झरोका

जीवन में एक बार आना सिंगापूर…. म्हणून सिंगापूरबद्दल ऐकून होतो. चित्रपटातून सिंगापूरचा झगमगाट पाहिला होता. पण मुलगीच सिंगापूरला असल्यामुळे एक बार काय, अनेकबार सिंगापूर घडले. १९९२ साली प्रथम सिंगापूरला आलो. हे सिटी स्टेट असूनही कमालीचे शांत वाटले. सर्व काही शांतपणे शिस्तीत चाललेले. इंडियात यावेळी मुंबईच्या ९२ च्या आतंकवादी हल्ल्याची उखरवाखर होती. सामान्य लोकांच्या मनांत भय दाटून होते. रेल्वेस्टेशन बसस्टॉप वगैरे ठिकाणी नेहमीच्या गर्दी गदारोळात माणूस जीव मुठीत धरुन धावत होता. या पार्श्वभूमीवर चांगी एअरपोर्ट आमच्या स्वागताला आले. जगातले पहिल्या प्रतीचे एअरपोर्ट. सर्व प्रकारच्या सुविधा, सौंदर्य आणि तांत्रिक सुलभतेसह चांगी आमच्याकरता जणू उभे होते. चायनीज लोकांची कल्पकता! तिने एअरपोर्टवरही आत झाडं लावून वरुन सूर्यप्रकाश सोडलेला. या टोकापासून त्या टोकाला येण्याकरता स्काय ट्रेन. ऐन गर्दीत पण एक दुर्मिळ सुंदर शांतता.

एअरपोर्टवरुन बाहेर पडल्यावर सिंगापूर नजरेत भरायला लागले. जे विमान खाली उतरताना समुद्राच्या किनाऱ्याशी ‘गवरणी’ मांडावी तसे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकत होते तें आता आपल्या विस्ताराने एकेक दल उमलावे तसे जाणवायला लागले. दुतर्फा झाडं, एकात एक आपला तोल सांभाळत गेलेले फ्लायओव्हर्स, बाजूच्या गगनचुंबी इमारतीचं वेगळं शिल्पं, त्या शिल्पाचं दुरुन एका भिंतीसारखं भासणं, पण त्याच रंगीबेरंगी भिंतीचं हळूहळू आपला आकार घेत जवळ येणं, सारं लहान मुलांच्या नजरेनंच पहाणं झालं.

प्रथम आले ते ‘आंग मो किओ’ ला. घरासमोर पार्क, एम आर टी स्टेशन, कमालीची स्वच्छता, साध्या पार्कसारख्या पार्कमध्येही सौंदर्यदृष्टी जपलेली, हळूहळू सिंगापूरला बघण्यासारखे होते ते सारेच पाहून झाले. बर्ड पार्क, सेंटोसा, कुसू आयलँड, केबल कार, फेरी बोट, क्लार्की, असं सारंच. सिंगापूरने टुरिस्ट लोकांना महत्व देऊनच सर्व सुखसोयी सिद्ध केल्या. बस स्टॉप, एम आर टी किंवा रस्त्यावरच्या स्पष्ट निर्देश खुणांनी नवा माणूसही स्वत:च स्वत: सिंगापूर फिरु शकेल. आजकाल हॉटेल मँनेजमेंटमध्ये टुरिझमवर विशेष भर दिला जातो. प्रकर्षाने सिंगापूर ही टुरिझमची जननीच म्हणायची.

नंतर वारंवार सिंगापूरला येणे होतं राहिले. मग त्याचं तेवढं अप्रूप राहिलं नाही. तरी प्रत्येक वेळी सिंगापूर नव्याने समजत राहिलंच. मुलीचं राहणंही बिशान, यीशून, लेक व्हूव इस्टेट अशा विविध ठिकाणी होत गेलं. मॅकरिची, अप्पर लोअर सेलेटार मध्ये पडलेलं आजूबाजूच्या हिरवाईचं प्रतिबिंब, झाडांना पाणी घालावं तसा येणारा आणि थंडावा निर्माण करणारा पाऊस, यासह मरिना बे सँड्स, सिंगापूर फ्लायर, डूरियन या फळाच्या डिझाईनचं एस्प्लनेड थिएटर, सायन्स सेंटर, ओमनी मॅक्स थिएटर असेही अद्ययावत कंस्ट्रक्शन, हॉस्पिटल्स, त्याचे आर्किटेक्चर नजरेत भरत राहिले. प्रत्येक वेळी या सिटीने तंत्रज्ञान सुधारणा यांत नवनवीन मॉडेल समोर ठेवून ‘मिनी अमेरिका’ हे आपलं बिरुद सार्थ केलं. खरं तर अमेरिकेपेक्षाही सिंगापूर सरस वाटलं. ते इंडियाच्या जवळ म्हणून आणि इंडियन कल्चरसारखं फॅमिलीलाईफ इथेही स्थानिक चायनीज लोकात आढळलं म्हणून. घरातल्या वृद्धांची काळजी घेणं, नातेसंबंध दृढ करुन ते टिकवणं हे इथेही जाणवलं म्हणून. आणि इथे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी स्वत:च्या कला, कल्चर जोपासून, इथेही स्वत:चा इंडिया निर्माण केला म्हणून.

हा इंडिया फक्त महाराष्ट्र मंडळापुरताच सीमित नव्हता तर त्या बाहेरही होता. केवळ इंडियात वाढलो, जन्मलो , म्हणून इंडियन नाही, तर वृत्तीनेही भारतीय या धाग्यानेच सर्वांना त्यांच्या भिन्न भिन्न आवडीसह व पॅशनसह एकत्र जोडले होते. सिंगापूरचा मंथन ग्रुप हा  ह्याचं एक उदाहरण.

अनेकदा येऊन झाल्यावर साईट सीन्समध्ये फार मन रमलं नाही. फिरायला जाण्याच्या वाटेवरचे तेच ते कोपरे व तीच ती झाडं. ग्रासकटींगच्या मोनोटोनस आवाजासारखी वाटली . मग वाटलं सिंगापूरचा स्थानिक माणूस कळून घेतला पाहिजे. त्यांची चायनीज भाषा, त्यातले लिटरेचर, त्यांचे थिएटर, पिक्चर्स, त्यांची व्यायाम प्रियता, ते बिझनेस करण्याच्या वृत्तीचे आहेत की त्यांना जॉब करायला आवडतो? त्यांना घरी स्वयंपाक करायला फारसे आवडत नाही का? इथले हॉकर सेंट्रर्स का सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजलेले असतात? चायनीज माणसाची कमालीची राष्ट्रीय वृत्ती कुठून येते? त्या राष्ट्रीय वृत्तीमुळेच स्वातंत्र्य मिळून केवळ अर्धशतकाच्यावरंच झालेलं छोटसं सिंगापूर जगातला एक प्रगत देश म्हणून समजलं जातं का? इथली बस सर्व्हिस, एम आर टी चे जाळे, खाजगी टॅक्सीमुळे सुलभ झालेले जाणे-येणे पाहिले की वाटते अमेरिकेतही लोकल ट्रान्सपोर्टची अशी सुविधा असायला हवी होती. सिंगापूरबद्दल हे सगळे कळून घेतां आले तर सिंगापूर कळेल. नाहीतर ते वर वर झरोक्यातून पाहणेच होईल. भारतात कलकत्ता, बनारस, मद्रास, कानपूर अशा सर्व मोठ्या शहरांचे ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग असतात, तसे इथे आहेत काय? बनारसच्या गल्लीबोळातून गेल्याशिवाय, गंगेचे घाट तुडवल्याशिवाय बनारस नाही न कळणार ! तशी सिंगापूरची मातीच कळायला हवी. इथला माणूस कळायला हवा. त्याच्या भाषेसह. ग्रांथिक भाषाच केवळ नाही तर बोलीभाषेसह कळायला हवा. संत एकनाथांचे ‘वारियाने कुंडल हाले’ हा अभंग महाराष्ट्रात नदीवर कपडे धुणाऱ्या अशिक्षित स्रीलाही पाठ असतो. कविवर्य ना. घ. देशपांडेंचे ‘वाजते तिच्या भरल्या घाघरीतले पाणी’ ही पहाटेच्या वेळेची नदीकाठची चाहूल मेहकरच्या लोकांनी अनुभवली आहे, तसा चायनीज माणूस कळायला हवा मग सिंगापूर कळत जाईल.

दोन गोष्टींचा उल्लेख केला नाही तर सिंगापूर पूर्ण होणार नाही. एक सिंगापूरचा ‘मुस्तफा’. बायकांच्या पर्समध्ये जसे सारे ब्रम्हांड सापडते तसा हा मुस्तफा ! सिंगापूरला आलात आणि मुस्तफा नाहीच पाहिला तर बनारसला जाऊन काशीविश्वेश्वराचं दर्शनचं न घेतल्यासारखं आहे आणि दुसरं म्हणजे इथल्या मराठी कवींनी दिलेला शब्दगंध. कवितेची इतकी खोलवर मुळं रुजलेला हा शब्दगंध. मुंबई-पुण्याकडेही हे कमळ असं उमलंलेलं नाही. सिंगापूरला अनेक वर्षे राहून या लोकांनी आपलं असं एक रोप इथे लावलं. त्याचा आता वृक्ष झाला तो मात्र या झरोक्याच्या पल्याडच गेला.

तर असा हा झरोका. झरोक्यातून सारेच थोडी दिसते !

                                                                                                                                          -आशा बगे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा