चिवपोहे

मी पार्ल्याची ! आमच्या लहानपणी पार्ले हे गांवच होते. फार थोड्या स्रिया नोकरी करायच्या, त्यातलीच एक माझी आई ! इतरांची आई संध्याकाळी घरी यायची पण माझी आई , संध्याकाळी पार्ले स्टेशनला उतरली की परस्पर नाईट हायस्कूलला शिकवायला जायची . रात्री १०:३० वाजता घरी यायची. पहाटे ३ वाजता उठून ३०/३५ पोळ्या करून ६:३० वाजता ट्रेनसाठी निघायची. शाळेत मुख्याध्यापिका होती. त्या काळात रिक्षा तर नव्हत्याच पण टॅक्सीसुद्धा एखाद दुसरी असायची गांवात. तीही बहुदा कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उपयोगाची. तेव्हा सारा पायीच कारभार ! बापू (वडील) ही भाजी, आमटी करून आम्हाला शाळेत पाठवून निघायचे. तेही मरोळच्या शाळेत मुख्याद्यापक ! सकाळी व शाळा सुटल्यावर शिकवण्या… त्यांनाही बरेच दूर फिरावे लागे. बालपणी या दोघांचे कष्ट कळायचे नाहीत, उलट आई फार कमी वेळ भेटते म्हणून मी नाराज असे. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे जाणवू लागले. दादाही समजावित असे.

माझी ७ वी ची परीक्षा संपून सुट्टी लागली होती. आई, बापूंना मात्र रिझल्ट आणि इतर कामांसाठी शाळा होतीच. परीक्षेनंतर नाईटस्कूलचे काम कमी झाल्याने आई संध्याकाळी जरा लवकर येवू लागली आणि रोज दमणाऱ्या आई, बापूंसाठी काहीतरी करावे अशी मला फार इच्छा झाली. आत्ताचे surprise म्हणतात ना तसेच काही ! मी स्वयंपाकघरात जाऊन काय करता येईल पाहू लागले नी पोहे दिसले. आईला पोहे करताना पाहिले होते. मस्तपैकी कांदे चिरले नी फोडणी करायला घेतली. केली कधीच नव्हती पण मागे एकदा आजीकडे गेले तेव्हा तिने सांगितलेले सटकन आठवले. आधी तेल तापवायचे , मग त्यात मोहरी टाकून तडतडली… किती. ...तुझ्यासारखी बर्र… की मग हिंग थोडा S SS सा आणि मग हळद नी याच क्रमाने. लक्षात ठेव गं ढमाले. का काय ? कारण हळद पटकन जळते. मग मिरच्यांचे तुकडे व कडिपत्ता ! फोडणी कच्ची राहिली किंवा जळली तर तुझा पत्ता कट, समजले? तिने सांगितले होतेच असे की काय बिशाद विसरायची. तर तशीच फोडणी करून कांदा परतला. कांदा नेहमी गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा… आईसाहेब कोणालातरी सांगतांना ऐकले होते. कुठला गुलाबी? बापरे, चाॅकलेटी होऊ लागल्यावर घाबरून आधी gas बंद केला नी आईपेक्षा काहीतरी निराळे (आत्ताच्या भाषेत fancy ) करावे म्हणून त्यांत शेंगदाणे टाकले. सर्व काही परतून त्यात पोहे घातले, मीठ, चमचाभर साखर, नी सारे ढवळून, परतून कोथिंबीर घातली बारीक चिरून ! व्वा, काय मस्त वास आला, स्वत:वर खूष होवून ताटली ठेवली झाकण म्हणून आणि दुसऱ्या बर्नरवर आले घालून झकास चहा केला नी आई, बापूंची आतुरतेने वाट पाहू लागले. नाही म्हटले तरी या साऱ्या उपद्व्यापामुळे खाली जाऊन खेळण्यावर पाणी सोडावे लागले होते.

थोड्याच वेळात आई, बापू आणि खेळणे आटपून दादोबाही आले. माझा चेहरा जास्तच फुलारला असावा कारण चप्पल काढत असतानाच आईने विचारले, “आज काय विशेष ? आणि खाली मैत्रिणी विचारत होत्या, खेळायला का नाही गं गेलीस?''

“आधी पाय तर धुवा ''... माझे लकलकते डोळे.

“चहा केलाय वाटतं, छान वास येतोय''... बापू

हं, बाहेरच बसा हं… असे म्हणून तीन ताटल्यात अस्मादिकांनी पटापट पोहे भरून नेले बाहेर.

“मी आज कांदेपोहे केलेत तुमच्यासाठी ''.... माझे प्रचंड उल्हासित होवून सांगणे .

“काय?''... आईचे काळजीयुक्त आश्चर्य. एकटी असताना gas पेटविण्यास बंदी होती न मला.

अरे व्वा !..........कौतुकाने बापू .

आणि आणि...

फूSSSSS सांगितलेस म्हणून बरे . बरं का आई, याला कांदेपोहे म्हणतात.....पूर्णपणे टिंगल उडवित दादाचे खो खो हसणे..

“मी कांदेपोहेच केलेत, यात काय टिंगल करतोस?'' माझे चिडणे .

आई आणि बापू खरं तर अवाक !

“आई , हे कानSSSS दे पोहे बरं का ! बाईसाहेब कोणाकडून शिकलात?''

“आई , बघ गं ''..........अस्मादिक

“असू दे, असू दे, अरे तिने पहिल्यांदाच केलेत, खा बघू जसे झालेत तसे ''

“जसे झालेत तसे म्हणजे ? मी तू करतेस तस्सेच केलेत . शिवाय शेंगदाणेही घातलेत. उगाच नावं ठेवायची म्हणजे?'' माझा राग अनावर झाला.

“हो, अगदी बरोबर, छानच झालेत, तो उगीच चिडवतोय तुला '' बापूंनी दादाला डोळ्यांनी खुणावत म्हटले नी काही शंका येऊन मी आत गेले .

पातेल्यात पाहिले तर कडकडीत पोहे ! अरे बापरे ! एक चमचाभर खाऊन

पाहिले नी काहीतरी चुकलं हे कळून डोळ्यात पाणी आलं.

“ अरे व्वा! शेंगदाणेही आहेत बरं कां! ए, तू कधी घातले नाहीस पण हिने 
बघ, rich पोहे बनविलेत ''........बापू

“पोहे”, हा हा, पुन्हा मोठ्याने हसत दादा म्हणाला ,यापेक्षा कांदा -चिवडा हे नाव मस्त आहे.ओ SSSS नवीन रेसिपी गं आई चिवड्याची !!

आता मात्र माझा बांध फुटला नी मी मोठ्याने रडू लागले.

बशी बाजूला ठेवून आईने मला जवळ घेतले व म्हणाली, “अगं वेडाबाई ,पोहे भिजवले नाहीस बहुतेक म्हणून असे झालं. तू आपल्या मनाने केलेस हीच किती मोठी गोष्ट !''

“पण मी कधीच पहिले नाही तुला पोहे भिजविताना”

“अगं, ते कडधान्यासारखे नसतात भिजत घालायचे. फोडणीस टाकायच्या आधी पाण्यात भिजवायचे आणि लगेच पाणी काढून टाकायचे, इतकेच ''

मला खरंच नव्हते गं माहित, मी तुम्ही दमून येता रोज म्हणून करायला गेले नि… हा दादा… मला पुन्हा रडू फुटले.

“त्याला काय जाते चिडवायला? चिडविताना मिटक्या मारीत खातोय. ते बघ की ''.....आई उवाच.

हो ना , चव चांगली आलीय बरं का चिवड्याची !'' ...बापू म्हणाले .

परत फू SS कन हसला दादिटला, “बघ, बापू पण चिवडा म्हणताहेत,'' हा हा हा ..

“आ SSSS ई” ......

"आई, आपण याला चिवपोहे म्हणू या ! चिमणीचे पोहे !! हा हा हा ...''

“मी चिमणी तर तू कावळा ''....

“अरे, भांडताय काय? मला अजून आण बरे तुझे चिवपोहे ''... बापू 

“मलाही ''... आई

“आणि मलाही चिमणे ''... दादोबा

"आई , मी चहा पण केलाय ''

“चहा फर्स्टक्लास हं ,नीला !''... बापू 

“मीच शिकवलाय तिला ''... दादिटला चान्स सोडेल तर शपथ !

काहीही असो, पण मी केलेल्या पहिल्या चिवडा कम पोह्यांचा चट्टामट्टा झालाच लगेच, जरी थोडी चुटपूट लागली.

पुढच्या काळात अनेक पदार्थ करायला शिकले. आज गुगल केले की एका पदार्थाच्या दहा तरी रेसिपी तत्काळ हजर ! पण तेव्हा वेगळी वही करून 
मासिकातून, वर्तमानपत्राच्या पुरवणीमधून उतरवायच्या, शेजारच्या काकी, मावशी यांच्याकडून शिकून लिहून ठेवायच्या आणि आई , बापू, दादा यांच्यावर प्रयोग करायचे ! पहिल्याच पदार्थाने ठेच लागल्याने पुढे काळजी घेत गेले. तेव्हा हाॅटेल्स विशेष नव्हते व ऊठसूट बाहेर खायची पद्धतही नव्हती. सणावारी सर्व पदार्थ घरोघरी घरीच! आणि दिवाळीचा फराळ तर… आहा ! प्रत्येक घरची चव निराळी. आईच्या हाताखाली लुडबुड करू लागले हौसेने !

नोकरीला लागल्यावर विविध प्रांतातील सहकारी ! मग पदार्थांची अन् रेसिपींची देवाणघेवाण ! इडली, डोसा, उत्तप्पा, कुर्मा, ढोकळा, पराठे, कोफ्ता, बिर्याणी, गुलाबजाम, जिलेबी अगदी शिरखुर्मा सुद्धा ! लग्नानंतर माझ्या तिन्ही मोठ्या जाऊबाई अतिशय सुगरण आणि निरनिराळे पदार्थ करायची भारी हौस ! त्यांच्यापुढे मी म्हणजे लिंबूटिंबू ! पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतले. लग्नापर्यंत अनेक पदार्थ केले पण मजा म्हणून. तेव्हां पोळ्यांच्या वाटेला सहसा नाही गेले नी लग्नानंतर माझ्या विविध आकाराच्या पोळ्या पुतण्यांनी चालवून घेतल्या.
“ ए , मला आफ्रिका देश, तुझा कोणता? '' असे करत त्यांनी मला पृथ्वीपर्यंत आणलेच मजेत.

आजच सकाळी पोहे ..हो ..कांदेपोहेच बनविले आणि महाराष्ट्र मंडळाची इ मेल वाचली, ऋतुगंघसाठी साहित्य पाठविण्यासंबधी ! दुर्दैवाने आई, बापू तर गेलेच पण ऐन तारुण्यात दादाही गेला. आज प्रकर्षाने त्यांची आठवण झाली. दादा आज असता तर मोठ्याने हसून म्हणाला असता, “अगं , चिवपोहेची रेसिपी पाठव, गुगलच्या बापालाही माहित नसेल.'' हा हा हा ! 

खरंच , त्यानंतर अनेकवेळा पोहे बनविले , न चुकता ! अगदी कांदेपोहे च्या कार्यक्रमालाही मीच बनविले कांदेपोहे !! (आणि अनेक कार्यक्रमांमुळे त्यांत अचूकताही सहज आली ). पण आज पार विस्मरणात गेलेला तो दिवस, ती संध्याकाळ /माझी पहिली वहिली पाककृती… सारे सारे आठवले आणि त्या बरोबरच, त्या रात्री झोप लागत असताना आई-बापूंचे ओझरते कानावर पडलेले संभाषण… “पोरगी लवकर मोठी झाली हो , परिस्थितीमुळे"... 

"नको काळजी करू. चांगलच आहे. स्वावलंबी बनेल लवकरच….
................आठवलं आणि डोळे पाणावले !! 
- नीला बर्वे




























४ टिप्पण्या: