चेहरा

आठवितो आजही तुझा, 
प्रथम भेटीतला चेहरा, 
वाचावेसे पुस्तक जसा, 
अन कळी समान लाजरा. 

भाव देखणा, नयन बोलके, 
स्मितहास्य नेसून निरागससे, 
पारदर्शक प्रांजळ मनाची, 
साक्षच जणू देतसे. 

चंचलसी चेतना, 
गालांवर रेंगाळत होती, 
हलक्या नाजुकशा बटांना, 
हवाच सांभाळत होती. 

मित्र झाला क्षणात तो, 
मनी येउनी भिडला, 
अल्पावधीच्या भेटीतच, 
हृदयी थेट पोहोचला. 

तीक्ष्ण कटाक्ष बाणांनी, 
ठसा काळजावर कोरला, 
उमेदीच्या झरोक्यातून,
मज दिशे सन्मुख झाला. 

कसे म्हणू सोज्वळ तया, 
मनचि चोरुनी गेला, 
निष्पाप तरी म्हणू कसे, 
घायाळ हा दर्दी केला. 

उत्कंठेने उद्याकडे, 
हळूच होता डोकावित, 
नेशील मज तू कोण दिशे, 
होता जणू विचारित. 

आजही पाहतो नित्य, 
चेहरा तोच खराखुरा,
प्रयत्नेही न त्यावरी, 
बसे मुखवटा दुसरा. 

परिवर्तला उद्या जरी, 
मजसाठी राहील नव्यापरी, 
धूसर न होऊ देणार, 
प्रतिबिंब जे ते अंतरी.

दिसता क्षणीच तो मजला, 
जीवनी फुलला मोगरा, 
आजही सांभाळुन आहे,
पहिल्या वहिल्या भेटीतला 
मोहक गोड़ तुझा चेहरा ...... 


- नंदकुमार देशपांडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा