गर्दीत सापडलेली माणसं!

आपल्याला आयुष्यात लाखोंनी माणसं भेटतात. काही लोक मित्र बनतात तर काही सहकारी! काही नातलग असतात तर काही अगदी सख्खे! काही लोकांच्या नावाला नात्याचं लेबल नसलं तरी खूप जवळचे वाटतात. तर काही लोक नात्याहून अधिक जवळची माणसं बनून आपल्या आयुष्यात स्थान निर्माण करतात. प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला काही तरी मदत केलेली असतेच अशातला भाग नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधे आपणास काहीतरी धागा सापडलेला असतो जो कुठेतरी आपणास जरूर पकडून धरावासा वाटतो. तो धागा त्यांच्या जिद्दीचा असो वा माणुसकीचा, त्यांच्या जीवन शैलीचा असो वा त्यांनी भोगलेल्या दु:खाचा. आपण तसं बनण्याची परीस्थिती जरी उद्भवली नाही तरी ती व्यक्ती मनात खोलवर घर करून राहते. कायम स्मरणात राहते. 

बऱ्याच वर्षांपुर्वी मी मुंबईत नोकरीच्या निमीत्तानं रहात होतो. त्या वेळी एकटाच असल्यामुळं तीन चार मित्रांमधे एक फ्लॅट घेऊन मी रहात होतो. त्यामधे एक मित्र होता विजय. कायम हसतमुख असायचा. एका मोठ्या कंपनीत तो इंजिनीयर होता. त्याच्या क्षेत्रात तो प्रवीण होता. माझ्यापेक्षा वयानं थोडासा मोठा होता. आम्हा मित्रांमधे कदाचित तोच सर्वाधिक कमवत असावा. घारे डोळे, स्वच्छ दाढी, केस कायम छान विंचरलेले, कपडे टापटीप, गव्हाळ वर्ण, शरीरयष्टी एकदम फिट आणि चेहऱ्यावर कायम स्मित हास्य. एखाद्या हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व! त्याच्या अस्तित्वानं मनात एक उत्साह जागृत होत असे. तो संध्याकाळी दमून जरी आला तरी त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत असे. आम्हा मित्रांची करियरची सुरवातीची धडपड आम्हाला अतिशय त्रास देणारी होती. पण त्याच्या उपस्थितीमधे सर्व गोष्टी सोप्या वाटत असतं. त्यानं कधीच कोणता सल्ला दिला नाही किंवा मार्गदर्शनही केले नाही. तरीपण त्याच्या मधील सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत इतका मोठ्ठा होता की तो सर्व विवंचना विसरण्यास भाग पाडीत असे. त्याचं पुण्याला घर होतं. प्रत्येक रविवारी तो पुण्याला जायचा. आम्ही त्याच्या परतण्याची वाट बघत असू. त्याच्याकडं गंभीर विषय बदलून वातावरण हसतं खेळतं करून दाखवण्याची कला होती. कधीतरी बोलताना तो सांगत असे की त्याची बायको, दोन वर्षाचा मुलगा आणि आई पुण्यात असतात. त्यांना भेटण्यासाठी तो दर रविवारी पुण्याला पळायचा. 

एकदा पुण्याहून आल्यावर बराच अंतर्मुख आणि गप्प गप्प वाटला. विचारलं असता काही नाही रे असं सांगून चेहऱ्यावर स्मित आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी काळजी दडलेली मला दिसत होती. त्याला थोडा बोलता केल्यावर त्याची व्यथा कळली. मुलाच्या जन्माच्या सहा महिने आधी त्याची बहीण आणि तिचा नवरा एका मोठ्या अपघातात गेले होते. तो धक्का त्याला खूपच मोठा होता. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे बहिणीला एक मुलगा होता. तो केवळ एक वर्षाचा होता. त्याच्या नशिबानं तो वाचला पण बिचारा अनाथ झाला. विजय आणि त्याच्या बायकोनं खूप प्रेमानं त्याला जवळ केलं. विजयची आई पण खुष झाली. सर्वकाही सुरळीत चालू होतं. सहा महिन्यांनी विजयला मुलगा झाला. विजयची नोकरी पुण्याहून मुंबईला बदलली. आता बहिणीच्या मुलाला आई व बायकोच्या ताब्यात ठेऊन याला मुंबईला येऊन राहणं गरजेचं झालं. बायको स्वत:च्या मुलात अधिक गुंतत गेली आणि आईला तिचं वागणं खटकायला लागलं. पुण्याच्या प्रत्येक भेटीमधे दोघी एकमेकीं विरूद्ध पाढे वाचू लागल्या. विजयला त्यांच्यापेक्षा अधिक काळजी लागली होती ती त्या कोवळ्या जीवाची. बिचाऱ्याची काहीही चूक नसताना नशिबानं विचित्र भोग वाढून ठेवले होते. विजय परीस्थिती समोर हतबल झाला होता. त्याला आता मोकळेपणानं स्वत:च्या मुलावर प्रेम करणंसुध्दा अपराधीपणाचं वाटू लागलं होतं. आई आणि पत्नी दोघींची भूमिका योग्य वाटत होती. या वेळच्या त्याच्या पुणे भेटीत दोघींनी त्याला सोक्षमोक्ष लावायला सांगितला होता. त्याची ती कहाणी ऐकून मी तर स्तंभितच झालो. त्याला सल्ला द्यावा किंवा मदत करावी एवढा मी मोठा किंवा अनुभवी मुळीच नव्हतो. काही वेळातच तो पुन्हा सावरला आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित झळकले. आत लपलेले दु:ख नाहीसे झाले. नेहमी प्रमाणे विषय बदलून त्याने वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्या या स्मित हास्यामागे केवढे कठीण प्रश्न लपले आहेत याची मला जाणीव झाली. प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास असतात पण त्यासाठी समोर येणारा प्रत्येक क्षण दु:खात घालवणे योग्य नाही. 

काही दिवसात मी नोकरीच्या निमीत्ताने मुंबई सोडून दूर निघून गेलो. विजयचा फारसा संपर्क राहिला नाही. त्यानं हा महाकठीण प्रश्न कसा सोडवला हे मला कळलं नाही. मला खात्री आहे त्यानं नक्की योग्य निर्णय घेतला असणार.

नोकरीच्या निमीत्ताने बऱ्याच देश विदेशच्या लोकांबरोबर माझा संपर्क आला. पुर्वी फक्त क्रिकेटच्या मैदानावर किंवा जाहीरातीत दिसणारी गोरी माणसं माझ्या हातात हात देऊन बोलू लागली. त्यांच्या बद्दल वाटणारे कुतूहल संपून ती माणसं पण आपल्या सारखी हाडा मासाचीच बनलेली आहेत याचा शोध लागला. 

अशाच अनेक गोऱ्यांमधून चांगली लक्षात राहिलेली व्यक्ती म्हणजे मथियाज. माझ्या जर्मनी मधील प्रोजेक्टच्या काळात याच्याशी संपर्क आला. त्यावेळी जर्मनीमधे लिपझीग नावाच्या एका सुंदर व टुमदार शहरात आम्ही रहात होतो. जर्मन भाषेचा आम्हाला गंध नसल्यामुळे केवळ मथियाज हाच आमचा बोलवता धनी बनला होता. अगदी मीठ साखरे पासून ते खोकल्याच्या औषधापर्यंत त्याचीच मदत होत होती. सुरुवातीस एका अनामिक भीतीनं आम्ही त्याच्यापासून थोडे अंतर ठेऊनच होतो पण हळू हळू आमचा चांगला परीचय झाला. मथियाज हा वयानं पंच्चावन वर्षांचा. तरीपण तरतरीत व्यक्तिमत्त्व. तरूणांना लाजवेल असा फिटनेस. गोरा म्हणण्यापेक्षा मी त्याला गुलाबी अधिक म्हणेन. मिश्किल स्वभाव, चौकस बुध्दी, वागण्यात कमालीची मार्दवता दिसून येत असे. मदतीसाठी सदैव तत्पर असे. तसं इंग्रजीचं ज्ञान जरा कमी असल्यामुळं त्यानं फोनवर जर्मन ते इंग्रजी भाषांतराचं ॲपच ठेवलं होतं. बोलताना अडखळला तर तो फोनवर शब्द बघून पुढं बोलत असे. जर्मन संस्कृती, प्रगती यांचा त्याला सार्थ अभिमान होता पण त्यानं कधीही कोणत्याही इतर देशांना अथवा धर्माला कमी लेखलं नाही. हिंदू धर्माबद्दल त्याला अतिशय कुतूहल होतं.

भारतीयांच्या विविधतेबद्दल त्याला कमालीचं कौतुक होतं. तो कायम संपूर्ण युरोपची भारत देशाबरोबर तुलना करीत असे. त्याचे कुटूंब आणि माझे कुटूंब आम्ही बऱ्याचदा छोट्या मोठ्या पिकनीकला जात असू. त्याच्या प्रमाणेच त्याची पत्नी आणि दोन मुले अतिशय उत्साही होते. त्याच्या पत्नीने माझ्या सौ कडून काही भारतीय पदार्थ शिकून घेतले. त्यांच्या लग्नाला पंचवीसहून अधिक वर्षे झाली होती. या वयात सुध्दा त्याचा फिटनेस वाखाणण्याजोगा होता. मी तर आश्चर्यचकितच झालो ज्यावेळी मला कळलं की तो दर रविवारी वीस ते पंचवीस किलोमीटर पळून येतो. शिवाय रोज संध्याकाळी तो आणि त्याची दोन मुलं सायकल वरून पाच दहा किलोमीटरची रपेट मारून यायचे. प्रोजेक्ट चालू असतानाच तो दोन दिवस गायब झाला. परतल्यावर त्यानं सांगितलं की तो मॅरॅथाॅन पळायला गेला होता. तब्बल ४२ किलोमीटर पळून आला होता. ते अंतर त्यानं पुर्ण केलं यामधे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्याच्या या वयातसुध्दा तरूणांना लाजवेल असा उत्साह भरलेला दिसत होता. आमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तो स्कीईंग ला जाणार होता. तो त्याचा अतिशय आवडता खेळ प्रकार. त्याचे स्कीईंगचे ठरल्यानंतर तो उत्साही दिसत होता! लहान मुलाप्रमाणे तो सतत त्याच विषयी सर्वांना सांगू लागला. आम्हाला तर त्याने ऑफीसमधेच स्कीईंगचे धडे दिले. कंबरेत कसे वाकायचे, पायावर किती दाब द्यायचा, थांबायचे कसे, पुढे कसे जायचे सर्व गोष्टींचे साभिनय सादरीकरण आमच्यासमोर झाले. वय वाढलं म्हणून माणूस म्हातारा होत नसतो, त्याचं मन त्याला तरूण ठेऊ शकते याचं तो मुर्तिमंत उदाहरण होता. आजही तो क्वचित कधीतरी ऑफीसच्या कामा संदर्भात संपर्कात येतो पण त्याचा लाभलेला सहवास मात्र मी कधीच विसरू शकत नाही. त्याचं "गुनटाग!" (सुप्रभात) असं घोगऱ्या आवाजातलं अभिवादन आजही माझ्या चांगलंच स्मरणात आहे. 

काही माणसं ही आपल्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नसतो तर नियतीनं जणू त्यांची नेमणूकच केलेली असते. त्यांच्या अस्तित्वाचा कालावधी हा किती हे फारसं महत्वाचं नसतं पण त्यांचा परीणाम आपल्या मनात खोलवर रूजलेला असतो. त्यांना आपण विसरणे अशक्य असते. माझ्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती अगदी अपघातानेच आली. मी पुण्याहून कोल्हापूरला माझ्या कारने चाललो होतो. माझ्या बरोबर सौ आणि माझ्या दोन मुली होत्या. मोठी साधारण सहा वर्षांची होती तर छोटी फक्त सात आठ महिन्यांची. आमचा प्रवास गाणी ऐकत, गप्पा मारत असा मस्त मजेत चालू होता. मी पण गाडी चालवण्याचा आनंद घेत ताशी ऐंशी ते शंभर वेग राखून होतो. पुणे ते कराड हा प्रवास आमचा तसा छान झाला. पण आता मोठी मुलगी कंटाळल्यामुळे तिनं सतत “बाबा, अजून किती वेळ?” हा प्रश्न चालू केला. तिला समजावून सांगतच माझे गाडी चालवणे चालू होते. छोटी झोपल्यामुळे सौ तिच्या देखरेखीमधे व्यस्त होती. कराडच्या उड्डाण पुलावर माझी गाडी चढू लागली. समोर एक अतिप्रचंड वाहन संथ गतीने जात होते. त्यामुळे माझ्या वाहनाचा वेग मंदावला. दरम्यान माझ्या मागून अजून एक ट्रक येताना मला दिसला. पुढच्या वाहनाला ओलांडून पुढं जावं असा मनात विचार आला म्हणून मी माझी गाडी थोडीशी उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मुलीबरोबर बोलता बोलता मागून येणाऱ्या ट्रकचे भानच राहिले नाही. काही कळायच्या आत मागच्या ट्रकने माझ्या गाडीला बाजूने एक जोराचा धक्का दिला आणि तुफान वेगात पुढं निघून गेला. माझ्या गाडीला हा धक्का भलताच मोठ्ठा होता. गाडीच्या उजव्या भागाचा संपूर्ण चेंदामेंदा झाला होता. गाडी १८० अंशात गर्रकन उलटी फिरली. माझ्या दोन्ही मुली कशा आहेत, पत्नी कशी आहे याचा मला अंदाजच येत नव्हता. मला काही झालंय का नाही हे सुध्दा कळत नव्हतं. कदाचित सेकंदाच्या सुक्ष्म अवधी मधे काहीतरी अति प्रचंड घडलेलं होतं. 

माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. माझे पाय लटपटू लागले. गाडी उलट्या दिशेने घसरू लागली. माझ्या कानावर पत्नीच्या आणि मुलींच्या किंचाळण्याचा आवाज पडला. मी धडपडायचा प्रयत्न केला. हात लांब करून हँडब्रेक लावला. आसपासचे लोक धावत आले. कोणीतरी दरवाजा उघडून आम्हाला बाहेर काढले. मला तर मुलींची आणि पत्नीची काळजी लागली होती. पण त्यांना समोर उभे असलेले पाहून त्या नीट असाव्यात असा विश्वास वाटला. दोघींना अतिशय किरकोळ खरचटलेलं होतं. आश्चर्य म्हणजे छोट्या मुलीला साधा ओरखडा पण नव्हता. मी पण माझ्या पायांवर उभा राहिलो होतो. एका माणसानं आम्हाला थोडा धीर दिला. आम्हाला रस्त्यातून बाजूला येण्याची त्यानं विनंती केली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सिमेंटच्या दुकानात त्यानं खुर्च्या घालून आम्हाला बसवलं. बिसलेरी पाणी देऊन आम्हाला शांत केलं. मला तर काय घडतंय काहीच समजत नव्हतं. मी फक्त त्या माणसाचं निमूटपणे ऐकत होतो. छोट्या मुलीच्या केसात काचांचे बरेच तुकडे पडले होते. त्यानं सौ. च्या निदर्शनास आणून देऊन ते साफ करायला सांगितलं. जवळच्या दुकानातून मोठीच्या हातात एक आईसक्रीम आणून दिलं. माझ्या जवळ येऊन त्यानं शांतपणे इंन्शुरन्सची चौकशी केली. कागदपत्रे गाडीतच आहेत कळल्यावर त्यानं पुन्हा रस्त्यावर जाऊन ते घेऊन आला. जवळच्या पोलिस स्टेशनमधे फोन करून त्यानं अपघाताची वर्दी दिली आणि इंन्शुरन्स कंपनीला फोन करून घडलेला वृत्तांत सांगितला. 

थोड्याच वेळात पोलिस आणि इंन्शुरन्सचा माणूस तिथे पोचले. त्या सर्वांना सगळी उत्तरं तोच देत होता. अगदी मोजके प्रश्न माझ्यापर्यंत येत होते. त्या दोघांची सर्व कारवाई पुर्ण होईपर्यंत आम्ही तिथंच बसून राहीलो. त्याच्या सांगण्यानुसार मी काही कागदपत्रांवर सह्या करीत होतो. तो जे काही करतोय ते फक्त मी पहात बसलो होतो. त्यानं दुसऱ्या एकाच्या मदतीने माझी गाडी कडेला आणली आणि त्या सिमेंट च्या दुकानदाराला तिथं लावू देण्यास विनंती केली. या सर्व घटनाक्रमात किती वेळ गेला मला काही कळलेच नाही. आम्ही कुठं जाणार याची चौकशी करून त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाचा बंदोबस्त केला. माझ्या गाडीतले सर्व सामान त्यानं त्या गाडीत चढवले आणि माझ्या गाडीची किल्ली माझ्या खिशात टाकून मला शांतपणे कोल्हापूरला जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग वाल्याला पाठवून गाडी घेऊन जाण्याचा सल्ला पण दिला. 

मला त्याचा प्रत्येक सल्ला मौलिक वाटत होता. कोल्हापूरला घरापर्यंत त्या गाडीवाल्याने सोडले. मी काही पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी त्याने ते स्वीकारले नाहीत. त्याने विचारले की ती तुम्हाला बसवून देणारी व्यक्ती कोण? माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मध्यम वयीन, पांढरा मळकट शर्ट, राखाडी पँट, थोडी स्थूल देहयष्टी, काळावर्ण, तोंडात मावा तंबाखूचा तोबरा, केस तेलकट चोपडलेले, डोळ्यावर मोठ्ठा गाॅगल, पायात जुनी चप्पल, भाषा अशुद्ध असा काहीसा त्याचा अवतार डोळ्यासमोर येत होता. त्या व्यक्तीचं नाव काय आणि त्यानं मला मदत का केली याचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. दुसऱ्या दिवशी गाडी आणायला गेलो असताना त्या दुकानात त्या व्यक्तीबद्दल चौकशी केली. त्यांनापण त्याच्या बद्दल काहीच कल्पना नव्हती. अशा माणसालाच देवमाणूस म्हणतात याचा मला प्रत्यय आला. 

- संदीप कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा