सखी ग राजसासी मी वरले...

दिवास्वप्न पाहता पाहता, 
मनं माझे हरले,
सखी ग राजसासी मी वरले।  

मनोमनीची सुंदर प्रतिमा,
रूपपरी गुणांची प्रतिभा,
खट्याळ डोळस हसरा मानस,
त्रैगुणांसह अमाप धाडस,
तारुण्यातील मखमली स्वप्न जणू,
रेशीम धाग्यांनी हे विणले,
सखी ग राजसासी मी वरले। 

आभासापरी भास बलत्तर,
अस्तित्वाची जाणीव निरंतर,
नवचैतन्याने समीप मी तर,
प्रियतमाच्या गुणांवर मोहरले,
सखी ग राजसासी मी वरले।

जोडीदार जणू मित्र निरंतर,
सहवास असावा नित्य चिरंतर,
छायेत तयाच्या शीतल लहरी,
मार्गस्थ सुखाच्या रात्रौप्रहरी, 
साकार स्वप्न हे चीरतारुण्याचे, 
सहवासाने प्रत्यक्षात रुजले, 
सखी ग राजसासी मी वरले।

गोजिरवाण्या ह्या विश्वातील,
ग्रहमालेच्या आरंभातील,
सूत्र जणू हे दोघांहाती,
तरी अढळपद त्यासी हे दिधले,
सखी ग राजसासी मी वरले।


- नंदिनी नागपूरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा