धावणं हीच माझी साधना - वैशाली कस्तुरे मुलाखत

वैशाली कस्तुरे ह्यांचा जन्म जानेवारी १९६९ मधे पुण्यात झाला. भारतातील नावाजलेल्या मॅरेथाॅनपटूंमधे त्यांचं नाव आघाडीवर आहे. इजिप्त व भारतात शालेय शिक्षण घेऊन त्यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून (xx) पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ICWA (काॅस्ट ॲंड वर्क्स अकाउंटन्ट) ही पदवी मिळवली. ह्या स्पर्धा परिक्षेतही त्यांचं नाव ‘मेरिट लिस्ट’ मधे आलं होतं. पुढे जमनालाल बजाजमधून गोल्ड मेडल सहित MBA ची पदवी मिळवली.

त्यांचा व्यावसायिक कार्यकालही असाच लक्षणीय आहे. त्या सध्या एक्सपीरियन ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भारतातील मुख्य अधिकारी (India manager) आहेत. त्यापूर्वी त्यांनी गोल्डमन सॅक्स, डेलाॅइट व इन्फोसिससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे मोठ्या पदावर काम केलं आहे. इन्फोसिस बीपीओ उभारणाऱ्यांपैकी (founding member) त्या एक आहेत. गोल्डमन सॅक्स ह्या जागतिक बॅंकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी त्या होत्या. डेलाॅइटमधे पार्टनर म्हणून कार्यरत असता त्यांनी रोबाॅटिक्स विभाग उभारला. 

आता पर्यंत तुम्हाला कल्पना आलीच असेल की कस्तुरे ह्यांना आव्हाने स्विकारायला आवडतात. ह्या आवडीतूनच त्यांचं धावणं सुरू झालं. वयाच्या ३४ साव्या वर्षी एका मित्राचे आव्हान स्वीकारत त्यांनी १०-किमी ची दौड पूर्ण केली व एक विलक्षण असा मॅरेथाॅनचा प्रवास सुरू झाला. आजवर त्यांनी ५ खंड व २० देशांतील विविध मॅरेथाॅन्समधे भाग घेत, थक्कं करणारे असे ३५,००० किमी चे अंतर पार केले आहे!! जगात मानाच्या समजल्या जाणाऱ्या आशा ६ मुख्य मॅरेथाॅन्स पूर्ण करून त्यांनी ६-स्टार मेडल मिळवले आहे. हा मान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत.

इतकं काही मिळवून सुद्धा त्या अतिशय विनम्र आहेत व इतरांनाही आयुष्यात पुढे आणण्यासाठी जमेल ती मदत करत असतात. 
प्रगती पाटणकर ह्यांनी ऋतुगंधसाठी ह्या कर्तृत्ववान मॅरेथाॅन वुमनची मुलाखत घेतली: 

प्र. तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता? एक उच्च पदस्थ व्यावसायिक म्हणून तुम्ही सतत दौऱ्यावर असता. मग त्याबरोबर एक प्रोफेशनल मॅरेथाॅन रनर व एक आई ह्या जबाबदाऱ्या कशा सांभाळता?

उ. मी पैशापेक्षा वेळेला अधिक महत्त्व देते. मी रोज पहाटे ५ वाजता उठते व ७ वाजेपर्यंत माझा व्यायाम पूर्ण करते. मग कुटुंबाबरोबर थोडा वेळ घालवून ९ वाजता रोजच्या धकाधकीला सुरुवात करते. सकाळच्या व्यायामाने मला दिवसभराच्या आव्हानांना तोंड द्यायची ऊर्जा मिळते. 
शनिवार, रविवार व सोमवार ह्या दिवशी मी अधिक व्यायाम करते. दौऱ्यांमुळे वेळापत्रकात फेरफार करावे लागतात पण त्याला पर्याय नाही. म्हणूनच मी ५ वाजता उठते.

प्र. खाण्यापिण्याची काही पत्थ्ये, किंवा काही विशेष सवयी?
उ. मी दर २-३ तासांनी खाते. एकावेळी थोडच खाते. जेवणाचा डबा मी घरूनच नेते. दौऱ्यावर असताना हाॅटेलातून काहीतरी बांधून नेते. कटाक्षाने, संध्याकाळी ७ नंतर मी काही खात नाही. रात्री सूप्स व सॅलड्स असं हलकं जेवण जेवते. न्याहारी व दुपारच्या जेवणात प्रोटीन मिळेल याची काळजी घेते. भरपूर ग्रीन टी पीते. मधेच भूक लागली तर फळं वा सुकामेवा खाते. शनिवार-रविवारी एखादा गोड पदार्थ खाणं होतंचं. 

प्र. आता वळूया माझ्या व तुमच्या आवडत्या विषयाकडे, म्हणजे धावणे. एका अल्ट्रामॅरेथाॅन (म्हणजे ५० किमी हून अधिक) ह्याबद्दल थोडी माहिती द्या ना: त्यासाठी लागणारी तयारी, ती मॅरेथाॅन शरीरापेक्षा मनाच्या शक्तीने पूर्ण होते. व १०-१२ तास चालत-धावत, इतकं मोठं अंतर कापल्यानंतर शरीर व मनाची काय अवस्था होते... ?
उ. मी स्वत:ला पट्टीची अल्ट्रा मॅरेथाॅनर म्हणणार नाही. आजवर मी एक ५०-किमी, दोन काॅमरेड्स रन्स (प्रत्येकी ८९-किमी) व तीन १००-किमी च्या मॅरेथाॅन्स केल्या आहेत. 
माझ्या व्यावीसायिक व पारिवारिक जबाबदाऱ्यांमुळे मला अधिक वेळ देता येत नाही. अल्ट्राच्या तयारीसाठी मी ४५-५० किमी च्या ‘ईझी रन्स’ केल्या आहेत. तसच मी माझ्या शारीरिक ताकदीसाठी नियमित व्यायाम करते. नियमित स्पोर्ट्स मसाजही घेते. 

एका अल्ट्रामधे शरीरापेक्षा मनाची ताकद गरजेची असते. मला वाटतं माझं मन शरीरापेक्षा सक्षम आहे. म्हणूनच मी ह्या मॅरेथाॅन्स पूर्ण करू शकले आहे. 

प्र. आमच्या दृष्टीने तुम्ही प्रोफेशनल अल्ट्रा मॅरेथाॅनर आहात. आता ६-स्टार मेडल, काॅमर्ड्स व १००-किमीची अंतरं पार केल्यावर पुढे काय ठरवलय तुम्ही?
उ.  पुढचं अजून काही ठरवलं नाही. दर वर्षी मी ३-४ फुल मॅरेथाॅन्स (फुल मॅरेथाॅन ४२.२ किमीची असते) करते. हे कमी करून ताकदीवर व वेगावर काम करायचं आहे. 

प्र.एखादा पारिवारिक वा व्यावसायिक ताण धावण्याच्या सवयीमुळे कमी झाला असेल ह्याचा तुमचा एखादा अनुभव?
उ. माझं काम फार जबाबदारीचं आहे आणि माझ्या दिवसातला बहुतेक वेळ त्यात जातो. त्यातच हल्ली माझ्या आईची तब्ब्येत बरी नसते. नियमित धावल्याने मला ह्या सगळ्या तणावांना तोंड देता येतं.

प्र. स्त्रियांचे विषय तुम्हाला जिव्हाळ्याचे आहेत. पारिवारिक ताणाचा सामना करण्यासाठी स्त्रियांना काही विशेष सल्ला?
उ. एकच सल्ला: रोज स्वत:साठी व स्वत:च्या तब्येतीसाठी एक तास तरी काढा. स्त्री सशक्त असेल तर कुटुंब व पर्यायाने समाज हा सशक्त होईल. 
मेंदूला चालना देणारी कामं करत रहा. बुद्धी तल्लक असेल तर समस्यांना तोंड देणं सोपं जातं तसच प्रत्येक समस्येला वेगळ्या दृष्टीकोनातून बघता येतं.

प्र. आजही बहुतेक भारतीय परिवारांत पुरूष-प्रधान संस्कृती आहे. बाईने नोकरी केली तरी चूल व मूलही सांभाळावं अशी अपेक्षा असते...?
उ. बायकांनीच ह्यातून समतोल साधायचा प्रयत्न करावा. स्वत:चा काही व्यवसाय वा नोकरी करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवावं. कदाचित काहीतरी पार्ट-टाइम करावं. पण ह्याने स्वत:ची कुवत ओळखता येते, आत्मविश्वास वाढतो. हे करणं सोपं नाहीच. तरीही प्रयत्न करत रहावा. आयुष्यात काही दिलगिरी राहता कामा नये.

प्र. साॅंडर कनेक्ट व IART ची सुरूवात कशी झाली? साॅंडरचा अर्थ काय?
उ. साॅंडर चा अर्थ प्रत्येकाकडे सांगायला काहीतरी असतं, एक कथा असते. ही एक बिना-नफ्याची संघटना आहे. मी माझ्या ३ मैत्रीणींबरोबर ही सुरू केली आहे. भारतात स्त्रियांना नवीन व्यवसाय सुरू करायाल अनेक अडचणी येतात, भांडवल उभ करणं कठीण पडतं. आम्ही अशा धडपड्या स्त्रियांची मदत करतो. 
IART म्हणजे India Amateur Runners Trust. ह्याद्वारे आम्ही पळणं ह्या विषयावर चित्रपट बनवतो व गरीब पण होतकरू धावपटूंना राष्ट्रीय पातळीवर धावता यावं ह्यासाठी त्यांची मदत करतो.


प्र. नोकरी व व्यवसायात आजही ‘glass ceiling’ — म्हणजे स्त्रियांना पुढे न येऊ देणे — जाणवतं का?
उ. आज परिस्थिती बदलंली आहे. अनेक स्त्रिया उच्च पदांवर काम करत आहेत, बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. पण ही सुरूवातच आहे. विषमता आजही बरीच आहे. अनेक कंपन्यांमधे महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी दिली जात नाही.
आपल्या देशात बाळंतपणानंतर नोकरी सोडणाऱ्या महिलांचं प्रमाणही फार आहे. मला वाटतं स्त्रियांनी जमेल तसं नोकरीवर पुन्हा रुजू व्हावं. नोकरी सोडून जर बराच काळ उलटला असेल तर योग्य अशा विषयांचा अभ्यास करून पुन्हा नोकरी मिळवायचा प्रयत्न करावा.

प्र. बहुतेकांना हेवा वाटावा असं तुमचं करियर असताना तुम्ही नोकरी सोडून ब्रेक घेतलात. हे धाडस कसं केलत व पुन्हा करियरची सुरूवात कशी केलीत?
उ. मी माझ्या नवऱ्याबरोबर हाॅंगकाॅंगला रहायला गेले होते. त्याला तिथे रुळायला मदत व्हावी म्हणून मी गेले होते. नोकरी करत नव्हते म्हणून पुन्हा अभ्यास सुरू केला. मला अभ्यासाची खूप आवड आहे. काही विषय जे वेळेअभावी शिकायचे राहिले होते त्यांचा अभ्यास मी त्या १८ महिन्यात केला. भारतात जेव्हा परतले तेव्हा जोमाने करियर उभारण्याच्या मागे लागले. प्रयत्नाने व पूर्वीच्या अनुभवामुळे पुन्हा संधी मिळाली.

प्र.‘डव’ साबणाची जाहिरात करून अष्टपैलू आहात हे सिद्ध केलत. पण ही जाहिरात कशी काय घडून आली? आता ह्यानंतर तुम्ही चित्रपटात दिसाल का? 
उ. (हसत...) मलाही आश्चर्य वाटतं की त्यांनी मला कसं काय निवडलं. मारियो तेस्तिनो हा जगातला आघाडीचा फॅशन व पोर्ट्रेट फोटोग्राफर आहे. त्याला जाहिरातीत अशी एखादी स्त्री हवी होती जी आपल्या क्षेत्रात आघाडीवर असेलच, शिवाय तिला त्वचेची काळजी घेण्याचीही आवड असेल. काही बायकांचा तो विचार करत होता ज्यात मीही होते. मारियोला माझी धावतानाची छायाचित्रे फार आवडली आणि ते म्हणतात ना, “the rest is history!”

प्र. तुम्हाला प्रोत्साहन, ऊर्जा कुठून मिळते? तुम्हाला श्रद्धास्थानी कोण आहे?
उ. आपल्या रोजच्या जीवनात इतकी थक्कं करणारी माणसं भेटतात की वेगळं प्रोत्साहन शोधावं लागत नाही. मला अशाच अनेक लोकांपासून प्रोत्साहन मिळतं. 

प्र. हल्लीच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल?
उ. मुलांवर कसलाही दबाव टाकू नका, जबरदस्ती करू नका. मात्र त्यांना आकलन करता येईल असं स्वत:चं वागणं ठेवा — रोल माॅडेल्स बना त्यांच्यासाठी. माझा मुलगा एकदा म्हणाला की त्याला मोठं झाल्यावर माझ्यासारखं व्हायचं आहे. ही माझ्यासाठी सर्वात मोठी कौतुकाची व अभिमानाची बाब होती!


प्र. हल्ली मोबाइल व टॅब हे शाळकरी मुलांच्याही गरजेची साधने बनू लागली आहेत. अशात तुम्ही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कसा नियंत्रित करता?
उ. मुलं आपल्याला बघूनच शिकतात. जर तुम्ही सतत फोनवर असाल तर ते ही तसच करतील. मुलांना साध्या गोष्टीत आनंद शोधायला शिकवा. त्यासाठी त्यांच्याबरोबर पुरेसा वेळ घालवा. मी माझ्या मुलाबरोबर ‘लेगो’ खेळते. ह्या खेळात बुद्धीला, कल्पकतेला चालना मिळते व वेळही छान जातो. 

वैशाली, आपल्या अतिव्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद! 

- प्रगती पाटणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा