रुपेरी पडद्यावरचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व


आपल्यापेक्षा वयानी कितीही मोठे असलेले आणि मोठे होत गेलेले आपल्या आवडीचे नट हे आपल्याला नेहमी तरुणचं वाटतात. एक ७० वर्षे वयाचं हसरं व्यक्तिमत्व निघून गेलं हे जेंव्हा कळलं तेंव्हाही विनोद खन्ना ह्यांचा अगदी निखळ हसरा-देखणा चेहरा नजरेसमोर झळकला. त्यांनी स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. बच्चनजींच्या झंझावातात झाकोळल्या गेलेल्या अनेक कलाकारांपैकी एक पण तरीही त्या काळातल्या आठवणी निघाल्या की पहिले आठवणारा असा आमच्या बालपणीच्या एका देखण्या-तगड्या-रांगड्या अभिनेत्याला अखेरचा सलाम!!!

विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. विनोद खन्ना यांनी नकारात्मक भूमिका साकारत व्हिलन म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. नंतर अभिनय आणि व्यक्तिमत्वाचा जोरावर ते लाडके हीरो बनले. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून पडद्यावर ह्या रुबाबदार कलावंताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि २०१५ मधील ‘दिलवाले’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. आठवत रहावे असे सुरेख सिनेमे आणि सुरेख अभिनय!!! ‘मेरे अपने’, 'कच्चे धागे', 'लेकीन', ‘कुर्बानी’, 'मै तुलसी तेरे आंगन की', ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधील भूमिकांनी त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र अशी छाप उमटवली. 

१९८२ मध्ये कारकिर्दीच्या परमोच्च शिखरावर असतानाच विनोद खन्ना अर्ध्यावरच चित्रपटसृष्टी सोडून आचार्य रजनीश यांच्यासोबत अमेरिकेला जाऊन ओशोंच्या आश्रमात राहायला लागले. या निर्णयानंतर विनोद खन्नांची चित्रपट कारकीर्द काहीशी थांबली. त्यानंतर थेट पाच वर्षांनी विनोद खन्ना यांनी चित्रपसृष्टीत पुनरागमन केलं होतं. मात्र, पुनरागमनानंतरही रसिकांनी प्रेमपूर्वक त्यांचे स्वागत केले. विजनवासाचा कोणताही परिणाम त्यांच्या छबीवर झाला नाही. तब्बल दीडशे चित्रपट केले. गुलजार, महेश भट, यश चोप्रा, मुकुल आनंद, चेतन आनंद, के. सी. बोकाडिया, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदी दिग्गज दिग्दर्शकांसमवेत काम केले. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चंदेरी दुनियेत त्यांचं स्वत:चं स्थान निर्माण झालं. अगदी सुपरस्टारपदाच्या टप्प्यापर्यंत त्यांची लोकप्रियता होती. बीग बींसोबतही 'अमर अकबर अँथनी', 'हेरा फेरी', 'बटवारा', 'परवरिश' आणि 'रेश्मा और शेरा' या चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची त्यांना संधी मिळाली. 

त्यांच्या आठवणींच्या गोड मधमाश्या कायम घोंघावत राहतील मनात, दिसत राहील त्यांचा पडद्यावरचा रांगडा प्रवास, प्रत्येकाला वेगळ्या भूमिकेतून ते आठवत राहतील. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान, मग अध्यात्म, समाजाची सेवा असं अर्थपूर्ण आयुष्य जगल्यानंतर 'मुस्कुराता हुआ, गुल खिलाता हुआ' असा हा कलाकार अनंतात विलीन झाला. अगदी आजआजवर विनोद खन्ना रुपेरी-चंदेरी दुनियेत वावरत होते आणि आज ते मात्र आपल्यामधे नाहीत. अमर-अकबर-अँथनी मधील अमर निघून गेला हे स्वीकारताना त्यांच्या प्रत्येक चाहत्याचं अंत:करण नक्कीचं द्रवलं असेल. 

अभिनेते विनोद खन्ना यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!!

-यशवंत काकड





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा