उलथापालथ - प्रकरण १

ह्याआधीचा भाग: उलथापालथ - उपोदघात 

 ----------------------------------------------------------------------------------------------------------
रात्रीच्या समयी ते दोघे घोडेस्वार मंद गतीने दंडकारण्यातून प्रवास करीत होते. केवळ हीच गोष्ट त्यांच्या धैर्याची साक्ष पटवण्यास पुरेशी आहे असे आम्हास वाटते. ज्या दंडकारण्याचे सद्यकाळातील रूप देखील मानवास भयप्रद वाटते अश्या दंडकारण्यातून आपल्या कथानकाच्या काळात प्रवास करणे म्हणजे मृत्यूशी गाठच! अगदी अतुलनीय धैर्याची आणि शस्त्रविद्येत निपुण असणारी माणसेच असा विचार करून तो अमलात आणण्यास धजत असत. इथे दंडकारण्याची माहिती थोडक्यात देणे आम्हास क्रमप्राप्त वाटते.

दंडकारण्य हे भौगोलिकदृष्ट्या विन्ध्य पर्वताच्या दक्षिणेला तेव्हाच्या कूर्म राज्यापर्यंत आणि सह्य पर्वताच्या पूर्वेला साधारण समुद्रापर्यंत पसरलेले होते, म्हणजेच सध्याच्या महाराष्ट्र राज्यापेक्षाही थोडी जास्तच एवढी त्याची व्याप्ती होती. त्यामुळे विन्ध्य पर्वताच्या उत्तरेस असलेली राज्ये आणि दंडकारण्याच्या दक्षिणेस असलेली कूर्म आदि राज्ये ह्यांना जोडणारा भूभाग म्हणजे सह्य पर्वताच्या पश्चिमेकडील कोकणचा प्रदेश. भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील ह्या राज्यांमध्ये जे काही दळणवळण होत असे ते कोकण मार्गे किंवा जेथे दंडकारण्याचा प्रभाव थोडा कमी आहे अशा पूर्व किनाऱ्याच्या इथूनच. पूर्वेकडील मार्गाने जाताना देखील व्यापारी वगैरे बरोबर संरक्षणासाठी सैनिक घेऊनच जात असत. दंडकारण्यामुळे भारतवर्ष राजकीयदृष्ट्यादेखील विभागाला गेला होता. 

परंतु कालपरत्वे दंडकारण्याच्या काही भागात मनुष्यवस्ती होऊन पश्चिमेस प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) आदि नगरे उदयास येऊन एक छोटे, परंतु साहित्य संगीत कला, सर्वच क्षेत्रात अत्यंत प्रभावशाली असे राज्य तयार झाले होते. हे राज्य सह्य पर्वतातील रस्त्याने कोकणमार्गे इतर भारतवर्षाशी संबंध ठेवून होते आणि त्याच्या बाकी सर्व सीमांना दंडकारण्य होते. अशा ह्या राज्याच्या पूर्वेकडून प्रवास करून ह्या प्रकरणाच्या सुरुवातीस उल्लेख केलेल्या दोन घोडेस्वारांना दंडकारण्याच्या दक्षिण भागात जायचे होते. त्यांच्याकडे असलेल्या पत्रात दिलेल्या खाणाखुणांप्रमाणे ते दोघे एका डोंगर-रांगेला समांतर दिशेने प्रवास करत होते. ते दोघेही साधारण एकच वयाचे तरुण होते. दोघेही पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यापैकी थोडा जास्त उंच असलेला तरुण त्याच्या पोशाखाप्रमाणे दुसऱ्याचा सेवक वाटत होता. मालकाच्या पोशाखावरून तो सधन घराण्यातील किंवा एखाद्या सरदाराचा मुलगा वाटत होता. 

गेले तीन दिवस प्रवास करून दोन्ही घोडे आणि स्वार थकले होते. खरे तर त्यांचे गंतव्य स्थान जवळच होते, परंतु अजून नक्की किती दूर जायचे होते हे त्यांना ठाऊक नव्हते. रात्रभर विसावा घेता येईल असे एक उंच झाड शोधून ते त्यावर चढून पहुडले. दंडकारण्यातील श्वापादान्बद्दल ऐकून असल्याने, गरज पडल्यास ते पळून जाऊन जीव वाचवू शकतील असा विचार करून त्यांनी घोड्यांना मोकळेच सोडले होते. पुढच्या प्रवासाचे बेत आखता आखता लौकरच ते दोघेही निद्रेच्या अधीन झाले.

गेले तीन दिवस दोन हेर त्यांच्यावर पाळत ठेवून होते. आता ते दोघेही निजल्यावर हेरांमध्ये काहीतरी खलबत झाले. एक जण तिथेच थांबला आणि एक जण आडवाटेने पुढे गेला.

- - - -

जवळच असलेल्या एका डोंगर-रांगेतील एका कड्यावर एक वयस्कर व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. त्या मनुष्याने भगव्या रंगांचे वस्त्र परिधान केले होते. मस्तकावर केसांच्या जटा होत्या. वाऱ्याने त्याची वस्त्र आणि लांबलचक दाढी झुलत होती. उजव्या हाताच्या अनामिकेमधील अंगठी आणि गळ्यातील रुद्राक्षांची माळ वगळता त्याच्या अंगावर इतर कोणतेही आभूषण नव्हते. 

दरीमधून वर येऊन एक सेवक अदबीने त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “जय श्रीराम! महाराज, करटक नुकताच परत आला आहे. त्याने आणलेल्या बातमीनुसार आपले पाहुणे झाडावर निजले आहेत. दमनक तिथेच थांबला आहे. उद्या पहाटे प्रवास सुरु केल्यानंतर ते सुमारे अर्ध्या प्रहरात इथे येतील.”

“उत्तम. सर्व काही योजनेप्रमाणे घडून येत आहे. उद्या ते येतील तेव्हा त्यांच्यासाठी फळांची व्यवस्था आधीच कर. त्यानंतर मी त्यांना भेटेन. आता तू जा.”

महाराजांची आज्ञा झाल्यावरही तो सेवक तिथेच थांबला आणि म्हणाला, “परंतु विष्णूपुरीस पाठवायच्या उत्तराच्या खलित्याचे काय?”

“उद्या चन्द्रचूडाबरोबर होणारऱ्या वार्तालापाचे फलित पाहून मजकूर ठरेल. जर सर्व काही आपल्या योजनेप्रमाणे पुढे सरकले तर खलिता पाठवावाही लागणार नाही. स्वतः चंद्रचूडच ते काम करेल. जय श्रीराम!”

“जय श्रीराम!”


- शेरलॉक फेणे

(विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध पावलेल्या गोविंद नारायण दातारशास्त्री ह्यांच्या कादंबर्यांच्या धर्तीवर लिहिलेल्या आमच्या ‘उलथापालथ’ ह्या आगामी कादंबरीतून..)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा