शब्दांनी सुटले कोडे

एक होता राजा आणि एक होती राणी. राजा-राणी श्रीमंत पण फक्त विचारांनी. आर्थिक परिस्थिती बेताचीच, अगदी मध्यमवर्गीय - खाऊन पिऊन सुखी. राजा-राणीचा संसार अगदी निगुतीनं सुरु झाला. लग्नावर अमाप खर्च करण्यापेक्षा तोच पैसा भविष्याची तजवीज करण्यासाठी त्यांनी वापरला आणि छोट्याश्या पण स्वतःच्या, हक्काच्या घरात ते मोठ्या थाटात राहू लागले. काल ओघात दोघांच्या संसारात एका बाळाने प्रवेश केला. छान, गुटगुटीत, मोदकासारखी गोरीपान मुलगी झाली. सगळीकडे 'आनंदी आनंद गडे' चालू असताना राजा-राणी कालांतराने नोकरीवर रुजू झाले आणि मग मात्र मुलीला सांभाळायचा पेच निर्माण झाला. राजाचं आपल्या राजकन्येवर अपार प्रेम, जणू काळजाचा तुकडाच. तिला पाळणाघरात वाढवायला त्याचा पूर्णपणे विरोध. 'तिला कोणी त्रास दिला, पळवूनच नेली तर? नको रे बाबा!' मग काय, तिची रवानगी तिच्या आजोळी करायचं ठरलं. पण आजी आजोबा होते पार दुसऱ्या गावात, दोन अडीचशे किलोमीटर वर. शेवटी बाळासाठी राजा राणीने त्या इवल्याश्या जिवाला आजी आजोबांकडे सुपूर्त केलं आणि निवृत्तीनंतर नात हे त्यांचं एक जणू करमणुकीचं productive साधनच झालं. ५ महिन्यांचं ते इवलंसं बाळ आजी आजोबांकडे दुधावरच्या साईप्रमाणे वाढू लागलं.

एकुलती एक, इतर नातेवाईकांपासून दूर आणि त्यातून आजी आजोबांच्या छत्रात वाढल्याने लहानपणापासूनच आजी आजोबा हेच तिचं विश्व आणि तेच तिचे मित्र आणि मैत्रीण. राजा राणीने आजी आजोबांच्याच भरवशावर तिला विविध खेळ, चित्रकला, गाणं अशा कलावर्गांना घातलं. स्वसंरक्षणासाठी तिला कराटे शिकायलासुध्दा घातलं. 'प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवता येईल इतपत तरी पोहोता आलच पाहिजे' म्हणून आजोबांनी लाडक्या नातीला स्वतः पोहायला शिकवलं. तीपण खोल पाण्यातही उंच शिडीवरून उड्या मारून सराईतासारखं पोहू लागली. तिचा दिवस शाळा आणि हे सगळे क्लास ह्यात कधीच संपून जाई. मित्र- मैत्रिणींबरोबर गप्पा, टिंगल करणं म्हणजे काय हेही तिला ठाऊक नव्हतं. हळूहळू एकीकडे बऱ्याच कलांची तोंडओळख योग्य वयात होत असताना दुसरीकडे तिचा स्वभाव जरा बिनधास्त पण अलिप्त आणि अंतर्मुखी बनत गेला.

पुढे मोठी झाल्यावर तिला ह्याची जाणीव झाली. वर्गातल्या इतर मुलामुलींमध्ये तिचा जीव रमेच ना. तिचं अबोल असणं शिष्ठपणा म्हणून बघितलं जाऊ लागलं. तशी हुशार होती ती, त्यात विविध स्पर्धांतल्या यशामुळे शिक्षकांच्यात ती आवडती होती पण तिच्या समवयस्कांमध्ये मात्र ती एकटी पडली होती. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण पार पडल्यावर नोकरीनिमित्ताने ती ह्या सुरक्षित कोशातून बाहेर पडली आणि एकटी राहू लागली, पार दुसऱ्या शहरात १०००-२००० किलोमीटर दूर.आपली कारकीर्द घडवण्यासाठी, शिक्षण वापरात आणण्यासाठी..

दरवेळी कृतीमागचा हेतू चांगला म्हणून आयुष्यातले खाचखळगे अनुभवणं चुकत नाहीत. आई बाबांबरोबर राहत होती तोपर्यंत आपल्याच विश्वात रमणं ठीक होतं, पण जेव्हा नवीन शहरात, नवीन माणसात राहायची वेळ अली तेव्हा तिला आपण घेतलेल्या निर्णयाची खात्री कमी होऊ लागली. आगीतून फुफाट्यात तर आलो नाही ना वाटू लागलं, कारण 'PR : personal relations' ठेवणं कधी तिला माहीतच नव्हतं. आपण बरं आणि आपलं काम बरं हा शैक्षणिक प्रगतीसाठी चांगला गुण असला तरी जगण्यासाठी तो नेहमीच फायदेशीर ठरत नाही, हे तिला कळत होतं पण वळत मात्र नव्हतं. कामानंतरचा अख्खा दिवस आणि विशेषतः शनिवार आणि रविवार तिला खायलाच उठे..दोन वर्षांच्या नोकरीत घरी आईबाबांकडे जाण्यापलीकडे तिची एकही सुट्टी झाली नव्हती. कारण 'घरी बसून करू काय?' हा यक्षप्रश्न तिला भेडसावत असे. त्यापेक्षा ऑफिसंच बरं हे तिचं जगावेगळं तत्त्वज्ञान होतं.

हळू हळू ती जास्तीच एकलकोंडी होऊ लागली आणि त्यातच internet वरच्या social media ह्या नावाच्या कृत्रिम, virtual महाजाल तिला परिचित झालं आणि त्यात ती कधी गुरफटत गेली तिचं तिलाच कळलं नाही. मोबाईल हा तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत गेला. chatting, posting, sharing, liking मधेच तिचे तासंतास जाऊ लागले आणि दिवसाच्या शेवटी अख्ख्या दिवसात केलेल्या productive कामांची बाकी शून्य येऊ लागली. ह्याचा तिला त्रास होऊ लागला. कारण तेवढी संवेदनशील ती जात्याच होती. आपल्याला मिळालेले २४ तास आपण वाया घालवले म्हणजे मुठीत वाळू कितीही घट्ट धरून ठेवली तरी ती शेवटी निसटतेच आणि मग आपल्या हातात उरते ती फक्त हतबलता, तशीच काहीशी गत तिची झाली होती. social media चं जणू काही व्यसनच तिला लागलं. Internet pack एका दिवसात संपू लागला आणि तो संपला कि 'जलबिना मच्छली' अशी अवस्था तिची होऊ लागली. तिच्यात चंचल वृत्ती वाढू लागली, छोट्या छोट्या कारणांवरून तिची चिडचिड होऊ लागली, सततच्या मोबाईलच्या वापराचा दुष्परिणाम तब्बेतीवर होऊ लागला आणि ती depression च्या गर्तेत नकळत ओढली गेली. मित्र मैत्रिणी तिच्या आयुष्यात आधीसुध्दा नव्हते, मग ह्या ओढवलेल्या परिस्थितीचं मूळ नेमक कशात होतं? ह्या सगळ्या प्रश्नांचं मूळ होतं ते तिच्या आयुष्यात छंदांच्या वजाबाकीमुळे निर्माण झालेली पोकळी. ऑफिसातून दमून भागून घरी आल्यावर प्रत्येक माणसाला करमणूक हवीच असते, ती तिनी मोबाईल मध्ये शोधली होती. तिच्या फावल्या वेळातल्या जोपासलेल्या आवडीची जागाच जणूकाही मोबाईलने घेतली होती पण त्याचा वारेमाप वापर मात्र दिवसातले २४ ही तास व्यापू पाहत होता. सैरभैर झाली होती ती! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या तिला virtual मित्रमैत्रिणीचं जग हे खऱ्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचं वाटू लागलं होतं, अगदी तिच्या आई बाबांपेक्षाही! राजा-राणी तर पार हतबल होऊन गेली होती, कारण मारून-धोपटून, रागावून किंवा अगदी आंजारून गोंजारूनही बधणाऱ्या वयातली त्यांची राजकन्या राहिली नव्हती. पण हार मानतील तर ते राजा-राणी कसले! राजा-राणीने विचारमंथन केलं, त्यांना प्रश्नांची उकल झाली. गरज होती ती राजकन्येच्या हातात एक नवीन खेळणं किंवा करमणुकीचं साधन देण्याची, तिला कशात तरी इतकं गुंतवायची कि तिला त्या फसव्या, virtual, खोट्या जगाची आठवण देखील येणार नाही. त्यांनी एक शक्कल लढवली, तिला एक गोष्टीचं पुस्तक आणून दिलं, अगदी छोटसंच, जेमतेम ३०-४० पानांचं. ''Who moved my cheese?'' आयुष्यातल्या बदलांना कसं न डगमगता, समर्थपणे सामोरी जायचं हे सांगणारी उंदरांच्या एका जोडीची रूपक अलंकारात गुंफलेली एक रोचक दंतकथा.

राजा-राणीची ही शक्कल भलतीच वर्मावर बसली. राजकन्येनी त्या पुस्तकाचा अधाशासारखा फडशा पाडला. एक झाल्यावर दुसरं, तिसरं, असं करता करता फावल्या वेळात ती कादंबऱ्या देखील वाचू लागली. नवीन पुस्तकांचा तो वास तिला हवाहवासा वाटू लागला, त्या पानांचा स्पर्श तिला सुखावू लागला, तिला पुस्तकातल्या गोष्टीतलं जग डोळ्यासमोर दिसू लागलं. विविध भाषेतलं उत्तमोत्तम साहित्य ती वाचू लागली, अभिवाचनाच्या कार्यक्रमांना जाऊ लागली आणि बघता बघता वाचनाची जागा लिखाणाने घेतली. सुरुवात अर्थातच उगीच मनातलं काहीबाही खरडण्यापासूनच झाली, पण नंतर सरावाने त्या खरडण्याला एक आकार, धरबंध येऊ लागला आणि पूर्वी खायला उठणारा अतिरिक्त वेळ तिला अपुरा पडू लागला. ती मनात येईल ते अगदी सगळं उतरवून काढत असे, त्यातून विचारांना चालना मिळत असे आणि अनेक नवनवीन कल्पना, गोष्टी आकार घेत. पहिला लेख लिहून झाल्यावर काय तो आनंद झाला होता तिला! एक लेख, मग दुसरा, तिसरा करत करत, म्हणता म्हणता एक पुस्तक तयार झालं आणि प्रकाशितही झालं..! दिवस भराभर सरत होते. महिने-वर्ष लोटली.आता ती एक लेखिका म्हणून नावारूपाला आली होती, तिच्या पुस्तकांची 'Bestseller' मध्ये गणना होऊ लागली होती. तेव्हाची 'ती' कधीच मागे पडली होती, मागे वळून बघताना आता मात्र तिला तेव्हाच्या तिचीच लाज वाटू लागली होती.

दिवसात प्रत्येक माणसाला २४ तासच मिळतात. ते निरर्थक वाया घालवायचे की सत्कारणी लावायचे ते मात्र प्रत्येकाच्या हातात असतं.

- अमिता जोशी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा