खाण्यासाठी जन्म आपुला...

या जगात कुठेही जा आपल्याला पहिली उत्सुकता असते ती तिथे खायला काय काय मिळेल याची. त्यात जर आयते मिळणार असेल तर काही विचारूच नका, अत्यंत आनंद होतो. गृहिणीला आयते मिळत नाहीच कारण ती घराची अन्नपूर्णा असते आणि ती सर्वांसाठी स्वयंपाक करण्यातच आनंद मानत असते. 

स्वयंपाक करणे ही आता नुसती स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली नसून अनेक पुरुषही त्यात सहभागी झालेले दिसतात. काहीजणांना उत्तमोत्तम पदार्थ बनवून दुसऱ्यांना खायला घालायला आवडते तर काहीजणांना दुसऱ्यांनी बनवलेले खायला आवडते. माझी आ्जी आणि आता आई ह्या दोघीही पहिल्या गटातल्या आहेत तर मी मात्र खाण्यासाठी जन्म आपुला हे मानणारी आहे. 

खाण्यात एवढी विविधता आढळते मग ती चाखलीच पाहिजे.

जन्माने मी पु लं च्या भाषेत पक्की मुंबईकर आहे आणि लग्नानंतर कोल्हापूरची झाले. त्यामुळे आज मी इथे आमच्या कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीबद्दल सांगणार आहे. 

कोल्हापूर म्हटले की प्रथम स्मरण होते ते अंबाबाईचे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. सकाळी उठून तिचे एकदा दर्शन घेतले की आपण गावात फिरायला मोकळे. आम्ही नेहेमीच कोल्हापूरला गेलो की तिच्या दर्शनानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आहार हॉटेलची मिसळ खाणे. मंगळवार पेठेतील हे हॉटेल, तिथे कांदा भजी, साबुदाणा वडाही मस्तच मिळतो, पण मला मात्र मिसळच आवडते. 

मिसळीसाठी इतरही काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. खासबागची मिसळ, फडतरेंची मिसळ. प्रत्येकाची चव वेगळी.

कोल्हापूर म्हटले की पांढरा, तांबडा रस्सा हा आलाच. म्हणजे मटणाचा तांबडा रस्सा ज्याला खुळा रस्साही म्हटले जाते. आणि नारळाचे दूध घालून केलेला पांढरा रस्सा. याला काहीच तोड नाही. तिकडे घराघरात तर हे बनतच पण पर्यटकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही खाणावळीत किंवा परख, ओपल, रसिका सारख्या हॉटेलांमध्ये तुम्हाला उत्तम कोल्हापुरी मटण थाळी मिळणारच. 

कोल्हापूरची आणखी एक खासियत म्हणजे कॉकटेल आईस्क्रीम. सोळंकी हे पहिल्यापासूनच कॉकटेलसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून माळी कॉलनीतील राजमंदिर आणि कावळा नाक्याचे फ्लेवर्स सुद्धा वेगवेगळ्या आईस्क्रीमसाठी प्रसिद्ध झाले आहेत. 

कोल्हापुरात ब्राह्मणेतर समाजामध्ये बऱ्याच आनंदाच्या प्रसंगात खारे जेवण घालण्याची पद्धत आहे. लोक चूल बंद आमंत्रण देतात म्हणजे घरातील सगळ्यांना जेवायला बोलावले जाते. त्या दिवशी घरात चूल पेटत नाही. 

आता जरा भाज्यांकडेही वळूया. भाज्यांमध्ये भरली वांगी पहिल्या नंबरला येतात. कुठल्याही गोष्टीची जर स्तुती करायची असेल तर कोल्हापूरकर म्हणणार एक नंबर आहे. वांग्याबरोबर डाळ दोडकाही इकडे आवडीने खाल्ला जातो. इथली ढब्बू मिरची म्हणजे सिमला मिरची तर इतकी नाजूक आणि सुंदर असते की ती कापायचे नकोसे वाटते म्हणून त्याचीही भरलेली भाजी केली जाते. असे आपले मला वाटते. श्रावणात मिळणारी शेपू पोकळा तर हिरवी मिरची, लसूण आणि तांदळाच्या कण्या घालून केली तर काय चवदार होते. इथल्या भाज्यांना आपली एक उत्तम चव आहे ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. 

याचबरोबर विविध प्रकारचे पापड, सालपापड्या, कुरडया, सांडगे हे तर उन्हाळ्यात वर्षभरासाठी केले जातातच. कोल्हापूरच्या लोणच्यांना विसरून चालणारच नाही. यात माईन मुळा हे लोणचं तर खासियत आहे. मसाले भात आणि दही कांदा हे तर व्हेज, नॉन-व्हेज जेवणाचा अविभाज्य भाग आहेत.

कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोल्हापुरी चटणी. इकडे जेवणात साधी मिरची पावडर न वापरता ही चटणी वापरली जाते. ती सर्व गरम मसाले, कांदा, सुके खोबरे, कोथिंबीर, आले , लसूण, तीळ, खसखस अशा विविध वस्तूंना एकत्र करून बनवली जाते. ती बनवणे कठीणच नाही पण किचकटही आहे. अनेक कुटुंबांमध्ये आजही ती घरी बनवली जाते. आता ती बाहेरही बनवून मिळते. तीच तर सगळे पदार्थ चविष्ट बनवते. 

कोल्हापूरला गेलात तर राजाभाऊंची भेळ तर खाल्लीच पाहिजे. आता ते परदेशी राहणाऱ्या कोल्हापूरकरांना ती पार्सलही करून देतात.

कोल्हापूरचा वडा हा पुणा-मुंबईच्या वड्याचा मोठा भाऊ आहे. तो एक जरी खाल्ला तरी पोट भरून जाते. 

पन्हाळ्याला फिरायला गेलात तर तिथे मिळणारी झुणका, भाकरी, खरडा, दही आणि कांदा खायला विसरू नका. पन्हाळ्याच्या त्या थंडगार वातावरणात ह्या पदार्थांची चव काही औरच लागते.

कोल्हापूरची पुरणपोळीही वेगळी असते. तिला तेल पोळी म्हणतात आणि ती तेलावर लाटून उलट्या तव्यावर केली जाते. कटाची आमटी, बटाट्याची भाजी , पापड , भजी आणि ही तेलपोळी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. 

कोल्हापूरला अनेक छोट्या मोठ्या बेकऱ्या आहेत आणि तिथे मिळणारे टोस्ट, बटर, खारी, केक्स, रस्क एकापेक्षा एक असतात . 

सकाळी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन तुम्ही महाद्वार रोडला आलात की तुम्हाला शिरा, उप्पीट, पोहे, आप्पे , लोणी डोसा असे अनेक नाश्त्याचे पदार्थ मिळतात. 

कोल्हापूरला रात्री कट्ट्यावर दूध पिण्याची एक पद्धत आहे. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे पण अजूनही काही चौकात संध्याकाळी काही शेतकरी म्हशी घेऊन येतात आणि तुम्हाला ताजे ताजे दूध काढून प्यायला देतात. त्याचा गोडवा काही वेगळाच असतो. 

ह्या ताज्या दुधामुळे इथला चहा अप्रतिम असतो हे सांगणे न लगे. 

दिवाळीचे फराळाचे पदार्थ तर इतके चविष्ट असतात की हे खाऊ का ते असे होऊन जाते. मोतीचूर लाडू जे ताजी बुंदी पाडून बनवले जातात, बाकरवड्या, तळलेला चिवडा , कच्या पोह्याचा चिवडा ,शंकरपाळी, करंज्या अशी यादी वाढतच जाते. एक गम्मत सांगू ? करंज्यांना इथे खुळखुळा म्हणतात कारण त्यात सारण खूपच कमी भरलेले असते त्यामुळे त्या खुळखुळ्याप्रमाणे वाजतात.

असे हे आमचे अंबाबाईचे कोल्हापूर , विविध पदार्थांचे माहेरघर.
एकदा तरी याला नक्कीच भेट द्या.

- सौ अनुराधा मिलिंद साळोखे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा