मानसिक अनारोग्य – एक गंभीर पण दुर्लक्षित समस्या

आजच्या धकाधकीच्या जीवनात “स्वास्थ्य” हा सर्वांच्या दैनंदिनीचा एक महत्वाचा भाग झाला आहे. वाढत्या जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी करावे लागणारे अथक प्रयत्न आणि सतत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे आजच्या मितीला अत्यंत आवश्यक ठरले आहे आणि त्यासाठी आवश्यक ठरले आहे आपले स्वास्थ्य उत्तम ठेवणे!

मुख्यत: सर्वसाधारण धारणेप्रमाणे, स्वास्थ्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि त्यासाठी नियमित व्यायाम, धावणे, योग, सायकलिंग, पोहणे, वेगवेगळे खेळ, असे सर्व उपाय शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी अवलंबिले जातात. आणि ते योग्यच आहे.

परंतु त्याचबरोबर संलग्न असलेला अतिमहत्वाचा पैलू, तो म्हणजे ‘मानसिक आरोग्य’ हा दुर्दैवाने दुर्लक्षित विषय राहिला असून त्याबद्दल आपल्या सामाजिक वर्तुळामधून निरोगी आणि खुली चर्चा अभावानेच होताना दिसते.

मानसिक अनारोग्य म्हणजे ‘वेडे’पण असा एक सर्वसाधारण निकष लावून या विषयाकडे एक तर विनोदाचा, किंवा टाळण्याचा विषय असे समजले जाते. परंतु कार्यानुशांगिक मानसिक अनारोग्य (profession and work related mental disorders) म्हणजे ‘वेडेपणा’ नसून हा आता जगभरात एक अत्यंत चिंतेचा विषय ठरत चालला आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’ (WHO)च्या अहवालानुसार जगात ४५० दशलक्षाहून अधिक लोक या कार्यानुशांगिक मानसिक अनारोग्याचे शिकार झाले असून ही संख्या दिवसेंदिवस भयावहरित्या वाढतच आहे. यात मुख्यत: नैराश्य (depression), दारू व इतर नशेच्या पदार्थांचा वापर, आणि आत्महत्येची प्रवृत्ती या समस्यांचा मुख्यत: अंतर्भाव आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने १० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून ठरवला असून त्यादिवशी या विषयातील अनेक महत्वाचे उपक्रम, चर्चा, परिसंवाद योजले जातात; हे अनेक ‘डे’ साजरा करणाऱ्या आपल्याला कितीसे माहित आहे?

जागतिक आरोग्य संघटनेद्वारा या समस्येवर काम काम करणाऱ्या WHO MindBank; The Quality Rights Project; Mental Health Policy, Planning & Service Development; Mental Health, Human Rights & Legislation: denied citizens: including the excluded; Mental Health, Poverty & Development; आणि Action in Countries: Nations at Work अशा अनेक उपसंघटना आणि उपक्रम चालवले जातात.

अशा मानसिक समस्या सुरु होताना बहुतांश त्यांची लक्षणे उघडपणे दिसून येत नाहीत. याला वैज्ञानिक भाषेत ‘अदर्शक’ स्थिती (asymptomatic state) असे म्हंटले जाते.

या समस्येशी लढण्याच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये 1. Universal Prevention (जागतिक प्रतिबंध); म्हणजे मोठ्या जनसमुदायामध्ये जागरुकता; 2. Selective Prevention (निवडक प्रतिबंध); म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये किंवा विशेष जनसमुदायामध्ये मानसिक समस्यांची शक्यता जास्त दिसून येते अशा व्यक्तींसंबंधात किंवा समुदायात जागृतीचे काम करणे; आणि ३. Indicated Prevention (वैयक्तिक प्रतिबंध); म्हणजे वैयक्तिक समुपदेशन अशा तीन स्तरांवर काम केले जाते.

मानसिक समस्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांनुसार, आणि विविध देशांतील परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या उपाय योजना कराव्या लागतात. यात पोषक आहार आणि पोषणमूल्यांमध्ये सुधारणा, निवास सुधारणा, शिक्षण, आर्थिक असुरक्षितता कमी करणे, सामाजिक विचारमंथन आणि नशेच्या पदार्थांच्या वापरावरील प्रतिबंध इतक्या अति मुलभूत सोयी सुविधांचा आणि उपायांचाही विचार करावा लागतो.

दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे तणावपूर्ण स्थिती निर्माण करणाऱ्या घटकांविरुद्ध उपाय योजना.

यामध्ये लहान मुलांचे मानसिक संतुलन, लहान मुलांविरुद्धच्या अत्याचारांना प्रतिबंध, कौटुंबिक समस्या व हिंसा यावरील उपाय, कार्यालयीन समस्यांवरील उपाय, आपल्या मातापित्यांच्या मानसिक समस्येबाबत मुलांमध्ये जागरुकता, आणि वृद्धापकाळातील मानसिक समस्या यांचा विचार केला जातो.

यानंतरचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष मानसिक रुग्णांवरील उपाय योजना, आणि समुपदेशन.

जगभरात अनेक सेवाभावी संस्था या समस्येविरुद्ध तळमळीने कार्य करित आहेत.

परंतु या भयंकर समस्येविरुद्धच्या लढ्यातील कच्चा दुवा म्हणजे समाजाचे आणि स्वत: पीडितांचे याबाबतचे औदासिन्य आणि समस्या लपवून ठेवण्याची प्रवृत्ती.

या विषयावर खूप काही लिहिण्यासाठी आणि करण्यासारखे असले; तरी वेळ आणि शब्दमर्यादेमुळे थांबणे आवश्यक आहे. हा लेख म्हणजे माझा या बाबतीतील जागरुकता वाढवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि या लेखामुळे जर लोकांमध्ये या विषयाबद्दल थोडीशी अधिक जाणीव निर्माण झाली, तर मी ते या लेखाचे यश समजेन.

- निरंजन भाटे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा