२६ मैल - एक प्रवास

आपल्याला काय जमू शकतं हे अनेकांना आयुष्यभर कळतच नाही. मलाही चार वर्षांपूर्वी माहीत नव्हतं. माझा दुसरा मुलगा एक वर्षाचा झाल्यावर मी फिटनेसकडे पुन्हा लक्ष द्यायचं ठरवलं पण मला 'जिम'ला जायचं नव्हतं. म्हणून चालू लागले. हळू हळू काँडोभोवती धावायला सुरूवात केली. सिंगापुरमध्ये रात्री अपरात्रीही धोका वाटत नाही. लोकं कुठल्याही वेळी धावताना दिसतात. माझं धावणं सुरू होण्यामागचं हे मोठ्ठं कारण आहे.

काही दिवसात लक्षात आले की चार-पाच कि.मी मी सहज धावू शकते. म्हणून ७ सप्टेंबर २०१३ रोजी पाच कि.मी. ची 'फन रन' केली.

गोडी वाढत गेली आणि काही महिन्यात मी १० कि. मी. ची रन पूर्ण केली. सराव नियमित करत राहिले. धावणं ह्या विषयावर अभ्यासपूर्ण वाचन सुरू केले. मग वेध लागले २१ कि.मी चे! वेडी आहेस का? माझा नवरा म्हणाला. घरची कामं न संपणारी (केर-कचरा, पोळी-भाजी...) आणि हाताशी हेल्पर नाही. प्रशिक्षक वगैरे लावायची सोय नाही. आधार होता तो केवळ माझ्या मुलांचा व नवऱ्याचा.

म्हणूनच अभ्यास खूप केला. प्रोटीन व कार्ब्सचा समतोल साधता येईल असा आहार पाळायचा प्रयत्न केला. सरावासाठी आठवड्यातून एकदातरी १० कि.मि. पळावे लागत. कंबर-पाय दोन दोन दिवस दुखत. २१ कि. मी. जमणं जरा कठीणच वाटत होतं. खरोखरच, ५-१० पेक्षा हे काही वेगळच रसायन होतं. पण स्वत:शी जणू 'कमिटमेन्ट' केली होती. अखेर, २८ सप्टेंबर २०१४ रोजी मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन २ तास २० मिनिटात पूर्ण केली.

आता आपल्याला ४२ कि.मी. किंवा २६.२ मैलांची फुल मॅरेथॉन जमेल का, असे विचार येऊ लागले. काहीसा घाबरतच सराव सुरू केला. याच दरम्यान आम्ही लग्नाचा १०-वा वाढदिवस लंडनला जाऊन साजरा करायचे ठरवले. म्हटलं आपलं मॅरेथॉनचं स्वप्न लंडनलाच साकार करू. जगातल्या ६ मुख्य मानल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमधे लंडन मॅरेथॉनचं नाव घेतलं जातं. पण प्रवेश जणू लॉटरीच. लाखो अर्जात आपल्या अर्जाचा नंबर लागायची शक्यता अगदी नगण्य. पण माझा लागला! जणू एक दैवी संकेत!

३-४ महिने अथक सराव केला. आठवड्यातले ३ दिवस ५-७ कि.मी. व एकदा १० कि.मी. असे धावणे. ते १० कि.मी. चे अंतर हळू हळू वाढवावे लागते. मूळ मॅरेथॉनच्या तीन आठवडे आधी ३०-३५ कि.मी.ची मजल गाठून मग धावणे कमी करायचे असते.

२४ एप्रिल २०१६. पहाटे ६ वाजता, ५ डिग्रीच्या थंडीत हॉटेल सोडताना मनात शंका व भित्यांची गर्दी. आपण काही बावळटपणा तर करत नाही आहोत ना? परक्या देशात डॉक्टर / हॉस्पिटलची गरज लागली तर... पण जशी रेल्वे स्टेशनला पोहोचले तशी तिकडची ही गर्दी बघून सगळ्या भित्या विसरले. सगळी धावणाऱ्यांची गर्दी! रेल्वेत अक्षरश: घोषणा होत होत्या की जे मॅरेथॉन धावत नाहीत त्यांनी ट्रेनमधे गर्दी करू नये. धावपटूंना प्राधान्य द्यावं! आणि तिथल्या काही रहिवाशांशी बोलल्यावर लक्षात आलं की सर्व नागरीकांना लंडन मॅरेथॉनची वेळ माहीत असते आणि गरज नसल्यास कोणीही ट्रेन-बसने प्रवास करत नाही.

जनसामान्यात त्या मॅरेथॉनबद्दल विलक्षण अभिमान जाणवला. इमिग्रेशन पासून ते टॅक्सीचालकापर्यंत ज्यांना कळत होतं की मी मॅरेथॉन धावणार आहे, ते सगळेच माझं अभिनंदन करत होते. एका बससचालकाने तर आमच्याकडून तिकिटाचे पैसेही घेतले नाही: "माय बेस्ट विशेज टू यू", म्हणाला.

या मॅरेथॉनमधे ५/१०/२१ कि.मी. हे गटच नसतात. म्हणजे जे कोणी धावणार आहेत ते ४२ कि.मी.च! आणि तरीही तब्बल ४०,००० ची गर्दी लोटली होती! बहुतेक मॅरेथॉन्सला जर तुम्ही तासभर आधी पोहोचलात तर तुम्हाला स्टार्ट लाइन दिसते. पण इथे अडीच तास आधी पोहोचलो तरी स्टार्टलाइनपासून मैलभर लांब होतो!

पण काय सुंदर आयोजन. अहाहा! बॅगा ठेवण्यापासून शौचालयांपर्यंत (हसण्यासारखं काही नाही. धावणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची असतात), आणि हायड्रेशन पासून ते फर्स्ट एड स्टेशनपर्यंत सगळं काही व्यवस्थित. धावपटूंचं सामान ट्रक्समधे ठेवलं जातं. त्यासाठीही रांगा लावाव्या लागत नाहीत! रेस सुरू झाली की हे ट्रक्स निर्धारित मार्गांवरून फिनिषलाइनजवळ पोहोचतात.

रेस पूर्ण केल्यावर अर्धमेल्या धावपटूंना आपल्या सामानासाठी कुठेही रांगा लावाव्या लागत नाहीत. स्वयंसेवक बारीक लक्ष ठेवतात. फिनिषलाइनला पोहोचणाऱ्या धावपटूंचा बिब नंबर टिपून त्यांचं सामान ट्रकमधून आधीच काढून हातात तयार ठेवतात. ह्यामुळे धावणाऱ्यांना थांबावेही लागत नाही! लंडन ही बहुदा एकच अशी मॅरेथॉन असेल की ज्याच्या सबंद २६ मैलांवर प्रेक्षक असतात. टाळ्या व ढोल पिटत, भोंगे वाजवत, गाणी म्हणत धावणाऱ्यांचा उत्साह वाढवत असतात. एवढेच नाही तर धावणाऱ्यांना केळी, पाणी, सरबत ईत्यादीही पुरवतात. सारा माहोल एकदम जत्रेसारखा. अविस्मरणीय!

ह्या अनुभवातून मिळालेला आनंद मी व्यक्त करू शकत नाही. मात्र, विशेष थँक्स वेळी-अवेळी रुन्ससाठी येणाऱ्या माझ्या मुलांना व माझ्या नवऱ्याला.
कळकळीने सांगावसं वाटतं की प्रत्येकाने एक छंद जोपासावा. ह्याने मन प्रसन्न राहते व रोजच्या कामांसाठी जोर येतो. शारीरिक व्यायामाचं केला पाहिजे असा नाही. पण हो, व्यायामाने शरीर व मन दोन्हीला उभारी येते. आपला मूड चांगला होतो, तब्येत ठणठणीत राहते. स्वतःशी संवाद साधता येतो.

गेली चार वर्ष केलेल्या अनेक रन्स, त्यामुळे भेटलेली वेगवेगळी माणसं मनात एक कृतज्ञता निर्माण करून गेली. आपल्याला हे जे काही मिळालं आहे, मिळतय हे इतरांबरोबर वाटायला हवं; हे कोणाच्या तरी कामी यावं.

ती संधी मिळाली ह्यावर्षीच्या 'रन सो अदर्स कॅन' ह्या उपक्रमात. सिंगापूरमधील रनिंगआवर नावाची संस्था विकलांग, तसेच ऑटिस्टिक लोकांना सुदृढ धावणाऱ्यांच्या मदतीने 'फन रन' करायची संधी देते. मदतीचे धावणारे म्हणून नाव नोंदवणाऱ्यांसाठी रनिंगआवर एक कार्यशाळा भरवते. ह्यात भाग घ्यायची सक्ती नसते पण एका अंध किंवा ऑटिस्टिक व्यक्तीस धावायला मदत करायची असेल तर तुम्हाला त्यांची परीस्थिती व गरजा समजून घ्यायला हव्या.

कार्यशाळेच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून केवळ १० मिनिटे डोळ्यावर पट्टी बांधून मॉलमधे वावरायचा प्रयत्न करायचा होता. त्या थोड्या वेळात कळलं की डोळ्यांना दिसणं ही एक केवढी मोठी देणगी आहे! ऑटिस्टिक लोकांना धावायची खूप इच्छा असते पण त्यांचा स्वत:वर ताबा नसतो. पाच कि.मी. धावायचं असेल तरी सुरूवातीलाच जी धूम ठोकतात की ३००-४०० मीटरमधेच त्यांना श्वास लागतो. बरं, त्यांना ओरडलेलं आवडत नाही. त्यांच्या कलेने घेत, त्यांना समजवावं लागतं की आपल्याला बरच अंतर कापायचं आहे आणि म्हणून आधीच जोरात धावून चालणार नाही.

काहीही असलं तरीही या शारीरिक मानसिक उणिवांनी ग्रासलेल्यांमधे उत्साहाची उणीव अजिबात नव्हती. 'डिफ्रेंटली एबल्ड' लोकांत जगण्याची जिद्द बघून आपल्यालाच हुरूप येतो. मग प्रश्नही पडतो की खरे फिट आपण की  हे लोक?

                                                                                                                                  - प्रगती पाटणकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा