रिमोट हाताशी आहे ना?

न्यूज हा शब्द चार दिशांच्या पहिल्या अक्षरांनी बनला आहे, असे म्हणतात. फ्रेंच शब्द ‘ले नूवले’ (les nouvelles), ज्याचा अर्थ ‘नवीन’ असा आहे, याच्याशीही न्यूजचं साम्य आहे. जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. पूर्वी याची माहिती रोजच्या वर्तमानपत्रात वा “आजच्या ठळक” बातम्यात मिळे. पण तीन दशकांपूर्वी याची व्याख्या बदलू लागली.

अमेरिकेतील टेड टर्नर यांच्या सी.एन.एन. वाहिनीने जून १९८० मधे २४-तास बातम्या दाखवायला सुरूवात केली. यानंतर १९९१ मधे बीबीसी ने ही हा प्रकार सुरू केला. काही वर्षातच सीएनएन ने हा प्रकार भारतात सुरू केला. आज इंटरनेट चोहीकडच्या बातम्या क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचवतं. 

आज भारतात जवळपास ३९० वृत्त वाहिन्या आहेत आणि प्रत्येक मुख्य भाषेत डझनभर तरी. त्यात स्थानिक वार्तापत्रे  वेगळीच. पण सर्वसामान्यांना इतकी मिनिटा-मिनिटाची बातमी अजिबात नको असते आणि जगात इतक्या घडामोडीही होत नसतात.


मग ह्या वाहिन्या चालू करायचं तात्पर्य काय? करमणूक. होय, काहीशी विकृत, थिल्लर, वाह्यात पण करमणूकच. २४-तास बातम्या एक थोतांड आहे. एक विलक्षण गॉसिप यंत्रणा. मतप्रदर्शनाचे साधन. ‘गर्दी जमवा’ हा एकमेव हेतू. रस्त्यावरच्या भांडणाला जशी गर्दी होते तसेच ह्या वाहिन्यांच्या, भावना चाळवणाऱ्या कार्यक्रमांना प्रेक्षक आणि टीआरपी मिळतात. त्याबरोबर जाहिरातींचा मेवाही.

दर्जेदार वगैरेसाठी वेळ कोणाला आहे? अपघाताची दृष्य, पोलीसांचा किंवा  पोलिसांवर अत्याचार, सरकारी कर्मचाऱ्याची / डॉक्टरांची मारहाण, स्त्रियांची छेडछाड, ढोंगी बाबा… सबकुछ चलेगा. सरकारी अधिकाऱ्याची मारहाण अक्षम्यच आहे पण याबद्दल महत्वाच्या पदांवर असलेल्या चार लोकांचं मत ऐकायची आपल्याला उत्सुकता असते. ह्यातच वाहिन्यांचं फावतं. दोन जहाल व दोन मवाळ मतवाद्यांना बोलवा व जुंपवा त्यांना थेट प्रक्षेपणात!

हा २४-तासांचा प्राणी वाढत वाढत जणू एक ऍनाकोंडा झालाय, जबर विळख्याचा व विषारी दंशाचा. या विळख्यात वाहिन्याही जखडल्या आहेत. २४-तास वृत्तवाहिनी चालवण्याचा खर्च साधारणपणे १०० मिलियन सिंगापुरी डॉलर्स आहे. एवढालं कर्ज काही सहज फिटत नसतं. मग चॅनल चालू ठेवायला आणिक कर्ज… मग भांडवलदार म्हणतील ते बीभत्स प्रकार दाखवत राहणं. 

वारंवार दाखवली जाणारी बीभत्स चित्रे टीआरपी वाढवतात ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण माणूस नकारात्मक गोष्टींकडे अधिक आकर्षित होतो. इतरांचा त्रास बघून आपल्याला बरं वाटतं: “हे माझ्याबरोबर नाही झाल हो!” हा सुप्त सुटकेचा नि:श्वास असतो. ‘मृत्यू हा इतरांनाच येतो’, तसचं ह्या टीव्हीवर दिसणाऱ्या वाईट गोष्टीही माझ्याबरोबर होणार नाहीत अशी आपली गैरसमजूत असते. आणि म्हणून त्या वाईट प्रसंगांची दृष्ये आकर्षित करतात. आपण ‘शादनफ्राइदं’ (इतरांच्या त्रासात आनंद मिळणे) ह्या भावनेने झपाटलेले आहोत.


ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ ग्रॅहॅम डेव्ही ह्यांचं म्हणंणं आहे की वारंवार हिंसक, नकारात्मक बातम्या बघून नैराश्य, सूडभावना, चिंता यात मन गुरफटते. अमेरिकेतील उजव्या व डाव्या मतांच्या गटात दरी वाढली आहे ती ह्या २४-तासांच्या मतप्रदर्शनानेच, असे तिथल्या सामाजिक संशोधनात आढळलं आहे. मुंबईतल्या ताज महाल हॉटेलवरील आातंकवादी हल्ल्यातसुद्धा ह्या वाहिन्यांनी थेट प्रक्षेपण करून पोलिसांची गैरसोयच केली होती.

पूर्वी आई-वडील मुलांना आवर्जून बातम्या बघायला सांगायचे. आता त्याचीही सोय नाही. आपण हेच सगळं दाखवत राहिलो तर पुढची पिढी अनेक मानसिक समस्या घेऊन मोठी होईल. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव होईल व सारखे कसल्यातरी भीतीत वावरतील.

पण सगळ्याच वाहिन्या वाईट नाहीत. युद्ध, पूर, दुष्काळ अशा प्रसंगी ह्या वाहिन्या महत्वाची माहिती व पीडितांना मदत पोहोचवण्यात नक्कीच उपयोगी ठरतात. निधी जमा करण्याचे साधन बनतात. खेड्यापाड्यातील समस्या सरकारदारी पोहोचवतात, पण दुर्दैवाने यांचे दुष्परिणाम जास्त दिसतात. 

‘स्लेट’ या नियतकालिकेने म्हटले आहे की आर्थिक मंदी, आतंकवाद असूनही जगात हिंसाचार, भूकमरी कमी होते आहे. पण हे दाखवून प्रेक्षकांची जगबुडीची भीती कमी होईल व त्याबरोबर टीआरपीही. जितकी सुजाण पत्रकारांची गरज आहे तितकीच आपण सुजाण दर्शक व्हायची. तोवर, चॅनल बदलू…
- केशव पाटणकर


२ टिप्पण्या:

  1. विचार खूपच समर्पक ! थोडक्यात ,मोजका आणि स्पष्ट तरीही फटकळ नाही !! हे कौतुकास्पद !!

    उत्तर द्याहटवा