हरवलेले बालपण

आजच्या धावपळीच्या युगात सर्व पालकांना भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे "मुलांचे योग्य संगोपन". सर्वांनाच आपली मुले सर्वगुणसंपन्न असावीत असं वाटतं, यात गैर काही नाही. पण पालक मुलांकडून अवाजवी अपेक्षा करतात. या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण हरवत चालले आहे. आईवडीलांचा सहवास न मिळाल्याने प्रेमाला पारखे झालेली मुले पुढे जाऊन नैराश्ये पोटी आत्महत्या सारखी कृत्ये करण्यास तयार होतात, ही खरच खूप चिंता करण्याची बाब आहे.

मी मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई आणि आता पन्नाशी पार केलेली आजी. या सर्व भूमिका चोखपणे बजावून पुन्हा आज समर्थपणे आजीची भूमिका पार पाडत आहे. माझ्या नातवाला सांभाळताना आजूबाजूला असणाऱ्या मुलांचे संगोपन कशा रितीने होते आहे हे प्रत्यक्ष पाहण्यात येते. या चिमुकल्यांनाही अनंत अडचणी असतात. त्या त्यांना सांगता येत नाहीत, तर घरच्या व्यक्तीला त्या समजून घ्याव्या लागतात. पावलो पावली त्यांना प्रेमाच्या माणसाची गरज असते. त्यांना काय हवं काय नको, काही दुखलं खुपलं तर समजून घेण्यासाठी, कोडकौतुक करणारी, वेळ प्रसंगी हक्काने रागवणारी पण क्षणात मायेने जवळ घेणारी आपली माणसे हवी असतात. आज पालक मुलांना सर्व काही देऊ शकतात पण स्वतःचा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्या अडचणी/ समस्या पालक म्हणून आपण समजून घेतो का? तर यावर नकारार्थी उत्तर मिळेल. मुलांच्या भावना समजून घेण्यासाठी आज पालकांना वेळच नाही याचे उत्तम उदाहरण देते. परवाच फेसबुक वर एक व्हिडिओ पाहून मन उदास झाले. जगाची खरी प्रगती झाली की अधोगती, हेच समजत नव्हते. या व्हिडिओमध्ये वडील आॅफीस मधल्या फाईल घरी आणून काम करत होते. त्यांची लहान मुलगी बाजूला बसून वडील कधी बोलतील याची वाट पहात बसली होती. ज्या फाईलमध्ये पाचशे रुपये होते त्या फाईलवर सही करणे चालू होते. मुलगी हळूच वडीलांजवळ गेली आणि म्हणाली, “पप्पा, तुम्हाला एक तास काम केले तर किती पैसे मिळतात?” वडील म्हणाले पाचशे रूपये. मुलगी म्हणाली पप्पा प्लीज मला पाचशे रूपये द्याल का? वडील लगेच तिला पैसे देतात नी खूष होतात. थोड्या वेळाने मुलगी वडिलांना म्हणते, “पप्पा, हे पाचशे रुपये घ्या आणि तुमचा एक तासाचा वेळ मला द्या.” त्या चिमुकलीचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता व्हिडिओ. यावरून तरी पालक काही बोध घेतील का? मुलांना काय हवे आहे काय नको? पालकाच्या मते मुलांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या की आपले कर्तव्य पूर्ण केले असे वाटते. मग सर्व काही मिळूनही आजची पिढी खरच समाधानी आहे का? दुर्दैवाने नाही म्हणावे लागेल. याचे कारण मी माझ्या अनुभवातून देणार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. कदाचित आपले मत यापेक्षा वेगळे असू शकते. 

आज पती पत्नी दोघेही नोकरीच्या निमीत्ताने दिवसभर घराबाहेर असतात. अशावेळी पालक आपल्या मुलांना डे-केअर किंवा हेल्पर जवळ ठेवतात. लहान वयात आईवडिलांना दुरावलेल्या मुलांच्या मनात भिती, असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. अशा दिवसभर हेल्परजवळ राहणाऱ्या लहान मुलांचा अतिशय काळजाला भिडणारा लेख माझ्या वाचण्यात आला. यात मुलगा आईला विचारतो, “मम्मी, तू आपल्या कामवाल्या मावशी जवळ घराची चावी का ठेवत नाहीस, त्यांच्या जवळ देशील का घराची चावी?” यावर आई लगेच म्हणते, “नको रे बाबा, आपल्या घरात लाख मोलाच्या वस्तू आहेत त्या अशा परक्या बाईच्या हाती कसे देणार?” यावर मुलगा म्हणाला "आई या निर्जीव वस्तू तुला लाख मोलाच्या वाटतात आणि मी तुझा असूनही तू मला मात्र अशा परक्या बाईच्या हाती कसे ठेवून जातेस?” मुलाचा प्रश्न ऐकून अंगावर काटा आला. पालक म्हणून काय उत्तर देणार आहात? बालवय म्हणजे मुलाचे हसणे, खेळणे, बागडण्याचे वय. याच वयात मुलांना आईची जास्त गरज असते आणि हीच गरज आज पालकांकडून पूर्ण केली जात नाही. त्यांचे बालपण कोमेजले जात आहे. आईवडील दिवसभर न दिसल्याने संध्याकाळी मोठ्या आतुरतेने वाट बघणारी मुले मी रोज पाहते. आई दिसता क्षणी तिला बिलगणारे हे चिमुकले जीव पाहिले की खूप वाईट वाटते. मान्य आहे स्त्रीने नोकरी करणे ही काळाची गरज आहे. दोघे कमवते असल्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता येते, पण आपल्या या चिमुकल्यांना नेमके काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी पालकांना वेळच नाही. माझ्या नातवाला सांभाळताना मी समजू शकते या मुलांना आपल्या माणसाची किती गरज असते ते. 

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरभर माणसे असत. परस्थिती बेताची असल्याने घरातील मोठ्या भावंडांचे कपडे, पुस्तके, खेळणी, इतर वस्तू लहान भावंडाने वापरताना कोणालाही गैर वाटत नसे. यातूनच मुलांना काटकसर करण्याची शिकवण मिळत असे. मोठ्या माणसांच्या चांगल्या वागण्या, बोलण्यातून व आचरणातून मुलांवर उत्तम संस्कार व्हायचे. संस्कार शिकण्यासाठी कुठल्याही शाळा किंवा क्लासला जावे लागत नाही किंवा विकत घेता येत नाही, तर ते अशा एकत्र कुटुंबात आपोआप मुलांवर होत असतात. एकदा मुलं सुसंस्कृत झाली की संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रूजत असत. अशा संस्कारांनी तयार झालेल्या मुलांच्या हातून वाईट कृत्ये होत नसत.

सध्या "हम दो, हमारा एक" ही संकल्पना वाढीस लागली आहे. इंटरनेट, सोशल मिडियामुळे पिढी सुधारली आहे पण या सर्वांमध्ये मुलाचे बालपण मात्र हरवत चालले आहे. ते जोपासायला हवेच, पण हे करत असताना मुलांना परस्थितीची जाणीव होऊ द्या. अतिलाड, सुखासीन जीवन जगण्यास मिळत असल्यामुळे मुलांमध्ये संवेदना नाहीशा झाल्या आहेत. विना कष्टाने व आयते मिळत असल्याने गरीबी व कष्ट करण्याची जाणीव व विचार करण्याची शक्ती मुलांमध्ये विकसित होत नाही.

त्यामुळे मुलांना नकार ऐकण्याची सवय राहिली नाही. अशामुळे मुले हट्टी, हेकेखोर व एकलकोंडी होत आहेत. आईवडीलांचा सहवास न मिळाल्याने, पालकांबद्दल माया, प्रेम, ओढ हळूहळू कमी होत आहे.

आज मुलांना मैदानी खेळ खेळायला आवडत नाही. दिवसभर एसी मध्ये टिव्ही, मोबाईलवर गेम खेळणे, विना कष्टाने मिळणारे मनोरंजन आवडते. अशी एकलकोंडी मुले इतरांमध्ये मिसळत नाहीत. मोठ्या व्यक्तीने मुलांना काही सांगितले, शिकवले तर ते सर्वच पालकांना आवडेलच असे नाही. स्वावलंबन, माहित नसल्याने ऐतखाऊ पिढी निर्माण होत आहे. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक झाला तर त्याचा विपरीत परिणाम होतोच म्हणून "अति तिथे माती " होऊ देऊ नये. वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या याहून वेगळ्या असतात. आईवडीलांशी मुलांचा संवाद होत नसल्याने मुलांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज पालकांना येत नाही. प्रत्येक गोष्टी वेळेत व मागता क्षणी मिळाल्याने नकार ऐकण्याची सवय या मुलांना राहत नाही.

मागे पेपरमध्ये एक हिंगोलीची बातमी वाचली. वडिलांनी दहावीची पुस्तके आणण्यास उशीर केला म्हणून रागाच्या भरात मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. बातमी मनाला चटका लावणारी. असेच यापूर्वीही उच्चपदी विराजमान असलेल्या आईवडीलांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली. त्याचे कारण नक्की समजू शकले नाही पण वयात येणारी मुलं किती सैरभैर होत आहेत याचे ज्वलंत उदाहरण या बातम्यांवरून आपल्या लक्षात येईल. मुलांवर मायेचे पांघरूण जरूर घाला पण वाईट कृत्य करताना डोळे झाक करु नका. स्वतःचे काम स्वतः करू द्या. वेळप्रसंगी पाठीशी खंबीरपणे उभे रहा. शिक्षण द्या, संस्कार द्या.

कुमार वयात येणाऱ्या मुलामुलींमध्ये शारीरिक बदल घडत असतात, अशा वेळी पालकांनी त्यांचे मित्र बनावे. त्यांना समजून घेऊन काय अडचणी आहेत हे मनमोकळेपणाने बोलून त्या सोडवाव्या. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलामुलींना लैंगिक शिक्षण जरूर द्यावे. पालकांना शक्य नसेल तर डाॅक्टरांचे योग्य मार्गदर्शन घ्यावे. यावर उपाय म्हणजे स्त्रीला नोकरी करणे गरजेचे असेल तरच करावी अन्यथा मुलांचे पालनपोषण योग्य रितीने करावे. घर व मुल सांभाळणे म्हणजे बर्याच स्त्रियांना कमी पणाचे वाटते पण "आर्दश गृहीणी व आर्दश माता” होण्यासारखे पुरस्कार फार कमी महिलांना प्राप्त होतो, हे लक्षात घ्या. जर स्त्रियांना नोकरी करणे अत्यंत गरजेचे असेल तर आपल्या नात्यामधील विश्वासू व्यक्तीवर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सोपवावी. आपण परक्या लोकांच्या हाती मुलं देतो, विश्वास ठेवतो मग आपल्या जवळच्या व्यक्तीला का नाही स्वीकारत? घरात मोठ्या व्यक्तीची अडचण न वाटता आपल्या मुलाचे संरक्षण नीट होते हे समजून घ्यावे. याचा फायदा असा होईल की मुलांसाठी डे-केअर व वृध्द व्यक्तींसाठी वृध्दाश्रमाची गरज पडणार नाही. सुसंस्कृत पालकांचा सहवास व योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्याने मुलांच्या जीवनात चांगले बदल घडवून त्यांचे हरवत चाललेले बालपण त्यांना आपण परत करू शकतो, असे मला वाटते.

- सौ. प्रतिभा मुकूंद विभूते

1 टिप्पणी: