ई-करमणूक

करमणूक हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे किंवा अत्यावश्यक घटक आहे म्हणावे लागेल. करमणुकीविना माणसाचे आयुष्य म्हणजे आळणी स्वयंपाकासारखे. मनोरंजन नसेल तर आधीच चाकोरीबद्ध असलेले जीवन अतिशय रूक्ष व कंटाळवाणे होईल. ‘कालाय तस्मै नम:’ किंवा ‘बदल हा अपरिहार्य असतो’ ह्या उक्तीप्रमाणे मानवी आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीमध्ये काळानुसार घडामोडी होत असतात. मानवी मेंदू स्वस्थ न राहता सतत कसले ना कसले शोध लावून जीवन कसे सुखकर होईल याचा विचार करत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांचा विकास झाल्यामुळे माणसाच्या जीवनशैलीत बदल होतात. करमणुकीची साधने हाही ह्याला अपवाद नाही.

मित्र मैत्रिणिंनो, आठवा, आपण आपल्या लहानपणी कशी  करमणूक करायचो. कबड्डी, लंगडी, लपंडाव, खोखो, विटीदांडू, विषामृत, सोनसाखळी, खांब खांब खांबोळी, भोवरा, गोट्या, पतंग यासारखे मैदानी खेळ खेळायचो. तर पत्ते, व्यापारडाव, सागरगोटे, कानगोष्टी, नाव-गाव-फळ-फुल, भातुकली, बुद्धिबळ असे बैठे खेळ असायचे. ‘शाखा’ हा प्रकार खूप लोकप्रीय होता. एखाद्या मोठ्या पटांगणात आणि पावसाळ्यात बंदिस्त (छत असलेल्या) जागी शाखा भरत असे. शाखेच्या शिस्तीत ध्वजवंदन, प्रार्थना वगैरे होत असे. विविध वयोगटातील मुले असत. शाखेचे स्वयंसेवक यांचे खेळ घेत असत. त्यानिमित्ताने नवीन परिचय होत असत. व्यायामही होत असे. आताहा प्रकार नाहीसा झाला आहे. आजकालच्या नवीन पिढीला वरील खेळांची नावेसुद्धा ‘फनी’ वाटतात. मोकळ्या जागा संपून टोलेजंग इमारती आल्या आहेत. मुलांवर अभ्यास, स्पर्धा, गृहपाठ, परीक्षा यांचा तणाव आल्यामुळे वेळच मिळत नाही, त्यामुळे  हे खेळ कालबाह्य झाले आहेत.

पूर्वी रेडियोवर गाणी ऐकणे, चिंतनासारखे काही ठराविक कार्यक्रम वा क्रिकेटची काॅमेंट्री ऐकणे ही  करमणूक  असे. मग टेपरेकाॅर्डर आले, दूरदर्शन  आले. पण त्यावरही बातम्या, छायागीत, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं, आणि खास आकर्षण म्हणजे शनिवारचा मराठी व रविवीरचा हिंदी चित्रपट एवढेच कार्यक्ररम प्रक्षेपित व्हायचे. थियेटरमधे कधीतरी साठीमाशी शिवाजी महाराज, संत तुकाराम, ज्ञानेश्वर असे धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपट बघायला मिळायचे आणि तेही पालकांच्या उपस्थितीत. मग संगणकाचा व भ्रमण दूरध्वनीचा शोध लागला आणि नवीन पिढीचे (म्हणजे ज्यांचे घडण्याचे व आकारायचे वय आहे अशा मुलांचे) नुक्सानच झाले असे म्हटले करी अतिशयोक्ती होणार नाही. या साधनांसाठी जागा कमीतकमी लागते, मित्रमैत्रिणींची गरज वाटत नाही. दोन्ही पालक नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात ते पाल्यावरच पडते (हे कळले नाही). कानात कर्णफुले हेडफोन घालून लॅपटॉप, मोबाईल यासारखी गोंडस उपकरणे घेऊन तासनतास करमणूक करायची. पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. माणसामध्ये मिसळायची, परिचय वाढवण्याची, लोकसंग्रह करायची सवयच लागत नाही. वाचनालयात जाणे, मासिके, वृत्तपत्र, पुस्तके वाचणे याचे प्रमाणही कमी झाले आहे. छंद जोपासले जात नाहीत, ना मैदानी खेळ खेळले जातात ना बैठे खेळ.

सण साजरे करणे यामागे संस्कृती जोपासण्याचा उद्देश असतो. पण त्याबरोबर करमणुकही होत असते. दस-याला सोने वाटणे, संक्रांतीला तिळगुळ वाटणे, भोंडला, हळदीकुकू, गणपतीला एकमेकांच्या घरी दर्शनाला जाणे, आरत्या म्हणणे, दिवाळीला फराळाला जाणे, एकत्र किल्ला बनवणे, फटाके वाजवणे, कंदिल बनवणे, रांगोळ्या काढणे, मंगळागौरीचे खेळ हे सगळे आता नष्ट होऊ लागले आहेत. नवीन पिढीलाही त्यात फारसा रस नाही. लग्न, मुंज, बारसं, साखरपुडा ह्या कार्यक्रमातही काहीजण मोबाईलमधे मग्न असतात.

पूर्वी सुट्टीच्यादिवशी नातेवाईकांकडे, मित्रांकडे, शेजा-यांकडे, परिचितांकडे भेटायला जायची पद्धत होती. गप्पागोष्टी, हास्यविनोद, गाणी, बातम्यांची देवाणघेवाण, विविध विषयांवर चर्चा, चहापोहे असे होत असे. आजकाल सगळे दैनंदिन व्यवहारात इतके व्यस्त असतात की कारणाशिवाय कोणाकडे असे येणेजाणे होतच नाही. हाही एक करमणुकीचाच प्रकार होता.

आपल्या लहानपणी खिडकीशेजारची जागा मिळण्यासाठी झटापट असायची. मग तासंतास खिडकीतून बघताना वेळ कसा जाई कळत नसे. हल्ली मुलांना ना खिडकीत बसण्यात रस असतो ना बाहेर बघण्यात. सुट्टीच्या दिवशी कुटुंबातील सगळेजण एकत्र वेळ घालवायला घराबाहेर पडले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल व कानात हेडफोन असे चित्र दिसते. मग पोहणे वा धावणे असो, सायक्लिंग असो, जिम असो, जेवायला जाणे असो, मु व्ही असो, माॅलमधे जाणे असो, पार्कमधे जाणे असो, काहीही असो. मंदिरसुद्धा अपवाद नाही हो. तिथेही मोबाईलचा वापर मुक्तहस्ते होत असतो.

बाहेरगावी जायचे असेल तरीही ज्या हाॅटेलात २४ तास वायफाय असेल असेच हाॅटेल बुक केले जाते. कमीतकमी बाहेरगावी जाताना तरी ही उपकरणे घरीच ठेवून, निसर्गाच्या सांन्निध्यात अधिकाधिक रमावं असं माझं प्रांजळ मत आहे. पण मोबाईल जणू प्राणवायू असलेल्या पिढीला कोण समजावणार? निसर्गाच्या सहवासात त्यांचं मन जास्त वेळ रमत नाही.

नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ह्या साधनांचे फायदेही असंख्य आहेत. त्यासाठी त्यांचा जरूर वापर करावा. मात्र त्यांच्या आहारी न जाता प्रमाणबद्ध उपयोग करून त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळले आणि करमणुकीसाठी इतर साधनांचा अवलंब केला तर नवीन पिढीचे भविष्य उज्वल होईल आणि सगळ्यांचे जीवन सुखकारक आणि आरोग्यमय होईल.

 - गीता पटवर्धन



1 टिप्पणी: