स्वयंपाकातले अनुभव आणि प्रयोग

प्रत्येक घरातील स्वयंपाकघराचं वेगळं स्थान असतं. म्हणजे कोणाचे मोदक जास्त चविष्ट तर कोणाची पुरणपोळी मऊसूत ही सुप्त स्पर्धा असतेच. स्वयंपाक आणि माझा लग्नापूर्वी फार कमी संबंध यायचा. पावभाजी सारखे काही मोजके पदार्थ करणे, कुकर लावणे किंवा भाजी आणणे इतपतच माझा अनुभव. पुण्यात असताना मंडईतून भाजी आणणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. माझे बाबा मला मजेत म्हणायचे, "संचिता, तुला जरी स्वयंपाक येत नसला तरी हॉटेल मधून ऑर्डर करता येते तुला!"

प्रत्येक क्षेत्रात दिसणारी स्पर्धा आज पाककृती प्रांतातही उतरली आहे . पूर्वी कॉलनीतल्या गणेशोत्सवांनी, सार्वजनिक पूजांनी व अनेक मासिकांनी तर नजीकच्या काळात विविध TV चॅनेल्सवरील स्पर्धांनी पाकं कलेला वाव दिला आहे.

स्वयंपाक करायची वेळ पहिल्यांदा मुंबईला नोकरी निमित्त राहिला लागले तेव्हा आली. सुरुवातीचे दिवस बाहेर खाऊन हौस फिटली. मग तब्येतीवर परिणाम दिसू लागला. त्यातून चांगलाच धडा घेतला. माझ्या दोन मैत्रिणी आणि मी नियमितपणे घरी भाजी करायला लागलो. छोटा गॅस असल्याने पोळ्या करणे शक्य नव्हते, त्यामुळे फक्त भाजी करायचो आणि पोळ्या विकत आणायचो. तरीसुद्धा म्हणावी तितकी स्वयंपाकाची आवड निर्माण झाली नव्हती. तेवढ्या भाजीची रेसिपी आईला फोन करून विचारायची. गरजेपोटी स्वयंपाक, असं चालू होतं. पुण्यात राहतानासुद्धा माझ्यावर स्वयंपाक करायची वेळ फारशी नाही आली. 

आम्ही जेव्हा सिंगापूरला राहायला आलो तेव्हा स्वयंपाकाची खरी ओळख झाली. म्हणजे सुरुवातीला तर खूप धावपळ व्हायची. कधी भाजी तिखट तर कधी मीठ कमी तर कधी कधी खूप ठसका उडायचा फोडणी देताना. खरं दोनच जणांचा स्वयंपाक… पण किती प्रमाण? ह्याचा सुद्धा अंदाज नाही यायचा. भाजी जास्त प्रमाणात झाली तर दोन दिवस तीच भाजी खायचो. पोळ्यांपर्यंत मी पोहोचलेच नव्हते. आम्ही खूप दिवस त्या फ्रोझन पोळ्या खाल्ल्या. मग त्या कशा तब्येतीसाठी चांगल्या नाहीत हे पटल्यावरच पोळ्या करायला लागले. कधी कडक तर कधी कणिक सैल आणि मग अनेक देशांचे नकाशे झाले तेव्हा कुठे पोळ्या जमायला लागल्या. पोळ्या यायला लागल्यावर मात्र स्वयंपाक करण्याचा आत्मविश्वास वाढला. 

स्वयंपाकातली गोडी वाढली. फक्त मॅगी आणि मुगाची खिचडी ह्याच्यापुढे जाऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या जमायला लागल्या. घरी जेवायला बोलावलं कोणाला की आमचा पूर्वी स्टॅंडर्ड मेनू असायचा बटाट्याची भाजी, गाजर हलवा आणि पुरी कारण तेव्हा मला तेवढच नीट यायचं. 

माझे सासरे एकदा मला म्हणाले, "स्वयंपाकातले काही पदार्थ असे असतात जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत पास ऑन होतात. तू ते पदार्थ शिकून घे." तसं आजीकडून मी कैरीची चटणी आणि काकू कडून भरल्या वांग्याची भाजी शिकले! माझ्या आजीनी मला सांगितलं होतं की प्रत्येक माणसाच्या हाताला सुद्धा वेगळी चव असते. लग्नानंतर पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा तिने मला विचारले होते, “करतेस की नाही स्वयंपाक”? स्वयंपाकातल्या बऱ्याच गोष्टी मला माझ्या सासूबाईंकडून शिकायला मिळाल्या. मग तो मऊसूत प्रसादाचा शिरा असो, बेसनाचे लाडू असोत किंवा खमंग टोमॅटोचा सार असो. आजही काही अडलं तर मी त्यांना फोन करून विचारते. 

स्वयंपाकघर ही प्रयोग शाळा सुद्धा आहे. त्यातले सगळेच प्रयोग यशस्वी होतात असं नाही. एकदा मी नानकटाईची बिस्किटं करायचा प्रयत्न केला. त्यात माझा एक इडली कुकर तुटला. त्याला चीर पडून त्याचे दोन तुकडेच झाले अगदी. मग एका मैत्रीणीच्या ओव्हनमध्ये बेक करून आणली बिस्किटं. अलीकडेच मी रोस्टेड पंपकिन सूप बनवायचा प्रयत्न केला. लसूण मायक्रोवेव मध्ये थोडा जास्त वेळ राहिला... झालं! आता तोच जळका वास खूप दिवस झाले तसाच आहे.


अवनीश (माझा मुलगा) झाल्यावर बाळाचा आहार, त्याला जास्ती जास्त चवींशी ओळख करून देणे हे मी करू लागले. त्याच्या आवडी प्रमाणे मी नॉनवेज पदार्थ सुद्धा शिकले. पुण्यात गेलं की बिपीनचा वडा पाव, बेडेकरांची मिसळ, सुजाता मस्तानी, अजूबाची पावभाजी, मनीषाची पाणीपुरी, पेस्ट्री कॉर्नरचे रोल्स आणि पुष्करणीची भेळ ही सगळी यादी आम्ही पूर्ण करूनच येतो परत.

माझी एक मैत्रीण पूर्वी समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायची. ती रोज ब्रेकफास्ट तयार करायची आणि माझ्या नवऱ्याला डबा दिल्यामुळे माझा लंच रेडी असायचा. मग आम्ही दोघी फक्त पदार्थ एक्सचेंज करायचो. त्यामुळे आम्हा दोघींना थोडा जास्त वेळ मिळायचा गप्पा मारायला. असेही थोडे शाॅर्टकट्स असतात आणि थोडा अळशीपणा!! हे काही वेगळं बोलायला नको . मैत्रीण कर्नाटकी असल्यानी मला तिच्याकडून सेट डोसा, टोमॅटो भात, पुदिना भात, बिसिबेली भात असे अनेक भाताचे प्रकार शिकायला मिळाले. मी प्रेग्नन्ट असताना माझी एक मैत्रीण रोज मला संध्याकाळी डबा आणून द्यायची. तिच्या डब्यातले ते गरम गरम आणि तयार पदार्थ खाऊन खूप समाधान वाटायचं. 

सिंगापूर मधले पेपर नूडल्स आणि पेपर चिकन किंवा टॉम-याम सूप असे अनेक पदार्थ इथल्या फूडकोर्ट मध्ये खाऊन पाहावेत असे आहेत. म्हणजे फूड कोर्ट वरून जाताना येणारे वास काही लोकांना अजिबात आवडत नाहीत पण खरं सांगू का मला तो सुगंध अगदी खमंग वाटतो. आमच्या शेजारी चिनी आजी आजोबा राहतात. त्यांची जेवायची वेळ लवकर असल्यानी त्यांच्या घरून बरेचदा संध्याकाळी ५ पासून वेगळे वेगळे खमंग वास येणं सुरु होतं. त्या वासांनी सुद्धा भूक लागते मला. आम्ही त्यांना दिवाळीचा फराळ देतो आणि ते आम्हाला चायनीज न्यू इयरला खाऊ देतात. मग त्यात ते होम मेड लेटर्स आणि केक असं काही देतात. आम्ही त्यांना चिवडा, चकली, लाडू आणि शंकरपाळे असं देतो. आता ६ वर्ष होतील ह्या परंपरेला. विविध खाण्याचे प्रकार आणि शेजारी म्हणून एक बॉण्डिंग अशा खाण्यातूनच साध्य होतं. 

"व्हराईटी इज द स्पाइस ऑफ लाइफ", हे विधान खाण्याच्या बाबतीत अगदी खरं आहे! बेसिक मॅगी आणि मुगाच्या खिचडी पासून ते काही पौष्टिक रेसिपीज् पर्यंत हा मोठा प्रवास झालाय माझा. पुढे अजून ह्या क्षेत्रात शिकायला वाव आहे. स्वयंपाक ही फक्त कला नाही तर तो एक शिकण्याचा प्रवास ठरलाय माझ्यासाठी. माझ्या मनात नेहमी ते बहीणाबाईच्या गाण्यातलं वाक्य येतं, “आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर!” 

- संचिता साताळकर














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा