सणाची खाद्यसंस्कृती

आजही आपल्या भारतीय समाजात ‘खाद्य संस्कृती’ चांगलीच टिकून आहे. आपल्या भारत देशात होणाऱ्या हवामान बदलांबरोबर शरीराला आवश्यक असलेले अन्नघटक सणासुदीला केल्या जाणाऱ्या पदार्थातून शरीराला कसे पुरवता येतील, याचे आयोजन करूनच आपली खाद्य संस्कृती घडली आहे.

प्रत्येक समाजात खाद्य संस्कृती व परंपरांना महत्त्वाचे स्थान असते. ह्या परंपरा त्या समाजाला त्यांच्या पूर्वजांसोबत घट्ट बांधून ठेवतात. आहारात परंपरेचे विविध प्रकार आहेत. निसर्ग व नियम हा पहिला प्रकार, धर्म हा त्याचा दुसरा प्रकार, अन्न आणि आध्यात्म ह्याची सांगड घालणारा आहार हा तिसरा प्रकार. निसर्ग, धर्म आणि आरोग्य हे परंपरेचे त्रिसूत्र आहेत. या सर्वांचा विचार करुनच आपली खाद्य संस्कृती घडली आहे. आपल्या देशात प्रत्येक सणाचे जसे वेगळे महत्त्व आहे, तसेच त्या त्या वेळी होणाऱ्या निसर्गातील बदलांना अनुसरून त्या सणाला खाद्य पदार्थ बनवले जातात.

उदाहरणार्थ, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. या दरम्यान वसंत ऋतू आरंभ झालेला असतो, झाडाला नवीन पालवी फुटते. कडुनिंबाची पाने फुले आरोग्यासाठी औषधी व चांगली असल्याने गुढीपाडव्याला प्रसाद बनवताना त्याचा वापर केला जातो. तसेच या दिवसात उन्हाळा सुरु झाल्यामुळे सणाच्या संस्कृतीमध्ये थंड प्रकृती असलेले ‘श्रीखंड’ करण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत हमखास असतोच. यानंतर उन्हाळ्यात येणारा सण म्हणजे ‘अक्षय तृतीया’. या दिवसात उन्हाळ्यातील रानमेवा खाण्यासाठी तयार झालेला असतो. तो म्हणजे ‘फळांचा राजा आंबा’. आपल्या पूर्वजांना पुरणपोळी व आंबरसाचे जेवण देऊन मातीच्या कर्यामध्ये पिण्यासाठी पाणी देण्याची प्रथा आहे. त्यादिवसापासून आंबे खाण्यास सर्वजण सुरुवात करतात. खान्देशामध्ये आखादी हा महत्त्वाचा सण असून या दिवशी खाद्य पदार्थ म्हणून मांडे आंबरस बनवण्याची पद्धत आहे. अतिशय सराईतपणे महिला हातावर मांडे तयार करून खापरावर भाजतात. त्यामुळे मांड्याची चव काही औरच असते. उन्हाळ्यात सहजासहजी उपलब्ध असणारे पेय तयार करून त्याचा वापर केला जातो.

पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. अशावेळी अरबटचरबट खाण्यापेक्षा सात्त्विक आहार घेणे महत्त्वाचे असते. या दिवसात उपास केल्यामुळे पचन संस्थेला आराम मिळतो. आपली खाद्य संस्कृती तशी वातावरणाला अनुकूल अशीच आहे. पावसाळ्याची सुरुवात झाली की श्रावण महिन्यालाही सुरुवात होते. श्रावण महिन्यापासूनच सणाची रेलचल चालू होते. यात प्रथम येणारा सण ‘नागपंचमी’. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपास केला जातो. या उपासाच्या दिवशी पचायला हलक्या अशा ज्वारीच्या लाह्या व लाहीपीठ वापरून त्याचे अनेक खाद्यपदार्थ बनवून खाण्याची पद्धत आहे. नागपंचमीच्या दिवशी बरेच लोक तवा वापरत नाहीत. त्यामुळे या दिवशी उकडलेले खाद्य पदार्थ करतात. या पाठोपाठ येणाऱ्या रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला खाद्यपदार्थ म्हणून ‘नारळी भाताचा’ वापर केला जातो. नारळी भाताची जिभेवरची चव संपते ना संपते तोच कृष्णाष्टमी हा कृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. या दिवशी उपास करून दुसऱ्या दिवशी खाद्यपदार्थ म्हणून गोपाळकाला हा पदार्थ बनवतात. यामध्ये पोहे, पेरू, लिंबाचे लोणचे, कुरमुरे, दाळे, शेंगदाणे, हिरवी मिरची, दही, साखर, मीठ, कोंथिबीर असे अनेक जिन्नस एकत्र करून गोपाळकाला केला जातो. अतिशय स्वादिष्ट व शरीराला पोषक असा हा खाद्यपदार्थ या सणाला खाण्यास मिळतो. 

फक्त मानवासाठीच नाही तर वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैल व दूध देणाऱ्या गाईसाठीही आपल्या संस्कृतीमध्ये सणाचे आयोजन केलेले आहे. या दिवशी पुरणपोळी हा खास पदार्थ बनवून या प्राण्यांना खाऊ घातला जातो. या प्राण्यांच्या प्रति प्रेम व्यक्त केले जाते. पुरणपोळी वर भरपूर तूप व त्या बरोबर दूध घेण्याची पद्धत आहे. यामुळे पुरणपोळी पचण्यास मदत होते.

आपल्याकडे सणाच्या आदल्या दिवशी बहुतेक वेळा उपवास असतो. कारण पोटाला विश्रांती मिळणे खूप गरजेचे असते. हरतालिकेचा कडकडीत उपास केल्यानंतर दहा दिवस गणपतीच्या सणामध्ये अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी असते. यावेळी प्रामुख्याने बनवला जाणारा खाद्य पदार्थ म्हणजे ‘मोदक’. या दहा दिवसांमध्ये सप्तमीला ‘ज्येष्ठ गौरी’ घरी येतात. अष्टमीला महापूजा व महाभोजन असते. यात अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी असते शिवाय फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. हवामानानुसार शरीराला आवश्यक असलेले अन्नघटक या पदार्थातून पुरवले जातात, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन केले जाते. त्यानंतर पित्रृपक्ष सुरू होतो. आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना भोजन दिले जाते. यामध्येही अनेक पदार्थ बनवले जातात. खास करुन खीर, आळूच्या वड्या, उडदाचे वडे, तळलेले पदार्थ असतात. हे सर्व पचायला जड असल्यामुळे पितरांना जेऊ घातल्यावर रात्री परत जेवण करत नाहीत. यामागे उद्देश हाच आहे की रात्री पोटाला आराम मिळावा.

सप्टेंबर महिना सुरु झाला की पाऊस कमी होऊन हळूहळू थंडीची चाहूल लागते. अशा वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या दिवसात उपास करून नवरात्र देवीची उपासना केली जाते. या काळात अनेक उपासाचे खाद्यपदार्थ बनवले जातात. शेवटी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. यानंतर शरद ऋतूला सुरुवात होऊन बहुतेकांना पित्ताचा त्रास सुरु झालेला असतो. त्यामुळे पित्तशमनासाठी आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये कोजागिरीला खसखस, सुकामेवा घालून आटवलेले दूध रात्री चंद्रप्रकाशात शीतल करून पिण्याची पद्धत आहे. अनेक खाद्यपदार्थांबरोबरच असे पेय प्यायल्याने आपल्या शरीराला फायदा होतो. पित्त कमी करण्यासाठी आणखी एक जिन्नस म्हणजे साळीच्या लाह्या व धणे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या दोन्हीचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. दिवाळीच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे प्रदीप्त झालेला जठराग्नीचा उपयोग आरोग्य व शक्ती वाढवण्यासाठी करून घेता यावा म्हणून शरीराला पोषक असे खाद्यपदार्थ दिवाळीला केले जातात. त्या त्या ऋतूमध्ये पचायला व शरीराला पोषक असे पदार्थ आपल्या खाद्य संस्कृती मध्ये सणावाराला बनवले जातात. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी मिश्र भाजी केली जाते, तिला ‘मिश्रभाजी किंवा शेंगसोळा भाजी’ म्हणतात. या दिवसात थंडी असते. निसर्गाचा हा सृजन सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या खाद्य संस्कृतीत मिश्रभाजी बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. त्यानंतर येणारा सण म्हणजे ‘मकर संक्रांत’. संक्रांत म्हटलं की तिळगूळाच्या लाडूची आठवण येते. तीळ व गूळ हे गुणाने उष्ण पदार्थ असल्याने उन्हाळा सुरू होण्यापूर्वी खाणे योग्य असल्या कारणाने संक्रांतीला याचे विविध खाद्यपदार्थ बनवतात. आपले पूर्वज अतिशय हुशार होते. त्यांनी या सणाच्या निमित्ताने आपल्या शरीराला पोषक व वातावरणाला पूरक असे खाद्यपदार्थ त्या त्या सणाला बनवून खाण्याचे महत्त्व अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

तर अशी ही आपली सणांची ‘खाद्य संस्कृती’. याशिवाय अनेक नवीन पदार्थ आपण बनवत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी नुसार, वेळप्रसंगी, वातावरणाला व शरीराला पोषक असे खाद्य पदार्थ बनवणे, हीच आहाराची खरी पंरपरा आहे. ही पंरपरा समजून घेऊन जर खाद्यपदार्थ बनवले गेले तर तो पदार्थ खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. शेवटी मी गृहिणी म्हणून एवढेच सांगेन की नवीन नवीन पदार्थ बनवून स्वतः खाण्यापेक्षा इतरांना खाऊ घालण्यात मला खूप आनंद व मानसिक समाधान मिळते.
- प्रतिभा मुकूंद विभूते





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा