महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

विशेष वार्ता

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस हे सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या काही प्रतिनिधींना त्यांनी गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राच्या विकासासंबंधी ज्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि काही प्रश्नांना दिलखुलास उत्तरही दिली. ह्यावेळी इंडियन हाय कमिश्नर माननीय श्री जावेद अश्रफ हे सुद्धा उपस्थित होते. मंडळातर्फे फडणवीस साहेबांना मंडळाची स्मरणिका व अद्वैताची गाणी याच बरोबर पुष्पगुच्छ देण्य़ात आला. ही भेट भारतीय दूतावासातर्फे आयोजित केली गेली होती.




सिंगापूर वार्ता

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा सण. या वर्षी देखील महाराष्ट्र मंडळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला.

२५ ऑगस्ट: चतुर्थीच्या प्रात:काळी साग्रसंगीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली. संध्याकाळी ३०० हून अधिक भाविक गणेश दर्शन व आरतीसाठी उपस्थित होते. संध्याकाळची आरती, प्रसाद व जेवणाच्या कार्यक्रमानंतर बालचमूंची 'किलबिल गाणी' ही मराठी बालगीतांची मैफल सादर करण्यात आली. बाल कलाकारांनी सादर केलेल्या ह्या संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.


२६ ऑगस्ट: संध्याकाळी ‘विविध गुणदर्शन’ ह्या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात GIIS क्वीन्सटाउनच्या सभागृहात झाली. यंदाचा विविध गुणदर्शन हा कार्यक्रम ‘नवरस’ ह्या संकल्पनेवर आधारित होता. विविध वयोगटातील कलाकारांनी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने आपल्या नृत्याविष्कारातून नवरस सादर केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी हाय कमिश्नर माननीय श्री. निनाद देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन आणि स्मरणिका टीमचा सत्कार श्री निनाद देशपांडे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. सभासद व अभ्यागत मिळून ५०० च्या वर लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली.



२७ ऑगस्ट: गणेशोत्सवाचा तिसरा दिवस, रविवार. सकाळी भक्तिभावपूर्ण वातावरणात जोशी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले गेले. १२५ हून अधिक लोकांच्या नादमय स्वरात अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने झाली.


संध्याकाळी मंडळातर्फे भारतातील कवी संदीप खरे व वैभव जोशी यांची गाजत आलेली कवितांची मैफिल 'ईर्शाद' चे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कवितांनी लोकांना खिळवून ठेवले. त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून सिंगापूर मधील शब्दगंध प्रेमींनी स्वरचित कवितांचे वाचनही केले. साहित्य रसिकांनी उत्तम संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला योग्य दाद दिली.


२८ ऑगस्ट: संध्याकाळी 'जे जे उत्तम' साहित्य वाचनाचा कार्यक्रम झाला. ह्या वर्षी शांता शेळके यांचे साहित्य वाचनास होते. यंदा एकूण १८ जणांनी वाचनात भाग घेऊन शांता शेळके ह्यांच्या विविधरंगी साहित्यातील काही निवडक भाग प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. माधव भावेंच्या हस्ते मंडळातर्फे सर्व वाचकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

२९ ऑगस्ट: गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. मंडळातील उत्साही सभासदांनी जल्लोषात साजरा केला. सालाबादाप्रमाणे गणरायाची आरती, प्रसाद झाल्यानंतर श्रींच्या मिरवणुकीची सुरुवात झाली. ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात वाजत गाजत, तालात बाप्पांना पुढच्या वर्षी लौकर यायचा आर्जव सुरु झाला. भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.


दरवर्षी स्थानिक कलाकारांची स्थानिक कलाकारांनी दिग्दर्शित केलेली एकाहून एक दर्जेदार मराठी नाटके सादर करण्याची परंपरा महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने यंदाही कायम ठेवली. ९ सप्टेंबर, संध्याकाळी खू सभागृह, सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल येथे नाटकाचा प्रयोग झाला. 'मास्टर माइंड' या मूळ गुजरातीत गाजत असलेल्या नाटकाचा पहिलाच मराठी प्रयोग मंडळातर्फे सादर झाला. सर्वच कलाकार आपल्या रंगतदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. साधारण ३०० प्रेक्षकांनी उपस्थित राहून नाटकाला उत्तम प्रतिसाद दिला.





आगामी कार्यक्रम

ममंसि तर्फे आयोजित, कार्निवल सिनेमा अंतर्गत १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मराठी चित्रपट उबुंटूचा शो १०९ बीच रोड शाॅ थिएटर, १८९७०२ येथे सादर करण्यात येणार आहे.


२२ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वा. सिंगापूर पाॅलिटेक्निक ५०० डोव्हर रोड, सिंगापूर, १३९६५१, येथे दिवाळी निमित्त ममंसि प्रस्तुत करत आहे, अजय अतुल यांच्या याड लावणाऱ्या संगीतावर आधारीत ममंसि कलाकारांचा सुमधुर व धडाकेबाज आॅर्केस्ट्रा ‘सैराट झालं जी’.


तिकीट बुकिंगसाठी इथे क्लिक करा : http://mmsingapore.yapsody.com 

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ह्यात बॅडमिंटन, बोलिंग, इंडोअर क्रिकेट, चेस ह्या खेळांचा समावेश करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा