खारीचा वाटा !!

जून महिन्याची सुट्टी... मुलीचा ऑफिसमध्ये आलेला चौथा फोन... "ममा, मला बोअर होतंय"... अगं, मग पुस्तक वाच, चित्र काढ, मैत्रिणीला बोलावं खेळायला. माझे उपाय सुचवणे... आणि, “असे सारखे सारखे फोन केलेस तर माझे काम लवकर संपणार नाही मग मला घरी यायला उशीर होईल”... असे म्हणत फोन ठेवणे. पण मनात पाचवा फोन येणार याची खात्री.
पुढचा फोन येण्यापूर्वी मी मनात विचार करत होते, की आपल्या मुलांना सारखे असे बोअर का होते? आपण लहान असताना आपल्याला कसे कधी बोअर नाही व्हायचे? खरे तर आपल्या लहानपणी करमणुकीची साधने तुटपुंजी होती. मोजकी खेळणी आणि अत्यल्प गॅजेट्स.TV चे प्रसारणसुद्धा दिवसाचे ४-५ तासांचे. मग लक्षात आले की सुट्टीच्या दिवशी आपण लहानपणी घरात छोटी छोटी कामे करायचो. शिक्षिकेची नोकरी सांभाळून एकत्र कुटुंबासाठी राबणाऱ्या आईला आपली खारीची मदत म्हणून केलेली छोटी कामे. ती करताना आईशी गप्पा मारता यायच्या. मला धुपाटण्यानी आपटून आपटून कपडे धुवायला फार मजा वाटायची. बाकी आमच्या घरात माणसांचा इतका राबता होता की दर दोन दिवसांनी एक नवीन माणूस दिसायचा. त्यामुळे माणसांचे निरीक्षण करायची सवय फार लहानपणापासून नकळत लागली होती. आता जाणवते की ती एक मोठी करमणूक होती. नाहीतर तेव्हा रहदारीच्या रस्त्याला लागून असलेल्या मोठ्या वाड्यात, जिथे लहान मुलांसाठी कुठलेही खेळणी TV गॅजेट्स असे प्रकार फारसे नसलेल्या ठिकाणी दुसरी काय करमणूक असणार होती?
आता चित्र नेमके उलटे झाले आहे. घरात मोजकी माणसे आणि गॅजेट्सचा भडीमार. त्यात घरकामाला २४ तास बाई. आई वडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर. मग मुलांनी करायचे तरी काय? त्यांना बोअर होणे स्वाभाविक आहे. मग मी ठरवले की मुलांना घरात छोटी छोटी कामे करायला शिकवायचे. रविवारी डोमेस्टिक हेल्परच्या सुट्टीचे निमित्त साधून मी मुलांना म्हणाले की आज तुम्ही मला नाश्ता बनवायला मदत करा. मला वाटले होते मुले कुरकुर करतील. पण मुले आनंदाने तयार झाली. नाश्ता बनवण्यापासून ते टेबल साफ करण्यापर्यंत सर्व कामात दोघे उत्साहाने सहभागी झाली. नंतर उत्साहाच्या भरात त्यांनी दुपारच्या स्वयंपाकात पण मदत केली. इतकेच नव्हे तर जेवणे झाल्यावर टेबलसुद्धा आवरले. आणि हे करताना मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्यामुळे आमचा सर्वांचा वेळ मजेत जात होता. अर्धा दिवस संपला होता आणि मुलांनी बोअर होण्याचे किंवा कुठल्या गॅजेटचे नावसुद्धा काढले नव्हते. मनातून कुठेतरी खूष झाले होते मी.
पुढचा रविवार आला तेव्हा मुलांनी जाहीर केले की आजचा नाश्ता आम्ही बनवणार आणि ममा ने किचनमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचे नाही... माझ्यासाठी "युरेका" क्षण होता तो. मला काम करावे लागणार नाही यापेक्षा मुले स्वत:हून घरकामाला आनंदाने तयार झाली होती आणि मला त्यांना बिना गॅजेट बिझी ठेवायचा खात्रीशीर उपाय सापडला याचा आनंद जास्त होता.
मला जाणवले की मुलांना सतत उत्तम प्रकारची करमणुकीची साधने देण्यासाठी आपण कायम धडपडत असतो. त्यासाठी महागडी खेळणी, पुस्तके गॅजेट्स यांचा त्यांच्यावर भडीमार करत असतो. त्यात गैर काही नाही पण मुले तरीसुद्धा कंटाळतात. कंटाळा आणि करमणूक यांचे एक मजेशीर नाते आहे. आपल्याला कंटाळा आला की काहीतरी करमणूक हवी असते. पण करमणुकीची साधने फार असतील तर त्याचाही कंटाळा येतो. मला वाटते करमणूक ही खरी तर जेवणानंतरच्या Dessert सारखी असली पाहिजे. शॉर्ट अँड स्वीट. आधी आपण नेहमीचे जेवणातले पदार्थ  प्रामुख्याने खातो आणि मग थोडी स्वीट डिश खातो, त्यामुळे तिचे अप्रूप वाटते. तिचे महत्व साध्या जेवणाच्या शेवटी आणि थोडे खाण्यात आहे. आता मला सांगा की आपण main course ऐवजी जर नुसते dessert खाल्ले तर थोड्याच वेळात "बोअर" व्हायला लागेल  ना? मग मुलांचेही तसेच होत असणार नाही का?
मला असे नेहमी वाटते की मुलांना घरात थोडी जबाबदारी घेण्याची इच्छा असते. छोटी कामे केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना आई वडिलांच्या कष्टांची आणि जबाबदारीची जाणीव होते. म्हणून आपण मुलांना त्यांच्या वयानुसार थोडे स्वतःचे काम, घरकाम करायला प्रोत्साहित करावे. ही कामे रोजची असल्याने रोज उठून नवीन करमणूक शोधावी लागत नाही. आणि रोजची कामे झाल्यावर उरलेल्या वेळात खेळल्यामुळे मुलांना त्या करमणुकीच्या साधनांचे थोडे अप्रूप राहते. मुलांनाही आपण घरात काहीतरी योगदान दिल्याचे समाधान मिळते. शिवाय आपण त्यांच्याबरोबर काम केले तर ते करता करता मुलांशी संवाद होतो, त्यांच्यावर स्वावलंबनाचे संस्कार करता येतात, आणि मुलांना एकमेकांशी जुळवून एकत्र काम करायचे शिक्षण घरी मिळते. कुठल्याही जॉबसाठी लागणारे effective communication, team player हे गुण मुले घरीच शिकतात. आपल्याला मुलांना जो "quality time " द्यायचा असतो ना, तो द्यायला महागड्या वस्तूंची नाही तर त्यापेक्षा अमूल्य अश्या आपल्याबरोबरच्या क्षणांची गरज असते. ते नुसती तात्पुरती करमणूकच करत नाहीत तर आयुष्यभराची आठवण बनतात.

- विनया  रायदुर्ग 



1 टिप्पणी: