच्या काळाला धरून चालणारी एक भूमिका यात मध्यवर्ती आहे. स्वरानंद नावाच्या संस्थेतर्फे मराठी भावगीतांचा कोष यावर्षी करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यात दोन भाग असतील, पहिल्या भागात गीतांची, गीतकार आणि संगीतकारांची सूची असेल आणि दुसर्‍या भागात गीतांचा एकूण प्रवास असेल. मला एखादे बक्षिस मिळाले तर मी आधी त्याचा अर्थ समजून घेतो. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार घेताना मला भयंकर संकोच वाटायचा. कारण माझ्या मनात मी काही करताना ती जाणीव नव्हती. मी जे काही केलं ते माझ्यासाठी केलं, माझी ती मानसिक गरज होती, आर्थिक नाही. ते केलेलं जे तुम्हाला आवडलं हा त्याचा साईड इफेक्ट होता. त्यामुळे ह्या कृतज्ञता स्वीकारायच्या की नाही हा माझा प्रश्न होता. मी आता त्याचा असा अर्थ घेतो की, हे एक नवं भान तुम्ही माझ्यावर घातलंत. त्या दृष्टीने ह्या पुढच्या माझ्या क्रिएटिव्ह जगण्यात हे सामाजिक ऋण आहे. त्याबाबत मी काही करू शकतो का ह्याचा मी विचार करतोय. मला एखादे रिसर्च फाऊंडेशन करायला आवडेल. Cultural research मला फार महत्त्वाचा वाटतो. ह्याचा आवाका ग्लोबल ठेवण्याकडे माझा कल आहे. त्याचं नाव इंग्रजी असावं आणि त्यात सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक, भाषिक भिंती गळून पडव्यात असं त्याचं ग्लोबल कल्चरल फौंडेशन असे स्वरूप असावं.
मुलाखतकार : कौस्तुभ पटवर्धन

शब्दांकन : मुक्ता पाठक शर्माकौस्तुभ पटवर्धन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा