व्यायाम एक जीवनशैली

माझा २९ किंवा ३० वा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे गिफ्ट प्रेझेंट कार्ड सर्वकाही मला मिळाले नवऱ्याकडून. पण त्याचबरोबर त्याने एक वाक्य पण म्हटले, "तुला अजुन पुढची ६० वर्ष जर चांगल जगायचे असेल तर व्यायाम चालू कर". 

त्याने ते बोललेले वाक्य तो नंतर विसरलाही असेल पण माझ्या मनांत ते घर करुन गेले. त्या वाक्याचा अर्थ मी जेंव्हा आज पण लावते तेंव्हा मला आजही असे जाणवते की त्या मागे त्याचा उद्देश होता मी फिट रहाण्याचा आणि एक निरोगी जीवन जगण्याचा.

त्या दिवसानंतर मी जिम लावली. माझा मुलगा लहान असल्यामुळे थोडी पळापळ व्हायची माझी पण मी जिम चालूच ठेवली. मलाही हळूहळू व्यायामाचे महत्व कळू लागले आणि व्यायामाची सवय झाली.
माझ्या कामांची गती व चिकाटी वाढली. व्यायामाने मी तरतरीत तर झालेच व त्यामुळे माझ्या दिनचर्येचा तो भाग झाला.

माझ्या नवऱ्याने मला कधीच कुठल्या गोष्टीची आडकाठी केली नाही. तो पण त्याचा व्यायाम करत असतो. खरतर आम्ही दोघेही आम्हाला आवडतील ते व्यायाम करतो. एकमेकांच्या बरोबरच व्यायाम करायला पाहिजे असे बंधन आम्ही एकमेकांना कधीच घातले नाही कारण आम्ही असं मानतो की प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि चालना वेगळ्या असतात. कधीकधी आम्ही सहकुटुंब खेळ खेळतो, फिरायला जातो. माझी मुलेपण भरपूर व्यायाम करतात. हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आहे. त्यांना कदाचित त्याचे महत्व लक्षात आले नसेलही पण मन आणि शरीराला लागलेली सवय त्यांना व्यायाम करायला प्रवृत्त करते आणि त्याच गोष्टींचा उपयोग नंतर जीवनात होतो मग महत्व लक्षात येते.

मी सर्व प्रकारचे व्यायाम केले आणि करते. योगासन , पोहणं , चालणं , जिमनॅशियम, बॅडमिंटन , टेनिस अगदी नृत्य पण! मी किती कॅलरीज जाळल्या त्यापेक्षा मला व्यायाम करण्यातला आनंद जास्ती महत्वाचा वाटतो.
व्यायाम हे आपल्या जीवनाचे एक महत्त्वाचे अंग मानायला पाहिजे. कुठे, कसा, काय आणि केंव्हा हे प्रत्येकांनी आपल्या दिनचर्येनुसार निश्चीत करावे. 

माझ्या आनंदी जीवनाचे सार सगळे व्यायामामध्ये दडले आहे. व्यायामामुळे माझे मन आनंदी राहते व त्या एकांत वेळात (चालताना) मी जप करते, दिनचर्येचा विचार करते व अनेक इतर कामेही लक्षात येतात. मला वाॅक करताना टॉक करायला आवडत नाही. मी गाणी पण ऐकत नाही. मला त्याची गरजच वाटत नाही कारण निसर्गामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपण आनंद घेऊ शकतो. अगदी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे पाहिले, त्यांना गुडमॉर्निंग म्हटले तरी समाधान वाटते. आपल्या या आधुनिक दुनियेत संवाद लोप पावत आहेत. एकटेपण वाढत चालला आहे. एकांत आणि एकटेपण यामधला फरक जाणून घ्यायलाच हवा.

आपले मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आयुष्य आपल्या दिनचर्येवर अवलंबून आहे. आपले मानसिक दडपण, रागीटपणा, काळजी करण्याचा स्वभाव आणि इतरही बऱ्याच गोष्टी सहजच कमी होतील जर आपण व्यायामात आनंद शोधला.

कुठलीही गोष्ट २१ दिवस सलगपणे केली तर ती अंगवळणी पडते. मन ती गोष्ट करायला आपोआप वळते. ती गोष्ट किंवा ती सवय आपल्या दिनचर्येचा एक भाग बनते.
असा हा माझा व्यायामाचा प्रवास असाच "चालत" रहावा आणि इतरांनाही त्यामधून स्फूर्ती मिळावी अशी मी आशा करते!!

- अदिती नितीन देशपांडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा