संस्कार

संस्कार हा आपल्या संस्कृतीशी जोडलेला अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. त्याचा अर्थही तितकाच खोल आहे म्हणा. मला असं वाटतं, प्रत्येक घराचे आपापले संस्कार असतात. लहान मुलांच्या मनावर त्याचा खूप खोल परिणाम होतो आणि ते संस्कार आयुष्यभर आपल्या बरोबर असतात. मी एकत्र कुटुंबात वाढले असल्याने, माझ्यावर आजी, आजोबा, काका, काकू, आई, बाबा, आत्या, प्रत्येकांनी दिलेल्या शिकवणीचा परिणाम झाला आहे. आजही रामरक्षा ऐकली किंवा म्हंटली की मला माझ्या आईची आठवण येते. कारण लहानपणी रोज संध्याकाळी ती आमच्याकडून रामरक्षा म्हणून घ्यायची. मी जे काही थोडं फार लिहिते, कविता करते, तो सुद्धा आईचाच आशिर्वाद आहे कारण ती खूप छान कविता करायची. बाबांचं रोज फिरायला जाणं, व्यायाम करणं, हे कायम लक्षात आहे. आजी-आजोबांनी सगळ्यांशी मिळून, मिसळून वागणं शिकवलं. Caring & sharing जर आपण लहानपणीच शिकलो, तर आयुष्य खूप सोपं होतं. माझ्या काकांनी आम्हा सर्व बहिणींना निर्भीड बनवलं. काही झालं तरी कायम खरं बोलायचं, जर आपण काही चूक केलीच, तर त्याची शिक्षा भोगण्याची धमक आपल्यात असली पाहिजे. खोटं बोलून आपण तात्पुरती पळवाट काढू शकतो. खोटं फार काळ टिकत नाही आणि ते लपवण्याकरता आणखी दहा वेळा खोटं बोलावं लागतं, ही साधी परंतु अतिशय मोलाची शिकवण आहे.

आपण आपल्या लहानपणी काय आणि कसं शिकलो, ह्यावर आपलं व्यक्तिमत्व घडतं. माझ्या घरातली मोठी मंडळी आम्हा मुलांवर कायम विश्वास ठेवत असत. त्यांनी कुठल्याही बाबतीत आमच्यावर कधीही संशय घेतला नाही. खरं सांगायचं तर, नकळत आपल्यावर त्यांचा विश्वास न तोडण्याची जबाबदारी पण येते. मला ह्या सगळ्या संस्कारांचा माझ्या आयुष्यात खूप उपयोग झाला. आम्हाला लहानपणी भरपूर स्वातंत्र्य मिळालं. मोठ्यांशी मोकळेपणाने चर्चा करण्याची, वेळ पडल्यास एखाद्या विषयावर वाद घालण्याची मुभा होती. ह्या सगळ्यातून मुलांमधे एक आत्मविश्वास येतो. चांगला संवाद साधणं, चांगले शिष्टाचार पाळणं मुलं घरातच शिकतात. लहानपणी ह्या गोष्टीचं महत्त्व तितकं कळत नाही.

मी जेव्हा आई झाले, तेव्हा मी अर्थातच ह्या गोष्टींचा खोलवर विचार करू लागले. जेव्हा आपण आपल्या मुलांना घडवत असतो, तेव्हा आपल्या मोठ्यांनी केलेले चांगले संस्कार, चांगल्या सवयी खूप उपयोगी येतात व आपण तीच चांगली शिकवण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. मुलं अगदी लहान असताना त्यांची काळजी घेणं, खाणं, पीणं ह्याकडे लक्ष देणं, हे काम असतं. पण वयात येणाऱ्या मुलांना समजून घेणं, हे एक वेगळं आव्हान असतं कारण ह्या वयात मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ झपाट्याने होत असते. आपल्याला मूल लहान वाटत असतं आणि मुलांना मात्र वाटतं की आपण आता मोठे झालो आहोत. कधी कधी ते त्यांचं मत मांडतात, आपलं ऐकत नाहीत, वाद विवाद करतात. आपल्याला लगेच वाटतं, मुलाला शिंग फुटली. तेव्हा डोकं शांत ठेवून, कधी त्यांचं ऐकायचं, कधी आपलं ऐकायला लावायचं, असा लपंडाव खेळून वेळ निभावून न्यावी लागते. आपल्या मुलांवर आपण पूर्ण विश्वास ठेवावा ह्या मताची मी आहे, कारण आपल्या संस्कारांवर आपला विश्वास हवा. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत म्हणजे त्यांना कधी काही प्रॉब्लेम असेल तर ते मोकळेपणाने आपल्याशी चर्चा करतील. पण त्यांनी असं करावं, असं वातावरण घरात तयार करण्याची जबाबदारी मात्र पालकांची आहे. मुलांना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नये, त्यांना नाही ऐकायची सवय पण असली पाहिजे. म्हणजे कधी मनासारखं नाही झालं तर त्यांना त्रास होत नाही. मुलांचं वय जसं वाढतं तसं आपलं आणि त्यांचं नातंही बदलतं. मुलंही खूप स्वतंत्र होतात व नातं जास्ती मैत्रीचं होत जातं. त्यांना भरपूर exposure मिळाल्याने त्यांचं ज्ञानही सतत वाढत असतं.

नंतर २०-३० ह्या वयोगटात मुलांचं करियर आणि पुढे लग्न-कार्य हे सर्व होत असतानाही पालकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. ह्या बाबतीत कुठेतरी वाचलेलं एक वाक्य मला फार आवडलं होतं, "पालकांची भूमिका CCTV ची नको तर GPS ची असावी". ह्या वयातल्या मुलांना पण कधीतरी सल्ल्याची, मार्गदर्शनाची गरज लागते पण त्यांनी मागितला तरच सल्ला द्यावा. मुलांना भरपूर स्पेस द्यावी. हल्ली मुलांनी आंतरजातीय किंवा परदेशस्थांशी लग्न करणं ह्या गोष्टी पण common आहेत. त्यांनी जर कुणाची निवड केली असेल तर त्या गोष्टीला स्वीकारावं. सून, जावई ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असतील तर घरात एक उत्तम आणि तणावरहित वातावरण राहतं. आता जग इतकं लहान होत चाललं आहे की बरीच मुलं नोकरी निमित्ताने परदेशात राहतात. त्यामुळे Live and Let Live हा मंत्र म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असं मला वाटतं.

- मेघना असेरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा