तिमिरातून तेजाकडे

"आई येतो ग! आज घरी आल्यावर भेळ खायला जाऊया असे बाबांनी प्रॉमिस केलेय. लक्षात आहे ना?" असे म्हणत सलील शाळेला निघाला. तो आणि त्याचे आठवीच्या वर्गातले मित्र रोज सायकलवर एकत्र शाळेत जात असत. घरी आले की सायकली टाकून काहीतरी खाऊन क्रिकेट खेळायला जाणे हा सर्वांचा आवडता उद्योग! कधीकधी स्वातीताई आणि आईबाबांबरोबर भेळ खायला जाणे देखील ठरलेले! छोटे चौकोनी कुटुंब आणि त्यांचे छोटे छोटे आनंद!

आजही तो रोजच्या सारखा शाळेत गेला. त्याची मोठी बहीण स्वाती बारावीत होती. तीही कॉलेजला गेली होती! दोघेही दुपारी ४ च्या सुमारास घरी आले तेव्हा घराबाहेर गर्दी होती. कसली गर्दी म्हणत आत गेले तेव्हा घरात सुन्न बसलेली आई आणि रडणारे नातेवाईक दिसले. स्वाती आणि सलीलला मावशीने सांगितले की, "आज तुमचे बाबा सकाळी ऑफिसला गेले आणि तिथे त्यांना हार्टअटॅक आला आणि ते गेले!" दोघांचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. सकाळी तर सलीलने बाबांपाशी हट्ट केला होता! आणि हसत बाबांनी "बरं! नक्की जाऊया आज भेळ खायला" असे प्रॉमिस सुद्धा केले होते आणि आता ही बातमी! स्वातीला हुंदके आवरेनात! सलीलला खरे तर रडू येत होते पण तो सुन्न बधीर झाला होता! त्याचे डोळे आणि मन शुष्क झाले होते. रात्री वडिलांचे अंत्यसंस्कार करून परत आलेला सलील सकाळच्या हट्ट करणाऱ्या सलीलपेक्षा एकदम खूप मोठा झाला होता. त्या रात्री जणू त्याच्या बालपणाला त्याने अंतिम निरोप दिला होता.

पहिल्या १३ दिवसाचे विधी संपले. नातेवाईक आपापल्या घरी परतले आणि घरात तिघेच उरले! चौकोनी सुखी कुटुंब आता विस्कळीत झाले होते. आईला इतका मोठा मानसिक धक्का बसला होता की पुढचे कित्येक महिने तिच्यावर उपचार सुरू होते! घरची परिस्थिती बेताची होती! वडील एकटे कमावते असल्याने ते असेपर्यंत खाऊन पिऊन सगळे सुखी होते! पण आता तो आधारच निसटला होता! रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. वडिलांच्या स्वाभिमानी स्वभावाचे संस्कार दोघा मुलांच्या मनावर इतके पक्के होते की त्यांनी कुठल्याही नातेवाईकांची मदत घेण्यास नकार दिला.

मग स्वाती आणि सलीलने कंबर कसली. तोवर स्वातीने डिग्री कॉलेजला प्रवेश घेतला होता. सकाळी कॉलेज आणि दुपारी ऑफिसमध्ये नोकरी करून तिने त्या कोवळ्या वयात घराची आर्थिक जबाबदारी उचलली! सलील आईची तब्येत आणि घरकामाकडे जास्त लक्ष देऊ लागला. क्रिकेटची बॅट आता माळ्यावर गेली होती. वडील गेल्यापासून आईने हाय खाल्ल्याने तिची तब्येत नाजूक झाली होती! तिला जपणे हे सलीलचे आद्य कर्तव्य बनले होते. 

३ वर्षांनी अपार कष्टात शिक्षण संपवून स्वाती लग्न करून सासरी गेली! आता घराची, आईची आणि स्वतःच्या शिक्षणाची आणि घर चालवण्याची जबाबदारी सलीलवर आली होती. त्याने स्वातीताईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला.त्याने डिग्रीऐवजी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला. पुण्यात प्रवेश मिळेना. मग परगावी जाऊन शिकायचे ठरले आणि पुढची ३ वर्षे एका नातेवाईकांच्या घरी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. डिप्लोमाला तो कॉलेज मध्ये पहिला आला. त्या दादा वहिनींच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही या भावनेने तो पुण्यात परत आला. डिप्लोमाच्या जोरावर त्याने नोकरी मिळवली आणि पार्टटाईम डिग्रीसाठी मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढची काही वर्षे अपार कष्टाची होती. नोकरी,अभ्यास, मुंबईला जाणे येणे! पण सलीलने जिद्द सोडली नाही. ४ वर्षात डिग्री तर त्याने पूर्ण केलीच, शिवाय नोकरी करून मिळालेल्या पैशाने एक फ्लॅट देखील बुक केला. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने नव्या वन बेडरूम फ्लॅटची किल्ली आईच्या हातात दिली! इतकी वर्षे भाड्याच्या एका खोलीच्या घरात राहिलेल्या आईचा ऊर अभिमानाने भरून आला.

तोवर स्वाती परदेशात स्थायिक झाली होती. त्या नव्या घरी स्वातीचे दुसरे बाळंतपण झाले. स्वाती बाळाला घेऊन परत गेली आणि लवकरच सलीलला देखील तिकडे चांगली नोकरी मिळाली. सलील आईला बरोबर घेऊन गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. ते वन बेडरूम घर सर्वांनाच चांगले लाभले! सर्वांचेच दिवस पालटले होते. स्वाती तिच्या दोन मुली आणि नवऱ्याबरोबर सुखाने नांदत होती. कालांतराने सलीलचे प्राचीशी लग्न झाले. त्यांना २ गोजिरवाणी मुले झाली. सलीलला पुन्हा एक सुखी कुटुंब मिळाले.

आपण ज्या परिस्थितीशी सामना केला तसे दिवस आपल्याला, आपल्या मुलांना कधीही दिसू नयेत यासाठी सलीलने जीवाचे रान केले. सलीलच्या हुशारी आणि कामसू वृत्तीमुळे त्याला लवकर बढत्या मिळत गेल्या. तो लवकरच कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला. त्याच्या खांद्याला खांदा लावून प्राचीने त्याला साथ दिली. दोघांनी मिळून अपार कष्ट केले आणि वयाची चाळिशी गाठेपर्यंत ते दोघे परदेशी २ तर मायदेशी ४ घरांचे मालक झाले.दोघांनी शून्यातून हे जग निर्माण केले होते. त्यांच्या या प्रगतीची साक्ष होती सलीलची आई! कामाच्या इतक्या गडबडीत देखील दोघांनी आईच्या तब्येतीकडे जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही. आता दोघांच्याही आयुष्यात स्थैर्य आले होते! सलील पुन्हा क्रिकेट खेळायला लागला… जणू निसटून गेलेलं बालपण पुन्हा जगत होता तो!

ज्या दादावहिनींकडे सलील डिप्लोमाच्या वर्षी राहत होता ते दादा अचानक कर्करोगाने गेले. त्यांच्या मुली डिग्रीसाठी शिकायला पुण्यात येणार होत्या. २० वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीशी त्याने सामना केला होता त्याच परिस्थितीमध्ये आज त्याच्या दोन पुतण्या होत्या! तेव्हा ज्या वहिनींनी त्याला मदत केली होती त्यांना आज मदत करायची वेळ आली होती. त्यांचे ऋण स्मरायची आणि फेडण्याचा प्रयत्न करायची संधी त्याला सोडायची नव्हती! सलीलने वहिनी आणि मुलींना त्या वन बेडरूम फ्लॅटमध्ये राहायचा आग्रह केला. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतोय हा आनंद आणि समाधान बाकीच्या घेतलेल्या घरापेक्षा फार मोठे होते! त्या घराच्या गुणाने त्यांचेही सगळे चांगले व्हावे हा प्रामाणिक हेतू! आज त्या दोघींचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि दोघी मोठमोठ्या कंपनीमध्ये उत्तम काम करत आहेत!

बरेवाईट दिवस प्रत्येकाच्या वाट्याला येतात. निराशेचा अंधार ग्रासून टाकतो! पण प्रतिकूल परिस्थितीत आलेल्या प्रसंगांना धीराने तोंड देत वाट चालत राहिले तर यशाची पहाट उगवतेच!
- विनया रायदुर्ग




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा