परोपकाराचे समाधान

‘व्यायाम’ हा शब्द दिवसभरात अनेक वेळा मनात रेंगाळत असूनही तो प्रत्यक्ष आचरणात आणणे म्हणजे खरंच महाकठीण काम असते. नोकरी, घरकाम, मुलांचे अभ्यास अशा अष्टपैलू भूमिका निभावताना अशी त्रेधा-तिरपीट उडते कि ‘फिटनेस’ हा शब्द उच्चरायलाही वेळ मिळत नाही. चंद्रकोरीप्रमाणे हळूहळू वाढणारे शरीर जेव्हा आपल्या वाढीचा वेग वाढवते तेव्हा मात्र व्यायामाची तीव्र गरज भासू लागते. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या पोटाचा घेर पाहून, आपल्यापेक्षाही वयाने मोठी असलेली एखादी सुडौल यौवना जेव्हा गैरसमजुतीने आपल्याला बसायला जागा करून देते, तेव्हा आपण ‘फिटनेस’ ला मनावर घेतो. मनाचा निर्धार करून रविवारचा पहाटेचा अलार्म लावतो. पण अलार्मच्या कर्णकर्कश ध्वनिबरोबरच ‘ह्या एकाच दिवशी तर आपल्याला छान उशीरापर्यंत झोपायला मिळते' असे अतिशय मोलाचे विचार मनात पिंगा घालू लागतात. मग अनेक वेळा अलार्म पुढे ढकलत का होईना, एकदाचा मनावर विजय मिळतोच. तयार होऊन पार्कमधे 'वॉक' ला जाताना तिथे असलेली गर्दी पाहून उगाचच स्वतःचा अभिमानही वाटून जातो. पण लवकरच लक्षात येते की तिथे 'वॉक' करणारे बरेचसे लोक परतीच्या मार्गाला लागलेले असतात. इतक्या उशीरा 'वॉक' सुरु करणारे आपल्यासारखे महाभाग फारच थोडे असतात. तरीही मनाचा निग्रह करून 'वॉक' पूर्ण करून परतताना तर दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. मग पार्कमधले मॅकडोनाल्ड किंवा वाटेतले एखादे रेस्टॉरंट आपल्या अथक परिश्रमांवर पूर्णच पाणी फिरवते.

असो! पण आजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात व्यायामाला पर्याय नाही हे मात्र खरे! 'जीम','जॉगिंग','वॉक' हे उपक्रम जसे निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे निरोगी मन म्हटले की योगासने आणि रामदेव बाबांच्या प्राणायामला तोड नाही. आपल्या शरीराला व मनाला या उपक्रमांतून घडवणे आवश्यक झाले आहे खरे! स्वच्छता, टापटीप, नियमितता, सुरक्षितता अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सिंगापूरची अजून एक ओळख आहे, ती म्हणजे तणावपूर्ण आयुष्य! अर्थात Stressful life. Condominium, गाडी आणि प्रत्येक सुट्टीमधील फॅमिली सोबतचे विदेशी पर्यटन या तीन जीवनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यासाठी सिंगापूरवासी कामाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत असतात. स्पर्धात्मक जीवन आणि प्रसंगी जागतिक मंदीमुळे कामाचा वाढता ताण, अमानुष working hours ना तोंड देणाऱ्या या सिंगापूरवासींना 'फिटनेस' चे महत्व कळले नाही तर नवलच! कदाचित म्हणूनच अगदी मध्यरात्री सुद्धा jogging track वर धावणारे अनेक स्त्री-पुरूष आपल्याला पहायला मिळतात.

शरीर आणि मनाचा 'फिटनेस' ठेवण्यासाठी जरूरी असणाऱ्या गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे मानसिक समाधान. गमतीची गोष्ट अशी की आपले मानसिक समाधान हे आपल्यापेक्षा इतरांच्या सुखातच जास्त सामावलेले असते. कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला केलेली मदत सर्वात जास्त समाधान देऊन जाते. आजकाल अनेक यशस्वी लोक आयुष्याच्या उत्तरार्धात, आपले तन-मन-धन अर्पून समाजाची सेवा करताना दिसतात. यातूनच 'Giving back to society' हे तत्व उदयाला आले आहे. पण या त्तवाचे अवलंबन आयुष्याच्या उत्तरार्धातच करावे असे काही नाही, तर अगदी लहानपणापासून आपण स्वतःला तसे घडवू शकतो. आपण सर्वसामान्य लोकही सहज जाता-जाता अनेक गोष्टींतून हे समाधान मिळवू शकतो. अगदी जवळचेच उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त उजळलेले चेहरे दिसतात ते आपल्या volunteers चे! खरं पाहता, स्टेजवर चाललेल्या उत्कृष्ट कार्यक्रमाला ते मुकलेले असतात. पण तरीही त्यांच्या अंतरंगातले समाधान त्यांच्या चेहरेरूपी आरशावर प्रतिबिंबित झालेले दिसते. अशा अनेक कार्यक्रमांतून किंवा अगदी आपल्या दैनंदिन व्यवहारामधील लहान-मोठ्या प्रसंगातून आपण हा आनंद नक्कीच कमावू शकतो. तंदुरूस्त शरीर व तंदुरूस्त मन हेच माणसाचे सगळ्यात मोठे ऐश्वर्य म्हणता येईल.

-सौ. सोनाली पाटील




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा