असतो मा सद् गमय

असतो मा सद् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर् मा अमृतं गमय

ही प्रार्थना मला लहानपणापासून मनापासून आवडायची. एवढे मागितले की देवाकडे अजून काय मागायचे? आणि जेव्हा ह्या पंक्ती मी वाचते तेव्हा नकळत मनाने कळकळीने मी ही प्रार्थना करीत असते. ऋतुगंधचा हा विषय वाचला तेव्हा वाटलं आपल्यालाही ह्यावर काही लिहायला सुचावं. तशी मला लिखाणाची सवय नाही. ८ -१० वर्षापूर्वी ऋतुगंधसाठी लिहिले असेन.

सकाळी (पहाटे नव्हे) उठून नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले. मला ध्यान लावणे जमत नाही, पण प्रयत्नपूर्वक रोज सकाळी अर्धा तास बसते. त्यात दिवसभरातले सगळ्यात जास्त विचारांचे थैमान अनुभवते. हे सांगण्याचा उद्देश हा की ध्यानाला बसते म्हणजे खूप काही मोठं करते असा वाचकांचा गैरसमज नको! आज ध्यान सुरु केल्यावर कालच वाचलेला ऋतुगंधचा विषय मनात डोकावला आणि मग विचारांची मालिका सुरु झाली.

खरं तर मला आता ह्या क्षणी ह्या प्रार्थनेची गरज आहे. विचारांच्या ह्या असत्य वावटळातून निर्विचारतेचे सत्य अनुभवू दे! अंधाराच्या जाळ्यातून सोडवून प्रकाशाचा अनुभव दे! ध्यानाला बुडविणाऱ्या ह्या विचारांच्या भोवऱ्यातून सोडवून अमृतासारखी गोड स्तब्धता दे! आणि काही वेळ ह्या प्रार्थनेवरच चिंतन केले तर लक्षात आले की थोडी स्थिरता रुजू लागली होती. मनाला आनंद झाला. मनच ते! आनंद झाला तसा फाजीलपणा सुरु झाला. नवीन विचारचक्र सुरु झाले. ही प्रार्थना आपल्याला ध्यान धारणेला, म्हणजे सकाळी उठल्यानंतरच्या पहिल्याच क्रियेला इतकी उपयुक्त ठरली तर दिवसभरातल्या इतर व्यवहारांना देखील अशीच लागू पडेल कदाचित. मग तर सुदर्शनचक्र हवेत सोडावे व ते सैरभैर जावे तसे विचारचक्रांचे झाले.

सकाळी उठल्या उठल्या ध्यानाला बसायच्याही आधी तर आपण ब्रश केलाय! असत्य अशा कीटाणूंचा थर काढून सत्य असे दात (कवळी नसल्यामुळे दाताला सत्यता आली) स्वच्छ केलेत. त्याच कीटाणूंचा अंधकार दूर करून प्रकाशरूपाने दात चमकत आहेत. दात स्वच्छ केले नाही तर कीड लागून त्यांचा विनाश! पण तोंड धुण्याच्या ह्या दैनंदिन विधीने आपण त्यांना विनाशापासून अमृताकडे नेतोय… असा विचार मनात आल्यावर गंमत वाटली आणि त्या चक्राला गती आली.

आणखीन काय? मला पोळ्या करण्याची क्रिया आठवली. आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपल्याला सर्वात अधिक काय महत्वाचे वाटते किंवा दिनचर्येत कुठल्या कामाचे सातत्य आहे, अशा काही संख्याशास्त्रीय अथवा मानसिक घटकांना अनुसरून मला ‘पोळ्या करणे’ आठवले असावे. कुणाला ऑफिसमधली मीटिंग आठवेल तर कुणाला गायनाचा क्लास आठवेल. असो. माझ्यासाठी ‘पोळ्या करणे’ आवडीचे, तरी दडपण असते ह्या कामाचे. आणि पोळ्यांइतक्या सातत्याने दुसरा कुठलाही पदार्थ स्वयंपाकात केला जात नाही. (भाजी, डाळ, भात ह्यामध्ये विविधता असते). शिवाय स्वयंपाक करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ध्यानधारणे इतकेच महत्त्वाचे. म्हणून पोळ्या करणे ह्यावर विचार घुटमळायला लागला असावा.

कणकेचा गोळा ‘असतो’. अपूर्ण असतो. असत्यासारखा कुचकामी असतो. त्या ‘असत्’ पासून उत्तम पोळी लाटली जाते, सत्याप्रमाणे गोल, पूर्ण. तव्याच्या चटक्याने पोळून, अग्निदिव्यातून सत्यच वर येते. ती भाजलेली ताजी पोळी म्हणजे असत्याकडून सत्याकडे जाणारा प्रवास. अपक्वतेच्या अंधारातून पक्वतेच्या प्रकाशाकडे जाणारा प्रवास. ज्याप्रमाणे हे पाकसिद्ध अन्न मनुष्याच्या देहाचे पोषण करू शकते, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वातील परिपक्वता समाजाला सुदृढ बनवू शकते. कणकेच्या गोळ्यातला कच्चेपणा, अपक्वता, पचायला जड आणि विनाशी आहे. अपरिपक्व विचार-वृत्तींमुळे समाजात मृत्यूसमान अंधकार पसरतो, तर परिपक्व विचार, तावून कस लागलेले सत्य, समाजाला अमृताप्रमाणे जीवनदायी, कल्याणकारी असते.

अरे बापरे ! पोळी करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा आपली आवडती प्रार्थना इतकी चपखल बसते, तर इतर कुठल्याही कृतीला ती तितकीच योग्य असणार. गणितशास्त्रात जशी ‘mathematical induction’ द्वारा काही प्रमेयं सिद्ध करता येतात, तसाच हा प्रकार!

आता तरी ध्यानावर एकाग्र व्हावं; पण मन आवरणं इतकं सोप असतं तर काय? मनात विचार आला: दिवसातली शेवटची क्रिया म्हणजे आपण झोपतो. म्हणजे प्रत्यक्ष उजेडाकडून अंधारात जातो. जागृतीकडून निद्रेत जातो. तेव्हां काय म्हणायचं ? मन मानायला तयार नाही. आपण वर सिद्ध केलं आहे त्याला अपवाद असू शकत नाही. प्रत्येक श्वासाला ही प्रार्थना करावी इतकी ती सुंदर आहे. ती प्रत्येक श्वासाला सत्यच असली पहिजे.

दिवसभरात आपण संसाराची कर्तव्ये, व्यवहाराची कामे ह्यात व्यस्त असतो. कोणी TV वरच्या रटाळ शोच्या आहारी, तर कोणी whatsapp वरचे किस्से, निरर्थक चर्चा ह्यात अडकलेला असतो. ते सर्व असत्य; त्या पासून मुक्त होऊन सत्य अशा झोपेकडे मला ने. दिवस कसाही जावो, ज्या मनुष्याला अंथरुणाला टेकल्यावर पटकन झोप लागते तो सुखी असतो. गाढ झोप तेवढी आपली असते, ती कुणा दुसऱ्याची नसते, म्हणून ती सत्य असते. आपण दिवसभरात जी कामे करतो ती बहुधा आपली नसतात, आपली असली तरी इतर विचारांची त्याला विघ्ने असतात, किंवा इतरांकडून त्यात व्यत्यय असतात. आपण स्वत:त नसतो, तेव्हा आपण अंधारातच असतो. झोपेत मात्र आपण स्वत:च्या प्रकाशात असतो. त्या प्रकाशात कधी स्वप्नं दिसतात, तर कधी प्रेरणादायी कल्पना येतात. त्या प्रकाशात यथेच्छ बुडून उठल्यानंतर कसे ताजेतवाने वाटते ! दिवसाच्या प्रकाशाला कार्यान्वित होण्याची शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. झोपणे अशा प्रकारे अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचाच मार्ग आहे. निद्रानाश हा कटू अनुभव आहे तर गाढ झोप अमृतासारखी गोड आहे. सामान्य माणसाला, ज्याला संत, योगीपुरुषांसारखा समाधीचा, अमृताचा अनुभव नाही, त्याच्यासाठी झोप हाच अमृताचा अनुभव. जीवशास्त्रीयदृष्ट्यासुद्धा झोपेत आपल्या झिजलेल्या पेशींचे पुन:निर्माण होते; मनुष्याला जिवंत ठेवण्यासाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रक्रिया मानवी शरीरात झोपेच्या काळात होत असतात. अमृताकडे ती वाटचाल असते.

बराच वेळ झाला. खूप सैरवैर धावले मन. आता आवरायला हवे. पण झोपणे, दिवसाची रात्र होणे ह्यातसुद्धा आपल्याला एवढी सकारात्मकता दिसू शकते ह्याबद्दल कृतज्ञता वाटली. आठ दहा वर्षांच्या अंधकारानंतर ऋतुगंधसाठी लेख लिहिण्यासाठी पुरेसा प्रकाश पडलाय, थोडं उजाडलंय. विचारांना असत्यतेत विरून जाण्याआधी, लेखणीने कागदावर उतरवून सत्यता दिली आहे. लेखणी चालू झाली आहे. मृतवत, चेतनाहीन होती, ती आता चेतना पावून अमृताकडे वाटचाल करत आहे.

धनश्री जगताप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा