लग्न पध्दती

जोडीदार म्हटले कि तरुण मुलामुलींच्या मनात गुदगुल्या होतात. प्रत्येकाच्या मनात जोडीदारासंबंधी काही स्वप्ने असतात. गेल्या पिढीपर्यंत मुले-मुली त्या बाबतीत जास्त लक्ष घालत नसत. सगळे काही आईवडिलांवर अवलंबून असे. मनात एक प्रकारचा विश्वास असे की आईवडील जे काही करतील ते चांगलेच असणार. 

लग्नाच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी घरात असली की साहजीकच लोकांचं लक्ष असे व स्थळ सुचविले जाई. मग स्थळाची बाहेरून चवकशी करून एकमेकांची पत्रिका पाहून ती जुळत असेल तरच पुढची बोलणी होत व नंतर मुलीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम असे. चाळीमध्ये राहणारी मुलगी असेल तर मग काय विचारायलाच नको. मुलाकडची माणसे बघायला येणार म्हणजे घराची रंगरंगोटी केली जाई व चाललेल्या धावपळीमधून शेजारीपाजारी कानोसा घेत असत. शेजारी सुद्धा एवढे चांगले असत की त्यांना मुद्दाम सांगायची जरुरी नसे. जणू काही आपल्या मुलीला बघायला स्थळ आले आहे, असे समजून आलेल्या पाहुण्यांना आपले घर वापरण्यासाठी मोकळे ठेवत असत. जरी स्वतःची गैरसोय झाली तरी शेजारधर्माला जास्त महत्त्व दिले जाई. ज्या मुलीला पाहण्याचा कार्यक्रम असे तिला स्वयंपाकाच्या खोलीत, जरी घर लहान असले तरी पडदा लावून आडोसा केला जाई व तिने आधी 'पाहुणेमंडळींसमोर येऊ नये' अशी सूचना असे. तिच्या २-३ जिवलग मैत्रिणी आलेल्या असत. त्या तिचा नट्टापट्टा करून तिला काय हवेनको ते बघायला आजूबाजूलाच रहात असत, संपूर्ण वेणी सुगंधित गजऱ्यांनी वेढून तिला छान नटवत असत. फुलांचा सुगंध दरवळून वातावरण प्रसन्न असे व पडद्याआडून हळूच वाकून बघून आलेल्या मुलाचा तपशील आपल्या मैत्रिणीला पुरवत असत. त्या मुलीचाही जीव उत्सुक असे की ज्याच्यासोबत पुढील सर्व जन्म घालवायचा आहे तो आपला जोडीदार आहे तरी कसा, त्याचप्रमाणे मुलालाही त्या मुलीला कधी एकदा बघतो असेच झालेले असे. त्याचे मित्र त्याला त्या बाबतीत हळूच काहीतरी सांगून फिरकी घेत असत. यथावकाश मुलाचे आईबाबा मुलीला पाहण्यासंबंधी इच्छा व्यक्त करत. मग मुलीची आई आतल्या खोलीत जाऊन मुलीच्या हातात पाहुण्यांसाठी केलेले बटाटे पोहे किंवा उपम्याच्या बशांचा ट्रे देऊन मुलीला हळूच बाहेर घेऊन येई. मुलीने प्रथम मुलाकडच्या माणसांना पहिल्या भेटीतच प्रत्यक्ष पाहणे शिष्टाचाराला धरून नसे. मुलीची धडधड वाढलेली असे. ती लाजेने नजर जमिनीकडे खिळवून उभी असे. मग मुलीची मावशी, काकी, वहिनी, कोणीतरी तिच्या हातातील बशांचा ट्रे घेऊन आलेल्या पाहुण्यांना डिश देण्याचा कार्यक्रम होई. मुलाकडील वडीलधारे मुलीला बसण्यास सांगत. मुलगी आलेल्या वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करून अवघडुन बसे. मग आई कौतुकाने सांगे की, 'आमच्या मुलीने स्वतःच्या हाताने हे बनवले आहे. ती सर्व कामात व स्वयंपाकात हुशार आहे.’ चहापाण्याचा कार्यक्रम होई. मुलाकडचे वडीलधारे मुलीला नांव, शिक्षण वगैरे साधे प्रश्न विचारून मुला-मुलीला एकमेकांना काही विचारायचे आहे का, असे विचारत. मुलगी डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच आपल्या भावी जोडीदाराला पाहण्याचा प्रयत्न करत असे. इतक्यात कोणीतरी समंजसपणे सांगे की 'त्या दोघांनांही सर्वांसमोर बोलणे अवघड जात असेल'. म्हणून त्या दोघांना घराच्या गच्चीमध्ये किंवा एखाद्या बंद खोलीत एकटे सोडत असत. दोघांनाही प्रथम काय बोलावे व कशी सुरुवात करावी ह्या संभ्रमात असताना मुलगाच पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात करी. हे लग्न मुलीच्या खुषीनेच होत आहे ना की तिच्यावर कोणाची जबरदस्ती तर होत नाही ना, एकमेकांच्या आयुष्यात आधी कोणी होते का, इत्यादी चवकशी करत. एकमेकांच्या आवडीनिवडी संबंधी विचारत. तोपर्यंत एकदोन वडीलधारी माणसे दोन्ही बाजूंच्या अपेक्षा, देणीघेणी ह्यासंबंधी थोडक्यात चर्चा करत. काही वेळाने मुलगा मुलगी येत व दोन्ही बाजूनी मोठी माणसे ‘विचार करून सांगतो’ ,असा एकमेकांचा निरोप घेऊन पाहण्याचा कार्यक्रम संपे. मग वेध लागत की काय निरोप येतो. 

पसंतीनंतर साखरपुड्याचा दिवस ठरवला जाई. मग दोन्ही बाजूंच्या पसंतीने नवरा मुलगा व नवरी मुलगी ह्यांचा साखरपुडा व लग्न ह्या दोन्हीसाठी डोक्यापासून पायापर्यंत सर्व पोषाखाची खरेदी सुरु होई. ती एका खेपेत कधीच आटपत नसे. साखरपुड्याच्या अंगठीचे माप देण्यास एकमेकांच्या सोनाराकडे जात असत. साखरपुडा केला की लग्न होईपर्यंत दोघेही एकमेकांना भेटू शकत असत. पण साखरपुडा व लग्न ह्यात फार अंतर नसे. काहीतरी विघ्न येऊन लग्नात अडथळा येऊ नये ही सुप्त ईच्छा असे. साखरपुडा मुलीच्या घरीच असे. मुलीची ओटी भरून नवऱ्याची आई मुलीला साखरपुड्याची साडी देत असे व ती साडी नेसून मग मुलगा-मुलगी एकमेकाला साखरपुड्याची अंगठी घालत असत.

मग काय दोन्ही घरी लगीन घाई; लग्नाचा हॉल बघणे, मेनू ठरवणे, पत्रिका छापून सर्वांना देणे, कितीतरी कामे असत. घराच्या आजूबाजूला जागा असेल तर तेथे मंडप घालून लग्न होत असे. खर्चाला जास्तीत जास्त आळा घातला जाई व तोच पैसा मुलीच्या अंगावर एखादा दागिना घालण्यासाठी वापरत. प्रत्यक्ष लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलीच्या घरी सासरी पाठवायच्या, मधुचंद्राला न्यायच्या अशा बॅगांचे वर्गीकरण कोणीतरी बाई जबाबदारीने करून देत असे, कारण मुलीला सर्व गोंधळात भांबावून गेल्यासारखे होई. नेहमी तिच्या सोबत राहून तिला काय हवेनको ते बघण्याची जबाबदारी कोणातरी समंजस मुलीवर सोपवली जाई व ती मुलगीदेखील आपण किती महत्वाचे काम करत आहोत, म्हणून भाव खाऊन जाई. 

लग्नाच्या आधी ३ दिवस मुलीला हातापायाला मेहेंदी लावून घ्यायला तासंतास बसून पाठीला रग लागलेली असे. अंगाला हळद लागली की लग्नापर्यंत मुलीने घराच्या बाहेर जाऊ नये, अशी अपेक्षा असे. हळद लागलेल्या नवरीला भुताखेतांपासून भिती असते असा एक जुनाट विचार असे म्हणून हळदीचा कार्यक्रम सहसा लग्नाच्या आदले दिवशीच होत असे. मुलीला हिरवा चुडा व पायात जोडवी घातली जात. घरी कासाराला बोलावून त्याच्याकडून नवरीसोबत आजूबाजूच्या सुवासिनी व मुलीच्या मैत्रिणी हातात शास्त्रापुरत्या काचेच्या बांगड्या भरून घेत व सर्व वातावरण बांगड्यांच्या नाजूक किणकिणीने भरून जाई व मुलीवर नवीन नवरीचे तेज झळकायला सुरुवात होई. घरात आलेल्या माणसांनी लग्नघर गजबजून जाई. घराच्या मुख्य दरवाजाला पवित्र म्हणून केळाच्या घडासकट झाडे बांधली जात. घडासकट का तर लग्न लावून दिलेली मुलगी त्या केळीसारखी लेकुरवाळी होऊन फुलू दे, फळू दे अशी इच्छा. सर्व आटपून झोपायला उशीरच होत असे व दोन्ही लग्नघरी दुसरे दिवशीच्या धास्तीने धड झोप ही लागत नसे. 

दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून मामाने दिलेली साडी मुलीला नेसवून आईबाबा व आलेले जवळचे नातेवाईक पुण्यवचनासाठी सर्व सामानाच्या बॅगा घेऊन मुलीला घेऊन हॉल वर पोहोचत; पण कितीही ठरवलेले असले तरी प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी काहीतरी गोंधळ होतच असे व लक्षात येई की काहीतरी महत्वाचे घरीच राहून गेलेले असे. मग पाठीमागून येणाऱ्या माणसांना ते घेऊन येण्यास सांगण्याचा गोंधळ, कधी हॉल वर भटजीचाच पत्ता नसे, मग लवकर पोचूनही उशीर झाल्याची रुखरुख. लग्नाच्या हॉलमध्ये किंवा मंडपात शिरता शिरता पवित्र सनई चौघड्याचे नाद कानावर पडून आपण लग्नाला आल्याची जाणीव होई. कन्यादानाचा विधी झाल्यावर मुलगी गौरीपूजनाला बसत असे. बाहेर अंतरपाट धरून त्याच्या एका बाजूला पाटावर नवरामुलगा उभा राही. भटजी मोठ्या आवाजात मंगलाष्टके म्हणत असत. नंतर लग्नघटिका भरत आल्यावर भटजी मुलीला घेऊन यायला सांगत. मग मुलीचा मामा मुलीच्या हाताला धरून तिला घेऊन येई व अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला पाटावर आणून उभी करे. दोघांच्याही कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या असत. गालाला कुंकू लावलेले असे. मुहूर्तावर अक्षता वाहून अंतरपाट दूर करून नवरा मुलगा व नवरी मुलगी एकमेकांना तुळशीमाळ घालून लग्न लागत असे. सर्वांना पेढे, फुले वाटली जात. गुलाबपाणी शिंपडले जाई. 

लग्नाच्या दिवशी हॉल मध्ये स्टेजच्या समोर खाली एका कोपऱ्यात टेबलवर नवऱ्यामुलीने केलेल्या व तिला तिच्या मैत्रिणींनी दिलेल्या शोभेच्या वस्तू व विशेष कष्ट करून केलेले शोभेचे खाद्यपदार्ध रुखवत म्हणून मांडले जाई. लग्नाला आलेली सर्व माणसे रुखवत कौतुकाने बघत असत. ते सर्व मुलीला सासरी जाताना सोबत दिले जाई. लग्नाच्या दिवशी सकाळपासून नवरानवरीचा व त्यांच्या आईबाबांचा उपवास असे; त्यामुळे पोटात भुकेचा डोंब उसळलेला असे व आजूबाजूला सर्वजण खुर्च्या मांडून गप्पागोष्टी करण्यात दंग असत, तेव्हा स्टेजवर भटजी लग्नाचे विधी उरकत असत. लग्नात सप्तपदीचा अर्थ मुलीला समजावून देण्याचा भटजींचा प्रयत्न असे व होम मध्ये झालेला धूर नवरानवरीच्या डोळ्यात झोंबत असे. सर्वात शेवटी नवरा नवरी त्यांचे आईबाबा व जवळचे नातेवाईक ह्यांची पंगत बसे. जरी भूक असली तरी नवरा-नवरीला काही फारसे जेवण जात नसे. एकमेकाला आग्रहाने घास भरवला जाई. मग लग्नाचे मुख्य आकर्षण स्वागतसमारंभ, त्याच्या तयारीला सुरुवात होई. त्याचा मेकअप व जड पोशाख परिधान करून नंतर स्वागत समारंभासाठी उभे रहावे लागे. मुलगा-मुलगी स्टेजवर एकमेकांच्या नातेवाईकांची ओळख करून देत असत. काही लोक कधी एकदा नवीन जोडपे स्वागत समारंभाला उभे राहते व त्यांना भेटून कधी निघतो ह्याची वाट बघत असत. म्हणून नवरानवरी आल्यावर स्टेजवर चढून निरोप घेणाऱ्यांची एकच गर्दी उडे. काही दिवस चाललेली धावपळ व अपुरी झोप ह्यामुळे नवरा नवरी एवढे दमलेले असत की त्यांची ओळख करून घेण्यामध्ये धड लक्षही लागत नसे. तोंडदेखले सर्वांशी हसावे लागे व सर्व आटपून अंगावरचा जड पोशाख कधी एकदा उतरवतो व केलेला मेकअप उतरवून कधी एकदा मोकळे होतो, त्याची वाट बघत असत. सर्वांचे भेटून झाले की मग फोटो काढण्याचा कार्यक्रम; फोटोग्राफर जसजशा पोझेस सांगेल तसे फोटो सेशन होई. सर्व पाहुण्यांचे आदरातिथ्य व्यवस्थित होत आहे ना, ह्याकडे लक्ष देण्यास जवळच्या जबाबदार माणसांस सांगितले जाई, कारण लग्नाच्या वेळी घाईघाईत मानापमानामध्ये रुसवेफुगवे असत. 

सर्व झाले की मग विदाईचा नाजूक कार्यक्रम असे. बरेच वेळेला नवरीला मेकअप करणारीने सांगितलेले असे की डोळ्यातून पाणी आले की मेकअप खाली उतरणार, म्हणून नवरीमुलीने ठरवलेले असे की काही झाले तरी रडायचे नाही. पण विदाई ही वेळच अशी असे की एका क्षणामध्ये इतक्या वर्षात आईबाबांच्या घरात घालविलेल्या सुखदुःखाच्या गोष्टींचे चित्र डोळ्यांसमोर उभे राही. भावंडांशी झालेली किरकोळ भांडणे, कोडकौतुक सर्व आठवे व डोळ्यांमधून गंगाजमुना वाहायला सुरुवात होई. ज्या घरात राणीसारखी राहिली, हे कपाट माझे, हे सामान माझे, म्हणून सर्व हक्क गाजवला, तेथे आता पाहुणी म्हणून जावे लागेल, ह्या विचारानेच गलबलल्यासारखे होई. मुलीच्या आईबाबांना, जवळच्या माणसांना अश्रू आवरणे मुश्किल होई. आपली लाडली आता परक्या घरात कसे जमवून घेईल, ह्या विचाराने कसेसेच होई. नवीन नवरीला नवऱ्याच्या घरात सुरुवातीला अवघडल्यासारखे होईल व तिला काय हवेनको ते बघण्यासाठी सोबत धाकट्या बहिणीला नाहीतर एखाद्या चुणचुणीत मुलीला पाठराखीण म्हणून पाठवत असत. त्या घरात पाऊल टाकतेवेळी उंबरठ्यावरील माप ओलांडताना जीव धाकधूक होत असे. 

नवऱ्यामुलाच्या घरीदेखील नवीन जोडप्याला राहायला खास सोय केलेली असे. प्रथम घरात नवीन जोडप्याच्या हातून सत्यनारायणाची पूजा होई. नंतर प्रथम हाताची मेहेंदी उतरेपर्यंत सहसा नवीन नवरीला कोणी काम करायला देत नसत. मग दोन-तीन दिवसात नवरीच्या माहेरी एक कार्यक्रम होई. नवरीचा भाऊ नाहीतर मामा वगैरे कोणीतरी तिच्या सासरी जाऊन नवीन जोडप्याला, पाठराखीणीला व नवऱ्या मुलाच्या जवळच्या काही नातेवाईकांना व नवऱ्याच्या मित्रमंडळींना मानाने घरी घेऊन येत असे. मुलगी आता आपल्या माहेरी माहेरवाशीण म्हणून आलेली असे. सर्व ऊठबस झाल्यावर पुन्हा नवऱ्यामुलाकडची माणसे जायला तयार होत. नवीन नवरीची ओटी भरली जाई. आलेल्या पाहुण्यांचा मानपान होई व पुन्हा नवरीचे, माहेरच्या माणसांचे डोळे अश्रूंनी भरून येत. आता पाठराखीणीला पुन्हा पाठवत नसत. मग ज्या क्षणाचे त्यांच्या मनात एक कुतूहल असते अशा मधुचंद्रासाठी काही दिवसांसाठी कुठेतरी पाठविले जाई, तेथून परतल्यावर हळूहळू नवीन नवरी आपल्या सासरी रुळत असे व नवऱ्याच्या घरच्या चालीरीती आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरु होई. नवरा नवरी दोघेहीजण आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयन्त करीत व एक नवीन संसार सुरु होई. लग्नाच्या पहिल्या वर्षात जावयाचा मोठ्या सणांच्या वेळी रुबाब असे, कारण मुलीच्या माहेराहून काहीतरी भेटवस्तू मिळत असे. एखादे वर्ष झाले की आता चार हाताचे सहा हात कधी होतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागत असे.

पण आता सर्व बदलले आहे. आत्ताच्या पिढीमध्ये मुलगा व मुलगी दोघेही चांगले शिकलेले, कमावते असतात. त्यामुळे त्यांच्या जोडीदारासंबंधी अपेक्षा उंचावलेल्या असतात. पूर्वी आईबाबांच्या पसंतीने जोडीदार निवडला जाई, ह्याचेच त्यांना कुतूहल वाटते. आता घरी पाहण्याचा कार्यक्रम होत नाही. बाहेरच ऑफिसमध्ये जाऊन नाहीतर एखाद्या उपहार गृहामध्ये ठरवून मुलगा-मुलगी एकमेकाला भेटतात, चर्चा करतात व सर्व व्यवस्थित वाटले तर मग घरातल्या मोठ्या माणसांसमोर लग्नाची इच्छा प्रदर्शित करतात. बरेच वेळेला आता पत्रिका बघण्याला फारसे महत्व देत नाहीत, काहीजण पत्रिका बघण्यापेक्षा ब्लड ग्रुप मॅच होतो का ते बघतात. त्याप्रमाणे मोठी माणसे पुढाकार घेऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करून लग्न लावून देतात. आता प्रेमविवाहाला जास्त पसंती असते, त्यामुळे आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणावर असतात. मुलगा मुलगी लग्नाआधी फिरायच्या निमित्ताने काही वेळेला भेटलेले असतात, एकमेकांच्या घरी जाऊन घरातल्या माणसांना ओळखत असतात, म्हणून पूर्वी एवढे नावीन्य राहिलेले नाही. सर्व विधी बहुतेक हॉलवरच असतात, त्यामुळे घरी पूर्वी एवढा गोंधळ नसतो. पत्रिका पण व्हाट्सऍपने पाठवल्या व एक फोन करून लग्नाचे आमंत्रण दिले तरी चालते. माणसेही शिकून समंजस झालेली आहेत, त्यामुळे नसत्या मानापमानासाठी अडून बसत नाहीत. हॉलवरच सर्व कॉन्ट्रॅक्ट दिले की आपला गोंधळ होत नाही, फक्त त्याप्रमाणे खर्च करावा लागतो. नोकरीधंद्या निमित्त बरेच वेळा नवीन जोडपे लग्नानंतर काही दिवसातच परदेशात रहायला जाते त्यामुळे नातेवाईकांमध्ये पूर्वी एवढी जवळीक उरत नाही. नवीन नवरीला पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धतीत जमवून घ्यायची वेळ येत नाही.

शेवटी आधी काय आणि आता काय, दोघांनीही आपआपल्या जोडीदाराशी जमवून घेतले तरच संसार सुखाचा होतो.


- प्रतिमा जोशी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा