मी फिटनेस...

नमस्कार मंडळी,

ओळखलंत का मला? नाही?

वाटलंच…

माझी ओळख करुन देण्यासाठी मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. मग तुम्हाला कदाचित कळेल की मी कोण आहे. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी आटपाट नगराच्याही खूप आधी माझा जन्म झाला… म्हणजे जेव्हा ऍडम आणि ईव्ह जन्माला आले त्यांच्या सोबतीनेच माझाही जन्म झाला… मी सर्वांच्याच आयुष्यात महत्वाचा घटक असले तरी लोक मला विसरलेत. माझी आठवण त्यांना फक्त त्यांच्या आजारपणात आणि संकट काळात येते. आता ओळखले का मी कोण ते?

हाहाहा ! बरोब्बर… अहो मी आहे फिटनेस. मी खूप आधीपासून तुमच्या अवती भोवतीच वावरते आहे पण तुम्हाला माझी आठवण फक्त तुमच्या शरीरात प्रॉब्लेम्स झाले की मगच येते.  तुम्हाला ही माझी कथा वाटेल पण खर तर ही माझी व्यथा आहे.

जसे गीतेत कृष्ण भगवान म्हणून गेले की, जेव्हा जेव्हा धर्म संकटात असतो तेव्हा मी जन्माला येतो. तसाच माझाही जन्म अधर्माचा नाश करायला नाही पण तुमच्या शरीराचे रक्षण मात्र करायला झालाय. 

यदा यदा हि शरीरस्य ग्लानिर्भवति मानव।
अभ्युत्थानामस्वास्थ्यस्य तदात्मानं सृजाम्यहम।।

या एकविसाव्या शतकातले सारे बदल पाहताना खर तर आम्हा ओल्ड जनरेशन संकल्पनांना थोडा कॉम्प्लेक्स येतो. पण मनोमन हे देखील वाटते की या जगण्याच्या शर्यतीमध्ये तुमच्या आमच्यातले अंतर वाढत चालले आहे. मी तुमच्या आयुष्याचा भाग बनले तर कदाचित तुमची प्रगती अधिक जास्त होईल आणि तुमच्या यशाची फळं चाखायला तुम्ही अधिक काळ या भूतलावर असाल.

तुमचं तस माझ्यावाचून पहिली काही वर्ष छान चाललेलं असत खर तर. मग तुमचं आणि तुमच्या तब्येतीच गणित बिनसलं की तुम्हाला डॉक्टरांची आठवण येते…डॉक्टरांनी शिक्का मारला आणि तुम्हाला तब्येतीकडेही लक्ष द्या अस म्हटलं की मगच बुवा तुम्हाला माझी आठवण येते.

तुम्हीच सांगा, डॉक्टर, दवाखाने ही काही माझी फ्रँचायझी आहे का? हे सगळे नसताना तुम्ही आणि मी एकत्र राहू शकत नाही का? आता एक उदाहरण द्यायचे झाले तर बघा, आजकाल अगदी ३०-३५ वर्षाचे तरुण किंवा तरुणी डॉक्टरांकडे येतात आणि सांगतात की माझे आजकाल जरा गुडघेच दुखतात किंवा मला जरा दम लागतो किंवा अजुन असेच काहीतरी. अहो हे काय वय आहे का दुखणी मागे लावून घ्यायला? तुम्ही आधीच माझ्याशी मैत्री केली तर ही वेळच येणार नाही ना!

व्यायाम तुम्हाला करायला नको, योगासाठी वेळ नाही अशी एक ना अनेक हजार कारणं देऊन तुम्ही मला टाळत असता आणि मग नंतर अशी भयानक दुखणी मागे लावून घेता. तर मुद्दा हा की तेव्हा डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळी सतत सांगत असतात की वेळ काढा… थोडा वेळ रोज व्यायाम करा… तो सल्ला ऐकला तर सगळंच सुरळीत होऊ शकतं नाही का?

माझ्याबद्दल तुम्ही करून घेतलेले गैरसमज ऐकले ना की मला बुवा हसावे कि रडावे असं होत! अनेक बायकांना वाटतं ‘एकदम वेल मेन्टेन्ड फिगर?’ म्हणजे फिटनेस. मग त्यासाठी वाट्टेल ते अघोरी डाएट करायला काही जणी मागे पुढे पाहत नाहीत. मग होत ते उलट… माझा प्रवेश त्यांच्या आयुष्यात होण्याऐवजी येतात ती दुखणी आणि आजार.

आजकाल पुरुषांना तर मी फिटनेस म्हणजे फक्त ‘सिक्स पॅक’ वाटते... यावर मी एकच सांगेन की आधी स्वतःकडे बघा… कोणी म्हणेल ‘पोटाचा नगारा नसणे म्हणजे फिटनेस का?’ तर नाही! उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रमेश पवार म्हणून एक निवृत्त क्रिकेटर आहे त्याचे क्रिकेट खेळतानाचे फोटो पहा… शरीर स्थूल असलं तरी फिटनेस (मी) होतेच की!

गंमत म्हणजे वर्षाची सुरुवात, योग दिवस, अमुक दिवस, तमुक दिवस असला की लोकांना माझी आठवण येते. संकल्पांच्या यादीत मला अगदी न विसरता नोंदवलेल असत. पण अंमलबजावणीची वेळ आली की मग काय होतं?

मी आकारमानात बसणारी किंवा शब्दात, कॅलरीज मध्ये फिट होणारी संकल्पना नाही.

तुमच्या शरीराला जशी माझी गरज आहे ना तशीच गरज तुमच्या मनालाही आहे. शरीर आणि मन दोन्ही फिट असले तरच आयुष्य सुखी आणि निरोगी असेल तुमचे... तशी आजची नवी पिढी मला ओळखू लागली आहे... माझ्याशी मैत्रीचे महत्व अनेकांना पटू लागले आहे. वयाचे बंधन न मानता जमेल तसे माझ्याशी नातं जोडून ठेवणारे उतारवयीन मित्र देखील वाढू लागले आहेत. पण माझं अजूनही काही समाधान होत नाही.

तुमचे आरोग्य उत्तम असेल म्हणजेच तुम्ही तुमची दैनंदिन कामे न थकता करू शकत असाल आणि तुम्हाला विनाकारण कंटाळा येत नसेल तर तुम्ही फिट असाल…तर सगळंच छान होईल... आणि हे सगळंच छान करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी मैत्री करणं आवश्यक आहे. अगदी आग्रहाने सांगेन की जिम मधे जाऊनच फिटनेस मिळवता येतो असे नाही. अहो पूर्वी आटपाट नगरात काय लोक जिम मध्ये जात होते का? तुम्हाला जो जमेल आणि जसा जमेल तसा एखादा व्यायाम करा आणि मुख्य म्हणजे आहाराकडे लक्ष द्या... मला आवडेल तुमच्या प्रत्येकाच्या सोबतीला रहायला… तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य जगताना बघायला…

मग इथून पुढे तरी ठेवाल ना मला लक्षात…???

नाहीतर असे तर नाही होणार ना की, “You are opening a gym called “Resolutions”. It will have gym equipment for the first two weeks of the year and then it will turn into a bar for the rest of it”. 


अभिजीत अरविन्द कुलकर्णी




२ टिप्पण्या:

  1. Khup chan. Vishesh mhanaje aaj International yoga day diwshi he wachayla milale. Fitness ha jasa sharirik ahe tasa manasik suddha aahe. tyamule shariracha vyayam tar havach pan jodine man tandurust thevanyasathi gharchya lokanni ekatra jewan ghene, tyaveles gappa marane, meditation karane, tanavanpasun door rahnyasathi sangeet aikane ase upay karta yetil...

    baki lekh mast !!

    उत्तर द्याहटवा