आधुनिक सिंदबादच्या सफरी - अभिलाष टोमी, एक मुलाखत

१ नोव्हेंबर २०१२ रोजी कमांडर अभिलाष टोमी हे गेटवे ऑफ इंडियाहून आपल्या सागर परिक्रमेवर निघाले. ही परिक्रमा ते आय.एन.एस.म्हादेई ह्या नौकेतून एकटे व कुठेही न थांबता (solo and non-stop) पूर्ण करणार होते. तब्बल १५१ दिवसांच्या खडतर प्रवासात त्यांनी २३,१०० नाॅटिकल माइल्स (जवळपास ४०,००० किमी) इतकं अंतर पार केलं. चक्रीवादळं, १०-मीटर उंच लाटा व अति-थंडीच्या अनेक दिवसांना तोंड दिलं. ह्याशिवाय तांत्रिक बिघाड होतेच: शेवटच्या १५ दिवसात पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बंद पडल्याने त्यांच्याकडे फक्त १५ लिटर पिण्याच्या पाणी उरलं होतं. अशा असंख्य आव्हानांना तोंड देत ते ३१ मार्च २०१३ रोजी मुंबईत परतले. हा विक्रम करणारे ते पहिले भारतीय, दुसरे आशियाई व जगातले ७९ वे व्यक्ती ठरले!

(आजवर जगातील ६००० लोकं माउंट एव्हरेस्ट चढले आहेत; तुलनेत फक्त ७९ लोकांनी ही एकाकी व नाॅन-स्टाॅप सागर परिक्रमा केली आहे!!)

ह्या आगळ्या विक्रमासाठी त्यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले व तेनसिंग नाॅरगे हा पुरस्कारही देण्यात आला. “मी कुठलाही विक्रम करायच्या हेतूने ही सफर केली नाही. मला फक्त एक निराळा अनुभव घ्यायचा होता”, असं अभिलाष म्हणतात. ऋतुगंधसाठी केशव पाटणकर यांनी अभिलाष यांच्याशी मारलेल्या गप्पा:

प्र: सर्वप्रथम तुमचं मन:पूर्वक अभिनंदन व येत्या शर्यतीसाठी शुभेच्छा! तुमच्या बोटींबद्दल माहिती द्याल का, म्हणजे ‘म्हादेई’ व येत्या गोल्डन ग्लोब रेस साठीची नौका यांबद्दल?

उ: म्हादेई ही ५६-फुटी अत्याधुनिक याॅट आहे. ती सॅटेलाइट फोन, जीपीएस, इलेक्ट्राॅनिक नकाशे, पाणी शुद्धीकरण व जनरेटर इ. यंत्रणांनी सज्ज आहे. माझे गुरू, कॅप्टन धोंडे, यांनी २००९ मधे ह्याच जहाजातून सागर परिक्रमा केली होती. त्यांच्या परिक्रमेत धोंडे चार ठिकाणी थांबले होते व मी त्यांचा ‘शोर सपोर्ट’ होतो.

गोल्डन ग्लोब रेस ही १९६८ साली प्रथम घेण्यात आली. न थांबता सागर परिक्रमा करणं हा ह्या शर्यतीचा उद्देश होता. त्यात अवघे ९ स्पर्धक होते व त्यातील फक्त सर राॅबिन नाॅक्स हेच रेस पूर्ण करू शकले. एका स्पर्धकाने आत्महत्या केली तर इतरांनी रेस अर्धवट सोडली. आता ५० वर्षांनंतर २०१८ मधे ही शर्यत पुन्हा घेण्यात येत आहे व भारतातून मला बोलावण आलं आहे. ह्या शर्यतीत ३० स्पर्धक असतील व सगळ्यांना १९६८ साली जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं तेच वापरायची परवानगी आहे. म्हणजे सॅटेलाइट फोन, इलेक्ट्राॅनिक नकाशे, जीपीएस वगैरे वापरता येणार नाहीत. माझी बोटं, थूरिया, ही छोटी आहे, साधारण ३२-फुटी. ह्या शर्यतीत मला ७००० नाॅटिकल माइल्स (१३,००० किमी) अधिक पार करायच्या आहेत. तसच माझी बोट अत्याधुनिक नाही. म्हणून मला ही शर्यत पूर्ण करायला ३०० दिवस लागतील असा माझा अंदाज आहे! 

प्र: तुमच्या सेलिंगची (शिडाच्या जहाजाने प्रवास) सुरूवात कशी झाली? तुम्ही वैद्यक किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास पात्र असूनही नौदल कसं काय निवडलत?

उ: डाॅक्टर-इंजीनियर या वाटेला जायचा प्रश्नच नव्हता. मला कायम नौदलातच जायचं होत. मी गोव्याच्या नेवल अकॅडमीमधे प्रवेश घेतल्यावर तेथील सेलिंग टीममधे रुजू झालो व माझ्या सेलिंगची सुरूवात झाली.

प्र: एकट्याने केलेल्या सागर परिक्रमेचा तुमच्यावर बराच प्रभाव पडला असेल ना? तुमचे दृष्टीकोन बदलले असतील… ?

उ: नक्कीच! त्या सफरीचा अनुभव अगदी खोलवर व दीर्घकाळ परिणाम करणारा होता. अनेकानेक दिवस मनुष्याला न पाहता काढणे. सबंध सफरीत कोणाशी थेट संभाषण न होणे. सलग रात्रीची झोप घेता न येणे व दोन-दोन तासच झोपणे… सगळचं आगळं. परत येतांना पिण्याच्या पाण्याची टंचाई. मग समुद्राच्या पाण्यात शिजवलेला भात. नेहमीच्या जीवनापासून मला लांब घेऊन जाणारा अनुभव होता तो. पण त्यामुळे मनातील धास्ती, भिती, संकोच दूर झाले.

प्र: मग सफरी आधीचे तुमचे मित्र, नातेसंबंध… जुळवून घेणं काहीसं कठीण झालं का?
उ: अजिबात नाही. सगळी नाती टिकून आहेत. कशाला बिघडतील?

प्र: तुमची १५१ दिवसांची एकाकी सफर म्हणजे टाॅम हॅंक्सच्या ‘कास्ट अव्हे’ चित्रपटासारखी वाटते. त्यात त्याला जसं परत माणसात आल्यावर वेगळं वाटतं तसं काहीसं तुम्हालाही वाटलं का?

उ: तसं म्हणाल तर, हो, मला ही परत ॲडजस्ट करायला वेळ लागला खरा. तशी सफर तुम्हाला पूर्णपणे हलवून टाकते…

प्र: त्या सफरीनंतरच्या एका मुलाखतीत तुम्ही म्हणाला होतात की कसं तुम्हाला रस्त्यावरील मोठमोठ्या जाहिराती, आधुनिक उपकरणांची दुकानं बघून वाटलं की माणूस आपल्या गरजा वाढवतो व एका दुष्टचक्रात अडकतो…

उ: मी सैन्यात रुजू झाल्यापासून काटकसर करायचो. थोडे पैसेही शिलकीत पडले पण आजच्या वाढत्या महागाईत ते फार कमी वाटतात. असो. आजही मी विचार न करता उगाचच धाडसाची कामं करत नाही. उलट ‘ॲडवेंचरस’ कामातून मी काल, आज व उद्या ह्यांचा आदर करायला शिकलो. मला वाटतं प्रत्येकाने सूज्ञपणे बचत करावी, आयुष्य सुरक्षित करावं पण जगण्यास अर्थ मिळेल असंही काही करायचा प्रयत्न करावा.

प्र: समुद्र सफरीत कधी आजारपण…?

उ: किरकोळ आजारपणं झाली पण गंभीर असं काही नाही. सफरीवर निघण्या अगोदर नौदलाच्या डाॅक्टरांनी मला अनेक औषधं बांधून दिली व ती कशी घ्यायची ह्याचीही सविस्तर माहिती दिली. 
तसंही, सैन्य तुम्हाला कणखर बनवतं व सर्वसामान्यांना गंभीर वाटणाऱ्या अनेक गोष्टी सैनिकांना साध्या वाटतात. 
तरीही, येणाऱ्या रेससाठी मी एक ‘मास्टर्स मेडिकॅर कोर्स’ केला आहे.

प्र: एकाकी सफरीत कधी पायरेट्सचा (समुद्रावरील लुटारू) धोका जाणवला?

उ: नाही. आशियाई समुद्रांत पायरसी वा चाचेगिरी फारशी उरलेली नाही. तिचा नायनाट करण्यात भारतीय नौदल आघाडीवर आहे. पायरेट-जहाज बुडवणारं पहिलं दल म्हणून भारतीय नौदल ओळखलं जातं. त्यांनी गल्फ आॅफ एडन मधे हे काम फत्ते केलं होतं. 

प्र: ह्या सगळ्या व्यापात तुम्ही तुमच्या नौदलातील प्रशासकीय जबाबदाऱ्या कशा सांभाळता?

उ: मी माझ्या कामावरील जबाबदाऱ्या चोख बजावत आलो आहे. सोलो व्हाॅयेजवरून आल्याआल्या देखील मला दोन परीक्षा द्यायच्या होत्या. त्या मी दिल्या आणि उत्तीर्णही झालो. तसच, अगदी नजीकच्या काळापर्यंत मी नॅश्नल एंटरप्राइज असोसियेशनचा खजिनदार म्हणून कार्यरत होतो. ह्या असोसियेशनचा हेतू सेलिंगला प्रोत्साहन देणं आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर सेलबोट्स किंवा शिडाच्या जहाजांच्या दोन शर्यती आयोजित केल्या. २०१४ पर्यंत भारतात सेलिंग फारसं होत नव्हतं. पण २०१६ च्या शर्यतीत १८२ स्पर्धकांनी भाग घेतला होता!

प्र: गोल्डन ग्लोब शर्यतीसाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? आणि ह्यासाठी लागणारा निधी तुम्ही कसा उभा करत आहात?
उ: माझी वैयक्तिक अशी काही वेगळी तयारी सुरू नाही. मी फक्त माझ्या बोटीच्या बांधकामावर लक्ष ठेवून आहे. गोव्याच्या ॲक्वेरियस शिपयार्ड मधे माझी बोट बनत आहे. नौदलाने मला वेळेची सूट दिल्यामुळे मला गोव्याला गरज पडेल तसं जाणं शक्य होत आहे. 
ह्या रेससाठी मला अष्टपैलू असणं गरजेचं आहे. बोटं लांब पल्ल्यासाठी तयार आहे की नाही हे मला स्वत:ला ओळखता आलं पाहिजे. मग त्यासाठी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजीनियर बरोबरच प्लंबर, कारपेंटर ह्यांची कामं समजून घ्यावी लागतात. तसच स्वत:साठी डाॅक्टरही व्हावं लागणार आहे. निधी अजून जमा झालेला नाही. बोट शर्यतीपर्यंत घेऊन जायला मला चार कोटी रुपायांची गरज आहे. त्यानंतर अन्न, पाणी ई. साठी पैसे हवेत. जास्त पैसे उभे करता आले तर ‘डीहायड्रेटेड’ पदार्थांची पाकिटे नेईन नाहीतर फक्त डाळ-तांदुळ असं धान्य न्यावं लागेल. सरकारकडे मागण्यात अर्थ नाही. प्रशासकीय बंधनं इतकी आहेत की त्या शर्यतीचा नादच सोडावा लागेल. खाजगी कंपन्या पैसे देत नाहीत कारण त्यांना ह्यात नफा दिसत नाही. 

प्र: आम्हाला खात्री आहे तुमची हिम्मत व जिद्द यामुळे निधी जमा होईल. बरं, ह्या शर्यतीनंतर काय प्रयोजन आहे? आणखी एक पुस्तक लिहाल का? ‘इन्स्पिरेश्नल गुरू’ म्हणून दौरे कराल ?

उ: सध्या तरी माझ्या डोक्यात फक्त ही रेस आहे. पुढचं काही ठरवलं नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर पुस्तक लिहिणं हे फार मेहनतीचं काम आहे; त्याला बराच वेळ लागतो. तसच, आपल्या देशात पुस्तकांच्या दुकानांपेक्षा सिनेमागृहं जास्त आहेत. 

मी अनेक ठिकाणी भाषणं दिली आहेत. पण तुम्ही म्हणता तसं ‘टाॅक सर्किट’ मधे मला रस नाही. एक छोटीशी मिळकत ही की, केरळच्या शालेय पुस्तकात माझ्यावर एक धडा आहे त्यामुळे अनेक मुलांना आता मी माहीत आहे (हसत…)

प्र: ही बाब अजिबात छोटी नाही. ह्याबद्दलही तुमचं विशेष अभिनंदन! 
इतकी धाडसी कामं केल्यानंतर तुम्ही अंतराळात पाऊल ठेवाल का? म्हणजे मंगळग्रहावर सामान्या लोकांना नेण्याच्या गोष्टी होत आहेत…

उ: मी बहुतेक जाणार नाही. मला अंतराळाचं काही वावगं नाही. पण माझं पाण्याशी जास्त जवळचं नातं आहे. तिथे अजून खूप काही करण्यासारखं आहे. 

प्र: सेनादल व सामान्य नोकरी-धंदा ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

उ: ही तुलना आज फारशी गरजेची राहिलेली नाही. पूर्वी अनेक जण नोकरी मिळत नाही म्हणून पोलीस वा सैन्यात भरती व्हायचे. पालकांनाही फक्त, “मुलाला नोकरी लागली का?” असच विचारलं जायच. कुठे लागली हे तितकसं महत्त्वाचं नसे. आता सैन्यदलातही पगार वाढले आहेत. तसच सैन्य तुमची व तुमच्या परिवाराची चांगली काळजी घेतं. एक सैनिक हा सर्वसामान्यांपेक्षा मनाने व शरीराने अधिक सक्षम असतो; अनेक लहान मोठ्या प्रसंगांना तोंड द्यायला तयार असतो. ह्यामुळे सैन्यातली नोकरी खाजगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा मला आकर्षक वाटते. 

प्र: बदलतं तंत्रज्ञान व टॅब-मोबाइल ही मुलांची गरज बनत चालली आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटत?

उ: प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात. आज चुटकीसरशी आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. पण संगणक इ. चा वापर आणि परस्पर संभाषण व संपर्क ह्याचा समतोल साधायला हवा.

… अभिलाष सागर परिक्रमेवरून परतले तेव्हा त्यांचं स्वागत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलं. ह्या प्रसंगी अभिलाष यांनी राष्ट्रपतींना एकच विनंती केली होती: “सर, मी पुन्हा एक चक्कर मारून येऊ का?”!!

ह्या आधुनिक सिंदबादच्या सफरी अखंड चालू राहोत हीच आमची शुभेच्छा!!

- केशव पाटणकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा