आयर्न-वुमन उषा सोमण, एक मुलाखत

वयाच्या पन्नाशीत आयर्नमॅन ही अल्ट्रा-मॅरेथाॅन करणारे मिलिंद सोमण ह्यांनी फिटनेसची व्याख्याच बदलून टाकली आहे. पण त्यांच्या मागचं शक्तीस्थान आहेत त्यांच्या आई, आयर्नवुमन उषा सोमण. 

आमचे संपादक, केशव पाटणकर यांनी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा:

प्र: तुमची 'फिटनेस'ची व्याख्या काय?
उ: फिट म्हणजे आपली रोजची कामं करताना काहीही शारीरिक त्रास न होणे. फिट म्हणजे विपरीत परिस्थितीचा वा माणसांचा स्वत:च्या मनावर, वागण्यावर परिणाम न होऊ देणे. आपले विचार नि:संकोच, स्पष्टपणे मांडता येणे. बहुतेक वेळा आपण मोकळेपणे बोलतच नाही. फ्रॅंकली बोलता आलं पाहिजे. त्याने मन स्वस्थ राहतं. मुळात त्रास असे फार नसतातच. आपणच बऱ्याच प्रसंगात त्रास आहे असे वाटून घेतो. मग साध्या साध्या गोष्टींचा बाऊ होतो.

प्र: खाण्या-पिण्याचे काही पत्थ्य?
उ: मी कुठलाही डाएट प्लॅन पाळत नाही. मी सगळं खाते, भाजी, भात, वरण व गोड सुद्धा. मला साखरेचंही काही वावगं नाही. मिलिंदच्या सांगण्यामुळे साखर सोडून गुळावर आले. खीरीसारख्या पदार्थात नारळाचं दूध व गूळ वापरते. लक्षात ठेवा, सर्व काही खा पण प्रमाणात खा व भूक लागल्यावरच खा. भुकेपेक्षा दोन घास कमीच खावे. मी तेच करते. 

प्र: तुमचं फिटनेस शेड्यूल काय?
उ: माझं असं काही शेड्यूल नाही. मी काॅलेजात लेक्चरर होते तेव्हा असही बरच चालणं होत असे. निवृत्तीनंतर मी सकाळी ६ ला उठून एक तासभर चालू लागले; ब्रिस्क वाॅक. ते सोडून आणखी काही व्यायाम करत नाही. हल्ली सांगू का, उपकरणांचा अतिरेक झालाय. बघा... बहुतेक बायका हल्ली काम करतात. त्यामुळे दिवसभर आॅफिसात बसून असतात. घरी कामाला बाई तरी असते नाहीतर उपकरणे नाहीतर दोन्ही. पूर्वीसारखी ऊठ-बस होत नाही, हाडांना व्यायाम मिळत नाही. साहजीकच, लहान वयात पाठीची, पायांची दुखणी जडतात.

प्र: ह्यावर उपाय काय?
उ: सोपं आहे. 'न' चा पाढा बंद करा. "मला हे कसं जमेल", "काल थोडं चालून आले तर पाय दुखतायत; आता दोन दिवस आराम करू". कुठलीही सुरूवात बेताने करा. मनात सकारात्मक विचार ठेवा आणि कष्टाची तयारी ठेवा. थोडंसं दुखलं तर लगेच सोडून देऊ नका. सर्वांना २४ तासच मिळतात. त्यातला अर्धातास नाही देऊ शकत आपण तब्येत जपायला? दृढ इच्छा शक्ती ठेवा. सगळं जमेल. 

प्र: मिलिंद आयर्नमॅन करणार याची तुम्हाला काही भिती?
उ: छे! अजिबात नाही. मिलिंदला पळण्याची व पोहण्याची चांगली सवय होती, फक्त सायक्लिंगची सवय नव्हती. त्यामुळे त्याचा सराव सायक्लिंगवर केंद्रित होता. मला अभिमान आहे त्याने स्वत:ला हे चॅलेन्ज दिलं व ते पारही पाडलं.

प्र: हा प्रश्न अनेकांनी विचारला असेल. तुम्ही ह्या वयातही हायवेवर धावलात. ते धावणं कसं काय घडून आलं?
उ: अहो कसलं काय. जुळून आलं. आणि 'ह्या वयात' 'ह्या वयात' का करतात सगळे? सगळं मनात असतं. त्या दिवशीसुद्धा मिलिंद गुजरातहून धावत येत होता आणि मी फक्त त्याला वाटेत भेटायला गेले. छान वारा वाहत होता, बारीकसा पाऊस होता, रस्त्यावर कोणीही नव्हतं. मिलिंद म्हटला, "धाव आई तू पण". मग काय, धावले मी. मला कल्पनाही नव्हती की कुणी त्याचा व्हिडियो बनवत होतं आणि त्याहूनही की तो सोशल मीडियावर इतका बघितला जाईल. ते आपलं मिलिंदबरोबर धावताना दिसले म्हणून... नाहीतर मला कोण विचारत होतं आजवर? तुम्ही तरी आला असतात का? (हसत हसत)



-केशव पाटणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा