संगीतकार मदन मोहन: एक आठवण

एक पावसाळी संध्याकाळ होती आणि दूरदर्शनवर साधारण ७:३० वाजता श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम सुरु झाला. अभिनेते मनमोहनकृष्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते आणि सोबत होत्या गानसरस्वती लता मंगेशकर. त्या दिवशी मदन मोहन यांच दुःखद निधन झालं होतं आणि लतादीदी अतिशय खिन्न मुद्रेने त्यांच्या  आठवणी सांगत होत्या.  थोड्या वेळात त्यांनी, ‘यूं हसरतो के दाग मुहब्बत मे धो लिये’ हे करुणरसातील एक गीत सादर केले. 

पाऊस पडत असल्याने मला त्यादिवशी खेळायला काही मिळाले नाही. घरी नुकताच टीव्ही आणला असल्याने दूरदर्शनवर हा कार्यक्रम बघता आला. या कार्यक्रमामुळे माझ्या मनावर एवढे कोरले गेलेले की मदन मोहन हे उच्च दर्जाचे संगीतकार होते. मला मात्र त्यांच्या संगीताची थोडीफार ओळख पत्रकार राजू भारतन व चंदेरी नावाच्या फिल्मी पाक्षिकामुळे झाली. १९८५ ते १९९० या काळात मी चंदेरी नियमित वाचायचो आणि राजू भारतन यांनी मदन मोहन यांच्याबद्दल भरभरून लिहिल होत. त्याकाळात आम्ही मित्र हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉक या प्रकारचे संगीत ऐकत असू; अपवाद, मदन मोहन आणि पंचमदा यांची फिल्मी गीते. 

इंग्रजी भाषेतील Born with a silver spoon in mouth ही म्हण मदनमोहन यांना तंतोतंत लागू पडते. त्यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा १९२४ सालचा जन्म आणि सुरुवातीची काही वर्ष त्याच देशात गेली. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनउ, मुंबई आणि देहरादून ह्या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात काही रमले नाही आणि १९४६ साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.

सैन्यात काम करून फिल्मी दुनियेत प्रसिद्ध झालेली आणखी एक व्यक्ती म्हणजे गीतकार आनंद बक्षी. 

सैन्य सोडल्यावर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या  महान संगीतकारांशी पडली. योगायोगाने, संगीतकार रोशन पण त्याच काळात लखनौ आकाशवाणीवर नोकरीस होते. पण मदन मोहन यांच्यावर खरा प्रभाव पडला तो बेगम अख्तर यांच्या संगीताचा. त्यांची कारकीर्द याच प्रभावामुळे घडली आणि हा प्रभाव शेवटपर्यंत टिकून होता. आकाशवाणीच्या वास्तव्यात त्यांना तेथील महान कलाकारांना ऐकून जे ज्ञान मिळाले तेच त्यांचे संगीताचे शिक्षण म्हणायला हवे कारण संगीताचे रीतसर शिक्षण त्यांना काही मिळाले नाही. फक्त लाहोरच्या वास्तव्यात कर्तार सिंग यांच्याकडून थोडेसे संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. 

फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लतादीदी यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते (duets) गायली. यानंतर ते संगीतकार एस. डी. बर्मन आणि श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले. त्यांना संगीत देण्याची पहिली संधी मिळाली १९५० साली ‘आँखें' या चित्रपटात. चित्रपट काही फार चालला नाही पण काही चोखंदळ रसिकांनी संगीताच्या वेगळेपणाची नोंद जरूर घेतली. 

जेव्हा लता मंगेशकर यांना मदन मोहन यांच्या चित्रपटाकरता गाणार का असे विचारले तेव्हा त्यांचा दोन क्षण विश्वास बसला नाही आणि हसायला आले. याचे मुख्य कारण त्याकाळात मदन मोहन यांची ओळख एक धनिकाचा वाया गेलेले, लहान पोरांबरोबर क्रिकेट खेळणारा पोरगा अशीच होती. आज जेथे वानखेडे स्टेडियम आहे तेथे त्याकाळी एक खुले मैदान होते आणि मदन मोहन तेथे सतत लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत असत आणि त्यांचे वडील याबद्दल अतिशय नाराज असत.

मोठे झाल्यावर जेव्हा जेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी सामने होत, तेव्हा मदन मोहन सामन्यांना नियमित हजेरी देत असत. गॅरी सोबर्स हा त्यांचा आवडता खेळाडू होता. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोणी ओळखीची व्यक्ती भेटली आणि ती त्यांच्याशी संगीतावर गप्पा मारायला लागली तर ते आवर्जून सांगत की हे ठिकाण फक्त क्रिकेटचा खेळ पाहण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे आहे; तुम्हाला संगीतावर काही बोलायचे असल्यास उद्या माझ्या घरी या.

सुरुवातीची पाच सहा वर्षे मदन मोहन यांची संघर्ष करण्यात गेली आणि पहिला चित्रपट गाजला तो ‘भाई भाई’(१९५६). या चित्रपटाची सर्व गाणीही गाजली. मला त्यात आवडलेले एक श्रवणीय गीत आहे, ‘कदर जाने ना’. त्या अगोदर आलेला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातील ‘देख तेरे इन्सान की हालत’ आणि ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत’ ही गाणी गाजली पण इतर गाण्यांची फारशी नोंद घेतली गेली नाही. ‘भाई भाई’ भरपूर चालला आणि मदन मोहन यांना प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटाचा रौप्य महोत्सव (Silver Jubilee) होणार पण मदन मोहन यांचे दुर्दैव आड आले. २५ आठवडे पूर्ण व्हायच्या अगोदर चित्रपट पडद्यावरून काढला गेला आणि पहिल्या रौप्य महोत्सवाकरता मदन मोहन यांना आणखी काही वर्षे थांबायला लागले.

;गीत: ‘कदर जाने ना’

गीत: देख तेरे इन्सान की हालत

त्यानंतर गाणी प्रसिद्ध झाली तो चित्रपट १९५७ साली आलेला ‘देख कबीरा  रोया’ (१९५७). या चित्रपटातील सगळी गाणी गाजली पण आजही ऐकली जातात ती गाणी आहेत, ‘मेरी वीणा तुम बिन रोए’, ‘हमसे आया  न गया’, ‘तू प्यार करे या ठुकराये’ आणि ‘कौन आया मेरे मन के द्वारे’. त्याच्या पुढच्या वर्षी आलेल्या ‘अदालत’ (१९५८) या चित्रपटातली गाणी अतिशय गाजली: ‘यूं हसरतो के दाग मुहब्बत मे धो लिये’ ‘उनको ये शिकायत है के हम’ आणि माझ्या आवडीचे ‘झमिन से हमे आसमान पर बिठा के’.

एरव्ही मदन मोहन यांच्याकडे सृजनशील काम करण्याची स्वतःची अशी प्रतिभा तर होतीच पण त्याकाळात सर्वात लोकप्रीय संगीतकार होते ओंकारप्रसाद नय्यर आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही गाणी त्यांना इच्छेविरुद्ध नय्यर यांच्या पठडीतली करायला लागली. या गाण्यांवर नय्यर यांच्या संगीताचा प्रभाव जाणवतोच. यानंतर गाणी गाजली ‘बैरन नींद न आई’ (चाचा झिंदाबाद १९५९) आणि ‘वोह भुली दासता लो फार याद आ गयी’.

गीत : बैरन नींद न आई


गीत : वोह भुली दासता लो फार याद आ गयी


यानंतर १९६२ साली आलेल्या ‘अनपढ’ या चित्रातील सर्व गाणी गाजली पण चित्रपट फारसा चालला नाही त्यामुळे 'यशस्वी चित्रपटाचे संगीतकार' हा टिळा लागला नाही. ‘अनपढ’ मधील तीन गाणी आजही ऐकली जातात: ‘जिया ले गयो’, ‘है इसी मे प्यार की आबरू’ आणि ‘आप की नजरो ने समझा’. 

यानंतर गाणी गाजली: ‘अगर मुझसे मोहब्बत है’ (आपकी परछाईयां , १९६४) आणि ‘रंग और नूर की बारात’ (गझल’,१९६४). १९६४ साली आलेल्या ‘हकीकत’ चित्रपटातलीही सर्व गाणी लोकप्रीय  झाली आणि त्यातील माझे आवडते गाणे, ‘जरासी आहट होती है’. तसेच त्याच वर्षी आलेला ‘जहाँ आरा’ मधील गाणी लोकप्रीय    झाली: ‘वोह चूप रहे तो मेरे दिल’ आणि ‘फिर वोही श्याम’ आजही ऐकली जातात. त्याच वर्षी आलेल्या ‘शराबी’ चित्रपटातील एक गीत लक्षणीय ठरले, ‘सावन के महिने मे’. या गाण्यावर आणि गाण्याच्या वाद्यसंगीतावर नय्यर यांची छाप लपत नाही. 

पण मदन मोहन यांना खास मान मिळवून दिला तो 'वोह कौन थी' ह्या त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या  ज्युबिली चित्रपटाने. या चित्रपटाचे  सर्व पैलू गाजले आणि संगीतकारात फिल्मफेयर नामांकन मिळाले. या चित्रपटामुळे मदन मोहन पण हिट चित्रपटाचे संगीत देऊ शकतात ही एक गोष्ट पक्की झाली. मास्टरपीस अशी गाणी होती ‘नैना बरसे’ आणि ‘लग जा गले’.
गीत : लग जा गले


त्यानंतर एक चित्रपट आला 'दुल्हन एक रात की’ (१९६६), ज्यातील, ‘एक हसीन शाम को’, हे गाणे अतिशय गाजले. कै. मोहम्मद रफी यांनी मदन मोहन यांची अनेक गाणी गायली आणि कित्येक गाजलीही पण माझ्या मते रफी यांनी गायलेले हे गाणे सर्वोत्तम आहे. 

यानंतर आला ‘मेरा साया’ हा दुसरा ज्युबिली चित्रपट. यातील सर्व गाणी लोकप्रीय झाली आणि आजही ऐकली जातात. ‘नैनो मे बदरा छाये’ हे गाणे  मदन मोहन यांच्या सर्वोत्तम गाण्यापैकी एक आहे ‘तू जहाँ जहाँ चॅलेंगा’ तसेच आशा भोसले यांच्या आवाजातील ‘झुमका गिरा रे’.  

यानंतर चित्रपट येत राहिले आणि काही गाणी गाजली उदा. 'तेरी आखों के सिवा’ ‘चिराग’ १९६९ पण १९७० साली आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळवून दिला, आजही ती गाणी ऐकली जातात. ‘हम है मताए कुचा’, ‘माई री में कैसे कहू’ आणि मदन मोहन यांच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक ‘बैय्या ना धरो’ तसेच ‘हीर रांझा’ (१९७०) आणि ‘बावर्ची’ (१९७२) मधील गाणी पण लोकप्रिय झाली. ‘हसते जख्म’ चित्रपटात ‘बेताब दिल की तमन्ना यही है’ तसेच ‘दिलकी राहे’ (१९७३) चित्रपटात एक सर्वोत्तम गीत होते ‘रस्मे उल्फत’. 

पण या कारकिर्दीच्या अखेच्या टप्प्यात माझ्या  मते एकाच चित्रपटाची गाणी मास्टरपीस म्हणता येतील अशी होती, तो गुलझार यांचा ‘मौसम’ (१९७५). यातील सर्व गाणी आजही ऐकली जातात. ‘दिल ढूंढता है’ दोन वेगळ्या चाली एक करुण रसातील गंभीर आणि दुसरी उडती खेळकर. तसेच ‘रुके रुके से कदम’. 

१९६० च्या दशकात जेव्हा मदन मोहन शिखरावर होते तेव्हा फिल्मी दुनियेतील सर्व गायक/गायिका त्यांची गाणी गाण्यास उत्सुक असत. पण आशा भोसले यांना त्यामानाने कमी गाणी मिळाली आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला शमशाद बेगम तसेच गीता दत्त यांना काही गाणी मिळाली होती पण नंतर त्यांची भिस्त लतादीदी यांच्यावरच जास्त होती आणि एखादे गाणे आशाताई गात असत. गायकांमध्ये सुरुवातीला  तलत मेहेमूद यांना काही गाणी मिळाली. किशोर कुमार आणि मुकेश यांना पण थोडी गाणी मिळाली किशोर कुमार यांचे ‘जरुरत जरुरत है’ हे गाणे त्याकाळी लोकप्रीय झाले होते पण मदन मोहन यांची भिस्त फक्त रफीसाहेब यांच्यावरच होती.

या दशकात जेव्हा मदन मोहन फिल्मी पार्ट्यांना जात, तेव्हा तेथे जमलेले पहिल्या फळीचे निर्माते त्यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक करत. मदिरेचे घोट पोटात गेल्यावर कित्येक निर्माते पुढील चित्रपट तुम्हालाच देणार असे वचन देत पण नशा उतरल्यावर हमखास वचनभंग होत असे. अतिशय संवेदनशील मनाचे मदन मोहन फिल्मी निर्मात्यांचा खोटेपणा स्वीकारू शकले नाहीत. पण त्यांचे मन इतके संवेदनशील नसते तर एवढे चांगले काम त्यांच्या हातून घडले गेले असते का? मदन मोहन यांना फारच थोडे उत्तम निर्मितीमूल्य असलेले चित्रपट मिळाले उदा. ‘वो कौन थी’ किंवा ‘मेरा सया’. मिळालेले अनेक चित्रपट पडले असतील पण गाणी श्रोत्यांनी कायम उचलून धरली.

त्याकाळातील एक लोकप्रीय निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मदन मोहन हयात असेपर्यंत त्यांना कधीच संधी दिली नाही पण त्यांच्या पश्चात तीस वर्षानंतर त्यांच्या ध्वनिमुद्रित चाली वापरून चित्रपट केला ‘वीर झरा’ (२००४). पण त्या गाण्यांवर मदन मोहन यांच्या प्रभाव काही दिसला नाही. 
  
मदन मोहन यांनी साहिर लुधियानवी पासून गुलझार पर्यंत अनेक गीतकारांबरोबर काम केले पण त्यांचे खरे सूर जुळले ते राजेंद्र कृष्ण आणि कैफी आझमी यांच्या बरोबर, पण त्यांनी कधी कुठल्या एक गीतकाराकरता हट्ट धरला नाही. याबाबतीत ते १००% व्यावसायिक (Professional) होते. मदन मोहन यांनी जी गाणी केली त्याची भाषा प्रामुख्याने उर्दू हीच होती पण जेव्हा गीतकार गाणे लिहून आणत ते गाणे ते आपल्या वहीत रोमन लिपीतच लिहीत कारण इतर लिपीची त्यांना सवय नव्हती.

त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र (अण्णासाहेब चितळकर) यांना मदन मोहन गुरुस्थानी मानत आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून अण्णासाहेबांचे हार्मोनियम ते घेऊन आले, नेताना म्हणाले ‘मला तुमच्या सारख्या चाली बांधायच्या आहेत’.  

मदन मोहन यांचे संगीत प्रामुख्याने गझल या प्रकारचे होते. चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार त्यांनी काही उडत्या चालीची आणि पाश्चिमात्य संगीताचा आधार घेऊन पण गाणी केली तसेच कलेच्या आवश्यकतेनुसार संगीतपण वापरले. पण ते खरे रमले ते गझलमध्ये. शास्त्रीय संगीतावर आधारलेली बरीच गाणी त्यांनी बांधली काही उदाहरणे खालील प्रमाणे:

राग रागेश्री - ‘कौन आया  मेरे मन के द्वारे’ (गायक: मन्ना डे, चित्रपट: देख कबिरा रोया)

राग मालगुंजी - ‘उनको ये शिकायत’ (गायिका: लतादीदी चित्रपट: अदालत)

राग भीमपलास - ‘नैनो में बदरा छाये’ (गायिका : लतादीदी, चित्रपट मेरा साया)

राग नंद - ‘तू जहाँ जहाँ चलेगा’ (गायिका: लतादीदी, चित्रपट: मेरा साया) 

राग यमन - ‘जा रे बदरा बैरी जा’ (गायिका: लतादीदी, चित्रपट: बहाना)

राग पहाडी - ‘लग जा गले’ (गायिका: लतादीदी, चित्रपट: वो कौन थी)

माझ्या मते मदन मोहन यांची सर्वोत्तम अशी तीन गाणी आहेत एक ‘लग जा गले’ दुसरे ‘बैय्या ना धरॊ’ आणि तिसरे ‘रस्मे उल्फत’. यांच्यापैकी कोणते एक गाणे सर्वोत्तम म्हणून मला आजवर निवडता आले नाही. 

मदन मोहन यांना देवाघरी जाऊन ४० पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली पण त्यांच्या गाण्यांच्या रूपात आजही ते जिवंत आहेत.
-शैलेश दामले












संदर्भ 
लता मंगेशकर - लेखक राजू भरतं 
अनिल विश्वास ते पंचम - लेखक वसंत पोतदार 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा