आयुष्य

पडता पडता मेघातून एका सरीला गाठले 
सूर्याच्या एका किरणाने तिच्या थेंबाला भेदले 
इंद्रधनुच्या रूपे मग ते नाभाचली प्रकटले 
किरण, थेंब दोघांचे आयुष्य त्या क्षणात सार्थक झाले 

लावत होतो आयुष्याचा अर्थ मी पाहुनी नभाकडे 
उंच उंच कितीतरी उंच, पार न ज्याचा कुणा सापडे 
छोटे छोटे पक्षी भरारी घेत, थवा तो मजेत उडे 
स्पर्धा उंच ढगांशी नसे, ना इंद्रधनूचा मोह पडे 

सहज पडावे, पडता पडता नवल घडे तर घडावे 
सहज उडावे, उडताना परी फक्त सहज उडावे 
सांडूनी सहजता, गुंतत गुंतत का इतके गुंतावे ?
अर्थ लावण्या आयुष्याचा का आयुष्य खर्चावे ?


धनश्री जगताप