गम्मत

एकदा काय गम्मत झाली, तुम्हाला सांगू का, 
सुट्टीत मुले मामाकडे रहायला गेली होती, बरं का!

म्हणून ठरवले लाड करून घ्यायचा आलाय मौका, 
हट्टाने टांगून घेतला झाडावर एक झोका. 

वजन माझे पेलेल का हा, आली अशी शंका, 
नवऱ्याला म्हटले, ‘देतोस का हळूहळू झोका’. 

त्याने असलेला जोर काढून दिला असा धक्का, 
की वाटले हा आहे झोका की वादळातली नौका?

वाकडातिकडा जोरात हिंदकळू लागला तिच्यासारखा, 
वाटले पाय वर जाऊन, सटकून खाली पडतेय का? 

म्हटले स्वारीच्या इराद्यात नाही ना कसला धोखा, 
की सुंठीवाचून खोकला गेल्याच्या विघ्नसंतोषाची शंका?

क्षणार्धात माझ्या काळजाचा चुकला की तो ठोका, 
तेव्हापासून झोक्याचा घेतलाय मी चांगलाच धसका. 

वाटले नसते हट्ट करण्याचे आता वय उरले आहे का, 
बिचाऱ्या नवऱ्यावर का उगीच घ्या नसती शंका?

पडून कंबर मोडली तर कोणाला वेळ आहे का, 
म्हटले मुले परतण्याआधी काढून टाका झोका. 

असले खेळ त्यांच्या दृष्टीने आऊटडेटेड नाहीत का, 
आधुनिक उपकरणांचे त्यांच्यासारखे मला ज्ञान आहे का?

बघितले पाहिजे मला व्हॉट्सऍप, स्काईप जमतेय का?
वा व्यायाम म्हणून गंगनम स्टाईलची एखादी स्टेप जमतेय का?


- प्रतिमा जोशी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा