मला उमगलेली जनाबाई


मला उमगलेली जनाबाई
"ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस |' असे वारकरी संतांविषयी तुकाराम शिष्या बहिणाबाई ह्यांनी अभंगातून सांगितले आहे. भागवत धर्माच्या मंदिराची जडणघडण तेराव्या शतकात झाली. ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात अध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातला. मधल्या काळात एकनाथांनी खांब दिला भागवत' कोसळत्या परंपरेला भरभक्कम केले तर तुकाराम हे भागवत धर्माच्या मंदिराचा कळस ठरले. मराठी संत या भागवत धर्माच्या म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या गंगोत्रीचे वारकरी ठरले. तळागाळातील साधक वारकरी विठ्ठलभक्तीच्या प्रयोजनातून काव्यनिर्मिती करू लागला. परंपरेने नेमून दिलेला व्यवसाय करता करता नामस्मरणातून काव्य स्फुरू लागले. अशाच एका कवयित्रीचा आज आपण तिच्या अभंगांद्वारे परिचय करून घेऊ.
जनाबाईचा जन्म गंगाखेड येथील दया नावाच्या विठ्ठल भक्ताघरी झाला. मागासवर्गीय जातीत जन्मलेल्या जनीला आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांनी पंढरपूरला दामाशेटकडे (नामदेवांचे वडिल) दासी म्हणून ठेवले. ७-८ वर्षांची जनी नामदेवांच्या घरी धुणी, भांडी, झाडलोट करू लागली. नामदेवांच्या घरी संतांची नेहमीच वर्दळ असे. ज्ञानेश्वर व त्यांच्या प्रभावळीतील संत नेहमीच नामदेवांकडे येत. कीर्तन, प्रवचन व नामस्मरण घरात नेहमीच चालत असे. छोट्या जनीला लहानपणापासून ह्या संतांचा सहवास लाभला. दामाशेट व गोणाई ह्या जोडप्याने तिला प्रेमाने वाढवले. त्यामुळे नामदेवांच्या कुटुंबाविषयी जनीला आपुलकी व जिव्हाळा होता. ती एका अभंगातून नामदेवांच्या संपूर्ण कुटुंबाचे दर्शनच घडवते.
गोणाई राजी दोन्ही सासू सुना | दामा नामा जाणा बापलेक |
नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र | जन्मले पवित्र वंशी |
लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी | वेडीपिशी जनी नामयाची |

नामदेवांच्या घरात अहोरात्र कष्ट करणारी अनाथ जनी या कुटुंबामुळेच सनाथ झाली असा आनंद ती व्यक्त करते.
नामयाचे ठेवणे जनीस लाभले | धन सापडले विटेवरी |
पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे. शूद्रांना आणि स्त्रियांना आत्मोन्नतीची प्रेरणा देणारी मुक्तीची भक्तीपेठआहे. मानवधर्माचे, सहिष्णुतेचे व ऐक्याचे प्रतीक म्हणजे पंढरपूर.
बाप रखुमादेवीवरू | माझे निजांचे माहेर |
ते हे जागा पंढरपूर | जगमुक्तीचे माहेर |

नामदेवांकडे येणाऱ्या संतांची ओढ पांडुरंगाकडे असे. मायबाप विठ्ठलाला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करून चालत वारीला येत. त्यामुळे विठ्ठलामध्ये जनीला कुटुंबवत्सल पुरुषाचे दर्शन घडते.
विठू माझा लेकुरवाळा | संगे लेकुरांचा मेळा
जनाबाईने आपली गुरुपरंपरा सांगताना म्हटले आहे, "ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर |’ भक्तीची कवाडे खुल्या करणाऱ्या ज्ञानदेवांना तिने गुरुस्थानी मानले आहे. ज्ञानदेवांमुळे आम्हाला भक्तीचे स्फुरण चढले. आमचा उध्दार झाला. विठ्ठलभक्तीच्या प्रेरणेमुळे आम्ही काव्य करू लागलो. त्यामुळे ज्ञानदेवांविषयी अनन्य भक्तीभाव तिच्या अभंगातून व्यक्त होतो. तसेच ज्ञानदेव-विसोबा खेचर-नामदेव-जनाबाई अशी गुरु परंपरा ती सांगते. ज्ञानदेव हे तिचे श्रद्धास्थान आहेत तर नामदेव हे पारमार्थिक गुरु आहेत.
धन्य मायबाप नामदेव माझा | तेणे पंढरीराजा दाखवले |
करीत नामदेव विठ्ठल चिंतनी | त्याचीच सेवेलागी जन्मली जनी |
नामदेवांचे आणि आपले युगानुयुगाचे नाते आहे असे तिला वाटते.
जनाबाईने परमेश्वराला मानवीय पातळीवर आणून भक्तीमार्गातील परमोच्च अवस्था दाखवली आहे. भक्ताने ईश्वरापर्यंत जाणे व ईश्वराने भक्ताची जागा घेणे असा तिचा आत्मप्रवास ठरतो. अंघोळ घालणे, पाठ चोळून देणे, दळण कांडण करणे, तेल लावणे इ. गोष्टी तिचा श्रीकृष्णच तिच्यासाठी करतो. जनाबाईने लौकिक जीवनालाच अध्यात्मिक पातळीवर नेले. नवनवीन रूपे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाशी (विठ्ठलाशी ) ती अखंड सुसंवाद साधते. कदाचित हाच तिचा साक्षात्कार अनुभव ठरत असेल. विठ्ठलाला आपल्या जाळ्यात गुंतवून ठेवणारी जनी त्याच्याशी एकरूप होते. माझे व त्याचे द्वैत नाहीच हे सांगताना ती म्हणते,
झाडलोट करी जनी | केर भरी चक्रपाणी |
माझ्या जनीला नाही कोणी | म्हणोनी देव घाली पाणी |
सांगे जनी सर्व लोका | न्हाऊ घाली माझा सखा |
हाता आला असे फोड | जनी म्हणे मुसळ सोड |'

जनाबाई आणि विठ्ठल ह्यांचे नाते हृदयंगम आहे. कधी ती त्याच्यावर रागावते तर कधी काम करून थकला म्हणून व्याकूळ होताना दिसते.
अरे विठ्या अरे विठ्या | माझ्या मायेच्या कारट्या |
अरे काळतोंड्या | म्हणे का टाकिले मला |
माझा तू कधीही अव्हेर करू नकोस असे ती सांगते
गंगा गेली सिंधुपाशी | त्याने अव्हेरीले तिशी |
तैसे तू न अव्हेरी मजसी |’

त्या विठ्ठलाला मी बंदिवान केले आहे असे ती सांगते.
धरला पंढरीचा चोर | गळा बांधोनिया दोर |
हृदय बंदिखाना केला | आत विठ्ठल कोंडला |
एका अभंगात तर जनीने तो आपला चाकर झाला असे सांगितले आहे.
जाय जाय राउळाशी | नको येऊ आम्हापाशी |
जाऊ आम्ही बरोबरी | झाला तिचा हो चाकर |

नामदेव, चोखा, बंका इत्यादि सर्व संत विठ्ठलभेटीसाठी तळमळत असतात. जनीला समजत नाही हे एवढे व्याकुळ का होतात? विठ्ठल तर माझ्याकडे येऊन माझी सर्व कामे करतो.
देव भावाचा लंपट | सोडुनी आला हा वैकुंठ |

असा निर्गुण निराकार साक्षात्कार तिला होतो. ईश्वराच्या वियोगापेक्षा त्याच्या मीलनाचे तादात्म्य तिच्या अभंगातून जाणवते. नामदेवाच्या श्रेष्ठत्वापेक्षा पुंडलिकाच्या भक्तीच्या साक्षात्काराचे नाते जनाबाईशी जवळिक साधते. जनाबाई अगदी विठ्ठलमय झालेली होती.
कर्मकांडाच्या आणि व्रतवैकल्याच्या चातुर्वर्ण्याची चौकट त्याकाळच्या कोणत्याच संतांना तोडता आली नाही. जातीधर्माच्या बंधनामुळे जनाबाईचे संवेदनशील मन आक्रोश करून उठते; पण तिला संपूर्ण आधार वाटतो तो भक्तीमार्गाचाच. जनाबाईने आपल्या अभंगांनी व्यवहाराला आणि परिस्थितीला वास्तवाचाच रंग चढवला. याती हीनतेचे दु:ख व्यक्त करताना जनी म्हणते,
राजाई गोणाई अखंड तुझ्या पायाजवळी | मज ठेवियले द्वारी | नीच म्हणोनी बाहेरी |

जनाबाईसारख्या एका निरक्षर मागास समाजातील स्त्रीने सकल संतगाथेमध्ये आपले स्थान निश्चित केले ते रसाळ अर्थपूर्ण अभंगांमुळे. तिच्या नावावर ३५० अभंग आहेत. कृष्णजन्म, प्रल्हादचरित्र आणि बालक्रीडा इत्यादी विषयांवर तिचे अभंग आहेत. द्रौपदी स्वयंवर व हरिश्चंद्र आख्यान या काव्यांमुळे मला स्फुर्ती मिळाली असे एकनाथांचे नातू मुक्तेश्वर सांगतात.
जनाबाईने अनेक भावनात्मक अवस्थांमधून भक्तीप्रवास केला. अनुताप, प्रतीक्षा, धावा, शरणागती, निर्धार, यातीहीनतेचे दु:ख, निराशा आणि साफल्य या सर्व अवस्थांमधून जनाबाईची अध्यात्मिक वाटचाल होते. आपल्या दासीपानाशी आणि स्त्रीत्वाशी एकरूप होऊनच ती प्रामाणिकपणे कविता करते. तिच्या काही अभंगातून तर प्रसंगनाट्यच वाचकांसमोर उभे करते.
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईची कविता सिद्ध झाली. माय मेली बाप गेला अश्या अवस्थेत नामदेवांनी जनाबाईला लहानपणापासून सांभाळली. म्हणून ती नामदेवांविषयी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करते.
जनी म्हणे जोड झाली विठोबाची | दासी नामयाची म्हणोनिया |

परीसासंगे जसे लोखंडाचे सोने होते तसे नामदेवांमुळे मी विठ्ठलभक्तीला पात्र झाले असे ती सांगते.विठ्ठलाची आणि जनाबाईची भेट विरघळवून टाकणारी आहे. ईश्वर भेटीच्या आनंदाने सुखावलेल्या जनीला जनक्षोभाला तोंड द्यावे लागले. पांडुरंग वैजयंतीमाळ व पदक जनीकडे विसरतो व जनीवर चोरीचा आळ येतो. तिला सुळावर देण्याची शिक्षा सुनावली जाते. जनी व्याकुळ होते. आपला दोष काय हेच तिला कळत नाही.
तोच धावला संकटी | पांडुरंग जगजेठी | झाले सुळाचे ग पाणी | धन्य जनी धन्य हरी |
तत्कालीन सर्वच संतानी आपल्या अभंगांतून उपेक्षितांचे अंतरंगच उलगडून दाखवले आहे. जनाबाईने पण आपली व्यथा, वेदना, अवहेलना, हीन जातीचे दु:ख व परमेश्वर भेटीचा आनंद समाजापुढे मांडला. या व्यथेची सल नंतरच्या काळातील समाज सुधारकांना बोचली व हळुहळू परिस्थिती पालटू लागली. हेच संतसाहित्याच्या यशाचे रहस्य होय.
जनाबाईच्या काव्याचा परामर्श घेणे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नाही. पण नामदेवांनी जनाबाईच्या काव्याबद्दल जे प्रशंसोद्गार काढले ते वाचकांपुढे ठेवणे मी माझे कर्तव्य समजते.
जनीचे अभंग लिहितो नारायण | करिती श्रवण साधुसंत |
ज्ञान तेची जनी | ज्ञान तेची भक्ती | नामदेव स्तुती करतसे |
संत जनाबाईने आपल्या भक्तीच्या बळावर विठ्ठलाशी जोडलेले नाते, नामदेवांवरील अपार श्रद्धा, ज्ञानदेव प्रभावळीतील संतावर केलेले प्रेम व नि:स्वार्थ सेवा हे तिच्या अभंगातून पाहिले की जनाबाईपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.
विनया दीपक मिराशी

२ टिप्पण्या:

  1. तुमच्या सुंदर लिखाणाने डोळे पाणावले,
    रामकृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच डोळ्यात पाणी आले..हृदय‌द्रवले...किती महान ती जनी...खूप प्रश्नांची ऊत्तरे मिळाली तूमच्या लिखाणामुळे...थँक्यू 🙏🙏

    उत्तर द्याहटवा