डोंगराएवढा !

(शिवराम कारंत ह्यांचं ‘डोंगराएवढा’ हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलं होतं, परवा कशावरून तरी ते एकदम आठवलं. त्यानंतर सुचलेलं...)



मी खाटेवर पडलो होतो. आतून ऐकू आलं, “जेवण तयार आहे. गिळायला ये." मी उठलो आणि हात पाय धुवायला गेलो.
“येताना केळीची पानं नाही का आणता येत? का ते पण आम्हीच करायचं?" 
“काय ही कटकट रोजची”
“एवढी कटकट वाटते, तर मग चुलते आणि भावांसारखा रानात जा की. ते तर काही काम करायलाच नको. फुकट गिळायला मिळतंय तर घरातली चार कामं म्हणजे कटकट वाटते होय?”
“नकोय मला काही, हा मी चाललो.”
“आलाय मोठा तोरा दाखवणारा! येशीलच आठ-दहा दिवसात परत! पाहिलंय हे मागे २-३ वेळा!”


मी तणतणतच बाहेर पडलो. घरात असलेल्या कोणीही लक्ष दिलं नाही. बरोबर आहे, तसं हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. मी मात्र तसाच चालत राहिलो. बराच वेळ गेला आणि मग जाणवलं की भूक लागलीये. जेवण पण केलं नव्हतं आणि बरोबर काही न घेता बाहेर पडलो होतो. थोडा वेळ एका वडाच्या सावलीला बसलो. ‘आता काय करावं बरं? विक्रमप्पाकडे जावं का? पण त्याचं घर तर पश्चिमेला आहे. मी रागाच्या भरात निघालो तो उत्तरेला चालत आलो. असो. त्याच्याकडेच जावं. लगेच निघालो तर रात्र व्हायच्या आत पोहोचीन.’ सूर्य बघून थोडा दिशेचा आणि अंतराचा अंदाज घेतला आणि चालायला लागलो. संध्याकाळ झाली, अजूनही चालतच होतो. डोंगराला वळसा घालून पुढे आलो, पण अजूनही पुढे कुठे वस्ती असल्याची चिन्ह दिसेनात. मी नक्कीच वाट चुकलो होतो. हा प्रदेश ओळखीचा नव्हता. 

आता मात्र अगदीच अंधारून आलं होतं. पलीकडे एक फळबाग दिसली. ‘विक्रमप्पाचं गाव नसलं तरी काय झालं, कोणती तरी मनुष्यवस्ती नक्कीच असेल!’ तेवढ्यात दोन खारी समोर आल्या. अगदी माझ्यापासून चार हात अंतरावर! आणि माझ्या अंगावर छोटे दगड टाकायला लागल्या. मी बघतच राहिलो. ‘कसल्या धीट आहेत ह्या! कसली भीतीच वाटत नाहीये ह्यांना.’ मी थोडा मागे सरकलो, तर अंगावर धावून यायला लागल्या. तेवढ्यात मागे कसली तरी हालचाल झाली. पलीकडून एक म्हातारा आला. त्याला बघून मात्र त्या पळून गेल्या. 

“कोण रे बाळा तू? वाट चुकलास वाटतं? इकडे कोणी येत नाही कधी. कुठे चालला होतास?” म्हातारा वयाने साठीचा असावा, पण ताठ उभा होता आणि आवाज खणखणीत होता. 
“हो. मित्राच्या गावाला निघालो होतो.”
“चल मग आता आमच्या घरी. रहा इथेच. नंतर जा.”

मी त्याच्या मागून चालायला लागलो. थोड्याच वेळात त्याच्या घराशी पोहोचलो. त्याची बायको आत होती. ती लगबगीने बाहेर आली. आम्ही हात पाय धुवून आलो. तिने माझ्यासाठी खायला आणलं. त्यांचं जेवण झालेलं असावं. मग दोघांनी बऱ्याच चौकश्या केल्या. मला मात्र फारसं विचारता आलं नाही. नावं तेवढी कळाली. गोपालय्या आणि शंकरम्मा नावाचे ते म्हातारा म्हातारी तिथे रहात होते. इतर कोणी नव्हतं. “आता दोन दिवसात दिवाळी आहे, तर मग इथेच रहा, दिवाळी नंतर परत जा. ह्यांना दिवाळीनंतर गावाकडे जायचच आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर जा..” गोपालय्यानेही आग्रह केला. असंही मला घरी जायचं नव्हतं, आणि ‘विक्रमप्पाकडे दिवाळीत जाण्यापेक्षा इथेच थांबू. सणासुदीला घरात कोणी असल्याचं ह्यांना बरं वाटेल’ असा विचार करून मी हो म्हणालो. जेवण झाल्यावर मी अंगणात पाठ टेकली आणि लगेचच झोपलो.

सकाळी जाग आली तेव्हा गोपालय्या नव्हता, बागेत गेलेला असावा. शंकरम्मा आत बसून जीर्ण पुस्तकातून काहीतरी वाचून पुटपुटत होती. दाराशी गेलो तेव्हा मला तिने खुणेनेच न्याहारीच्या गोष्टी दाखवल्या. माझी न्याहारी झाली तरी तिचं वाचन चालूच होतं. भरपूर न्याहारी झालेली असल्यामुळे दुपारच्या जेवणाची मला चिंता नव्हती. मी बागेकडे निघालो. दिवसभर बागेमध्ये फिरलो. पलीकडच्या डोंगराकडे मला एक धबधबा दिसला. उद्या तिकडे जाऊ असा विचार करून मी परत फिरलो. परत येताना मला गोपालय्या दिसला. त्याच्या पाठोपाठ मी घरी आलो. संध्याकाळ झाली होती. शंकरम्माने दिलेलं जेवलो. ते दोघंही म्हणाले की आजपासून पाडव्यापर्यंत त्यांचा उपास आहे. त्यामुळे मी एकटाच जेवलो. जेवणा नंतर आम्ही तिघं अंगणात गप्पा मारत बसलो. गोपालय्या त्याच्या तरुणपणीच्या काय काय गोष्टी सांगत होता आणि शंकरम्मा त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. मला तरी सगळे संदर्भ दीडदोनशे वर्षांपूर्वीचे वाटले. मला तर शंका आली की म्हातारा नशेत बरळतोय का काय! पण कसला वास वगैरे येत नव्हता. बहुतेक बापजाद्यांच्या गोष्टी स्वतःच्या नावावर खपवत असावा. ‘आपल्याला काय, फुकट खायला मिळतंय, करमणूक पण होतीये’ असा विचार करून मी नुसता ‘हुं हुं’ म्हणत होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी ती काहीतरी उगाळत बसली होती. मी न्याहारी करून डोंगराकडे गेलो. धबधब्यात आंघोळ करताना मागे एक गुहा दिसली. आत गेलो तर जिकडे तिकडे प्राण्यांचे सांगाडे आणि कवट्या होत्या. मला तर भीतीच वाटली. तडक बाहेर आलो आणि घराकडे परत आलो. शंकरम्मा अजूनही आतच होती. मी चिंचेच्या सावलीला पहुडलो. जाग आली तेव्हा गोपालय्या नुकताच परतत होता. मी जेवलो आणि मग आम्ही अंगणात गोपालय्याच्या अदभुत आणि चमत्कारिक गोष्टी ऐकत बसलो. एकतर तो नशेत होता किंवा त्याची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. त्याच्या गोष्टी ऐकता ऐकताच रात्री उशिरा कधीतरी डोळा लागला.

गोपालय्याने मला पहाटे पहाटे गदागदा हलवून उठवलं. “दिवाळीच्या दिवशी तरी लौकर उठायलाच पाहिजे” असं म्हणत त्याने मला हाताला धरून नेलं. “हे शंकरम्माने घरी बनवलेलं उटणं आणि तेल लावून कढत पाण्याने आंघोळ कर”, असं सांगून तो गेला. अंघोळ करून मी परत आलो तर दोघंही डोळे मिटून बसले होते. मी फराळाच्या गोष्टी खात खाटेवर बसलो आणि मग बागेमध्ये गेलो. 

संध्याकाळी परत आलो तर दोघंही माझीच वाट बघत होते. शंकरम्मा माझ्याकडे बघून पुटपुटत होती. मला बघून गोपालय्या पटकन पुढे आला आणि “दुपारीच अमावस्या लागली” असं म्हणत त्याने माझ्या कपाळाला भस्म लावलं. अचानक मला कसंतरी व्हायला लागलं आणि मी मटकन खाली बसलो. तसा तो जोरजोरात हसायला लागला. माझ्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. समोरचा गोपालय्या अचानक मोठा मोठा होत, डोंगराएवढा दिसायला लागला! मग माझ्या लक्षात आलं, तो नव्हता मोठा झाला, मी लहान झालो होतो! माझं चिमणीमध्ये रुपांतर झालं होतं. हातांचे पंख झाले होते. मी हतबुद्ध होऊन बघत होतो. डोक्यात इतके प्रश्न होते! बहुतेक ते जाणूनच गोपालय्या म्हणाला, “अमावस्येच्या तीन दिवस आधी आपण होऊन तू आमच्याकडे आलास, अशी संधी फार क्वचित येते. नाहीतर एरवी मुद्दाम लोकांना फसवून इथे आणावं लागतं. तुझ्यासारखा तरुण सापडला, बरंच झालं. आता आम्हा दोघांच्याही आयुष्यात किमान ३० वर्षांची वाढ झाली. आम्ही दोघेही मांत्रिक आहोत. जीवनातल्या अंतिम सत्याचा शोध घेणं आणि मृत्यूला पराजित करणं हे आमचं ध्येय आहे. गेली दोनशे वर्ष आमचे प्रयत्न चालू आहेत, पण अमर होण्यासाठी अजून साधना करावी लागेल, नवीन मंत्र तयार करावे लागतील. तोपर्यंत इतरांच्या आयुष्यातली वर्षे आमच्याकडे वळती करून आम्हाला अशा प्रकारे मृत्यू टाळावा लागतोय. आता तू ह्या परिसरात फिरायला मोकळा आहेस. पण ही बाग सोडून कुठं जाऊ शकणार नाहीस.”

हे सगळं ऐकल्यावर एकदम मला अनेक गोष्टींचा उलगडा झाला.. त्या खारी मला सावध करायचा प्रयत्न करत होत्या तर, आणि म्हणूनच त्या त्याला घाबरून पळून गेल्या.. त्याच्या त्या सुरस आणि चमत्कारिक कथा.. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या तर.. त्या दोघांचा उपास, शंकरम्माचे ते सतत काहीतरी पुटपुटणे.. आता काय करणार मग.. त्या महाकाय दोघांकडे बघत मी पंख पसरले आणि बागेकडे झेप घेतली. 


- शेरलॉक फेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा