माझी सखी - बोटॅनिकल गार्डन

अचानकच आमचं सिंगापूरला यायचं ठरलं. सुरुवातीचे काही महिने आम्ही शांग्रीला अपार्टमेंट मध्ये राहिलो. अम्मानच्या स्थिरावलेल्या आयुष्याची सवय झालेली होती. इथे आलो तेव्हा आम्ही भावनिक दृष्ट्या अगदी ढवळून निघालो होतो. ओळखीचं असं कुणीच नव्हतं. नविन गाव, नविन डाव. सगळं पहिल्यापासून सुरु ...... 

हळूहळू शांग्रीलाच्या बाहेर पडणं सुरु केलं. आधी ऑर्चर्ड रोडशी ओळख करून घेतली. एक दिवस पायी फिरायला गेले तर बरेच लोक जॉगिंग करताना, पायी फिरताना दिसले. मी पण उत्सुकतेपोटी थोडी पुढे गेले तर बोटॅनिकल गार्डनचे गेट दिसले. त्या दिवशी गेटपर्यंतच गेले. नंतर एक दिवस गेटच्या आत गेले आणि मी अक्षरशः बोटॅनिकल गार्डनच्या प्रेमातच पडले. अगदी Love at First Sight. तिथलं स्वान लेक, स्प्रिंग वॉक, जिंजर गार्डन, रेन फॉरेस्ट, हिलींग गार्डन, इवोल्युशन गार्डन, कॅक्टस गार्डन, बोन्साय गार्डन, हेलिकोनिया वॉक, सिम्फनी स्टेज आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्किड गार्डन असं एक एक करत सगळं बघितलं. जसजशी मी जात गेले, तसतशी माझी गार्डनशी मैत्री होत गेली. मला जेव्हा एकटं वाटायचं तेव्हा मी गार्डनमध्ये जायचे. तिथली फुलं, फिरणारी-धावणारी-व्यायाम करणारी माणसं बघून माझं एकटेपण पळून जायचं. अथर्वच्या सिंगापूरमधल्या शाळेचा पहिला दिवस होता, तेव्हाची माझी काळजी, अस्वस्थता गार्डेननेच पाहिली. खूप घरं शोधूनही मनासारखं घर मिळत नसल्याची निराशा गार्डन मधल्या झाडांनीच बघितली. जेव्हा घर मिळालं, तेव्हा तो आनंदही तिथल्या झाडाखाली बसून मी साजरा केला. त्या काळात आलेली दिवाळी, नाताळ,नवीन वर्ष, सगळंच गार्डेनच्या साक्षीने साजरं झालं. 

४ जुलै २०१५ ला जेव्हा गार्डनला 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट' म्हणून मान्यता मिळाली तेव्हा मला अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकाला सन्मान मिळाल्यावर जसं वाटतं ना, तसंच वाटलं. माझा ऊर अभिमानाने भरून आला. त्यावेळी गार्डनला ऑर्किडच्या फुलांनी नव्या नवरीसारखं सजवलं होतं. खूप सुंदर दिसत होतं गार्डन. १५-२० दिवसांपूर्वी गार्डन मधलं २७० वर्षं जुनं झाड उन्मळून पडलं तेव्हादेखील मला जवळच्या आप्ताचा मृत्यू झाल्यासारखं वाटलं. गार्डनने माझं दोन्ही हात पसरून स्वागत केलं. गार्डन ही माझी सखी आहे. तिने मला सिंगापूरमध्ये स्थिर-स्थावर व्हायला मदत केली. तिच्यामुळेच मी स्वतःला सांभाळू शकले. ती माझ्या चांगल्या-वाईट अनुभवांची साक्षी आहे. सध्या मी गार्डनमधे 'हेरिटेज टूर गाईड' बनण्यासाठी ट्रेनिंग घेत आहे. गार्डनने मला दिलेल्या साथीची परतफेड नाही म्हणणार मी पण ते नातं कायम असंच राहावं यासाठी हा एक प्रयत्न. 

नातं काय फक्त माणसांशीच असतं? निसर्गाशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, झाडांशी, फुलांशी आणि गार्डनशीदेखील आपलं खूप जवळचं नातं असू शकतं. मी तर अनुभवलंय, तुम्हीही जाऊन बघा बागेत! 


- माधुरी देशमुख-रावके


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा