जुनं ते सोनं !

“अस्मिता, मी दिपालीकडे डिनरला नाही आले तर चालेल का?” “मम्मा तुझ्यासाठीच तर डिनर अरेंज केला, म्हणून आम्हाला दोघी तिघींना बोलावले आहे”. ह्या मुलींच्यात आपण काय करणार? जरा कुरकुरतच मी मुलीबरोबर जायला तयार झाले. मला वाटलं त्यापेक्षा वातावरण खूपच मोकळं होतं. सगळ्याजणी छान गप्पा मारत होत्या. ३-४ प्रकार स्टार्टर्स मध्ये होते. त्याबरोबर वेगवेगळी डिप्स होती, ज्यूस होते, वाईन होती (मी पीत नाही ही गोष्ट वेगळी). वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगत होत्या. माझे अनुभव त्यांना ऐकण्यात फार उत्सुकता होती. आंटी इतक्या प्रॉब्लेम्स मधून तुम्ही गेलात, तुमच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही नाही, वगैरे वगैरे.

“डिनर लावलाय, चला पटकन या.” सगळ्या टेबलावर बरेच प्रकार आकर्षक पद्धतीने मांडले होते. एव्हढे स्टार्टर्स खाल्ल्यावर या मुलींनी तर जेवणाला हातही लावला नाही. त्यांच्या प्रत्येकीच्या डाएट, जिम ट्रेनर, कार्बोहाइड्रेट कमी खाणे, इत्यादी इत्यादीवर बऱ्याच चर्चा चालल्या होत्या. एक म्हणाली मी डिनर मध्ये फक्त सूप आणि सॅलड्स घेते, एक नुसती एका चपातीवर राहत होती आणि त्याबरोबर बऱ्याचश्या बॉइल्ड व्हेजीस, एक नुसते ड्रायफ्रुटस, फळं ह्यांच्यावरच राहत होती. मी सगळ्यांच्या फिटनेस फंड्यांची चर्चा ऐकत होते. दिपालीने तर मला २-२.५ किलो ड्रायफ्रुटस मावतील अशी बरणीच दाखवली. मला मनात खूप हसू आले. केवढी सुबत्ता! आमची आई कशी तिच्या कपाटात ड्रायफ्रुट्स ठेवायची, आठवड्यातून २-३ वेळाच आम्हाला त्याचे दर्शन व्हायचे. केवढी अपूर्वाई वाटायची तेंव्हा. दिपालीने मला विचारले, “आंटी तुमच्या वेळेला फिटनेससाठी काय करायचे?” मी नैवेद्यासारखे सर्व पदार्थ डिशमध्ये घेऊन चरायचे काम करत होते. इतक्या मेहेनतीने केलेले पदार्थ तसेच्या तसेच टेबलावर हिरमुसल्यासारखे मला वाटले. मी तिला म्हटलं, सगळ्यांना पार्सल दे, म्हणजे वाया जाणार नाही. पूर्वी पानात लोणच्याची फोड टाकलेली वडिलांना खपत नसे. आणि आम्ही तर चांगल्या ३-४ पुरणाच्या पोळ्या (मोठ्या) खाऊ शकेल अश्या बाईला सवाष्ण म्हणून जेवायला बोलावत असे.

सकाळी चहा, नाश्त्यात पोहे, उपमा, घावन असे सोपे व हलके पदार्थ असत. इडली, सँडविच, ग्रिल्ड सँडविच असले प्रकार हॉटेल मधेच मिळत. फोडणीचा भात किंवा फोडणीची दाणे तळून घातलेली पोळी बऱ्याच वेळा मेनूत असायची. माझा भाऊ तर आईला आज काय फो. भा. का फो. पो.? विचारायचा. मला तर लहानपणी नाश्ता हा काहीतरी स्पेशल पदार्थच आहे असे वाटायचं.

माझ्या वयाच्या २०-२२ वर्षापर्यंत मी मिक्सर पाहिला नव्हता. आई चटणीचे साहित्य काढून ठेवायची आणि चटणी पाट्यावर वाटायचं काम मुलींकडे असायचं. चांगला व्यायाम व्हायचा. विहिरीवरून पाणी ओढून भरायचं. नळ नंतर आले. भर उन्हात दुकानातून सामान, कधी कधी भाजी चालत जाऊन आणायची. १२ वाजता शाळा असायची. मग आमच्या मैत्रिणींना बोलावत, हाका मारत, गप्पा मारत शाळेत जायचं. टॅन व्हायची भीती नव्हती. असं दिवसभर कितीतरी चालणं होत असे. पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर असा आठवड्याचा मेन्यू असे. कधीतरी गोडधोड व्हायचं, त्यामूळे वजन वाढू नये म्हणून साखर न खाणं असले काही फंडे नव्हते. संध्याकाळी रोज पालेभाजी, भाकरी, ताक भात एवढेच जेवण असे. विचार केला तर किती पूरक आहार होता! चोवीस तास घरकामाला बाई नसल्यामुळे भरपूर व्यायाम व्हायचा.

अशा पठडीत वाढल्यामुळे आत्ताच्या फिटनेस फंड्याची क्रेझ नव्हती, बारीकच दिसलं पाहिजे असा पुसटसा विचारही मनाला कधी शिवला नाही.

दीपालीला मी सांगत होते, ६४ व्या वर्षी मी स्विमिंग शिकले. रोज १ तास योगा आणि संध्याकाळी ३-४ कि. मी. चालणे हे आजही ७० व्या वर्षी चालू आहे. घरातली कामे, दिवसातून २-३ वेळा जिने चढणे उतरणे ह्या गोष्टी सहज केल्या जातात. मित आहार, नो तळकट मळकट खाणे आणि व्यायाम ह्या गोष्टी जीवन आनंददायी बनवण्यास पुरेश्या आहेत असं मला वाटतं.

आंटी तुम्ही इतक्या वयाच्या दिसत नाहीत असं म्हटलं की मला उगाचच मूठभर मास वाढून वजन वाढलं की काय अस वाटतं… 

-अश्विनी शिराळकर




1 टिप्पणी: