क्रूझ अलास्काची

ह्या वर्षी मी आणि राजीव आमच्या नातवाला “ईवान” ला बघायला Houston ला गेलो होतो. ईवान, सारंग, सुविग्याच्या सान्निध्यात दिवस भुर्र्कन उडून गेले. त्यानंतर आम्ही अलास्काच्या क्रूझला गेलो. ह्या क्रूझबद्दल खूप ऐकलं आणि वाचलं होतं. त्यामुळे अर्थातच खूप उत्सुकता होती. आम्ही प्रिन्सेस क्राऊनची “Inside Passage” क्रूझ बुक केली होती. ती Seattle to Seattle आहे. पहाटेची Houston – Seattle flight घेऊन Seattle ला पोचलो. Land होण्यापूर्वी खिडकीतून बर्फाच्छादित Mount Rainier चे फोटो घेतले. Airport वर प्रिन्सेसचा काउंटर होता. त्यांनी अतिशय तत्परतेनी आमच्या मोठ्या बॅग्स ठेवून घेतल्या. त्या आम्हाला थेट क्रूझच्या रूमवर मिळतील असं सांगितलं. आम्ही एकूण २६०० प्रवासी होतो. सगळ्यांना बसेसनी पायरवर पोचवण्यात आलं. तिथे कस्टम्स, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार झाल्यावर क्रूझ कार्ड मिळालं. 

आता आम्ही आमच्या अतिशय सुंदर आणि अवाढव्य क्रूझच्या समोर उभे होतो. सगळे जण फोटो काढण्यात दंग होते. इतके लोक असून कुठेही गडबड, गोंधळ नाही. सगळं शिस्तबद्ध आणि सुंदर. आमची क्रुझमधे एन्ट्री झाली. आम्ही रूम वर येऊन फ्रेश होतो तर आमच्या मोठ्या bags आलेल्या होत्या. दुपारी ४ वाजता शिपनी Seattle चा किनारा कधी सोडला कळलं नाही. मग announcement झाली, कि तुमचा lunch buffet १५ व्या मजल्यावर Horizon Court वर लागलेला आहे. सगळ्यांनी येऊन जेवणाचा आनंद घ्यावा. हे रेस्टॉरंट जवळ जवळ २४ तास उघडं असतं. जेवणाचा स्प्रेड पाहूनच मजा आली. salads, fruits, soups, स्वीट्स, भाज्या, अनेक प्रकारचे jams, breads, नॉनव्हेज डिशेस ह्याची लयलूट होती. मासे खाणारे तर फारच खुश. ही क्रूझ म्हणजे १९ मजली सप्ततारांकित हॉटेल आहे, पाण्यावर तरंगणारं. लंच नंतर, डेक वर एक मस्त पार्टी होती. खूप dance, music सुरु होतं. लोकं एकमेकांशी ओळख करून घेत होते, फोटो काढत होते. Seattle शहर दिसेनासं झालं. पुढचा दीड दिवस आम्हाला शिप वर काढायचा होता. आमच्या पण खूप नवीन ओळखी झालया. डेक वर मस्त चक्कर मारली, हवा एकदम फ्रेश व ताजी होती. मग ठरवलं पूर्ण शिप बघून येऊया. १४ व १५ व्या मजल्यावर ओपन डेक्स आहेत. सर्व बाजुंनी शेकडो डेक चेअर्स मांडल्या आहेत. स्विमिंगपूल आणि झकुझी आहेत. स्वीमींग पूल वर एक मोठ्ठा Screen आहे. तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे Movies Under the Stars, रोज रात्री गरम कपड्यांचे थर चढवून डेक चेअर्स वर बसून थंडगार हवा खात सिनेमा पाहण्याची वेगळीच मजा आहे. ओपन डेकवर पिझ्झा, बर्गर, ice cream चं रेस्टॉरंट आहे, जिम, योगा आहे तर वरच्या मजल्यावर बास्केटबॉल कोर्ट आणि गोल्फ कोर्ट आहे, त्याभोवती Joggers track आहे. ७ व्या मजलयावर संपूर्ण शिपला प्रदक्षिणा घालता येते, असा promenade walk बनवला आहे. शिपच्या पुढच्या व मागच्या भागात उभं राहिलं कि, थंडगार वारा, चारी बाजूला पसरलेला अथांग समुद्र, कधी बर्फाचे डोंगर, मधूनच एखादं छोटंसं गाव, हिरवीगार झाडं हे पाहताना वेळेचं भानच रहात नाही, स्वतःशी संवाद साधता येतो आणि निसर्गा पुढे मनुष्य किती क्षुल्लक आहे, ह्याचा सतत प्रत्यय येतो. 

त्यानंतर पुन्हा शिपच्या बाकी मजलयांवर चक्कर मारली. अनेक Restaurants, दुकानं, Dance Floor, Art Gallery, डिस्को, इंटरनेट कॅफे, Beauty Parlour, Photography Gallery पाहताना आपण एका शिपच्या आत आहोत, हेच विसरायला होतं. Computer, योगा, कुकरी क्लासेस, Magic show, Casino, Comedy show अनेक प्रकार उपलब्ध आहेत. दुसऱ्या दिवशी शिपवर असणाऱ्या कार्यक्रमाचं पूर्ण वेळापत्रक Princess Patter, “Your daily guide to life at sea”. या नावानी आदल्या दिवशी रूम वर येतं. दुसऱ्या दिवशी “मायकेल द Naturalist” चं व्याख्यान प्रिन्सेस थियेटर मधे ऐकलं. हा माणूस अलास्काच्या एका निर्जन बेटावर राहतो. त्याचे अनुभव ऐकणं आणि slides पाहणं म्हणजे एक अवर्णनीय अनुभव होता. अलास्काचा निसर्ग, तिथले आदिवासी, wild life हे त्यानी इतकं रंगवून सांगितलं कि, सगळ्यांनाच अलास्का पाहण्याची घाई झाली. कार्यक्रमा नंतर भेटून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याची २ पुस्तकं विकत घेतली. 

रूमच्या TV वर दुसऱ्या दिवशी जुनो गावात पोचणार होतो, तिथली पूर्ण माहिती पाहीली. आज संध्याकाळचं आकर्षण म्हणजे “Formal Dinner”. शिपच्या कॅप्टननी Atrium मधे येऊन आपल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. त्या दिवशी सगळे जण formal वेअर, ज्वेलरी आणि मेकअप सकट लग्नाला जाण्यासारखे तयार होतात. मी आणि माझा नवरा राजीव पण छान तयार झालो. मग फोटो काढण्यात, नवीन लोकांना भेटण्यात, गप्पा मारण्यात दिवस कुठे संपला कळलंच नाही. Atrium चे व एकूण शिपचे interiors पहाताना कित्येक वेळा Titanic सिनेमाची आठवण येते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जुनो गावात पोचलो. जुनो अलास्काची राजधानी आहे. १८८० मधे इथल्या tilgit जमातीच्या चीफनी जोसेफ जुनो आणि रिचर्ड haris ह्या दोघा अमेरिकन तरुणांना अशा जागी नेलं, जिथे नदीच्या पात्रात सोन्याची रेती होती. ही gold rush ची सुरवात होती. मग ह्या आदिवासी खेड्याचं शहरात रूपांतर झालं, सुधारणा झाल्या व त्याचं नाव जुनो ठेवण्यात आलं. आम्ही सर्व जागी प्रिन्सेसची टूर बुक केली होती. आधी whale watching ला गेलो. समुद्रात दूरवर पाण्याचा फवारा उडला, कि व्हेलला शोधायचं. काही व्हेल्स दिसल्या. डेकवर थंडगार वारा आणि गरम कॉफी खूप एन्जॉय केली. काठावर sea lions पण दिसले. तिथून मेंडेनहॉल ग्लेशिअर वर गेलो. ग्लोबल वॉर्मिंग मुळे ही मागे सरकती आहे. जवळ नगेट्सक्रीक नावाचा सुंदर धबधबा आहे. तिथे डोंगरावर museum आहे. मग जुनो शहरात फिरलो. शिप समोरच लागली होती.  

दुसऱ्या दिवशी शिप Skagway ला पोचणार होती. त्याची माहिती रुमच्या tv वर पाहीली. इथली लोकसंख्या फक्त ९०० आहे. सकाळी उठून शिपच्या बाहेर पडलो, तर वाऱ्यानी उडून जाऊ, असं वाटलं. ही अतिशय windy city आहे. आम्ही White Pass युकॉन Railway चं booking केलं होतं. जे इथलं मुख्य आकर्षण आहे. सन १८९६ मधे विलियम मूरनी अमेरिका आणि कॅनडा च्या बॉर्डर वर युकॉन नदीचं उगमस्थान शोधून काढलं. ३००० फुटावरच्या खिंडीला सर Thomas White चं नाव दिलं. म्हणून ह्याला White पास म्हणतात. १८९७ मधे क्लोंडाईक पर्वतात सोनं सापडल्याच्या बातम्या पेपरला आल्या आणि सोन्याच्या लोभानी अनेक लोकं अलास्कामधे आले. काहींनी तीव्र चढणीचा चीलकुट पास निवडला, तर काहींनी लांबचा पण थोडा कमी चढणीचा White पास निवडला. Skagway सारख्या छोट्याश्या गावात एका वेळी ३० हजार लोकं आले. १८९८ मधे White Pass – युकॉन रेल्वे लाईन टाकण्यात आली. हा सिविल इंजिनीअरिंगचा एक चमत्कार मानला जातो. Whitepass ची सगळी history ऐकत आपण top ला पोचतो, तिथे बर्फ वितळून हिरव्या, निळ्या रंगाचा बेनेट जलाशय तयार झालाय. त्यातून युकॉन नदी उगम पावते व कॅनडा कडे वाहत जाते, आणि Skagway नावाची नदी खाली Skagway गावाकडे वाहत जाते. खाली येऊन Skagway शहरात चक्कर मारली. अलास्काच्या खाणींमधलं सोनं संपून कितीक वर्ष उलटली पण ह्या सगळ्या गावांमधे ज्वेलरीची खूप दुकानं आहेत. अलास्कामधे tourism हा मुख्य व्यवसाय आहे. शिपवर परतलो, आणि “अलास्कामाधले प्राणी, पक्षी” हे मायकेलचं भाषण आणि slides पाहण्यात रंगून गेलो. तपकिरी अस्वलं, किलर व्हेल, बाल्ड ईगल ह्या विषयी त्यानी अतिशय सुंदर माहिती सांगितली. मायकेल हा प्रिन्सेसचा “Star Performer” आहे. त्याच्या सगळ्या व्याख्यानांना खूप गर्दी असते. आम्ही त्याची सगळी lectures attend केली. तो म्हणजे अलास्काचा चालता, बोलता Encyclopedia आहे. 

सगळे ज्या दिवसाची आतुरतेनी वाट पहात होते, तो दिवस येऊन ठेपला. दुसऱ्या दिवशी शिपवरून Glacier Bay Park दाखवणार होते. पहाटे लवकर उठून जवळ असलेले सर्व गरम कपडे चढवून डेक वर गेलो. Glacier Bay पार्क चे rangers आमच्या शिप वर सर्व माहिती देण्याकरता आले होते. बाहेर खूप गार होतं, पण हवा अतिशय ताजी होती. थोड्यावेळानी समुद्रात पांढरे पुंजके तरंगताना दिसले, ते बर्फ होतं. आमची शिप Margerie Glacier कडे चालली होती. जेव्हा संपूर्ण glacier समोर आलं, तेव्हा डोळ्याचं पारणं फिटलं. glacier म्हणजे बर्फाची नदी. शिप glacier च्या अगदी जवळ गेली. हजारो लोकांनी डेकवर गर्दी केली. शिप इथे आरामात एक दीड तास थांबणार होती. म्हणून glacier ची माहिती घ्यायला, फोटो काढायला भरपूर वेळ मिळाला. तेवढ्यात Glacier Calving हा रोमांचक प्रकार बघायला मिळाला. म्हणजे glacier मधील एक बर्फाचा मोठ्ठा कडा कोसळून खालच्या पाण्यात पडतो. त्यानी दूरपर्यंत लाटा येतात. आम्हाला २,३ वेळा हा अनुभव घेता आला. त्याचे video व फोटो घेतले. डेकवर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. जोडीला गरम कॉफी व snacks होतेच. इथे निसर्ग इतका भव्य आणि सुंदर आहे कि तो न्याहाळायला दोन डोळे कमी पडतात आणि त्याचं वर्णन करायला शब्द कमी पडतात. तिथून एक सुंदर बेट पहात शिप दुसऱ्या glacier कडे निघाली. आम्ही इतके lucky होतो कि तिथे पण glacier calving बघायला मिळालं.




शिपवर नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आम्ही खूप एन्जॉय केलं. नाश्ता करताना, जेवताना, डेकवर सतत लोकं भेटायची. आमच्या वयाच्या काही अमेरिकन couples शी खूप गप्पा झाल्या. एकांची मुलंही आमच्या मुलांच्या वयाची होती. पण त्यांची दोघं मुलं लग्न करत नाहीयेत, ह्याची त्यांना खंत वाटत होती. नातवंडांची हौस आहे, but can't हेल्प असं ते म्हणाले. एक बरेच वयस्कर अमेरिकन नवरा, बायको क्रूझ वर होते. एक दिवस नवऱ्याची तब्येत बरी नव्हती, व त्यांचे दिवसभर फिरण्याचे बुकिंग होते. नाश्ता करताना ते आमच्या बरोबर होते. बाईंनी एकटी फिरायला जाते, असं ठरवलं, दोघांना एकमेकाची काळजी वाटत होती. बाई नवऱ्याला म्हणाल्या, Honey, I will be back soon, but you take care. आम्हाला पण त्या दोघांची काळजी वाटली. शिपवर अमेरिकेत राहणारे भारतीय भेटले, सिंगापूर चे चायनीज भेटले. 

जगात कुठेही जा, माणूस व त्याच्या भावना सारख्याच असतात, असं वाटतं. प्रत्येक गावी शिप थांबते, तेव्हा कधी पोचणार व तिथून कधी निघणार हे आधीच सांगण्यात येतं. त्या प्रमाणे आपला फिरण्याचा कार्यक्रम आखायचा. आम्ही सगळीकडे प्रिन्सेस क्रूझचेच Excursions घेतले होते, पण तुम्ही स्वतंत्र पण फिरू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही “Salmon capital of the World” असलेल्या केचीकन नावाच्या अतिशय सुंदर गावी पोचलो. इथे २०% लोकं इथल्या original आदिवासी tlingit जमातीची आहेत. त्यांना इंग्लिश शिकवून, mainstream मधे आणलं आहे. आम्ही सगळे एका बस मधून आदिवासी गावात (Saxman Native Village) गेलो, तिथे आधी एक फिल्म दाखवण्यात आली. मग सर्व आदिवासी त्यांच्या traditional कपड्यात आले व dance केला. आम्ही काही जणांनी पण त्यात भाग घेतला, त्यांच्या भाषेचे थोडे शब्द शिकलो. तिथले totem pole म्हणजे कोरीव काम केलेले उंच लाकडी खांब म्हणजे कलाकारीचा अप्रतिम नमुना आहे. आता ह्याला भरपूर मागणी असून ते खूप महाग किमतीत विकले जातात. आम्ही त्या कारागिरांना भेटलो, त्यांनी बरीच माहिती सांगितली. केचीकन खूप आवडलं, पण वेळ कमी होता, मग शिपवर परतलो. दुसऱ्या दिवशी शिप कॅनडा मधल्या विक्टोरिया ह्या सुंदर गावात गेली. सुंदर फुलांचं हे शहर taxi नी पूर्ण फिरलो. आजची शिपवरची शेवटची संध्याकाळ होती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शिप Seattle ला पोचणार होती व क्रूझ संपणार होती. संध्याकाळी डेकवर मनसोक्त फिरलो. क्रूझचा स्टाफ अतिशय नम्र व friendly आहे. त्यात मराठी लोकं पण खूप आहेत. 

प्रिन्सेस क्रूझचं ब्रीदवाक्य आहे, “Come back New.” खऱ्या अर्थानी आम्ही ताजेतवाने होऊन आणि खूप सुंदर आठवणी घेऊन Seattle च्या किनाऱ्यावर उतरलो.


- मेघना असेरकर


४ टिप्पण्या: