नागपूरच्या उन्हाळ्यातले लहानपणीचे खेळ

नागपूरचा उन्हाळा म्हटला की थंडी संपत आली असूनदेखील वडील मंडळींच्या अंगावर काटा यायचा. तुमच्यापैकी ज्यांनी ४८ अंशावर शरीर भाजून घेणे म्हणजे काय असते हे अनुभवले नसेल, त्यांना कदाचित नाही समजणार. अशा उन्हाळ्याची आम्ही लहान मुले मात्र आतुरतेने वाट पाहत असायचो. वार्षिक परीक्षा संपून मोठी सुट्टी लागणार हे तर एक कारण होतेच. या सुट्टीत सलग दोन महिने धमाल करायला मिळणार, हे खरे कारण असायचे! एकतर अभ्यासाचा लकडा कोणी लावणार नाही याची खात्री! बरेचदा उन्हाळा टाळण्यासाठी पूर्ण कुटुंबासह विदर्भाबाहेर जायचा कार्यक्रम असायचा. बहुतेक सगळ्या वर्षी आम्ही नाशिकला आजोळी जायचो. ती मौज काही औरच! वडीलांनी एखाद्या उन्हाळ्यात नागपूरलाच रहायचे जरी ठरविले, तरीही ती आमच्यासाठी पर्वणीच असायची. म्हणजे वडिलांचे काहीही ठरो, आम्हा मुलांची उन्हाळ्यात चैन असायची.

नागपूरच्या उन्हाळ्यात दिवसा पूर्ण शहरातील रस्ते मेल्यागत पडून असतात. सकाळी दहानंतर पारा भराभरा चढायला लागतो. अकरा-बारा पर्यंत ४५-४८ ची मजल गाठली की पार संध्याकाळी सहा सात पर्यंत भट्टी फुल पॉवरमध्ये सुरु असते. नोकरदार माणसं हापिसात कूलरच्या झोतात समोर एखादी फाईल शोभेसाठी ठेवून पेंगायची. त्रास द्यायला कोणी बाहेरचं पब्लिक येणार नाही ह्याची खात्री! दुकान-धंदे वाले देखील निर्धास्तपणे दुकानाला टाळे ठोकून घरी तण्णावून द्यायचे. सगळ्या गावात निद्रायज्ञ सुरु असल्याने मुलांची चंगळच! हे करू नका, ते करू नका अशी मोठ्यांची कटकट नाही. दंगा तर करायचाच, पण झोपी गेलेला जागा होऊ नये इतपत आवाजात, हे तंत्र आम्हाला बरोब्बर साधले होते.

आमच्या घरी आम्ही भावंडेच पाच होतो. म्हणजे आणखी कुमक बाहेरून बोलवायची तशी गरज नव्हती. पण तरीही, आमच्या घरी कोणीना कोणी मित्र मैत्रिणी पडीक असायचेच. त्यात तीन बहिणी व त्यांच्या साळकाया माळकाया (हे विशेषण आम्हा भावांकडून) हा एक गट व्हायचा. आम्ही दोघे भाऊ व आमचे टारगट दोस्त (हे विशेषण आमच्या बहिणींकडून) असा दुसरा गट पडायचा. 

आमच्या घराला समोर आणि बाजूला बोळीवजा अंगण होते. बाजूच्या बोळीत एक पेरूचे झाड होते. त्याच्या फांद्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छतापेक्षा उंच वाढल्या होत्या. बोळीतली अरुंद जागा आम्हाला कंचे खेळायला पुरे होती. उन्हं नसलेल्या भागात एकमेकांच्या कंचांना मारण्याची होड लागे. त्यातही, पाशवी जोराने मारून समोरच्या कंचाचा टवका काढण्यात विजयोन्माद व्हायचा! त्यासाठी मुले एखादा टेणा कंचा बाळगून असत! 

                                         

भोवरा फिरवून जोराने वर्तुळातल्या भोवऱ्याला मारून त्याला वर्तुळाबाहेर काढायच्या खेळात देखील भरपूर मौज यायची. एखादा भोवरा अणकुचीदार आरीच्या माराने दुभंगला, की नुसते मारणाऱ्यालाच नव्हे, तर तुटलेल्याला देखील मोक्ष मिळाल्याचा आनंद व्हायचा! 

                                         

उन्हाळ्यात आंब्यांचा मोसम जोरात असायचा. घरोघरी आंब्याच्या कोयांचा ढीग लागलेला असायचा. त्यावेळी काहीही फेकले जायचे नाही. कोयी धुवून वाळवून त्याची संपत्ती प्रत्येक मुलगा जमवायचा. कंच्याऐवजी, सात आठ कोयींचा ढीग लावून लांबून कोयीनेच त्याला फोडायचे आणि वर्तुळाबाहेर काढायचे हा खेळ जोरात चाले. यात बाहेर काढलेल्या कोयी नेम मारणाऱ्याला मिळत. आमची कोयींची संपदा कमी जास्त होत रहायची. काही फरक पडत नव्हता.  

                                     

बोळातले पेरूचे झाड आम्हा माकडांचे उन्हाळ्यातले कायम घर होते. उन्हाळ्यात पेरू अजून तयार नसल्याने, ते झाड देखील माकडांचे स्वागतच करीत असेल! आम्ही एकेक फांदी पकडून बसायचो आणि दुनियाभरच्या चकाट्या पिटायचो. आतून एखादी मुलगी “हे काय करीत आहेत” याची टेहळणी करायला बाहेर आलीच, तर तिच्या अंगावर वरून काटक्या फेकणे हे आनंदाचे कार्य होते. झाडावर अगदी शेंड्यापर्यंत जावून वरच्या छतावर चढणे हे देखील आवडते काम होते. अर्थात उन्हामुळे कौले प्रचंड तापलेली असायची. तरीही एखादी ढगाळलेली चुकार दुपार पाहून हे कार्य पार पाडले जायचे. नंतर पावसाळ्यात एखादे कौल गळायला लागले तर वडिलांची जरबेने चौकशी चालायची... “कोणी चढले होते कां रे छतावर?” उत्तर काय ते ठरलेलेच होते, हे त्यांनाही माहीत होते. तरी रीतीप्रमाणे प्रश्न विचारले जायचेच!

                                         

सिनेमातली गाणी मुलांमध्ये प्रचंड आवडती असायची. त्याकाळी पेन ड्राईवची सोय अर्थातच नव्हती. यु ट्यूबची चंगळ माहीतच नव्हती. आम्ही मुले सगळी गाणी तोंडपाठ करायचो. उन्हाळ्यात गाण्याच्या भेंड्या खेळताना हा अभ्यास उपयोगी यायचा. गाणी पाठ असून देखील मला गाण्यांच्या दोन आणेवाल्या पुस्तिका जमा करायचा छंद लागला होता.

माझा मामा त्यावेळी मॅट्रिकसाठी आमच्या घरी रहायचा. त्याने एकदा मला एक गाण्याचे पुस्तक बक्षीस दिले. ते पाहून मला कळले की असे काही असते! मग थोड्याच दिवसांत मी माझा स्वत:चा पुस्तिकांचा खजिना जमविला. खाऊचे पैसे वाचवून जरी ह्या पुस्तिका जमविल्या असल्या, तरी घरी ते सांगण्याची सोय नव्हती. वडिलांनी छडीनेच मारले असते! मग हा खजिना लपवायचा कुठे, तर त्यासाठी उन्हाळ्यात व थंडीत घराच्या छतावरच्या कौलांच्या पोकळीत ठेवायची जागा शोधून काढली. पेरूच्या झाडावरून छतावर गेले, की आधी प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेली पुस्तके काढायची, व फांदी फांदीवर बसलेल्या मुलांना वाटायची.

                                     

मग काय, मजाच मजा! पानापानांवर आमचे समूहगायन सुरु! गाऊन गाऊन घसा सुकला की मुले झाडावरून खाली उतरायला लागत. तेव्हा चपळाईने आपला खजिना हस्तगत करून पुन्हा सुरक्षित कौलांमध्ये दडविला की आमची माकड टोळी घरात थंड पाणी प्यायला घुसायची! 

मुलींनी आत कूलरच्या थंड हवेत सुस्तावत बैठे खेळ मांडलेले असायचे. पत्ते, सोंगट्या, काचापाणी, गाण्याच्या भेंड्या असे काय काय करून झाले असायचे. थंड पाणी गटागटा ढोसले की आम्ही मुले आम्हाला पण खेळायचेय म्हणत त्यांच्यावर स्वारी करायचो. आतापर्यंत दांडगाईशिवाय खेळल्याने नाही म्हटले तरी त्याही बोअर झालेल्या असायच्या.
                                        

उन्हाळ्यात मोठा ग्रुप असला की पत्ते तर हवेच! त्यांत सत्ती लावणी, नॉट अॅट होम, लॅडीस, गुलाम चोर, ३०४ असे कितीतरी पर्याय होते. सत्ती लावणी मध्ये आपण जिंकण्यापेक्षा इतरांना अडवून ठेवण्यात आसुरी आनंद मिळायचा. नॉट अॅट होम खेळतांना मागितलेले पान आपल्याकडे नसेल तर तारस्वरात “नोट्टेठ्ठोम” असे किंचाळण्याची शर्यत लागायची. ३०४ हा मस्त खेळ होता. एरवी एक्का सगळ्यात मोठा, पण यात गुलाम सगळ्यात मोठा! बहिणीची मैत्रीण पार्टनर असताना “आमचे मॅरेज आहे”, असे ठणकाऊन सांगत हातातली राजा राणीची जोडी दाखवणे ही पर्वणी होती! अशावेळी पार्टनरच्या गालावरचे गुलाब पाहताना हातातले पत्ते विसरले जायचे. 

एका उन्हाळ्यात माझा काका चार महिने आजारी असल्याने घरी होता. तेव्हा त्याने ब्रिज हा अफलातून खेळ शिकवला. एकदा तुम्हाला ब्रिजची चस्की लागली, की इतर सगळे पत्त्यांचे खेळ हे पोरखेळ वाटू लागतात. माझेही तसेच झाले होते. हळूहळू थोडेथोडे प्राविण्य मिळतेय असे वाटायला लागले, तसे ह्या खेळाची अप्रिय बाजू टोचू लागली. ते म्हणजे खेळ संपल्यावर होणारे खेळाचे विच्छेदन. पार्टनरच्या प्रत्येक खेळीचे विश्लेषण करून तू ते असे असे खेळायला पाहिजे होते, वगैरे पटवून देणे. यात मला मुळीच स्वारस्य नसायचे. अरे, मजेसाठी खेळा, खेळ संपला, विषय संपला! ब्रिज मध्ये हे चालत नाही. एकदा तर माझ्या एका पार्टनर काकानी भर खेळात मला दाटले, “पुन्हा असे खेळला, तर कानाखाली आवाज काढीन!” तेव्हापासून माझा ब्रिज कोसळला.

आम्हा मोठ्या मुलांमध्ये कधीकधी बच्चा कंपनी देखील लुडबुड करायची. त्यांना कसे कटवायाचे, हे त्यांच्या उपद्रव मूल्यावर ठरत असे. म्हणजे धाकदपटशा करून गप्प बसली तर ठीक. नाहीतर एखाद्याला कच्चे लिंबू म्हणून खेळात सामील करून, तर कधी स्वयंपाकघरात डब्बे धुंडाळून काही खाऊ आणता येते कां ते शोधायला पाठवायचे. आईने कुठे काय लपवून ठेवले आहे ते बच्चे कंपनीला बरोबर माहीत असायचे. त्यांनाही स्वार्थ आणि परमार्थ असे दोन उद्योग मिळून ती काही वेळासाठी बिझी राहत! सगळे उपाय करून झाले, की त्यांना त्यांच्या स्वतंत्र खेळात लावून द्यायचे. लहान मुलांचे आपले वेगळेच करमणुकीचे खेळ असत. मोठ्यांमध्ये काही त्यांची डाळ शिजायची नाही. ती बालगोपाल मंडळी एखादे मोठे पितळ्याचे भांडे घेऊन त्यात बसून खोलीभर गोलगोल फिरायची.
                                   
किंवा ढेकूण मारायला नवीन आणलेला पोयशां पंप असेल तर त्याला ढेकणाचा वास लागण्याआधी त्याचे उद्घाटन पाणी भरून करत आणि एकमेकावर तुषार स्प्रे करीत खिदळत राहत .

                                   

मोठ्या मुलांकडून एकदोन चापट्या खाल्ल्यावर ती चिल्लीपिली आणखीनच चेकाळत. ही सगळी मस्ती सुरु असताना आईकडून अधूनमधून ओरडा व्हायचा. माकडसेना कशाला जुमानते! उन्हाळा आणि आईसक्रीम नाही हे कसे होणार? तेव्हा बाहेरचे आईसक्रीम खाणे म्हणजे सणासारखी मेजवानी असायची. आई दादा अधूनमधून आम्हाला संध्याकाळी रसवंतीमध्ये नेऊन भेळ, उसाचा रस, आणि आईसक्रीम अशी मेजवानी तर देतच. तरीही, घरबसल्या, स्वत: घरी केलेले आईसक्रीम करून खाणे हा भन्नाट टाईमपास होता. गरम पाण्याने अमृतांजनची रिकामी डब्बी वास जाईपर्यंत धुतलेली असायची. तीमध्ये गोड दूध आणि हाती लागलेच तर बदाम काजू चुरा करून टाकायचे. डब्बी घट्ट बंद करून टिनच्या उभ्या डब्यात ठेवायची. मोठ्या टिनमधली पोकळी बर्फाच्या चुऱ्याने भरायची. टिनचे झाकण लावून गोलात बसलेल्या मुलांमध्ये ती टिन घरंगळत फिरवायची. पंधरावीस मिनटात घट्ट आईसक्रीम तय्यार. प्रत्येकाच्या तोंडी एक दोन चमचेच पडायचे! स्वत:चे आईसक्रीम ही कल्पनाच मस्त होती!

                                                 

उन्हाळ्यात आई दुपारी जेव्हा झोपलेली नसे, तेव्हा तिची करमणूक म्हणजे वाळवणाची कामे काढणे. त्यावेळी आजूबाजूंच्या चार सहा बायका एकत्र जमून गप्पा गोष्टी करीत वर्षभराचे वाळवण करून ठेवायच्या. नागपूरच्या उन्हाळ्यासारखा दुसरा योग्य ऋतू यासाठी नाही. त्या बाया कामात मग्न असल्या की मुलांची चांदीच चांदी! कधी आम्ही लाटून देतो म्हणत पापडाच्या लाट्या खिशात “लाटणे”, कधी बाहेर अर्धे वाळत आलेल्या कुरडया लंपास करणे! या अर्ध्या वाळलेल्या कुरडया अशा धासू लागतात सांगू तुम्हाला! आम्ही तर आईला म्हणायचो “कशाला वाळवीत बसते, अशाच खाऊ या!” “चल मेल्या, पळ इथून. जरा शांतपणे काम करू देतील तर शप्पथ!” हे आईचे उत्तर पाठ झाले होते.

                                       

                                          

आंब्याचा रस पातेली पातेली खाऊन पोटे टच्च भरल्यानंतर देखील उरायचा. कां नाही उरणार? आतासारखे डझनाने नाही तर शेकड्यानी आंबे घरात यायचे. मग उरलेल्या रसाचे ताटांमध्ये साटे घातले जायचे. मी आणि लहान भाऊ आपापली साटी घालायचो आणि डोळ्यात तेल घालून जपायचो. तिघी बहिणी मला भाऊ व त्याला अण्णा म्हणत. आमच्या साट्यांचे नांव त्यांनी “अण्णा भाऊ साठे” असे ठेवले होते. कावळ्यांपासून साटे जपून ठेवायला आम्ही सतत पहारा द्यायचो. खरे तर कावळ्यांपेक्षा, बहिणींपासून व एकमेकांकापासून ते जपणे हे खरे काम होते. अर्ध्या वाळल्या वाफेवरच्या पापड्या आणि अर्धे वाळले साटे केवळ अप्रतीम लागते!


           

घरबसल्या पतंगीचा मांजा घोटून ठेवणे हा आणखी एक मजेदार टाईमपास असायचा. मग त्यासाठी भाताची खळ, त्यात डिंक, अन शाई, अन वस्त्रगाळ काचेची पूड देखील कायकाय मशक्कत करावी लागायची.

                                             

नाशिकची आजी आलेली असेल तर तिचे आणि आईचे वेगळेच टाईमपास चालायचे. गॅस तर त्यावेळी आलेला नव्हताच, पण आमच्याकडे पंपाचा केरोसिनवर चालणारा एकच स्टोव होता. आजी आली की आईला मातीच्या चुली घालून द्यायची. त्यासाठी बाहेरून माती खणून आणून ओल्या मातीत खेळण्याचे लायसनच आम्हाला मिळायचे. आम्हीही त्या लायसनचा फायदा घेऊन मनसोक्त कपडे घाण करून घ्यायचो. आमच्या प्रत्येकाच्या खेळातल्या चुली देखील करायचो. “बावळट रमाबाई, चौकोनी चूल”, ही म्हण तेव्हा आजीकडून शिकलो. तसेच, चूल ही गोलच हवी, व शेगडी चौकोनी, हे कुठल्याही पुस्तकात नसलेले ज्ञान देखील शिकलो. 

                                            

चुली घालून झाल्यावर आजी समाधानाने म्हणायची “विमल, आता तुझी वर्षभराची निश्चिंती झाली!”. तेव्हा उकाड्यात श्रमाने घामाजलेला तिचा चेहरा आपल्या सदऱ्याने पुसावा अशी तीव्र इच्छा होत असे.

इतकी वर्षे उलटली. लहानपणाचे भन्नाट खेळ काळात विरून गेले. ते खेळ गेले, ते खेळ निर्माण करणारी परिस्थिती गेली. बहुदा “अच्छे दिन आ गये” असेच म्हणावे लागेल. आज लहान मुले मोबाइलवर एकटी एकटीच विडीयो गेम्स खेळत असताना दिसतात. लहानपणी आम्ही वडिलांना पत्ते खेळताना, झाडावर चढून भिंतीला रंग लावताना, आईला वाळवण करताना, आजीला चूल लिंपतांना पाहिले. त्यामधूनच आम्हाला आमचे खेळ मिळाले.

आजची मुले MRT मध्ये आणि घरी देखील वडील मंडळीनां पाहून त्यांचे अनुकरण करायला शिकली. मोबाईल गेम्स अॅडीक्ट झाली! तेही समजू शकते. माणूस हा पूर्वी देखील थोड्याफार प्रमाणात एक बेट होता. तरी इतर बोटींना किनारा देण्याइतपत त्याच्या मनाचा विस्तार होता. एकेकटे खेळायच्या या युगात माणूस भविष्यात एकाकी तरंगता बोयरा (buoy) होणार आहे कां? साध्या करमणुकीतून मनामनांचे पूल बांधायला हे boys शिकतील कां? आजचे buoys, adults केव्हा आणि कसे होणार? 

- अरुण मनोहर



३ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. छानच!!"तरी इतर बोटींना किनारा देण्याइतपत त्याच्या मनाचा विस्तार होता. एकेकटे खेळायच्या या युगात माणूस भविष्यात एकाकी तरंगता बोयरा (buoy) होणार आहे कां? साध्या करमणुकीतून मनामनांचे पूल बांधायला हे boys शिकतील कां? " मनाचे पूल बांधायची गरज कळली आणि पटली तर नक्की बांधतील!

    उत्तर द्याहटवा